Wednesday, January 23, 2019

व्हॉट इफ!

शाळेत असताना असे झाले तर, तसे झाले तर अशा प्रकारचे बरेच निबंध लिहिले होते. परंतु त्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव होता. अर्थात याला विज्ञानाची जोड दिली तर कसे प्रश्न तयार होतील, या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न एका युट्यूब चॅनेल मध्ये घेण्यातच करण्यात आलेला आहे. पृथ्वीला दोन सूर्य असते तर? पृथ्वी सूर्यापेक्षा मोठी असती तर? पृथ्वीवरचे पाणी अचानक नाहीसे झाले तर ? सूर्य अचानक नाहीसा झाला तर? पृथ्वी सपाट असती तर? पृथ्वीला एखादा लघुग्रह धडकला तर? पृथ्वीचे दोन्ही ध्रुव अदलाबदली झाली तर? डायनासोर आजही अस्तित्वात असते तर? पृथ्वीचे परिवलन थांबले तर? परग्रहवासी खरोखर अस्तित्वात असले तर? सर्व महासागरांचे पाणी एकाच वेळी नष्ट झाले तर? जगातले सर्व कीटक नष्ट झाले तर? आपण रिसायकलिंग थांबवली तर? आपण झोपायचं थांबवलं तर? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हे युट्युब चॅनेल बनवले गेले आहे त्याचं नाव आहे 'व्हॉट इफ!'
खगोल मंडळात जी सुसूत्रता आहेत इतकी जबरदस्त आहे, की त्याची आपल्याला पूर्ण सवय झाली आहे. पण ही सुसूत्रता जर नष्ट झाली तर काय होईल? याचा आपण कधी विचारच केलेला नाहीये. या सर्व प्रश्नांची उत्तरे यूट्यूब च्या चॅनेलमधून अतिशय उत्तम रित्या दिली आहेत. त्यांनी केलेल्या उत्तम ॲनिमेशनमुळे ती अतिशय समर्पक रित्या मांडली झालेली मांडली गेली आहेत.  त्यामुळे ज्या गोष्टींचा आपण विचारच करत नाही, त्या गोष्टींचा अतिशय सखोल विचार करायला आपण सुरुवात करतो. शिवाय विज्ञान किती अनाकलनीय आणि अद्भुत आहे याची जाणीवही होते.

https://www.youtube.com/channel/UCphTF9wHwhCt-BzIq-s4V-g


Tuesday, January 22, 2019

फर्स्ट मॅन

पृथ्वीवरील सजीवांची उत्क्रांती हा अनेक वर्षांपासून अनेक शतकांपासून खूप खूप मोठा गुढ प्रश्न होता. पृथ्वीवरती सजीव आणि विशेषत: मनुष्य प्राणी कसा जन्माला आला? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी बराच प्रयत्न केला. शतकानुशतके मनुष्यप्राण्याची उत्क्रांती होत गेलेली आहे, हे सर्वप्रथम चार्ल्स डार्विनने सिद्ध केले. अश्मयुगातल्या होमो सेपियन आणि होमो इरेक्टस ते आजपर्यंतचा मानवाचा प्रवास आपण फक्त इतिहासाच्या पुस्तकातच वाचत आलोय. परंतु 'क्युरिऑसिटी स्ट्रीम' या युट्युब चॅनेल ने यावर नुकतीच डॉक्युमेंट्री बनवलेली आहे. मानवी उत्क्रांती नक्की कशा प्रकारे झाली आहे, हे या दीड तासाच्या डॉक्युमेंटरीमध्ये अतिशय उत्तमरित्या विषद करण्यात आलेले आहे. मानवाच्या उत्क्रांती विषयी जर मनात 'क्युरिऑसिटी' असेल तर युट्युब वरची ही डॉक्युमेंट्री नक्की बघा.... फर्स्ट मॅन... 

Saturday, December 22, 2018

मशीन लर्निंग: नव्या युगाची नांदी

मानवी आकलनक्षमता संगणकाला प्रदान करण्याच्या संकल्पनेतून संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेचा उगम झाला. यायचं पुढचा टप्पा म्हणजे 'मशीन लर्निंग' होय. शक्यता आणि संभाव्यता या दोहोंचाही वापर निर्णय प्रक्रियेत करून घेणारे शास्त्र म्हणजे मशीन लर्निंग होय. संगणक मानवासारखा विचार करू शकतो का? असेल तर त्याचे निर्णय अधिक अचूक करण्यासाठी व वेगवान करण्यासाठी मशीन लर्निंग चा उदय झालाय, हे निश्चितपणे सांगता येईल. 


विविध घटना, रचना, संकल्पना व माहिती यांमध्ये एक प्रकारचा सांख्यिकीय सिद्धांत दडलेला असतो. अर्थात, हे सर्व गणिताच्या नियमाप्रमाणे चालतात. परंतु, हे नियम सर्वांनाच लागू होतील असेही नाही. यात कोणता विषय, कोणाला, कश्या पद्धतीने लागू पडतो? याचे उत्तर मशीन लर्निंग देते.
निसर्ग ही मानवाला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे. जर आपण म्हणतो की, सर्व काही निसर्ग नियमांप्रमाणे चालते तर संगणकही या नियमांचा उपयोग का नाही करू शकत? 'निसर्ग प्रेरित संगणन' ही संकल्पना यातूनच उदयास आली. निसर्गाने शिकवलेले धडे संगणकाने योग्य पद्धतीने गिरवले आहेत. किंबहुना संगणक हेच 'निसर्ग प्रेरित संगणनाचे' पहिले उत्पादन मानता येईल. निसर्ग आमचा गुरु... असं मानून अद्ययावत संगणकीय तंत्रज्ञानाची नवी वाटचाल चालू आहे. मशीन लर्निंग हा त्यातलाच एक भाग. यातील काही पद्धतींची तुलना अगदी आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाशी, चौमितीशी, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाशी व डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताशी केली तर वावगे ठरणार नाही. हे शास्त्र समजायला किचकट वाटत असले तरी, ती भविष्यातील नांदी ठरेल, इतपत क्षमता त्याच्यात आहे. अगदी भविष्यही सांगू  शकतील अश्या पद्धती मशीन लर्निंगच्या निर्णय प्रक्रियेत समाविष्ट आहेत.
संगणकाने मानवाला अधू केलं असं म्हटलं जातं. अर्थात, ते संगणक वापरणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. परंतु, नवनिर्मिती प्रक्रियेत व मानवी जीवनाच्या पुढील प्रवासात मानवाचाच मेंदू वापरून ते वेगाने वाटचाल करत आहे, असे दिसते. मागच्या लाखो वर्षांत जी क्रांती झाली, तीच काही शतकांमध्ये आजच्या काळात झाली. त्याहून वेगवान क्रांती पुढच्या दशकानुदशके चालेल ती या मशीन लर्निंग तंत्रज्ञानामुळेच, हे ध्यानात ठेवायला हवे.

Tuesday, December 11, 2018

आजोबा अन एम एच १५

त्या दिवशी बालगंधर्वच्या सिग्नलला लाल दिवा लागला म्हणू थांबलो होतो. तोच शेजारी एक आजोबा (अर्थातच पुणेकर) येऊन थांबले. माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते.
'कशी.... चालवतच आणली का?' त्यांनी प्रश्न केला.
या प्रश्नाने त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर तयार झाले. 


'नाशिकहून गाडी चालवतात आणली का?' त्यांनी पुन्हा प्रश्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आले की, आजोबांना माझ्या गाडीचा क्रमांक दिसला होता. पण, त्यांना मी गाडी पुण्यात कशी आणली, यात मात्र किती रस होता!

मी मात्र स्मितहास्य करून 'नाही' असे सहज सोप्पे उत्तर दिले. पण, मनातल्या मनात 'नाही... डोक्यावर घेऊन आलो', असे उत्तर आधीच तयार झाले होते. टिपिकल पुणेकरांसोबत त्यांचाच सारखे बोलायची सवय आता हळूहळू होऊ लागलीये. कदाचित त्या आजोबांना 'एम एच १५' हा क्रमांक नाशिकचा आहे... अन ते मला माहित आहे... असेही सुचवायचे असेल... म्हणून हा खटाटोप असावा. 'आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं' ... त्यातलाच हा भाग...!!!

Tuesday, December 4, 2018

राजगड हिंदीतून

गडांचा राजा अन राजांचा गड म्हणजे राजगड...
शिवरायांचा सर्वात अधिक सहवास लाभलेला किल्ला म्हणजे राजगड...
स्वराज्यातील प्रतापगडाचे युद्ध, लाल महालातील चढाई, सुरतेचा छापा, आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह यासारख्या घटनांचा राजधानी म्हणून साक्षीदार असलेला दुर्ग म्हणजे राजगड...
या किल्ल्याविषयी बऱ्याच दिवसांपासून हिंदी लेख लिहावा असे बऱ्याच दिवसांपासून मनात होते. ही इच्छा मी एक जानेवारी २०१३ मध्ये पूर्ण केली. सदर लेख इथे http://tusharkute.blogspot.com/2013/03/blog-post_8071.html वाचता येईल. तदनंतर दोन वर्षांनी मी हाच लेख महाविद्यालयाच्या वार्षिक मासिकासाठी पाठविला होता. लेख दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिंदी संपादकीय मंडळातून मला फोन आला. त्यांना वाटत होते की, सदर लेख मी 'रायगड' या किल्ल्यासाठी लिहिला असावा पण चुकून त्यात 'राजगड' असं नाव आलंय. आपल्यालाच लोकांना आपल्या किल्यांविषयी अथवा इतिहासाविषयी माहिती नाही, याचे मला अर्थातच फारसे विशेष वाटले नाही. लेख अखेर प्रसिद्ध झाला! त्यावेळी त्यावर मला अनेक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तुमच्या प्रतिक्रिया व सूचनांचे स्वागत यावेळीही आहे.
http://tbkute.blogspot.com/2015/11/hindi_17.html

Monday, October 15, 2018

वाचन प्रेरणा दिवस - 2018

दर वर्षी प्रमाणे मितू स्किलॉलॉजिस तर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यंदाचा चौथ्या वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने चिंचवडच्या प्रज्ञा विद्या मंदिर शाळेत विविध माहितीपर व चरित्रपर पुस्तकांचे वाटप विद्यालयात करण्यात आले. या निमित्ताने संस्थेचे संचालक, मुख्याध्यापिका तसेच शिक्षक वर्ग आणि कंपनी तर्फे रश्मी थोरवे (व्यवस्थापकीय संचालक), तुषार कुटे ( संशोधक व प्रशिक्षक) व अनिकेत थोरवे (सॉफ़्टवेयर डेव्हलपर व संशोधक ) उपस्थित होते.
Saturday, November 26, 2016

माझी ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरी... आमच्या कन्येचं १४ वर्षांपूर्वी ठरविलेलं नाव. संत ज्ञानेश्वरांची भावार्थदिपिका वाचली तेव्हाच ठरवलं, माझ्या मुलीचं नाव ’ज्ञानेश्वरी’ ठेविल. चौदा वर्षांनी हे स्वप्न साकार झालं. आम्हाला मुलगीच व्हावी, अशी दोघांचीही प्रबळ इच्छा होती. त्यामुळेच कदाचित आमची इच्छापूर्ती झाली असावी.
अनेकांना वाटत होतं... इतक्या आधीपासून तू तयारी केली होतीस! खरं तर तशी तयारी वगैरे काही नव्हतीच. रश्मीची सोबत लाभली व आमचे विचारही जुळू लागले. तेव्हा तीला मी ही गोष्ट सांगितली होती. फेब्रुवारी मध्ये आमच्या बाळाच्या आगमनाची चाहूल लागली अन तेव्हापासून आम्ही तीला तीच्या नावाने बोलावू लागलो. परिचयातील अनेकांना वाटत होतं की, मुलगाच होईल. पण, शेवटी आईवडिलांची इच्छाशक्तिच महत्वाची असते, हे आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. घरात अनेक वर्षे मुलीचा जन्म झाला नव्हता. ज्ञानेश्वरीच्या रूपाने कित्येक वर्षांनी लक्ष्मीची पाऊले लक्ष्मीपूजनाच्या आधीच घरात आली. माझा व तीचा जन्मदिवस एकच! तीचा जन्म माझ्या वाढदिवशी व्हावा, अशी आमची इच्छा होतीच. पण, त्या गोष्टी आमच्या हातात नव्हत्या. ऑक्टोबर महिन्यात घरातील व परिचयातील सर्वाधिक जणांचे वाढदिवस असतात. प्रत्येकजण रश्मीला स्वत:च्या वाढदिवसाची आठवण करून द्यायचा... याच दिवशी तुझ्या बाळाचा जन्म होऊ दे! पण, आमच्या मुलीने माझ्या वाढदिवशीच या जगात पाऊल ठेवायचे निश्चित केले होते. जन्मापासूनच ती तीच्या बाबाला साथ देऊ लागली होती. आदल्या दिवशी अर्थात २४ ऑक्टोबरला रश्मीला रूग्णालयात दाखल केले तेव्हापासून माझ्याही हृदयाची धडधड वाढीस लागली होती. परंतु, सर्व काही ठिक होईल यावरही विश्वास होताच. रात्रभर तब्बल आठ तास रश्मीच्या कळा चालू होत्या. त्या रात्री मी प्रथमच स्त्रीच्या मातृत्वाचा आविष्कार अनुभवला. सकाळी सहा वाजुन पन्नास मिनिटांनी नर्सने सांगितले.... ’तुम्हाला मुलगी झाली’ व तीने बाळाला माझ्या हातात दिले. त्याक्षणी असलेल्या भावना मी आज शब्दात व्यक्त करू शकत नाही. काही गोष्टींवर विश्वास ठेवायला कठीण जाते, अशीच अवस्था रश्मीचीही झाली होती. आयुष्यात पहिल्यांदा इतक्या छोट्याश्या बाळाला हातात घेतले होते. आनंदाचा तो परमोच्च क्षण होता.
प्राचीन काळात मातृसत्ताक असलेली भारतीय पद्धती कालांतराने पितृसत्ताक पद्धतीकडे झेपावली. याच कारणाने स्त्रीचे स्थान दुय्यम मानले गेले. आपली मुलगी कालांतराने आपले नाव लावणार नाही, हे माहित असल्याने भारतीय समाजात मुलाला वंशाचा दिवा मानलं जातं अन मुलीला परक्यांचं धन म्हटलं जातं. रश्मीचं नाव बदलण्याचं कोणीतरी सुचवलं तेव्हा मी तीचं नाव बदलणारच नाही, हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. अनेकांनी यावर नाकं मुरडली. ती तीचं नाव न बदलता राहू शकत नाही का? समाजाचा दृष्टिकोनच आम्हाला पूर्णत: चुकिचा वाटतो. आमच्या मुलीच्या बाबतीतही आम्ही ही गोष्ट ठरवली. तीच्या आईने तीला नऊ महिने पोटात वाढवलय. म्हणजे तीच्या जन्मात तीच्या आईचंच जास्त योगदान आहे. माझी मुलगी ’ज्ञानेश्वरी रश्मी तुषार’ असे दोघांचेही नाव लावेल. ज्या परंपरांमुळे समाजात चुकीची मानसिकता तयार होते, त्या परंपरांचा उपयोग तरी काय? स्त्रीला समाजामध्ये बरोबरीचं स्थान देण्यासाठी प्रत्येकाने या मानसिकतेचा अंगिकार करायला हवा. त्या दृष्टीने हे आमचे पुढचे पाऊल आहे...

Sunday, October 16, 2016

वाचन प्रेरणा दिवस - 2016


मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात 'वाचन प्रेरणा दिवस' आम्ही शाळेत साजरा केला. यावेळेस शाळा होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाणोली (ता. मावळ, जि. पुणे). कामशेत पासून सात किलोमीटर डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे छोटं खेडं अन ग्रुप ग्रामपंचायत असलेलं गाव. डोंगरराजींच्या निसर्गरम्य परिसरात गावाची शाळा आहे. सातवी पर्यंतच्या शाळेतील पटसंख्या जास्तीत जास्त साठ. आम्ही पोहोचलो तेव्हा 'वाचन प्रेरणा दिवसाची' सुरवात झालेली होती. पहिलीपासूनची मुलं वाचनात दंग होऊन गेलेली... रांगेत शिस्तीत बसलेली. मी आल्यावर जराही विचलीत न होता पुस्तके एकाग्रतेने वाचणारी. तेव्हाच त्यांने मन जिंकून घेतलं होतं. कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी त्यात उत्साहाने भाग घेतला. एक गोष्ट ध्यानात आली की, ही मुलं हुशार आहेत फक्त त्यांना घरून हवा तसा पाठिंबा मिळत नसावा. अर्थात तेही साहजिकच. शहरातील मुलांकडे अतिलक्ष देण्याची संस्कृती त्यांच्याकडं पोहोचली नसावी. इंग्रजीचे ज्ञानही त्यांना चांगलं आहे. आपल्या पाठिंब्याची याच मुलांना खरोखरच गरज आहे, याची जाणीव झाली. मराठी माध्यमाच्या शाळांसाठी सरकारने बऱ्याच उत्तम योजना आणल्यात. शिक्षकही चांगले आहेत. पण, पालकांची मनःस्थिती आड येते. ग्रामीण भागात शाळाबाह्य मुले शिक्षकांना अक्षरशः पकडून आणावी लागतात. ही परिस्थिती सुधारण्यासाठी व देशाची भावी पिढी सक्षम होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची खरी गरज आहे. ग्रामीण शाळांमधील मुलं व त्यांनाच समंजस समाजाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. हा पाठिंबा केवळ आर्थिक मदतीने होणार नाही तर त्यांना आपला वेळ दिल्यानेही पूर्ण होऊ शकतो. आजच्या 'इंटरनॅशनल' मुलांप्रमाणे ही मुलं रट्टा मारणारी नाहीत. त्यामुळे ज्ञानाधारित पिढी घडविण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. कलाम सरांच्या वाढदिवशी अशा विद्यार्थ्यांशी बोलण्याचे भाग्य मला लाभले, त्यामुळे दिवस सत्कारणी लागला असेच म्हणावे लागेल.