Thursday, November 14, 2024

बहु असोत सुंदर

महाराष्ट्राचा इतिहास विस्तृत आणि सखोल पद्धतीने लिहायला घेतला तर शेकडो खंडही अपुरे पडतील इतका मोठा आहे. सेतूमाधवराव पगडी यांच्यासारख्या जेष्ठ इतिहासकाराने आपल्या इतिहासातील अशी असंख्य अपरिचित पाने पुस्तक रूपाने लिहिलेली आहेत. त्यातीलच हे एक पुस्तक ‘बहु असोत सुंदर’.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जवळपास नामशेष व्हायला आलेल्या अनेक किल्ल्यांचा आणि गावांचा इतिहास या पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतो. छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, उदगीर, नळदुर्ग, गाळणा, परांडा, कंधार, चंद्रपूर अशा विविध ठिकाणचा अपरिचित अज्ञात इतिहास पगडींनी लेखमालिकेद्वारे या पुस्तकांमध्ये मांडलेला आहे. कदाचित स्थानिक जनतेला देखील याची फारशी माहिती नसावी. औरंगजेब काळात खानदेश नक्की कसा होता, याचे विस्तृत विवेचन एका लेखामध्ये पगडी करतात. तसेच दोन लेखांमध्ये छत्रपती संभाजीराजांच्या चरित्रावर देखील त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. पावनखिंडीच्या लढाईमध्ये प्रसिद्ध झालेला विशाळगड कसा होता, तसेच त्याचे औरंगजेबाचे असलेले नाते एका लेखामध्ये पगडी स्पष्ट करतात.
याशिवाय शिवरायांच्या चतुराईने धन्य ती वस्ती, जन्मस्थानातील शिवलीलामृत, शिवरूपाचे एक आगळे दर्शन, छत्रपतींचे जीवन कार्य आणि विचारधन, उर्दूचे पहिले कोशकार शिवाजी महाराज, रथचक्र उद्धरीले या लेखांमधून शिवकाळातील विविध प्रसंगांचा परिचय वाचकांना होतो. एका लेखामध्ये औरंगजेबा नंतरचा महाराष्ट्र कसा होता, याचे वर्णन पगडी करतात. शिवाय वऱ्हाड आणि खडकीच्या लढाईचे वर्णन देखील त्यांनी उत्तमरीत्या या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. अशा विविध ऐतिहासिक घटनांनी समृद्ध असा हा ग्रंथ कोणत्याही इतिहासप्रेमी वाचकाने वाचावा असाच आहे. 



Wednesday, November 13, 2024

इंटरनेट काळातील अपडेशन

एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये माझं व्याख्यान सुरू होतं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विदा विज्ञान अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी श्रोते होते. व्याख्यानादरम्यान मी एक प्रश्न विचारला. जेफ्री हिंटन तुम्हाला माहित आहेत का? मी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तर खरोखर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह तयार झालेले दिसले. हे एआय सारख्या अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी असूनही जेफ्री हिंटन हे नाव त्यांनी ऐकलेले नव्हते, हीच गोष्ट माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का देणारी ठरली.

विज्ञान शाखेमध्ये संशोधकांसाठी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार होय. यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘गॉडफादर ऑफ एआय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेफ्री हिंटन यांना मिळाला आहे. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कच्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डीप लर्निंग या तंत्राचा पाया असणाऱ्या आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कमध्ये अद्ययावत संशोधन करत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच यावर्षीचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यापूर्वीही संगणकशास्त्रातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा ट्युरींग पुरस्कार देखील त्यांना सन २०१८ मध्ये मिळाला होता. त्यावेळी हिंटन हे गुगल ब्रेन प्रकल्पावर काम करत होते. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाची गती, प्रगती, विकास पाहता त्यामध्ये त्यांना धोकेच अधिक दिसू लागले. या कारणास्तव मागील वर्षी त्यांनी गुगलला रामराम करून एआयविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. एकंदरीत सर अल्फ्रेड नोबेल यांचा तंत्रज्ञानाविषयीचा जो दृष्टिकोन होता त्याचेच प्रतिबिंब जेफ्री हिंटन यांच्यात देखील दिसून येते.

अशा महान संगणकतज्ञाची माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता अभियांत्रिकी शिकणाऱ्या मुलांना नसावी, याचे खूपच आश्चर्य वाटून गेले. असे म्हणतात की, इंटरनेटमुळे जग जवळ आलेले आहे. क्षणाक्षणाची माहिती आणि अपडेट्स आपल्याला या माध्यमाद्वारे वेगाने मिळत असतात. जगातील सर्व प्रकारच्या माहितीचा साठा आणि स्त्रोत म्हणून इंटरनेटकडे बघता येते. यातून आपण कोणतीही गोष्ट शिकू शकतो. जगात काय चालले आहे, याची इत्यंभूत माहिती मिळवू शकतो. शिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राद्वारेच तयार केले गेलेल्या चॅट-जीपीटी सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सहज आणि सुलभतेने माहिती तयार देखील करू शकतो. असे असले तरी या सर्व साधनांचा वापर आपण योग्य दिशेने करत आहोत का? हाही प्रश्न  मला त्यादिवशी पडला. 

 


खरंतर इंटरनेट या माध्यमातून द्वारे पायरेटेड चित्रपट, संगीत, व्हिडिओज सहज उपलब्ध होत गेले. ऑनलाइन गेमिंगची सुरुवात झाली. अगणित गेम्स तयार झाले. हळूहळू ऑनलाईन गॅम्बलिंगचा देखील उदय झाला. सोशल मीडिया सारख्या माध्यमांद्वारे आपण जगात कुठेही संवाद साधू लागलो. आभासी जगाद्वारे जवळपास प्रत्येक व्यक्तीशी जोडले जाऊ लागलो. ही इंटरनेट या माध्यमाची दुसरी बाजू. ज्यामध्ये बहुतांश तरुणाई गुरफटलेली दिसते. अगदी अभियांत्रिकीचे विद्यार्थी जरी असले तरी इंटरनेटचा ते माहिती मिळवण्यासाठी किंवा अपडेटेड राहण्यासाठी कितपत वापर करतात, हाही मोठा प्रश्नच आहे. आज विविध संकेतस्थळावर इतक्या मोठ्या प्रमाणात माहितीचा साठा आहे की कोणतेही कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या पदवीची आवश्यकता नाही. तरीदेखील इंटरनेटचा असा विधायक वापर तरुणाईकडून होताना दिसत नाही. बहुतांश लोकांना फक्त सध्या कुठली फॅशन चालू आहे? कोणता चित्रपट येणार आहे? इंस्टाग्राम वरील साठी कोणते गाणे ट्रेडिंग आहे? अशाच प्रकारच्या गोष्टींमध्ये जास्त रुची असते. आज इंटरनेट वापरणारी बहुतांश लोकसंख्या अशाच प्रकारची दिसून येईल. 

खरंतर इंटरनेटचा विधायक वापर करण्यासाठी नव्या पिढीला जागरूक करणे आणि प्रोत्साहित करणे देखील अतिशय महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर सातत्याने कमेंट करत बसणं, युट्युब शॉट्स, इंस्टाग्राम रिल्स यात स्वतःचा वेळ वाया घालवणे हे तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे दुष्परिणाम आहेत. आणि याबाबत युवा पिढीमध्ये जागृती निर्माण करण्याचा विडा कुणीतरी उचलायलाच हवा. 


— तुषार भ. कुटे


Tuesday, November 12, 2024

गोग्रामचा चितार

विज्ञान कादंबऱ्यांमध्ये विविध प्रकारचे विषय हाताळले जातात. परग्रहवासी हाही त्यातलाच एक विषय. आजवर बऱ्याच विज्ञान कथांमधून आपल्याला परग्रहवासी भेटलेले आहेत. बहुतांश वेळा अशा कथांमधून परग्रहवासीयांचा आणि पृथ्वीवासीयांचा संघर्ष पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतो. परग्रहावरील लोक आपल्या ग्रहावरील लोकांना त्रास देतात किंवा त्यांच्याकडे आपल्यापेक्षा मोठी अद्भुत शक्ती असते, ज्याच्या जोरावर ते आपल्यावर राज्य करू पाहतात. अशा कल्पनारम्य विज्ञान कादंबऱ्या आजवर वाचलेल्या होत्या.

परंतु कल्पना करा की पृथ्वीच्या जवळच्याच एका ग्रहावरील जीवसृष्टी आपल्यापेक्षा अधिक प्रगत झालेली आहे. त्यांना हेही माहित आहे की, आपल्या शेजारी जीवसृष्टी असलेला आणखी एक ग्रह नांदतो आहे. परंतु ते आपल्यावर आक्रमण करत नाहीत. आपल्याला जाणून घेतात. आपण आपल्या ग्रहाची काय अवस्था करून ठेवलेली आहे? याचे सखोल ज्ञान त्यांना असते. पृथ्वीवरील मनुष्यप्राणी नक्की पृथ्वीचा कसा सांभाळ की विनाश करतो आहे, याची देखील त्यांना इत्यंभूत माहिती आहे. एकंदरीत काय मनुष्य प्राण्याचा स्वभाव त्यांना पुरता कळलेला आहे. प्रगतीच्या मार्गावर असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते या विश्वामध्ये कोणताही विनाश करू शकतात, याची कल्पना त्यांना देखील आलेली आहे. म्हणजेच एका अर्थाने पृथ्वीवरच्या मनुष्य प्राण्याची प्रवृत्ती त्यांना खरोखरीच कळलेली आहे. उद्या पृथ्वीवासी आपल्यावर निश्चितच आक्रमण करून आपला ग्रह ताब्यात घेतील, याची त्यांना खात्री आहे. म्हणूनच भविष्यात दिसणाऱ्या धोक्यावर उपाय म्हणून हे परग्रहवासी सूर्यमालेच्या बाहेरील ग्रह शोधायला लागतात. त्यांच्याकडील अद्ययावत तंत्रज्ञानाने इंटरस्टेलर स्पेसमध्ये त्यांचा शोध सुरू होतो. आणि अशातच त्यांचा संपर्क पृथ्वीवरील एका मानवाशी होतो….. ही कथा आहे नारायण धारप लिखित ‘गोग्रामचा चितार’ या कादंबरीची.

नारायण धारप हे नाव प्रामुख्याने भयकथांशी जोडलेले आहे. परंतु त्यांनी बऱ्याच विज्ञानकथा, कादंबऱ्या देखील लिहिलेल्या आहेत, याची माहिती कमी जणांना असेल. धारपांच्या विज्ञान कथा मालिकेतीलच ही कादंबरी ‘गोग्रॅमचा चितार’. पृथ्वीवरील विजय आणि मंगळावरील गोग्रॅम हे या कथेचे नायक. अचानकपणे एके दिवशी हा मंगळग्रहवासी पृथ्वीवासीयाला भेटतो आणि वेगवेगळ्या घटना घडत जातात. ज्या आपल्याला कथेशी शेवटपर्यंत बांधून ठेवतात. एका चित्रपटाप्रमाणे या कादंबरीचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात गोग्रॅमचे आगमन तर मध्यंतरानंतर उत्तरार्धात गोग्रॅमचे पुनरागमन आपल्याला वाचायला मिळते. खरी गोष्ट मध्यंतरानंतरच वेग घेते. त्यामुळे वाचताना संयम देखील बाळगायला लागतो. मागच्या शतकामध्ये धारपांनी लिहिलेल्या या कादंबरीमध्ये बऱ्याच सुंदर अशा कल्पना विज्ञानरुपी विस्तृतपणे मांडलेल्या दिसून येतात. बुध, शुक्र, मंगळ, शनी, गुरु अशा विविध ग्रहांची वर्णने देखील यामध्ये आहेत. हे ग्रह नक्की कसे आहेत? याची माहिती देखील आपल्याला होते. त्याकाळी त्यांनी लिहून ठेवलं होतं की, आणखी काही वर्षानंतर पृथ्वीवासीय मंगळावर स्वारी करतील. आणि तेच आज आपण अनुभवत आहोत.

खरंतर विज्ञानकथेच्या रूपाने ही एक बोधकथारूप कादंबरी आहे. त्यातून वरती सांगितल्याप्रमाणे मानवी स्वभावाचे दर्शन मंगळग्रहवासी आपल्याला करून देतात. 


— तुषार भ. कुटे

 


 


Thursday, November 7, 2024

सोहळा

न्यायालयाच्या वरात पन्नाशी गाठलेला चित्रपटाचा नायक गिरीश आणि त्याचे वकील यांच्यामध्ये संवाद सुरू आहे.
“जन्माची मिरवली पारखी दुःखाचा सोहळा केला. प्रेम मरतं तेव्हा त्याचं पिशाच्च होतं आणि ते मानगुटीवर बसतं प्रेमवीरांच्या. रस्ते बदलतात, माणसे बदलतात, लांब जातात पण पिशाच्च मात्र पाठ नाही सोडत!” 
“प्रेम बदलत नाही वकील साहेब, त्याचा फॉर्म बदलतो … सुटलो आम्ही यातून… दोषारोपांच्या फेऱ्यातून मोकळे झालो. कदाचित मोकळं होण्याकरताच ही भेट झाली..... सॉरी म्हणता आलं पाहिजे. आम्ही दोघांनी ते केलं. एकमेकांना सॉरी म्हटलं. पण वेळ चुकली. वेळेवर सॉरी म्हटलं पाहिजे…  लाईफ इज अ लर्निंग प्रोसेस वकील साहेब.
ओठातून फुटले नाही, शब्दांचा सोहळा केला. वेदनेतही लखलखत्या इश्काचा सोहळा केला.”
एकंदरीत चित्रपटाचा सारांश या संवादातून आपल्याला ध्यानात येतो. 
चित्रपट सुरू होतो तो भर पावसामध्ये आपल्या बायकोच्या घराचा पत्ता शोधणाऱ्या गिरीश पासून. त्याची बायको विद्या, शहरामध्ये राहत असते.  गिरीशने आणि तिने लग्नाच्या वेळेस गावाकडे एक जमीन घेतलेली असते. ती आपल्या नावावर व्हावी याकरता तो विद्याची स्वाक्षरी घेण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु विद्या त्याला नकार देते.  पण सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ती तयार होते व न्यायालयीन कामकाजाकरीता गिरीश बरोबर गावाकडे येते. येथून दोघांचाही भूतकाळ हळूहळू पडद्यावर दिसायला लागतो. दोघांचाही प्रेमविवाह झालेला असतो. परंतु त्यांच्यातील गैरसमजामुळे विवाहसंबंधांमध्ये दुरावा निर्माण व्हायला लागतो. पडद्यावर भूतकाळात घडलेल्या घटना दिसतात आणि हळूहळू एकेका प्रश्नाचे उत्तर मिळायला लागते. नात्यांमधील होणाऱ्या बदलांवर हा चित्रपट प्रामुख्याने प्रकाशझोत टाकतो. काही गोष्टी वेळेवर व्हायला हव्यात जर त्या झाल्या नाही तर जीवनाची दिशाच बदलून जाते. हा सर्व घटनाक्रम दिग्दर्शकाने या चित्रपटाद्वारे पडद्यावर उत्तमरीत्या चित्रित केलेला आहे. तो आपल्याला भावनावश करून टाकतो. 
गजेंद्र अहिरे यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकाचा हा चित्रपट सर्वच आघाड्यांवर अगदी संगीतासह अतिशय उत्तम झालेला आहे. शिवाय सचिन पिळगावकर यांना गंभीर भूमिकेमध्ये पाहायला छान वाटते. शिल्पा तुळसकर, विक्रम गोखले आणि मोहन जोशी यांची कामे देखील सरस झाल्याचे दिसते. मराठी चित्रपटांचा गाभा असलेली आशयघनता या चित्रपटांमध्ये ठासून भरलेली आहे. 

--- तुषार भ. कुटे



Wednesday, November 6, 2024

मी आणि माझा बाप - व्यंकटेश माडगूळकर

पौर्वात्य साहित्य बऱ्याच मराठी लेखकांनी आपल्या भाषेमध्ये भाषांतरित केलेले आहे. आज-काल मूळ साहित्यापेक्षा भाषांतरित झालेली ललित पुस्तके मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये आलेली दिसतात. अर्थात मूळ पुस्तकाचा लोकप्रियता एन्कॅश करण्यासाठी ही पुस्तके तयार होत असावीत. ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी ‘द लाफ्टर विथ माय फादर’ या कार्लो बुलोसान यांनी लिहिलेल्या कथासंग्रहाचा ‘मी आणि माझा बाप’ हा अनुवाद केलेला आहे.
कार्लो बुलोसान या फिलिपीनी लेखकाचा परिचय मराठी वाचकांना करून देण्यासाठी माडगूळकरांनी हा घाट घातल्याचा दिसतो. भारतामध्ये बाप आणि मुलाचे एक वेगळे नाते असते. मोकळीकता किंवा खट्याळता या नात्यांमध्ये अतिशय क्वचितच दिसून येते. त्याचे प्रमाण नगण्य म्हटले तरी चालेल. परंतु या पुस्तकातून विनोदी पद्धतीने लेखकाने बाप आणि मुलाचे नाते शब्दबद्ध केल्याचे दिसते. यातल्या कथा विनोदी आहेत. वेगवेगळ्या घटनांतून विनोदनिर्मिती करतात आणि आपल्याला हसवतात. विशेष म्हणजे माडगूळकरांनी कथेतील सर्व पात्रे आपल्या भाषेतीलच वापरलेली आहेत. त्यामुळे ती आपल्याशी अधिक जवळीक साधतात. या घटना आपल्याच प्रदेशात घडलेल्या आहेत, असं देखील वाटून जातं. कथांमधील गावरान विनोद, बेरकीपणा, खट्याळपणा आपलासा वाटतो. आणि केवळ एका बैठकीत म्हणजेच दीड ते दोन तासातच तुम्ही हे पुस्तक सहजपणे वाचवून संपवू शकता.

--- तुषार भ. कुटे


 

राजवाडे अँड सन्स

काही वर्षांपूर्वीच राजवाडे अँड सन्स या चित्रपटाबद्दल ऐकलं आणि वाचलं होतं. अखेरीस तो पाहण्याचा योग आला. अतिशय नावाजलेले कलाकार तसेच उत्तम दिग्दर्शक यामुळे कोणताही मराठी रसिक हा चित्रपट पाहिल्याशिवाय सोडणार नाही.
राजवाडे म्हणजे पुणे शहरातील बडे प्रस्थ अर्थात मोठे व्यावसायिक. त्यांच्या घरातील सर्वच जण अगदी जावई आणि नातवांपर्यंत सर्वच कौटुंबिक व्यवसायामध्ये कार्यरत असतात. नवीन पिढी मात्र त्यांचा मार्ग शोधत असते. त्यांना पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या व्यवसायामध्ये काडीचाही रस नसतो. परंतु घरातील सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या आजोबांपुढे बोलण्याची कुणाची हिंमत नसते. काहींना तर स्वतःचे वेगळे घर देखील हवे असते. परंतु राजवाड्यांनी एकत्रित एकाच घरात राहावे, असा आजोबांचा आदेश असतो. तिसरी पिढी एका अर्थाने बंडाच्या पवित्र्यात असते. परंतु हिंमत कोणाचीच होत नाही. अचानक एक दिवस एका नव्या पात्राची एन्ट्री होते आणि इथून पुढे गोष्टी बदलायला लागतात.
एकाच कुटुंबामध्ये राहणाऱ्या चार वेगवेगळ्या कुटुंबांची गोष्ट या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. कथा उत्तमच आणि त्याची मांडणी देखील तितकीच प्रभावी. वेगवेगळ्या पिढ्यांचे विचार दिग्दर्शकाने छान पद्धतीने मांडलेले आहेत. अनेक जण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी त्यांचा मेळ घालू शकतात.

--- तुषार भ. कुटे 



Monday, November 4, 2024

कार्तिकनची प्रतिज्ञा

मागील दशकभरामध्ये पुरातन काळातील घटनांची सांगड घालून आधुनिक काळातील घटनांसोबत मिलाफ दाखविलेल्या काही मराठी कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. आजही बहुतांश नवोदित मराठी लेखक अशा अद्भुतरम्य रहस्यमय कादंबऱ्या लिहीत आहेत. त्यातीलच ही एक संकल्प अभ्यंकर लिखित 'कार्तिकनची प्रतिज्ञा'.
ही गोष्ट सहा हजार वर्षांपूर्वीची आहे. नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेल्या कार्तिकनचा अद्ययावत शिक्षण घेण्यासाठीचा प्रवास तक्षशिलाच्या दिशेने सुरू होतो. तत्पूर्वी त्याच्या गावावर राक्षसांनी हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये त्याचे सर्वच नातेवाईक मृत्युमुखी पडलेले आहेत. अशा परिस्थितीत कार्तिकन राक्षसांना संपविण्याची प्रतिज्ञा करतो आणि इथून पुढे या कथेची खरी वाटचाल सुरू होते. मजल दरमजल करीत तो तक्षशिला नगरीमध्ये पोहोचतो. तिथे त्याची ओळख या शिक्षणनगरीतील अनेक आचार्यांशी होते. त्यांचे संवाद अतिशय सुंदररित्या लेखकाने लिहिलेले आहेत. जणूकाही ही गोष्ट आपल्यासमोरच घडते आहे असा भास होतो.
कादंबरीची कथा घडत असताना समांतरपणे आधुनिक काळातील एक घटना देखील घडताना दाखवलेली आहे. ज्यामध्ये दोन गिर्यारोहक राज आणि राजलक्ष्मी हे हिमालयातील एका पर्वतावर आपल्या अन्य सवंगड्यांसह गिर्यारोहणाला जात असतात. यात देखील एक रहस्य दडलेले असते. त्याचा भेद या पुस्तकामध्ये अजूनही पूर्णपणे केलेला नाही. कदाचित पुढच्या भागांमध्ये तो होऊ शकेल. परंतु एकंदरीत कथेची मांडणी पाहता लेखकाने पुढच्या भागातील कथेसाठी उत्सुकता वाढवली आहे, हे मात्र निश्चित.


 

Sunday, November 3, 2024

पैसा पैसा

ना कोणी दुष्ट येथे
ना दोष ना कुणाचा
चालतो जीवनी हा
खेळ हा प्राक्तनाचा
चूक एकास वाटे
योग्य वाटे कुणाला
विष कोणास वाटे
औषधी ते दुचाला

सहज मिळू शकतं ना कुणाला काही
सतत लढत भिडूंनी नशीब तो पाही
हे युद्ध असे जगण्याचे
अन प्रेमाच्या नात्यांचे
मग अक्षम्य होईल असे ते
अवघडही वाट असे
हसरे पाऊल एखादे
वेळ कधी सांगून नाही कोणाला
समजून घे ना
तू धरशी एक मनी
असेल ते दुसरे काही
सत्याच्या अन असत्याच्या पलीकडले
समजून घेना
खेळ हा सारा नियतीचा… कळसुत्री जगण्याचा

ना कोणी दुष्ट येथे
ना दोष ना कुणाचा
चालतो जीवनी हा
खेळ हा प्राक्तनाचा


चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगामध्ये चित्रपटातील सर्व पात्रे अवतरतात आणि गाण्यांची हे बोल आपल्याला एकंदरीत चित्रपटाच्या सार देखील सांगून जातात. हा चित्रपट आहे सण 2016 मध्ये प्रदर्शित झालेला 'पैसा पैसा'.

एका मुलाखतीच्या निमित्ताने मुंबईचा राजीव नागपूरला येतो. आणि एका विचित्र प्रसंगांमध्ये अडकतो. एक रिक्षावाला त्याचे अपहरण करून त्याच्याकडे केवळ दहा हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करतो. अर्थात त्यावेळी राजीव कडे इतके पैसे नसतात. तू लगेचच आपल्या प्रेयसीला फोन करून पैशांची मागणी करतो. ती यामध्ये काडीचाही रस दाखवत नाही. आणि आपला फोन बंद करून टाकते. आणि अखेरीस राजीव आपल्या सर्वात जवळच्या मित्राला अर्थात अजयला फोन लावतो आणि नागपुरामध्ये घडलेली सर्व माहिती देतो. अजय मात्र आपल्या संसाराला वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. पण तरीदेखील तो संकटात सापडलेल्या आपल्या मित्राच्या हाकेला धावून जातो.. बँक बंद होण्याच्या आधी त्याला दहा हजार रुपये आपल्या मित्राच्या खात्यामध्ये जमा करायचे असतात. इकडे नागपूर मध्ये अपहरण करता राजीवला एका अंधाऱ्या खोलीमध्ये डांबून ठेवतो आणि सातत्याने लवकरात लवकर पैशाची सोय करण्यासाठी सांगत असतो. अजयच्या स्वतःच्या खात्यात मात्र फारसे पैसे नसतात. परंतु मित्राला पेज प्रसंगातून सोडवण्यासाठी तो लगोलग कामाला लागतो. त्याच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या आणि अन्य ओळखीच्या लोकांना तो भेटतो. अगदी काही हजारांमध्ये पैशांची जुळवा जुळवा होते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या व्यक्ती पैसा म्हटलं की कशा पद्धतीने टाळाटाळ करू शकतात याची प्रचिती अजयला येते.. मित्राला काही करून सोडवायचेच असा निर्धार करत तो दारोदार हिंडत असतो. कसेबसे करून पैशांची जुळवाजुळव होते. परंतु हे पैसे राजीवला भेटतात का? हे चित्रपटात पाहणे सोयीस्कर ठरेल.

हा चित्रपट एक इमोशनल थ्रिलर या प्रकारातला आहे. दिग्दर्शकाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पैशाची संबंधित व्यवहारांना केंद्रस्थानी ठेवून ही उत्तम कथा रचल्याचे दिसते. आणि ती छानपैकी फुलवली देखील आहे. प्रत्येक प्रसंगांमध्ये आपण गुंतून राहतो. यात अजय, राजीव सह अपहरण कर्त्याची देखील एक वेगळी गोष्ट आहे. ती मात्र मनाला चटका लावून जाते. योग्य काय अयोग्य काय? या प्रश्नाचे उत्तर देखील आपण शोधू लागतो. चित्रपटांमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, पण कथेचा जो गाभा आहे तो मात्र मनाला भावतो. किमान एकदा तरी हा चित्रपट पहावा असाच आहे. 


ओटीटी:  अमेझॉन प्राईम आणि युट्युब


--- तुषार भ. कुटे