Saturday, April 6, 2013

मराठीतूम मल्याळम (भाग-२, व्यंजनांची ओळख)

आज आपण मल्याळम भाषेतील व्यंजनांची ओळख करून घेऊयात. भारतातील सर्वच भाषांमध्ये समान व्यंजने वापरली जातात. त्यांत अगदी चार-पाच टक्क्यांचा फरक दिसून येतो. मल्याळम व मराठीतील व्यंजने व त्यांचे उच्चार हे सारखेच आहेत. फक्त मल्याळम मध्ये ’क्ष’ व ’ज्ञ’ नाहीत. त्या जागेवर ’ष’ व ’ळ’ चा उच्चार असणारे वर्ण आहेत. त्यांचा उच्चार मूळ मल्याळम भाषिकालाच विचारावा लागेल! तत्पूर्वी खालील व्यंजनांची माहिती पाहा. 
 
क = ക
ख = ഖ
ग = ഗ
घ  = ഘ
च = ച
छ = ഛ
ज = ജ
झ = ഝ
ट = ട
ठ = ഠ
ड = ഡ
ढ = ഢ
ण = ണ
त = ത
थ = ഥ
द = ദ
ध = ധ
न = ന
प = പ
फ = ഫ
ब = ബ
भ = ഭ
म = മ
य = യ
र = ര
ल = ല
व = വ
श = ശ
ष = ഷ
स = സ
ह = ഹ
ळ = ള
ऴ =

ऱ =

Thursday, April 4, 2013

छे


गुजराती भाषेत ’आहे’ ला समानार्थी शब्द ’छे’ आहे. त्यामुळे त्याचा खूपदा वापर वाक्यरचनेत होत असतो. याशिवाय बंगाली व नेपाळी भाषेतही याच प्रकारचा शब्द वापरण्यात येतो. या ’छे’ वरून काही विनोद हिंदी व मराठी चित्रपटांत तयार झाले होते. त्यांचा हा थोडा गोषवारा.

प्रसंग १:
फू-बाई-फू
झी मराठी फू-बाई-फू मध्ये दुसऱ्या वा तिसऱ्या पर्वामध्ये विकास समुद्रे व आरती सोळंकी यांचा एक ऍक्ट होता. त्यामध्ये विकास समुद्रे हा एक कोकणी माणूस असतो व आरती ही एक गुजराती मुलगी असते. दोघेही आपापल्या भाषेत संवाद साधत असतात. आरतीच्या तोंडी सतत छे.. छे.. सारखे शब्द बाहेर पडत असतात. तेव्हा विकास तीला म्हणतो, ’तुमच्यात काय फक्त ’छे’च असतं काय...? सात-आठ नसतं काय...?’

प्रसंग २:
चित्रपट चुप-चुप के
राजपाल यादवचे विनोद या चित्रपटात खूप प्रसिद्ध झाले होते. गुजराती येत नसल्याने काही वाक्यांचा तो वेगळाच अर्थ काढतो व त्यामुळे त्याला विनाकारण मार खावा लागतो. त्यानंतर शक्ति कपूर त्याला सोडवून जेवणासाठी बाहेर बसवतो. राजपालला जेवणात वाढलेली पोळी खूपच जाड असल्याने तो आचाऱ्याला म्हणतो, ’इसको सूखा कैसे खाऊ? इस के साथ अचार मिलेगा?’
आचारी गुजराती असल्याने त्याला वाटते की, अचार म्हणजे आणखी चार पोळ्या हा मागतो आहे. मग तो राजपालला चार पोळ्या आणखी मोजून देतो.. एक, बे, त्रैण, चार...
आधीच वैतागलेला राजपाल अर्थात बांडिया उद्वेगाने म्हणतो, ’ये क्या....!!!! छे...!!!’
आचाऱ्याला वाटते, याला सहा पोळ्या हव्या आहेत. तो आणखी दोन पोळ्या त्याला देतो... पांच... छह...!!!

प्रसंग ३:
चित्रपट नवरा माझा नवसाचा
सचिन-सुप्रियाच्या एसटीने गणपतिपुळे प्रवासाची ही विनोदी कहाणी आहे, हे सर्वांना माहितच असेल. त्यांच्या बसमध्ये एक पारशी म्हातारी बसलेली असते. तीच्या दोन मुलींबद्दल सांगताना ती म्हणते...’मारी डिकरी छे ना ती चिपलूनमां छे.... अन बिजी डिकरी छे ना ती मानगांवमां डाक्टर छे...’
यावर सचिन म्हणतो, ’...आणि तीजी?’
’त्रीजी नथी... दोनच छे...’
कंडक्टर अशोक सराफ हे सर्व ऐकत असतो. त्या म्हातारीचे शेवटचे वाक्य ऐकुन तो उद्गारतो, ’दोनच आहेत आणि.. छे...छे म्हणतीये...!!!’.

Wednesday, April 3, 2013

आयपीएल आणि पाणी

आयपीएलच्या सामन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून सध्या युद्ध सुरू झाले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या सामन्यांसाठी दर सामन्याला आठ लाख लिटर पाणी लागणार आहे. असे १६ सामने महाराष्ट्रात होतील. म्हणजेच वानखेडे स्टेडियम, मुंबई व एमसीए स्टेडियम, गहुंजे (पुणे) येथील सामन्यांत आयपीएलच्या काळात ऐन उन्हाळ्यात सुमारे पन्नास लाख लिटर पाणी लागेल. एका अर्थाने महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना या लाखो लिटर पाण्याची नासाडी होणार आहे. सामन्यांसाठी वापरले जाणारे पाणी हे सार्वजनिक असल्याने हा पाण्याचा अपव्ययच आहे. त्यावर तातडीने उपाय करण्याची गरज आहे. बीसीसीआयचे राजीव शुक्ला हे महाराष्ट्रातून खासदार म्हणून गेल्याने त्यांनीच या बाबीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. केवळ आयपीएल मधून पैशाचा वर्षाव होतो म्हणून दुष्काळी परिस्थितित पाण्याचा अपव्यय करू नये. भविष्यातही पाण्याच्या बाबतीत मैदानांनी स्वयंपूर्ण होणे, ही काळाची गरज ठरणार आहे. इंग्लंडच्या कौंटी क्लबमधील मैदाने तसेच ऑस्ट्रेलियातील गाबा स्टेडियम व विंडेजचं किंग्ज्टन ओव्हल ही मैदाने रेनवॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबवितात. असे प्रकल्प आपल्या राज्यातही राबविता येतील. पावसाळ्यात मैदानातील व मैदानाच्या छतावरील पाणी साठवून त्याचा वापर मैदानासाठी करता येऊ शकतो. बडोद्याच्या मैदानात अशा प्रकारची योजना राबवली जाते. पुढील काळात आपल्यालाही त्याची गरज भासणार, हे निश्चित!

Tuesday, April 2, 2013

मराठीतून मल्याळम (भाग-१, स्वरांची ओळख)

दक्षिण भारतात केरळमध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे मल्याळम होय. आपल्यापासून हा मुलूख तसा दूरच असल्याने त्यांची भाषा आपल्याला तसे समजणे अवघडच. परंतु, मल्याळम भाषेतील चित्रपट पाहताना मी ही भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. माझे हे थोडॆसे ज्ञान मी माझ्या नव्या ब्लॉग पोस्टच्या शृंखलेने तुमच्या समोर मांडणार आहे. एखादी नवी भाषा शिकायला काय हरकत आहे? तेव्हा तुम्ही द्राविडांच्या या प्रदेशात मल्याळमने सुरूवात करा. तुलनेने ही भाषा खूप सोपी व खऱ्या अर्थाने ’वळणदार’ आहे, हे तुमच्या ध्यानात येईलच. ह्या पूर्ण शृंखलेच्या अखेरीस मी एक मल्याळम ब्लॉग लिहिल. तेव्हा समजून घ्या.

अ - അ
आ - ആ
इ - ഇ
ई - ഈ
उ - ഉ
ऊ - ഊ
ए - എ
ऐ - ഐ
ओ - ഒ
औ - ഔ
अं - അം
अ: - അ:

Monday, April 1, 2013

संगणक माहिती मोजमाप करणारी एकके


कोणतीही गोष्ट मोजण्यासाठी विविध एककांची (युनिट्स) ची गरज पडते. संगणकीय माहितीसाठा अर्थात मेमरी मोजण्यासाठीही संगणकतज्ज्ञांनी एककांची निर्मिती केली आहे. यातील केवळ तीन-चार एककेच आपण जाणतो. कारण, आजची संगणक मेमरी त्यापुढे जाऊ शकलेली नाही. अगदी संगणक अभियंत्यांनाही या मोठ्या एककांची माहिती नाही. संगणकीय मेमरीचा डोलारा पाहता येत्या दहा वर्षांत या एककांची गरज आपल्याला पडू शकते. रजनिकांतच्या ’इंदिरन’ अर्थात ’रोबोट’ या चित्रपटांत स्वत:चे configuration सांगण्यासाठी तो मेमरीच्या एका एककाचा उल्लेख करतो. ते एकक कोणते ते खालच्या यादीत पाहून तुम्हीच ठरवा.

१ बिट (० किंवा १) = बायनरी डिजिट

८ बिट्स = १ बाईट

१०२४ बाईट्स = १ केबी (किलोबाईट्स)

१०२४ केबी = १ एमबी (मेगाबाईट्स)

१०२४ एमबी = १ जीबी (गीगाबाईट्स)

१०२४ जीबी = १ टीबी (टेराबाईट्स)

१०२४ टीबी = १ पीबी (पेटाबाईट्स)

१०२४ पीबी = १ ईबी (एक्साबाईट्स)

१०२४ ईबी = १ झेडबी (झेटाबाईट्स)

१०२४ झेडबी = १ वायबी (योटाबाईट्स)

१०२४ वायबी = १ बीबी (ब्रॉंटोबाईट्स)

१०२४ बीबी = १ जीऑपबाईट्स

जीऑपबाईट्स हे संगणक मेमरी मोजण्याचे सर्वात मोठे एकक आहे!