Monday, June 21, 2010

मृत्युपूर्वीची मजा... ’हसतील त्याचे दात दिसतील’


कल्पना करा की तुम्ही (अर्थात दोघांनी) आयुष्याच्या साठ वर्षांत खूप मेहनत केली आहे. तुम्हाला एकही अपत्य नाही. व अचानक एक दिवस तुम्हाला समजते की सहा महिन्यात तुमचा मृत्यू होणार आहे. मग, आता या काटकसर करून जमविलेल्या संपत्तीचे करायचे काय? हा प्रश्न तुमच्या दोघांच्याही समोर उभा ठाकला तर तुम्ही काय निर्णय घेणार? हीच पटकथा घेवून अभिजित फिल्मसने ’हसतील त्याचे दात दिसतील’ हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, राजू फुलकर.
चित्रपटात मुख्य पात्रे दोनच, राजा आणि राजी. (नावं छान आहेत.) अशोक सराफ व शुभांगी गोखले यांनी या भूमिका साकारल्या आहेत. दोघांचाही राजा-राणीचा संसार असतो. पण, त्यांना मूलबाळ नसते. आयुष्यभर काटकसर करून त्यांची मोठी कमाई असते. मग, एक दिवस अचानक त्यांना समजते की, राजीला श्वसनाचा कसला तरी आजार आहे. ती फारफार तर सहा महिने आणखी काढू शकते. आता, राजी जर सहा महिन्यात गेली तर राजाही तीच्याशिवाय फार काळ जगू शकत नव्हता. मग, करायचे काय? यावर ते एक मार्ग काढतात. या सहा महिन्यांमध्ये सर्व संपत्ती चैनीत घालवायची. सर्व हौस मौज करून घ्यायची व मगच मरायचे. राजा तर राजीनंतर विष पिऊनही मरायला तयार होते. आता या सहा महिन्यांत दोघेही राजा-राजी काय काय मजा करून आपले पैसे संपवितात, हे चित्रपटात चित्रित केले आहे. अशोक सराफ असल्याने हा चित्रपट कॉमेडी बाज असणारा असेल, यात शंका नाही. कथेत फारसा दम वाटत नसला तरी अशोक सराफ व शुभांगी गोखले या दोघांनीही उत्तम अभिनयाने चित्रपट किमान एकदा तरी बघण्यालायक बनविला आहे. राजीची मध्यम वर्गीय मानसिकता तीने उत्तम वठविली आहे.
चित्रपटाच्या अंतिम टप्प्यात कथेला वळण देण्याचे काम किशोरी आंबिये करते. खरं तर चित्रपटाचा काथा-सार तीच सांगते. दिग्दर्शकाला नेमके काय सांगायचे आहे, ते मात्र समजते, यातच कथेचे काही प्रमाणात यश आहे. काही ठिकाणी तो कंटाळवाणा वाटत असला तरी एकदा बघण्यासारखा आहे. चित्रपटाला असे विसंगत नाव का दिले तेच समजत नाही. कदाचित इतर कोणतेही शीर्षक सुचत नसल्याने कदाचित या नावाची निवड केली असावी.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com