Saturday, November 26, 2016

माझी ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरी... आमच्या कन्येचं १४ वर्षांपूर्वी ठरविलेलं नाव. संत ज्ञानेश्वरांची भावार्थदिपिका वाचली तेव्हाच ठरवलं, माझ्या मुलीचं नाव ’ज्ञानेश्वरी’ ठेविल. चौदा वर्षांनी हे स्वप्न साकार झालं. आम्हाला मुलगीच व्हावी, अशी दोघांचीही प्रबळ इच्छा होती. त्यामुळेच कदाचित आमची इच्छापूर्ती झाली असावी.
अनेकांना वाटत होतं... इतक्या आधीपासून तू तयारी केली होतीस! खरं तर तशी तयारी वगैरे काही नव्हतीच. रश्मीची सोबत लाभली व आमचे विचारही जुळू लागले. तेव्हा तीला मी ही गोष्ट सांगितली होती. फेब्रुवारी मध्ये आमच्या बाळाच्या आगमनाची चाहूल लागली अन तेव्हापासून आम्ही तीला तीच्या नावाने बोलावू लागलो. परिचयातील अनेकांना वाटत होतं की, मुलगाच होईल. पण, शेवटी आईवडिलांची इच्छाशक्तिच महत्वाची असते, हे आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. घरात अनेक वर्षे मुलीचा जन्म झाला नव्हता. ज्ञानेश्वरीच्या रूपाने कित्येक वर्षांनी लक्ष्मीची पाऊले लक्ष्मीपूजनाच्या आधीच घरात आली. माझा व तीचा जन्मदिवस एकच! तीचा जन्म माझ्या वाढदिवशी व्हावा, अशी आमची इच्छा होतीच. पण, त्या गोष्टी आमच्या हातात नव्हत्या. ऑक्टोबर महिन्यात घरातील व परिचयातील सर्वाधिक जणांचे वाढदिवस असतात. प्रत्येकजण रश्मीला स्वत:च्या वाढदिवसाची आठवण करून द्यायचा... याच दिवशी तुझ्या बाळाचा जन्म होऊ दे! पण, आमच्या मुलीने माझ्या वाढदिवशीच या जगात पाऊल ठेवायचे निश्चित केले होते. जन्मापासूनच ती तीच्या बाबाला साथ देऊ लागली होती. आदल्या दिवशी अर्थात २४ ऑक्टोबरला रश्मीला रूग्णालयात दाखल केले तेव्हापासून माझ्याही हृदयाची धडधड वाढीस लागली होती. परंतु, सर्व काही ठिक होईल यावरही विश्वास होताच. रात्रभर तब्बल आठ तास रश्मीच्या कळा चालू होत्या. त्या रात्री मी प्रथमच स्त्रीच्या मातृत्वाचा आविष्कार अनुभवला. सकाळी सहा वाजुन पन्नास मिनिटांनी नर्सने सांगितले.... ’तुम्हाला मुलगी झाली’ व तीने बाळाला माझ्या हातात दिले. त्याक्षणी असलेल्या भावना मी आज शब्दात व्यक्त करू शकत नाही. काही गोष्टींवर विश्वास ठेवायला कठीण जाते, अशीच अवस्था रश्मीचीही झाली होती. आयुष्यात पहिल्यांदा इतक्या छोट्याश्या बाळाला हातात घेतले होते. आनंदाचा तो परमोच्च क्षण होता.
प्राचीन काळात मातृसत्ताक असलेली भारतीय पद्धती कालांतराने पितृसत्ताक पद्धतीकडे झेपावली. याच कारणाने स्त्रीचे स्थान दुय्यम मानले गेले. आपली मुलगी कालांतराने आपले नाव लावणार नाही, हे माहित असल्याने भारतीय समाजात मुलाला वंशाचा दिवा मानलं जातं अन मुलीला परक्यांचं धन म्हटलं जातं. रश्मीचं नाव बदलण्याचं कोणीतरी सुचवलं तेव्हा मी तीचं नाव बदलणारच नाही, हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. अनेकांनी यावर नाकं मुरडली. ती तीचं नाव न बदलता राहू शकत नाही का? समाजाचा दृष्टिकोनच आम्हाला पूर्णत: चुकिचा वाटतो. आमच्या मुलीच्या बाबतीतही आम्ही ही गोष्ट ठरवली. तीच्या आईने तीला नऊ महिने पोटात वाढवलय. म्हणजे तीच्या जन्मात तीच्या आईचंच जास्त योगदान आहे. माझी मुलगी ’ज्ञानेश्वरी रश्मी तुषार’ असे दोघांचेही नाव लावेल. ज्या परंपरांमुळे समाजात चुकीची मानसिकता तयार होते, त्या परंपरांचा उपयोग तरी काय? स्त्रीला समाजामध्ये बरोबरीचं स्थान देण्यासाठी प्रत्येकाने या मानसिकतेचा अंगिकार करायला हवा. त्या दृष्टीने हे आमचे पुढचे पाऊल आहे...

Sunday, October 16, 2016

वाचन प्रेरणा दिवस - 2016


मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात 'वाचन प्रेरणा दिवस' आम्ही शाळेत साजरा केला. यावेळेस शाळा होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाणोली (ता. मावळ, जि. पुणे). कामशेत पासून सात किलोमीटर डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे छोटं खेडं अन ग्रुप ग्रामपंचायत असलेलं गाव. डोंगरराजींच्या निसर्गरम्य परिसरात गावाची शाळा आहे. सातवी पर्यंतच्या शाळेतील पटसंख्या जास्तीत जास्त साठ. आम्ही पोहोचलो तेव्हा 'वाचन प्रेरणा दिवसाची' सुरवात झालेली होती. पहिलीपासूनची मुलं वाचनात दंग होऊन गेलेली... रांगेत शिस्तीत बसलेली. मी आल्यावर जराही विचलीत न होता पुस्तके एकाग्रतेने वाचणारी. तेव्हाच त्यांने मन जिंकून घेतलं होतं. कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी त्यात उत्साहाने भाग घेतला. एक गोष्ट ध्यानात आली की, ही मुलं हुशार आहेत फक्त त्यांना घरून हवा तसा पाठिंबा मिळत नसावा. अर्थात तेही साहजिकच. शहरातील मुलांकडे अतिलक्ष देण्याची संस्कृती त्यांच्याकडं पोहोचली नसावी. इंग्रजीचे ज्ञानही त्यांना चांगलं आहे. आपल्या पाठिंब्याची याच मुलांना खरोखरच गरज आहे, याची जाणीव झाली. मराठी माध्यमाच्या शाळांसाठी सरकारने बऱ्याच उत्तम योजना आणल्यात. शिक्षकही चांगले आहेत. पण, पालकांची मनःस्थिती आड येते. ग्रामीण भागात शाळाबाह्य मुले शिक्षकांना अक्षरशः पकडून आणावी लागतात. ही परिस्थिती सुधारण्यासाठी व देशाची भावी पिढी सक्षम होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची खरी गरज आहे. ग्रामीण शाळांमधील मुलं व त्यांनाच समंजस समाजाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. हा पाठिंबा केवळ आर्थिक मदतीने होणार नाही तर त्यांना आपला वेळ दिल्यानेही पूर्ण होऊ शकतो. आजच्या 'इंटरनॅशनल' मुलांप्रमाणे ही मुलं रट्टा मारणारी नाहीत. त्यामुळे ज्ञानाधारित पिढी घडविण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. कलाम सरांच्या वाढदिवशी अशा विद्यार्थ्यांशी बोलण्याचे भाग्य मला लाभले, त्यामुळे दिवस सत्कारणी लागला असेच म्हणावे लागेल.