Wednesday, June 16, 2010

मंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात

अनेक चित्रपटांमध्ये पाहिलेला प्रसंग मला परवा हुबेहूब घडल्याचे दिसले. तर प्रसंग असा होता---
आपले मंत्री किती शहाणे असतात, हे आपण सर्वांनाच माहित आहे. त्यांना मते देणारे आपण मतदार किती मूर्ख असतो, हे त्यांना चांगलेच ठावूक असते. त्यामुळे जनतेबद्दल त्यांच्या मनात काही आत्मीयता असेल, अशी अपेक्षा करणेच पूर्णत: चूकिचे आहे. मंत्र्याचा काळा पैसा उडविण्यासाठी त्याने एक वंशाचा दिवा जन्माला घातलेला असतो. त्याचे काम एवढेच की, बापाचा काळा पैसा व्यसन आणि मौजमजेत उडवायचा. आपला बाप मंत्री असल्याने त्याला कशाचीच चिंता नसते. बापानंतर त्याचा ’वारसा’ हाच वंशाचा दिवा चालविणार असतो. त्यामुळे प्रशासन आपल्याच मुठीत असल्याची त्याला पक्की खात्री असते. शिवाय प्रशासनही तसेच वागणारे असते. मंत्र्याच्या या पोराची रोजच मौजमजा चालू असते. जनतेचा पैसा तो माझ्या पोराचाच पैसा, अशी समजूत मंत्र्याने त्याच्या पोराला घातलेली असते. एक दिवस काय होते की, पोरगा आपली ’फॉरेनहून’ मागविलेली गाडी नेहमीप्रमाणे भरधाव वेगाने दारूच्या नशेत चालवित असतो. कदाचित, ट्राफिक हवालदारांनाही या वंशाच्या दिव्याच्या गाडीचा क्रमांक माहित असावा, त्यामुळेच ते त्या गाडीला कधीच अडवित नसत. त्यादिवशी हा मंत्र्याचा पोरगा ८० ते १०० च्या भरधाव वेगाने मुख्य रस्त्यावरून गाडी पळवित असतो. शेवटी रस्ताही त्याच्याच बापाचा! त्याला कशाचीच चिंता नाही. अचानक रस्ता पार करण्यासाठी उभ्या असणाऱ्या एका आजीबाईंना आपल्या गाडीने हा मंत्रीपूत्र जोरदार ठोकर देतो. भर रस्त्यावर झालेला हा अपघात तिथले सर्वच नागरिक पाहतात. अपघात झालेल्या त्या आजीबाई जागीच मरण पावतात. मंत्रीपूत्र या अपघाताने नशेतून जागा होतो व तिथून पलायन करण्याचा प्रयत्न करतो. पण, काही जागरूक नागरिकांमुळे ते शक्य होत नाही. तो पकडला जातो. त्याच्या गाडीत त्याचे तीन जिगरी दोस्त असतात (त्याच्यासोबत मजा ’शेयर’ करणारे हे मित्र होय!).

अपघातात मृत्यू झाल्याने निश्चितच तो मनुष्यवधाचा गुन्हा ठरतो तरिही पोलिस ती केस दाखल करून घेत नाहीत. कारण, इथल्या पोलिसांना आधीच वरून तसे न करण्याची ’ऑर्डर’ आलेली असते. ही ऑर्डर अर्थातच खुद्द पोलिस कमिशनर देतात व त्यांना ही ऑर्डर त्याच्या ’मंत्रीसाहेबांनी’ दिलेली असते. शेवटी आपल्या वंशाच्या दिव्याला वाचविणे हे त्यांचे कर्तव्यच आहे ना! लोकांनी त्यांना दिलेली ’पॉवर’ तरी केव्हा कामाला येणार? त्यांच्यापुढे कायदा म्हणजे क्षुल्लक असतो. कारण, हे स्वत:च कायदा हातात घेऊन फिरणारी माणसे होत...
मंत्रीमहोदय इथवर थांबत नाहीत तर ते पुढच्या ’सेटिंग’च्या कामाला लागतात. सर्वप्रथम मुख्य स्थानिक वृत्तपत्रांच्या मालकांना फोन लावले जातात व माझ्या सुपुत्राविषयी ’काहीबाही’ छापू नका असे बजावले जाते. अल्कोहोल टेस्ट करणाऱ्या सरकारी डॉक्टरला धमकी दिली जाते. त्यावेळी मंत्रीपूत्र हे दारू पिलेलेच नव्हते, असा रिपोर्ट तयार केला जातो. मंत्रीपूत्र हे गाडी चालवितच नव्हते, याचे पूरावे तयार करण्यासाठी मंत्रीपुत्राच्या मित्राला पैसे देवून ’इल्ज़ाम अपने सर’वर घ्यायला लावला जातो. अशी सर्व सेटिंग करून मंत्री आपल्या मुलाला अर्थात आपल्या वंशाच्या दिव्याला अर्थात भावी युवा नेत्याला वाचवितातच. कारण, त्यांना माहित असते की, जनता ही सर्वात मूर्ख असते. त्यांना काहीच कळत नाही. पण, त्यांना तरी कुठे माहित असते की, आमच्यासारखे काही सामान्य नागरिक कुठेतरी दुर्बिणी लावून पाहत असतात.
तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पाहिलाय असा प्रसंग कधी?
आता... चित्रपटात नाही म्हणत मी! आठवून बघा नुकताच आपल्या जवळच असा प्रसंग कुठेतरी घडला आहे. बघूया, कुणाला आठवतेय ते....

2 comments:

  1. BITTER TRUTH TO BE DIGESTED..CANT HELP..UNLESS WE ALL STAND UP TOGETHER TO FIGHT THESE BRATS..
    THAT WAS REALLY A TOUCHING BLOG...

    ReplyDelete
  2. Aren't we going to learn anything from these?

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com