पॅसिफिक महासागरातील "पॉइंट नीमो" हे पृथ्वीवरील सर्वात दुर्गम स्थळ आहे — जे अंटार्क्टिकाहून २,६८७ किमी अंतरावर स्थित आहे. १९९२ मध्ये शोधले गेलेले हे स्थळ इतकं दुर्गम आहे की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेले अंतराळवीर, जे पृथ्वीपासून ४१७ किमी उंचीवर कक्षेत फिरत असतात... ते येथे असलेले सर्वात जवळचे शेजारी असतात!
"अंतराळयान स्मशानभूमी" म्हणून ओळखले जाणारे हे स्थान आहे. इथे निरुपयोगी उपग्रह आणि अंतराळ कचरा सुरक्षितपणे महासागरात फेकला जातो. १९९७ मध्ये शोधलेल्या गूढ "ब्लूप" ध्वनीसाठी देखील हे प्रसिद्ध आहे. ह्या ध्वनीला समुद्राखालील हिमनगांच्या हालचालींशी जोडले गेले आहे.
सारांश... आपली पृथ्वी किती विशाल आणि गूढ आहे. 🌍💙
विज्ञानेश्वरी
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥
Sunday, April 6, 2025
पॉइंट नीमो
असुर
समाजमाध्यमांवर विविध पानांवर असुर या वेबसिरीजबद्दल माहिती ऐकली होती. त्यातूनच जिओ सिनेमावर ही वेब सिरीज पाहायला सुरुवात केली.
प्राचीन काळापासून आजतागायत सामाजिक परिस्थिती बदलत आली. परंतु अध्यात्म आणि देव ही संकल्पना अजूनही तशीच आहे. अजूनही आपल्याकडे कल्की जन्माला येईल, असे अनेकांना वाटते. किंबहुना मी स्वतःच कल्की आहे, असे देखील काहीजण सांगू लागलेले आहेत. यातीलच एकाची गोष्ट असुरमध्ये पाहायला मिळते.
तंत्रज्ञान बदलतय परंतु त्याचा जर गैरवापर केला गेला तर काय होऊ शकतं? याची प्रचिती असुर पाहिल्यानंतर येते. फॉरेन्सिक विभागामध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांची ही गोष्ट आहे. त्यांना एका सिरीयल किलरला शोधायचे आहे. त्यासाठीचे पुरावे ते गोळा करतात. परंतु मारेकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण तो सातत्याने त्यांच्या अनेक पावले पुढे चालतो…. भविष्याचा विचार करतो… काळालाही त्याने मागे टाकले आहे. अशा गुन्हेगाराला पकडताना पूर्ण यंत्रणेचीच भयंकर दमछाक होते. या वेबसिरीजचा पहिला सीजन एका निराशाजनक शेवटाने संपतो.
दुसऱ्या सीझनमध्ये देखील तीच निराशा कायम चालू राहते. काळाच्या पुढे पळणारा गुन्हेगार तंत्रज्ञानाचा अतिशय हुशारीने वापर करत जात असतो. त्याला पकडताना अनेकांचे जीवही जातात. त्याने पोलीस यंत्रणेतीलच अनेकांना फितवले देखील असते. यातूनच निरनिराळी सत्ये, विश्वास बाहेर येतात. आणि शेवटी जाताना गेली कित्येक भागांमध्ये असलेली निराशा आशेच्या दिशेने प्रवास करायला लागते. परंतु आज विकसित होणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान जर चुकीच्या पद्धतीने वापरायचे ठरवले तर काय होऊ शकते? हे या वेबसिरीज मधून प्रकर्षाने जाणवते!
— तुषार भ. कुटे
#मराठी #वेबसिरीज
Friday, April 4, 2025
मशीन इंटेलिजन्सच्या दिशेने
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे स्तरानुसार अर्थात क्षमतापातळीनुसार तीन प्रकार पडतात. आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स!
आज आपण पहिल्याच पातळीमध्ये आहोत. ज्यामध्ये मशीन लर्निंगचा वापर करून विविध एआयआधारित उत्पादने तयार केली जातात. ज्यामध्ये आधीच्या माहितीचा वापर करून अल्गोरिदमला प्रशिक्षित केले जाते आणि मानवी कार्य करून घेतली जातात. अर्थात याद्वारे हुबेहूब मानवी क्षमता असलेल्या संगणक अजूनही बनवता आलेला नाही.
‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ ही एआयची दुसरी पातळी. ज्यामध्ये बनवलेल्या संगणक हुबेहूब मानवी कामे करू शकेल. खरंतर इथपर्यंत आपण अजूनही पोहोचलेलो नाही. परंतु याकरिता मशीन लर्निंगचा पुढचा स्तर अर्थात मशीन इंटेलिजन्स तयार होणे गरजेचे आहे.
तिसऱ्या स्तराला ‘आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स’ म्हणतात. ज्यामध्ये संगणकीय अल्गोरिदम मानवी क्षमतेपेक्षा वरचढ कामगिरी करू शकतील. किंबहुना मानवाच्या प्रत्येक कामाला पर्याय उभा करू शकतील. अनेक विज्ञान-रंजन चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे रोबोट्स आपल्याला पाहता येतात. परंतु इथवर पोहोचण्यासाठी अजूनही काही दशकांचा कालावधी आहे!
आज वापरण्यात येणारे सर्वात मोठे एआय उत्पादन म्हणजे चॅटजीपीटी होय. जगभरातील करोडो लोकांकडून याचा वापर केला जातो. ओपन एआय या कंपनीने बनवलेले हे चॅट एप्लीकेशन जगभरात सर्वांकडून वापरले जाते. सध्या त्याची चौथी आवृत्ती वापरण्याकरता उपलब्ध आहे. एआय जगतामध्ये आलेल्या वृत्तानुसार ओपन एआयची ४.५ ही आवृत्ती प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे चॅटजीपीटीच्या या नवीन आवृत्तीने उच्च पातळीवर ट्युरिंग टेस्टदेखील उत्तीर्ण केल्याचे समजते. सुमारे ८० वर्षांपूर्वी एआयचा जनक अॅलन ट्युरींग याने या चाचणीची निर्मिती केली होती. याद्वारे संगणक आपण संगणकाशी संभाषण करत आहोत की मानवाशी? हे ओळखून दाखवतो. कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या अभ्यासामध्ये चॅटजीपीटी ४.५ ने तब्बल ७३ टक्के वेळा ट्युरिंग टेस्ट उत्तीर्ण केल्याची समजते! म्हणजे चॅटजीपीटीने केलेले संभाषण हे मानवानेच केलेले संभाषण आहे, असं दाखवलेलं दिसतं! अर्थात या उत्पादनाद्वारे आपण हळूहळू मशीन लर्निंगला मागे टाकत ‘मशीन इंटेलिजन्स’च्या दिशेने चाललो असल्याचे दिसते. अर्थात आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स आता आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सकडे जाताना दिसत आहे. खरंतर हा प्रवास वेगाने होताना दिसतो. आज जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर वाढत आहे. खरोखर मानवच करू शकतो, अशी कामे देखील एआयद्वारे होत आहेत. मानवाची क्षमता आजही त्याच जागेवर आहे, परंतु मशीन मात्र उत्क्रांत होताना दिसते आहे! हे प्रगतीचे लक्षण की धोक्याची घंटा? या प्रश्नाचे उत्तर मात्र शोधावे लागेल.
---- तुषार भ. कुटे
Sunday, March 30, 2025
गौतमीपुत्राचा विजयोत्सव
मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा. हा दिवस का साजरा केला जातो, याविषयी समाजमाध्यमांवर विविध पोस्टच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती प्रसारित होताना दिसते. अनेकांनी याला हिंदू नववर्षाचे नाव देखील दिलेले आहे. खरं पाहिलं तर गुढी उभारण्याची परंपरा फक्त महाराष्ट्राच्या अर्थात मराठी भाषिकांच्या प्रदेशांमध्येच दिसून येते. यासाठी कोणतेही धार्मिक कारण नाही. समाजमाध्यमांवरील विविध पोस्टमध्ये नानाविध भोळीभाबडी कारणे दिसून आली. तेव्हा महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर संशोधन करणाऱ्या काही महत्त्वाच्या संशोधकांच्या पुस्तकांचा मी संदर्भ घेतला. आणि त्यामधील माहितीच प्रमाण मानावी अशी दिसून आली.
सातवाहन राजवंश म्हणजे महाराष्ट्राचा निर्माणकर्ता. त्यांच्या साडेचारशे वर्षांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण झाली. याच राजवंशातील विसावा राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी होय. ज्याने इसवी सन ७८ मध्ये शकांचा पराभव केला. त्याच वर्षापासून शालिवाहन शक सुरू झाला. हे इतिहास संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. अर्थात इतिहास संशोधकांच्या प्रत्येक पुस्तकांमध्ये हीच गोष्ट नमूद केलेली दिसते. गौतमीपुत्र सातकर्णीचा विजयोत्सव आपण मागील १९४७ वर्षे साजरा करत आलेलो आहोत. ९९ टक्के पेक्षा अधिक मराठी लोकांना सातवाहनांच्या या राजाचे नाव देखील कदाचित माहीत नसावे. यानिमित्ताने एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली की, गुढीपाडवा हा मराठी मातीतील खराखुरा मराठमोळा सण आहे.
सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
— तुषार व कुटे.
संदर्भ:
१. मुसलमानपूर्व महाराष्ट्र, लेखक वासुदेव कृष्ण भावे, वरदा प्रकाशन, पान क्रमांक १८
२. महाराष्ट्राची कुळकथा, लेखक डॉ. मधुकर केशव ढवळीकर, राजहंस प्रकाशन, पान क्रमांक ८५
३. सातवाहनकालीन महाराष्ट्र ,लेखक रा. श्री. मोरवंचीकर, प्रतिमा प्रकाशन, पान क्रमांक ७१
४. जुन्नरच्या परिसरात, लेखक प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पान क्रमांक १९९
५. Junnar Inscriptions, Author: Shobhana Gokhale, Page No. 17
Monday, March 17, 2025
देवदारांच्या छायेतील मृत्यू
रस्किन बॉण्ड या भारतीय इंग्रजी साहित्यकाराच्या पुस्तकाचा हा अनुवाद. नावामध्येच रहस्यकथा अथवा मृत्यूकथा दडलेल्या दिसतात. हा कथासंग्रह असला तरी एका वेगळ्या धाटणीतला आहे. सर्व कथांमध्ये कोणाचा आणि कोणाचातरी मृत्यू जवळपास आहेच. हिमाचल प्रदेशातील मसूरीजवळील एकाच हॉटेल रॉयलमध्ये किंवा तिथल्या परिसरात या सर्व कथा घडतात. सर्व एकमेकांशी जोडलेल्या आहेत. तरीही ही कादंबरी नाही! म्हणजेच आपण प्रत्येक कथा वेगळी वेगळी वाचू शकतो.
या सर्व कथांमध्ये काही पात्रे समान आहेत. मसूरी जवळच्या हॉटेल रॉयलमधील मिस रिप्ली बीन, हॉटेलचा मालक नंदू, रिप्ली बीनचा तिबेटी टेरिअर कुत्रा फ्लफ, हॉटेलमधील पियानो वादक मिस्टर लोबो हे प्रत्येक कथेमध्ये आपल्याला भेटतात. हिमाचल प्रदेशातील हा भाग देवदार वृक्षांच्या छायेमध्ये दडलेला आहे. आणि सर्व कथा याच ठिकाणी घडतात. खून झालेला पाद्री, विवाहबाह्य संबंध ठेवणार जोडपं, जन्मतः दुष्ट असलेला मुलगा, बॉक्सबेड मधलं प्रेत, टपालातून आलेल्या विषाचं गूढ, कोन्याकमधून केलेला विषप्रयोग, रहस्यमय काळा कुत्रा आणि दर्यागंजचा खूनी लेखक अशा विविध पात्रांना केंद्रस्थानी ठेवून या कथा लिहिलेल्या आहेत. त्या रहस्यकथा, गूढकथा,साहस कथा, भयकथा, सूडकथा आणि मृत्यूकथा अशा विविध प्रकारामध्ये मोडता येतील. छोटा सैतान आणि पत्रातून विषप्रयोग या थोड्याशा वेगळ्या वळणाच्या कथा वाटल्या. बाकी वरील कथाप्रकारामध्ये आवड असणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे एक उत्तम मेजवानी आहे, असेच म्हणावे लागेल.
--- तुषार भ. कुटे
#मराठी #पुस्तक #परीक्षण
Saturday, March 8, 2025
मराठी दौलतीचे नारी शिल्प
जागतिक महिला दिन विशेष
मराठेशाहीच्या चारशे वर्षांच्या इतिहासामध्ये पुरुषांबरोबरच स्त्रियांनीही पराक्रम गाजवले आहेत. अनेक प्रसंगी मराठी भूमितील महिला दीपस्तंभ म्हणून उभ्या ठाकलेल्या आहेत. कधी मसलतीच्या मैदानावर तर कधी युद्धाच्या रणांगणावर त्यांनी आपल्या पाऊलखुणा उमटविलेल्या आहेत. अशा मराठी भूमितील पराक्रमी स्त्रियांची ओळख करून देणारे हे पुस्तक “मराठी दौलतीचे नारी शिल्प”.
आपल्या रोमांचकारी आणि स्फूर्तीदायी इतिहासामध्ये अनेक स्त्रियांनी आपले नाव अजरामर केले. त्याची सुरुवात होते स्वराज्यजननी राजमाता जिजाबाई यांच्यापासून. शिवाजी महाराजांची जडणघडण करण्यामध्ये जिजाऊ साहेबांचा सर्वात मोठा वाटा होता. त्यांच्याच शिकवणीतून शिवरायांनी स्वराज्य घडविले, रयतेचे राज्य आणले आणि मराठा साम्राज्याची उभारणी केली. चहूबाजूंनी उभ्या ठाकलेल्या चार पादशाह्यांपासून स्वराज्य उभे झाले. याचे श्रेय राजमाता जिजाऊंना जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई आणि मोठी सून अथवा छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई यांनी देखील महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अढळस्थान प्राप्त केलेले आहे. याशिवाय छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच पेशवाईच्या कालखंडामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटविणाऱ्या दर्याबाई, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाची इत्यंभूत माहिती या पुस्तकाद्वारे आपल्याला होते.
एकंदरीत पुस्तक वाचताना तीन स्त्रियांचा जीवन प्रवास हा अतिशय प्रेरणादायी वाटतो. त्यातील पहिल्या राजमाता जिजाबाई, दुसऱ्या महाराणी येसूबाई आणि तिसऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. यांच्याशिवाय मराठी मातीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही, अशी भावना मनात तयार होते. महाराणी येसूबाई यांनी हिंदवी स्वराज्य विस्तार होत असतानाच्या कालखंडातील बहुतांश मोठ्या घटना अनुभवलेल्या आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांच्या त्या साक्षीदार आहेत. शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांना भक्कमपणे साथ देणाऱ्या, शंभूराजांच्या अनुपस्थितीमध्ये स्वराज्याचा कारभार हाकणाऱ्या, आपल्याच माणसांनी शंभूराजांना औरंगजेबाकडे पकडून दिल्यानंतर परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाणाऱ्या आणि योग्य वेळी हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत होण्यापासून वाचविणाऱ्या, स्वराज्यासाठी जवळपास ३० वर्षे शत्रूच्या तावडीत घालविणाऱ्या, शाहू महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत तेवत ठेवणाऱ्या खंबीर पराक्रमी येसूबाई या पुस्तकातून आपल्याला भेटतात. कधी कधी असा देखील वाटतं की महाराणी येसूबाईंनी आपल्या आत्मचरित्र लिहिलं असतं तर इतिहासातील किती घटनांची उकल आपल्याला होऊ शकली असती!
मराठेशाहीच्या इतिहासातील आणखी एक पराक्रमी स्त्री म्हणजे अहिल्याबाई होळकर. एका स्त्रीने राज्यकारभार हाती घेतल्यानंतर काय होऊ शकते? याचे उत्तम उदाहरण अहिल्यादेवींनी घालून दिले. मल्हारराव होळकरांच्या तालमीमध्ये तयार झालेल्या अहिल्याबाई यांनी सातत्याने विविध दु:खे पचवली. परंतु त्यामध्ये रयतेची आबाळ होऊ दिली नाही. एक आदर्श प्रशासक म्हणून त्या इतिहासामध्ये अजरावर झाल्या. आजही त्यांच्या कार्याच्या पाऊलखुणा आपल्याला भारतभर पाहता येतात. यातूनच त्यांच्या कार्याची प्रचिती देखील येते.
मराठी मातीमध्ये घडलेल्या या आदर्श स्त्रियांची छोटीखानी संकलित चरित्रे आपल्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती देतातच तसेच भविष्यासाठी प्रेरणादायी देखील ठरतात.
— तुषार भ. कुटे
#मराठी #मराठा #महाराष्ट्र #इतिहास #पुस्तक #परीक्षण #महिला_दिवस
मोहम्मद शमीचा रोजा
Thursday, March 6, 2025
सेतूमाधवराव पगडी यांची पुस्तके
इतिहास हा इतिहासकारांच्या नजरेतून वाचला की तो अधिक चांगला समजतो. त्यांची इतिहासाकडे पाहण्याची शास्त्रशुद्ध दृष्टी आपल्या दृष्टीत देखील बदल घडवून आणते.
त्यातही तटस्थ दृष्टी असणारे इतिहासकार विरळाच. महान इतिहासकार सेतूमाधवराव पगडी हे अशाच इतिहासकारांपैकी एक. महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी लिहिलेली पुस्तके इतिहासाची रम्य सफर घडवून आणतात. आणि आपल्याला इतिहास शिकवतात देखील. अशीच काही पुस्तके मागच्या काही दिवसांमध्ये वाचनात आली. ती तुम्हाला देखील निश्चित आवडतील. शिवाय आपल्या अज्ञात पण गौरवशाली इतिहासाची ओळख देखील करून देतील.
छत्रपती शिवाजी
https://amzn.eu/d/aVbTAHs
छत्रपती नि त्यांची प्रभावळ
https://amzn.eu/d/2nPiuHy
महाराष्ट्र आणि मराठे
https://amzn.eu/d/iFsOcZr
इतिहासाचा मागोवा
https://amzn.eu/d/gQX5HaW
पानिपतचा संग्राम
https://amzn.eu/d/49epGfA
कावेरी खोऱ्यातील यक्षनगरी
https://amzn.eu/d/bsdlcHJ
बहु असोत सुंदर
https://amzn.eu/d/2itHNys
वरंगलचे काकतीय राजे
https://amzn.eu/d/fdeN4OH
--- तुषार भ. कुटे
#मराठी #इतिहास #मराठा #छत्रपती #छत्रपती_शिवाजी_महाराज #पुस्तक #पुस्तके #महाराष्ट्र