Wednesday, June 16, 2010

हिंदीचा पुळका

भारताची सर्वात जास्त लोकसंख्या हिंदी भाषिक आहे. त्यामुळेच तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. परंतु, मागच्या काही वर्षांमध्ये हिंदीभाषिक राज्यकर्त्यांनी तिचे अस्तित्व राष्ट्रभाषा म्हणून उभे करण्यास मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे हिंदीविरोधी बोलणाऱ्या सर्वांनाच राष्ट्रद्रोही म्हणून संबोधले जाते. या कारणामुळे दक्षिण भारतीय मुद्दामहून उत्तर भारतीयांच्या नजरेत राष्ट्रद्रोही म्हणून ठसविले गेले.
महाराष्ट्रात हिंदी भाषा आजही राष्ट्रभाषा म्हणून संबोधली जाते. त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमात पूर्ण राज्यात तिचे अस्तित्व तयार झाले आहे. विनाकारण एक अतिरिक्त विषय आपल्या शालेय विद्यार्थ्यांना शिकवला जातो व त्यांच्यावर अतिरिक्त ताण तयार केला जात आहे. केवळ सर्वाधिक बोलली जाणारी भारतीय भाषा असल्याने हिंदी भाषेचे वर्चस्व महाराष्ट्रात तयार झाल्याचे दिसते. अगदी दहावीच्या परिक्षेचाच विचार केला तरी दिसून येईल की, आपल्या मातृभाषेपेक्षा हिंदी विषयाचा निकाल जास्त लागत आहे. हिंदी व मराठी या दोन्हींची लिपी ही देवनागरी असल्याने मराठी भाषिकांना ती लवकर समजते. त्यामुळेच हिंदीने आपली पाळेमुळे या राज्यात वेगाने रोवली. व आम्ही मराठी भाषिकांनीही तिला पटकन आत्मसात केले आहे. परंतु, मागच्या काही वर्षात मराठी भाषेच्या ऱ्हासाला हिंदीचा मोठा हातभार लागला असल्याचे दिसून येते. मराठी भाषिक हिंदी भाषिकांना लवकर सामावून घेत असल्याने त्याचा तोटा मराठीलाच सहन करावा लागला. बाहेरून आलेल्या लोकांनी त्यांची भाषा आपल्यावर लादली व हिंदीची गुलामी करायला शिकवले. आज या राज्यात ज्वलंत मराठी असल्याचा अभिमान दाखविणे म्हणजे राष्ट्रद्रोही व हिंदीविरोधी असल्याचे भासविले जाते. गेल्या पन्नास वर्षांत हिंदीच्या बॉलिवूडने राजधानी मुंबईत पाळेमुळे पसरविली व त्याचबरोबर इथल्या मराठीला मागे सारत चालली. हिंदीचे गेल्या काही वर्षांत मराठीवर मोठे वर्चस्व तयार झाले आहे. या गोष्टींचा मोठा तोटा मायभाषेला सहन करावा लागला. मराठी भाषिक हे हिंदी विरोधी आहेत असे नाही पण, आपल्याच राज्यात मराठीला दुय्यम दर्जा प्राप्त झाल्याने गेल्या काही वर्षात त्याविरोधात त्यांना पेटून उठावे लागले होते. असे कधीतरी घडणार होते. ते या काळात घडले, यात विशेष नवल वाटत नाही.
अगदीच हिंदीच्या बॉलिवूडचा विचार केला तर महाराष्ट्राएवढे प्रेक्षक त्यांना उत्तर परदेस किंवा बिहार मध्येही लाभत नसतील. म्हणजेच एका अर्थाने मराठी भाषिकांनी मराठीचाच ऱ्हास केला आहे. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या लोकांना तरी हिंदी भाषेविषयी काही ज्ञान आहे की नाही, तेच समजत नाही. बॉलिवूडच्या कोणत्याही पुरस्कार वितरण सोहळ्याला हिंदीचा वापर केला जात नाही, हे विशेष! त्यावरून ह्या लोकांना हिंदीचा किती पुळका आहे, ते समजून येते. या लोकांमध्ये अमिताभ व जावेद अख़्तर सारखी मंडळीही सामील आहेत, याचेही वाईट वाटते. मागे एकदा बॉलिवूडच्या एक बाई म्हणाल्या होत्या की, हम यूपी के है और हिंदीही बोलेंगे. त्यांना हिंदीविषयी विशेष प्रेम असे नाही तर मराठी भाषिकांना चिडविण्याचा त्यांचा हेतू होता, हे त्यातून खऱ्या अर्थाने स्पष्ट झाले.
सांगायचे इतकेच की मराठी भाषिकांना आजवर हिंदीचा जो पुळका होता तो पुष्कळ झाला. आता जरा मातृभाषेकडे थोडं लक्ष द्यायला काहीच हरकत नाही...

1 comment:

  1. hoy aapan je mhanata te khare aahe.Hindicha pharacha pulaka aapalayala hota aani aahe. yavaishayi aapalayala Amrut manthan var bharapur characha vachayala milel. "salil kukarani" yaani "marathi ekjut" he vyasapit facebk var charchesathi upalabdha kerun dile aahe.Thethe aapan aapale vichar avashya mandavet hi namra vinanti.
    http://savadhan.wordpress.com
    NY-USA
    31-7-10

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com