Showing posts with label Shivaji Maharaj. Show all posts
Showing posts with label Shivaji Maharaj. Show all posts

Friday, May 29, 2026

कर्नाटकातील कणकगिरीत उपेक्षित राहिलेली शिवरायांच्या थोरल्या बंधूंची समाधी!

बदामीवरून हम्पीकडे जाणारा आमचा प्रवास सुरू होता. वाटेत अचानक दिशा बदलून आम्ही कर्नाटकातील 'कणकगिरी' या गावी पोहोचलो. यामागे एक खास उद्देश होता; छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू, शहाजीराजांचे ज्येष्ठ पुत्र पराक्रमी 'संभाजी महाराज' यांची समाधी याच गावात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. गुगल मॅपच्या मदतीने आम्ही ती जागा शोधून काढली. पण तिथे पोहोचल्यावर जे दृश्य दिसले, ते मन सुन्न करणारे होते.
गावाबाहेर एका विस्तीर्ण, निर्जन मोकळ्या जागेत ही समाधी विदारक आणि उपेक्षित अवस्थेत उभी होती. तिची रचना एखाद्या मुस्लिम पद्धतीच्या दर्ग्यासारखी भासत होती. आजूबाजूला सामसूम होती. समाधीवर चुन्याचे काही ताजे तर काही जुने लेप लावल्याचे दिसत होते. समोरच दिवा लावण्यासाठी केलेली एक छोटी जागा होती, ज्यावरून कोणीतरी तिथे नियमितपणे नतमस्तक होत असावे, याची जाणीव झाली. पण दुर्दैवाने, या थोर योद्ध्याच्या समाधीचा इतिहास सांगणारा साधा एक फलकही तिथे नव्हता आणि माहिती देणारे आजूबाजूला कोणीही नव्हते.

या वास्तूविषयी कोणाला विचारावे, असा प्रश्न पडलेला असतानाच, थोड्या वेळाने एका दुचाकीवरून लुंगी नेसलेले एक गृहस्थ तिथे आले. फोनवर बोलत असलेले ते गृहस्थ आमची चुळबूळ पाहून आमच्याजवळ आले. त्यांनी अत्यंत हसतमुख चेहऱ्याने आणि नमस्कार करून आमचे स्वागत केले. आमची भाषा मराठी आणि त्यांची कन्नड; त्यामुळे संवादाचा मोठा प्रश्न उभा राहिला. पण खाणाखुणा आणि काही तुटक शब्दांच्या आधारे आमचा संवाद सुरू झाला. 'नागराज' असे त्यांचे नाव आणि तेच या आजूबाजूच्या विस्तीर्ण जागेचे मालक असल्याचे आम्हाला समजले. आम्ही थेट पुण्याहून, महाराजांच्या भूमीतून आलो आहोत, याचे त्यांना मोठे अप्रूप वाटले. त्यांनी आत्मीयतेने आमचा फोन नंबर लिहून घेतला.
भाषेच्या अडचणीमुळे फारशी माहिती मिळत नाही, हे पाहून आम्ही पुढच्या प्रवासाला निघण्याचा निर्णय घेतला. पण आम्ही गाडी सुरू करून दोन मिनिटेही झाली नसतील, तोच नागराज यांचा फोन आला. त्यांनी गावातील काही जाणकार मंडळींना मुद्दाम बोलावून घेतले होते. त्यांच्या या आपुलकीमुळे आम्ही तात्काळ गाडी पुन्हा मागे फिरवली.

तिथे पोहोचल्यावर नागराज यांनी बोलावलेल्या 'शरणप्पा सज्जन' या स्थानिक जाणकाराशी आमची भेट झाली. त्यांनी ही समाधी संभाजी महाराजांचीच असल्याच्या वृत्ताला ठाम दुजोरा दिला. मात्र, त्यांच्या बोलण्यातून एक खंतही जाणवली. "लहानपणापासून आम्ही ही समाधी याच अवस्थेत पाहत आलो आहोत, यात कोणताही बदल झालेला नाही," असे ते म्हणाले.
अधिक माहिती जाणून घेण्याच्या आमच्या इच्छेला अय्यानगौडा यांनी सविस्तर उत्तरे दिली. पूर्वी या समाधीवर एक सुंदर संरक्षक छप्पर होते, पण निजामाच्या काळात या वास्तूची मोठी नासधूस झाली. त्यानंतरच्या काळात ही वास्तू विविध स्थानिक आणि कायदेशीर वादांमध्ये अडकली. प्रकरण पोलीस दरबारी गेल्यामुळे समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम कायमचे रखडले. काही वर्षांपूर्वी या समाधीच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर झाला होता, पण लाल फितीच्या कारभारामुळे प्रत्यक्ष एकही वीट रचली गेली नाही.

स्थानिक गावकऱ्यांच्या मनात मात्र एक मोठी आशा आहे. जर या समाधीचा भव्य जीर्णोद्धार झाला, तर कणकगिरी गावाचे नाव भारताच्या नकाशावर मानाने झळकेल, असा त्यांना विश्वास आहे. यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे अधिकृत प्रस्ताव पाठवावा, तरच यावर वेगाने काम होऊ शकते, अशी त्यांची प्रामाणिक अपेक्षा आहे.
शिवकाळाचा विचार केल्यास, कणकगिरी हा त्याकाळी एक अत्यंत भक्कम आणि अभेद्य भुईकोट किल्ला होता. आजही गावात फिरताना या जुन्या तटबंदीचे जीर्ण अवशेष इतिहासाची साक्ष देत उभे असल्याचे पाहायला मिळते. आज मंदिरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कणकगिरीत इतिहासाच्या या खाणाखुणा मात्र काळाच्या पडद्याआड हरवत चालल्या आहेत.

छत्रपती शिवरायांच्या या थोरल्या बंधूंकडे आपल्या इतिहासाने कायमच काहीसे दुर्लक्ष केले, ही एक मोठी शोकांतिका आहे. इतिहासाचे भीष्माचार्य वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा अपवाद वगळता, इतर कोणत्याही इतिहासकाराने या थोर योद्ध्याच्या आयुष्यावर सखोल संशोधन केले नाही. परिणामी, त्यांचा पराक्रम आणि इतिहास आजही बहुतांश मराठी जनांसाठी अपरिचितच राहिला आहे. कदाचित याच अज्ञानामुळे त्यांची समाधी आज अशी दुर्लक्षित अवस्थेत आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'राजा शिवाजी' या रितेश देशमुख यांच्या चित्रपटामुळे शिवरायांचे थोरले बंधू किती कर्तृत्ववान होते, हा इतिहास प्रकर्षाने महाराष्ट्रासमोर येत आहे. यातून निश्चितच जनजागृती होईल. पण आता केवळ इतिहासाचे स्मरण करून चालणार नाही, तर या उपेक्षित स्मारकाच्या पुनर्बांधणीची नितांत आवश्यकता आहे.
यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. कोणतेही भाषिक किंवा सीमावाद न आणता, प्रशासनाने योग्य ती पावले टाकली, तरच कर्नाटकातील या समाधीचा जीर्णोद्धार होऊ शकेल. हे कार्य पूर्णत्वास गेल्यास, भविष्यात हे स्मारक केवळ इतिहासाची साक्षच देणार नाही, तर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी एक महान प्रेरणास्थान म्हणून दिमाखात उभे राहील!

--- तुषार भ. कुटे

#Marathi #ChhatrapatiShivaji #RajaShivaji #SambhajiMaharaj #ShivajiMaharaj #History #Kanakgiri #Karnatak #Maratha







 

Tuesday, May 5, 2026

राजा शिवाजी

एक मे रोजी प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या चित्रपटाबद्दल समाजमाध्यमांवर भरभरून लिहिले जात आहे, बोललं जात आहे. अर्थात चित्रपट अतिशय मेहनतीने आणि उत्तमरीत्या बनवलेला आहे, यात शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अवघ्या मराठी माणसांना व्यवस्थित ज्ञात आहे. तरीदेखील आपल्या राजाचे कर्तृत्व मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी मराठी लोक गर्दी करत आहेत, यातच या चित्रपटाचे यश आहे.



हा चित्रपट शिवकाळावर आधारित असणाऱ्या अन्य चित्रपटांपेक्षा काही विशेष कारणांमुळे वेगळा ठरतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रितेश देशमुखने हा चित्रपट प्रामुख्याने मराठी भाषेमध्ये तयार केला. आजवरच्या अनुभवावरून असं लक्षात येतं की बॉलीवूडच्या चित्रसृष्टीमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही मराठी दिग्दर्शक अथवा निर्मात्याने मराठी भाषेत चित्रपट बनवलेला नाही. प्रत्येकाला स्वतःच्या भाषेपेक्षा पैशाचं गणित महत्त्वाचं वाटतं. शिवाय मराठी चित्रपट म्हणजे भली मोठी जोखीम आहे, असे देखील वाटत असावं. परंतु रितेश देशमुखने मराठी प्रेक्षकांवर भरवसा ठेवून आपल्या भाषेमध्ये भव्यदिव्य चित्रपट तयार केला, याबद्दल त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. दक्षिण भारतीय असो वा उत्तर भारतीय भाषेतील चित्रपटसृष्टी असो यात मराठी चित्रपट कुठेही मागे पडत नाही, हेच या निमित्ताने अधोरेखित झाले. शिवाय स्वतःला महान समजणाऱ्या बॉलीवूडच्या चित्रसृष्टीमधून देखील बरेच कलाकार या चित्रपटांमध्ये दिसून आले. अनेकांना तर रितेशने मराठीदेखील बोलायला लावले. ही गोष्ट मला जास्त महत्त्वाची वाटते. सातत्याने मराठी चित्रपटसृष्टीला दुय्यम दर्जा देणाऱ्या कलाकारांना या निमित्ताने का होईना मराठी चित्रपटांचे महत्त्व समजेल.
चित्रपटाची सुरुवात शिवजन्मामागील एका भल्या मोठ्या पार्श्वभूमीने होते. आपल्याला शिवजन्मानंतरचा अर्थात शिवाजी महाराजांच्या कालखंडातील महाराष्ट्र माहित आहे. परंतु त्यापूर्वी या राज्यात नक्की काय घडले होते? लखोजी राजे जाधव तसेच शहाजीराजे यांच्या कारकिर्दीची पार्श्वभूमी देखील या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेली आहे. पहिल्या प्रसंगापासून ते अंतिम प्रसंगापर्यंत आदिलशाही सरदार अफझलखान हा प्रमुख खलनायक म्हणून लक्षात राहतो.
महाराष्ट्रावर सातत्याने वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांसारख्या परकीय आक्रमकांमधील चढाओढ या चित्रपटामध्ये सुंदररित्या मांडलेली आहे. सर्वात विशेष म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांची महाराष्ट्राला माहीत नसलेली कारकीर्द देखील ठळकपणे पाहता येते. जे आजवर कोणत्याही चित्रपटांमध्ये दाखविले गेले नाही. संभाजीराजे देखील शिवाजी महाराजांसोबत महाराष्ट्रामध्ये असते तर? अशा प्रश्नाचे उत्तर देखील आपण शोधू लागतो. 
सतराव्या शतकातील भला मोठा कालखंड या चित्रपटाने दाखवला आहे. कदाचित याच कारणास्तव काही घटनांना जास्त लांबी देता आलेली नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला हा चित्रपट निश्चितच एकदा नाही तर अनेकदा पाहण्यासारखा आणि दाखविण्यासारखा देखील आहे. कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर काही कलाकारांचे मराठी उच्चार वगळता ते इतरत्र कुठेही कमी पडत नाहीत. 
चित्रपटाची सध्याची एकंदरीत प्रगती पाहता लवकरच तो १०० कोटीचा पल्ला गाठेल, याची शक्यता आहे. अर्थात मराठी भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल, यात देखील शंका नाही.

--- तुषार भ. कुटे

Thursday, February 19, 2026

वा. सी. बेंद्रे आणि कलायोगी कांबळे यांची ऐतिहासिक देणगी: शिवरूपाचा शोध आणि रंगांची साधना

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नाहीत, तर ते एक अजोड दैवत आहेत. रयतेचा राजा, जाणता राजा आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून त्यांचे स्थान प्रत्येक मराठी मनाच्या गाभाऱ्यात अचल आहे. शतकानुशतके या महापुरुषाच्या पराक्रमाच्या गाथा गायल्या गेल्या, पोवाडे रचले गेले, आणि इतिहासाच्या पानांवर त्यांच्या शौर्याची नोंद झाली. तरीही, एका प्रश्नाने इतिहासकारांना आणि शिवभक्तांना दीर्घकाळ अस्वस्थ केले होते, तो प्रश्न म्हणजे—"आपले राजे खरोखर दिसायला होते तरी कसे?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे ऐतिहासिक आणि संशोधनपर श्रेय ज्येष्ठ इतिहासकार वा.सी. बेंद्रे यांना जाते, तर त्या सत्याला रंगांचे लेणे चढवून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य कोल्हापूरचे सुप्रसिद्ध चित्रकार 'कलायोगी' जी. कांबळे यांनी केले.
या दोन दिग्गजांमधील ऐतिहासिक दुवा म्हणून चित्रकार जी. कांबळे यांनी वा.सी. बेंद्रे यांना मे १९८४ मध्ये लिहिलेले एक पत्र अत्यंत महत्त्वाचे ठरते. बेंद्रे यांच्या नातीच्या अर्थात साधना बेंद्रे यांच्या संग्रहात हे पत्र आहे. या पत्रातून केवळ एका चित्राचा प्रवास उलगडत नाही, तर त्यामागील संशोधकीय आणि कलात्मक तपश्चर्याही समोर येते. कोल्हापूरात राहत असताना लिहिलेल्या या पत्रात कांबळे यांनी अत्यंत विनम्रतेने कबूल केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ आणि खरे रेखाचित्र मिळवून ते जगासमोर प्रकट करण्याचे संपूर्ण श्रेय हे वा.सी. बेंद्रे यांनाच आहे. विशेष म्हणजे याच पत्रामध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे चित्र देखील रेखाटण्याची इच्छा बोलवून दाखवलेली आहे. परंतु संभाजी राजांचे मूळ चित्र त्यांना मिळाले नाही.

मराठी मातीशी आणि भारताच्या भाग्याशी एकरूप झालेल्या शिवरायांचे रूप नक्की कसे असावे, याबद्दल समाजात अनेक तर्कवितर्क होते. अशा वेळी, वा.सी. बेंद्रे यांनी संशोधकाच्या चिकाटीने शिवरायांचे अस्सल समकालीन रेखाचित्र शोधून काढले. हेच रेखाचित्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या माध्यमातून चित्रकार कांबळे यांच्यापर्यंत पोहोचले. एका इतिहासकाराने शोधलेले सत्य आणि एका शिवशाहिराने केलेला पाठपुरावा, याला एका प्रतिभावान चित्रकाराची जोड मिळाली आणि इतिहास घडला.

 

 


मात्र, संशोधकाने शोधलेल्या सत्याचे रूपांतर कलेत करणे ही सोपी गोष्ट नव्हती. केवळ कल्पनेच्या भरारीवर चित्र काढणे वेगळे आणि इतिहासाच्या पुराव्यांवर आधारित अस्सल चित्र साकारणे वेगळे. जी. कांबळे यांनी या पत्रात आपल्या या पाच वर्षांच्या कठोर साधनेचे वर्णन केले आहे. बेंद्रे यांनी शोधलेल्या त्या मूळ रेखाचित्राचा कांबळे यांनी सलग पाच वर्षे सखोल अभ्यास केला. त्या चित्रातील प्रत्येक रेषा, चेहऱ्यावरील भाव आणि ऐतिहासिक बारकावे तपासून पाहण्यासाठी त्यांनी सुरुवातीला अनेक पेन्सिल स्केचेस तयार केली.
एखाद्या तपस्वी साधकाप्रमाणे पाच वर्षे अभ्यास केल्यानंतरच कांबळे यांनी कुंचला हातात घेतला. या प्रदीर्घ अभ्यासांती १९७४ साली त्यांनी शिवरायांचे ते भव्य तैलचित्र  साकारले, जे आज आपल्याला शिवरायांच्या खऱ्या रूपाची साक्ष देते. हे ऐतिहासिक तैलचित्र त्यांनी १९७४ मध्येच महाराष्ट्र शासनास अर्पण केले. आज शासकीय कार्यालयांपासून ते घराघरापर्यंत, आणि पुस्तकांपासून ते हृदयापर्यंत शिवरायांचे जे अधिकृत, तेजस्वी आणि प्रसन्न रूप आपण पाहतो, ते याच संशोधनाचे आणि कलेचे फलित आहे.
हे पत्र म्हणजे त्या ऐतिहासिक प्रवासाचा एक मूक साक्षीदार आहे. त्यात कांबळे यांनी "शिवरायांचे रूप खरोखर कसे होते?" या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचे श्रेय पूर्णपणे बेंद्रे यांना दिले आहे. इतिहासकार वा.सी. बेंद्रे यांची संशोधक दृष्टी आणि जी. कांबळे यांचा कलात्मक संयम यांच्यामुळेच महाराष्ट्राला आणि भारताला आपल्या लाडक्या राजाचे खरेखुरे रूप पाहण्याचे भाग्य लाभले. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरले जावे असे हे कार्य आहे, ज्याची साक्ष हे पत्र आजही देत आहे.

--- तुषार भ. कुटे

 

Thursday, March 6, 2025

सेतूमाधवराव पगडी यांची पुस्तके

इतिहास हा इतिहासकारांच्या नजरेतून वाचला की तो अधिक चांगला समजतो. त्यांची इतिहासाकडे पाहण्याची शास्त्रशुद्ध दृष्टी आपल्या दृष्टीत देखील बदल घडवून आणते.
त्यातही तटस्थ दृष्टी असणारे इतिहासकार विरळाच. महान इतिहासकार सेतूमाधवराव पगडी हे अशाच इतिहासकारांपैकी एक. महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी लिहिलेली पुस्तके इतिहासाची रम्य सफर घडवून आणतात. आणि आपल्याला इतिहास शिकवतात देखील. अशीच काही पुस्तके मागच्या काही दिवसांमध्ये वाचनात आली. ती तुम्हाला देखील निश्चित आवडतील. शिवाय आपल्या अज्ञात पण गौरवशाली इतिहासाची ओळख देखील करून देतील.

छत्रपती शिवाजी
https://amzn.eu/d/aVbTAHs

छत्रपती नि त्यांची प्रभावळ
https://amzn.eu/d/2nPiuHy

महाराष्ट्र आणि मराठे
https://amzn.eu/d/iFsOcZr

इतिहासाचा मागोवा
https://amzn.eu/d/gQX5HaW

पानिपतचा संग्राम
https://amzn.eu/d/49epGfA

कावेरी खोऱ्यातील यक्षनगरी
https://amzn.eu/d/bsdlcHJ

बहु असोत सुंदर
https://amzn.eu/d/2itHNys

वरंगलचे काकतीय राजे
https://amzn.eu/d/fdeN4OH

--- तुषार भ. कुटे

#मराठी #इतिहास #मराठा #छत्रपती #छत्रपती_शिवाजी_महाराज #पुस्तक #पुस्तके #महाराष्ट्र


 

Saturday, December 2, 2023

ग्रंथरांगोळी

नाशिक येथील मविप्र समाज संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालय प्रांगणामध्ये शिवोत्सव भरविण्यात आलेला आहे. या उत्सवामध्ये शिवरायांवरील ७५ हजार पुस्तकांचा वापर करून ग्रंथरांगोळी देखील साकारण्यात आलेली आहे. खरंतर ग्रंथांची देखील रांगोळी तयार करता येऊ शकते, ही संकल्पनाच अभिनव अशी आहे! शिवाय ती तयार करताना कल्पक नियोजन, प्रचंड मेहनत लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वातावरणातील बदलांचे आव्हान देखील असते. त्यावर सुयोग्य मार्ग काढून बनविलेली शिवरायांची ही भव्य रांगोळी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये पाहता येते.
याव्यतिरिक्त संस्थेच्या विविध शाळांमधील मुलांनी कल्पकतेने साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती देखील येथे पाहता येतात. जे किल्ले आपण प्रत्यक्ष पाहिलेले नाही, त्यांची प्रतिकृती दगड, माती, कागद यांचा वापर करून तयार केलेली आहे. असे सुमारे ६० पेक्षा अधिक किल्ले येथे बनविलेले आहेत. तसेच शिवरायांवरील विविध रंगीत चित्रे, मराठा हत्यारे आणि बारा बलुतेदारांची शिल्पे ही देखील या शिवोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत.


 

Tuesday, September 5, 2023

सुभेदार

प्रत्येक मराठी माणसाला तान्हाजीच्या कोंढाणा सर करण्याची गोष्ट माहित आहे. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक मावळ्यांपैकी एक म्हणजेच तान्हाजी मालुसरे होत. अशा या मराठी नायकाच्या पराक्रमाची गोष्ट दाखविणारा चित्रपट म्हणजे "सुभेदार" होय. जी गोष्ट आधीपासूनच सर्वांना माहीत आहे, तसेच जिच्यावर यापूर्वी तीन वर्षांपूर्वीच हिंदी चित्रपट देखील तयार झालेला आहे, ती गोष्ट नव्याने मांडणे खरंतर जोखमीचेच होते. पण दिग्दर्शक हाच चित्रपटाचा खरा नायक असतो हे सुभेदार या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळाले.
तान्हाजीच्या पराक्रमाची कथा सर्वांना माहीत आहेच पण ती प्रत्यक्ष मराठी पडद्यावर पाहणे, हा एक विलक्षण असा अनुभव होता. तीन वर्षांपूर्वी एका मराठी नावाच्या दिग्दर्शकाने 'सिनेमॅटिक लिबर्टी'च्या नावाखाली अतिशय काल्पनिक, अतिरंजीत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये 'अति' असणारा तान्हाजी नावाचा चित्रपट हिंदी भाषेमध्ये आणला होता. बहुतांश मराठी प्रेक्षकांना तो भावला नाही. पण बॉलीवूड स्टाईल या चित्रपटात ठासून भरलेली असल्याने भारतभरात त्याने बराचसा गल्ला जमवला होता. त्यामुळेच या दोन्ही चित्रपटांची तुलना होणे स्वाभाविक होते. एका इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि महाराष्ट्रप्रेमीच्या दृष्टीने बघितले तर सुभेदार हा कितीतरी वरचढ आणि अत्युत्कृष्ट चित्रपट आहे. मागील प्रत्येक चित्रपटागणिक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांची प्रतिभा वृद्धिंगत होत असल्याचे दिसते. ते अधिक अनुभवी झाल्याचे देखील दिसतात. ऐतिहासिक चित्रपटातील बारकावे, वेशभूषा, प्रसंग, देहबोली आणि भाषा यांचा अचूक संगम या चित्रपटांमध्ये पाहता येतो. या सर्व आयामांचा विचार केल्यास हिंदी चित्रपटापेक्षा हा चित्रपट कितीतरी उजवा आहे, हे समजून येते.
शिवकाळातील मराठा मावळे हे चिकणेचुपडे नसून रांगडे गडी होते! त्यांची देहबोली शत्रूला हीव भरविणारी होती. त्यांच्या शरीराबरोबरच त्यांचे डोळे देखील तितकेच बोलत असत. त्यांच्या प्रत्येक वाक्यातून शिवरायांविषयी आणि स्वराज्याविषयी निष्ठा दिसून येत होती. या सर्व गोष्टी सुभेदार चित्रपटामध्ये पाहायला मिळतात. शिवाय उत्तरेकडचा रजपूत उदयभान नक्की कसा होता, हे देखील या चित्रपटामध्ये उत्तमरीत्या दाखविलेले आहे. रजपुतांची देहबोली भाषा अचूकपणे दाखविल्याने आपल्यासमोर खराखुरे ऐतिहासिक प्रसंग उभे राहतात. इतिहास म्हटलं की वादविवाद आणि मतभेद हे आलेच. म्हणून काही गोष्टी काही लोकांना चुकीच्या वाटत असल्या तरी तान्हाजीच्या पराक्रमाचा हा इतिहास 'सुभेदार'मध्ये सखोलपणे मांडल्याचे जाणवते. शिवराज-अष्टक चित्रपटांतील सर्वच कलाकार पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या भूमिकेशी ते एकनिष्ठ असल्याचे देखील जाणवतात. यावेळी मृण्मयी देशपांडे बऱ्यापैकी छोट्या भूमिकेमध्ये आहे. पण ती भूमिका देखील तिने उत्तम वठवल्याचे दिसते. अजय पुरकर यांनी मागील चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे साकारले होते. सुभेदार मध्ये मात्र ते नव्याने तान्हाजी जगलेले आहेत. तान्हाजी मालुसरे असेच होते, ही प्रतिमा ते अगदी सहजपणे आपल्या मनात तयार करतात.
मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची उत्तम मांडणी करणारा हा चित्रपट एकदा तरी प्रत्यक्ष चित्रपटगृहामध्ये पहायलाच हवा असा आहे.

- तुषार भ. कुटे

 


 

Thursday, June 16, 2022

मऱ्हाटा पातशाह

मागील बरीच दशके मराठी माणसांची इतिहासाबद्दल अनास्था दिसून येते. जसे की शिवकालानंतर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे एकही चित्र उपलब्ध नव्हते. परंतु, शंभर वर्षांपूर्वी इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी महत्प्रयासाने छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले चित्र युरोपमधून भारतामध्ये आणले आणि शिवाजी महाराज कसे दिसत होते? हे महाराष्ट्रीयांना पहिल्यांदाच अनुभवता आले. विशेष म्हणजे त्यापूर्वीही शिवाजी महाराजांची चित्रे अनेक युरोपियन देशांमध्ये होती. परंतु इतिहास विषयाच्या अनास्थेमुळे आपण यावर फारसा विचार केला नाही. वा. सी. बेंद्रे यांनी शोधलेल्या पहिल्या चित्रानंतर हळूहळू शिवरायांची अनेक चित्रे उपलब्ध होत गेली. किंबहुना ती शोधण्यासाठी बेंद्रे यांची प्रेरणाच संशोधकांना कारणीभूत ठरली, असे म्हणता येऊ शकेल.
'शिवाजी महाराजांची चित्रे' हा विषय घेऊन लिहिलेला केतन कैलास पुरी लिखित 'मऱ्हाटा पातशाह' हा ग्रंथ होय. आजच्या काळामध्ये संशोधनात्मकरीत्या लिहिलेल्या निवडक ग्रंथांपैकी हा एक उत्तम ग्रंथ आहे. मागील शतकभरामध्ये शिवाजी महाराजांची विविध तत्कालीन चित्रकारांनी काढलेली चित्रे ही या पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. शिवाय त्यांमागील इतिहास, त्यांची चित्रशैली याचेही सारासार वर्णन सदर पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळते. शिवाजी महाराजांचे समकालीन इतिहासकारांनी केलेले वर्णन व त्यांचे चित्र किती मिळतेजुळते आहे, याचा तपशील लेखकाने खूप सुंदररित्या दिलेला आहे. शिवाय त्यांनी वापरलेले संदर्भदेखील विश्वासार्ह असेच आहेत. पुस्तक वाचताना आपण देखील शिवाजी महाराजांना त्या रूपामध्ये मनोमन पाहत जातो. शिवरायांची चित्रे काढणाऱ्या अनेक व्यक्ती इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेल्या आहेत. याची देखील खंत वाटते. खरंतर त्या चित्रकारांचे अगणित उपकार भारत देशावर आहेत, असे म्हणावे लागेल.
शिवाजी महाराजांव्यतिरिक्त आज विविध ठिकाणी उपलब्ध असणारी छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, शहाजीराजे, औरंगजेब यांची चित्रे देखील या पुस्तकांमध्ये कलर प्रिंट स्वरूपात पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांचे बोलणे कसे होते? यावर सेतुमाधवराव पगडी वगळता अन्य इतिहासकारांनी फारसा विचार केलेला दिसत नाही. याविषयी देखील एक प्रकरण या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.
एकंदरीत शिवरायांचे व्यक्तित्व शोधण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला दिसतो आणि तो यशस्वी देखील झालेला आहे.

Sunday, June 6, 2021

पडद्यावरील शिवराज्याभिषेक

६ जून अर्थात शिवराज्याभिषेक दिवस. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस होता. याच दिवशी मराठा राजा छत्रपती झाला! स्वराज्य आणि रयतेचे राज्य शिवछत्रपतींनी स्थापन केले.
कृष्णधवल चित्रपटांच्या काळातील भालजी पेंढारकरांपासून तर आजच्या हिरकणी चित्रपटापर्यत अनेकांनी पडद्यावर शिवराज्याभिषेक सोहळा सादर केला. या सर्वांचे सादरीकरण निश्चितच उत्तम दर्जाचे होते. सर्वच गाणी सातत्याने पहावी आणि ऐकावीशी वाटतात. प्रत्येक मराठी माणसाला ती प्रेरणा देणारीच आहेत. स्टार प्रवाह वाहिनी चालू झाली त्यावेळेस त्यांनी शिवरायांवर "राजा शिवछत्रपती" हि मालिका त्यांच्या वाहिनीवरून प्रदर्शित केली होती. या मालिकेची सुरुवातच शिवराज्याभिषेकाने दाखविण्यात आली होती. अन्य चित्रपट व मालिकांमध्ये दाखविण्यात आलेल्या शिवराज्याभिषेकापेक्षा या मालिकेतील हा सोहळा काहीसा वेगळा व शिवाजी महाराजांचे भाव खऱ्या अर्थाने प्रदर्शित करणारा होता. राज्याभिषेक सोहळा हा राजासाठी व तेथील प्रजेसाठी निश्चितच आनंदाचा एक सर्वोच्च सोहळा असतो. परंतु, या मालिकेत दाखविलेल्या या सोहळ्यामध्ये सिंहासनाकडे चालत जाताना शिवाजी महाराजांच्या मनातील भावना अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आल्या होत्या. स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासून राज्याभिषेकापर्यंत स्वराज्यासाठी अनेक मराठा सरदारांनी प्राणांचे बलिदान दिले होते. त्यांची आठवण शिवाजीमहाराजांना येते. बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, सूर्याजी काकडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, प्रतापराव गुजर यांचे बलिदान शिवरायांना आठवते. त्यांच्या मनात हाही प्रश्न निर्माण होतो की, 'माझ्या भावांनो... तुमच्या पायऱ्या करून मी सिंहासनाधीश्वर व्हायचं?' त्यांचा कंठ दाटून येतो. त्यावर ते पुढे विचार करतात,
मज दिली आयोध्या
तुम्हा लाभले वैकुंठीचे नाव,
तुम्ही लपला कोठे
मला घालुनी देवपणाचे घाव...
अतिशय भावपूर्ण असा हा प्रसंग चित्रित करण्यात आलेला आहे. तो पाहताना कोणत्याही मराठी माणसाचा कंठ दाटून आल्याशिवाय राहत नाही. एकदा तरी हा व्हिडीओ नक्की पहा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!!

व्हिडिओची हॉटस्टार लिंक: https://www.hotstar.com/in/tv/raja-shivchhatrapati/13021/shivaji-takes-an-oath/1000166210

मूळ गाणे:

जय राजा शिवछत्रपतींचा,
जय मंगलमय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...

स्वराज्य सुखकर मुक्त धरेवर,
सुराज्य करिती शिवराजेश्वर
प्रतिरोधाचा लय हो,
सत्वर जन भाग्योदय हो
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...

औक्षमान भव, दिगंत वैभव,
रामकीर्ति भव, कृष्णनीती भव
पुण्यप्रतापी सुखकर्ता शिव,
सुखमय संजय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...

बंधनात लाभे सिंहासन,
शककर्त्याचे लोक प्रशासन
बंधनात लाभे सिंहासन,
शककर्त्याचे लोक प्रशासन
रामच राजन, राम प्रजाजन
शासन सविनय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो... 


 

Sunday, October 18, 2020

पावनखिंडीतून...

रणजित देसाई लिखित "पावनखिंड" या कादंबरीतील हा बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांच्यातील एक संवाद. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची शिवाजी महाराजांची दृष्टी कशी होती? याची माहिती निश्चितच आपल्याला होते.

ते दृश्य पाहून राजे बाजींना म्हणाले,
'बाजी ! गनीम भारी पडला ! सिद्दी आता हलणार नाही. तो आपली वाट बघत राहणार !'
'कसली ?'
'शरणागतीची !' राजांनी सांगितले.
'वाट बघ, म्हणावं !' बाजी उसळले, 'वेळ आलीच, तर मारू किंवा मरू'
राजे हसले. ते म्हणाले,
'नाही, बाजी, असला अतिरेकी विचार आपल्याला परवडणार नाही. ते फक्त रजपूत करू जाणे ! मोठं संकट आलं की, वैतागानं प्राणाची बाजी लावायची आणि रणांगणी समर्पण करायचं. मागं बायका-मुलींनी जोहार करायचा. नावलौकिक फक्त मरणाचा. यश मात्र नेहमीच शत्रूच्या हाती !'

Tuesday, September 1, 2020

शिलेदारांचे ईमान - अनंत तिबिले

मी सहसा ऐतिहासिक कादंबरी वाचत नाही. कादंबरीकार इतिहास अधिक रंजक पद्धतीने मांडत असल्याने तो चुकीचा मनात बसण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी पुस्तके मी टाळतो. परंतु, काहीतरी वेगळं वाचावं यासाठी अनंत तिबिले यांची ही पहिलीच कादंबरी वाचून काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका अज्ञात मावळ्याच्या शौर्यावर व त्याच्या तत्कालीन जीवनावर आधारित असणारी ही कादंबरी होय. त्याचे नाव केदार. नाव तसं तत्कालीन परिस्थिती पाहता वेगळं वाटत असलं, तरी ते फारसं जाणवून येत नाही. कादंबरीचा नायक अर्थात जो स्वराज्याचा शिलेदार आहे, तो अनाथ आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात तो दाखल होतो व प्रतापगडची मोहीम, विशाळगडचा वेढा तसेच मिरजेचा वेढा अशा विविध प्रसंगांमध्ये आपले शौर्य दाखवतो. अशी एकंदरीत कादंबरीची पार्श्वभूमी आहे. शिवाय तिला प्रेमकहाणीचाही स्पर्श झालेला आहे. अनंत तिबिले यांनी सर्व प्रसंग विविध प्रकरणांमध्ये मांडलेले आहेत. प्रसंग जरी निरनिराळे असले तरी कथा कुठेही तुटत नाही. तिची रंजकता टिकून राहते. शिवकालामध्ये खरोखरच कित्येक मावळ्यांच्या जीवनात असे प्रसंग आले असावेत, याची जाणीव ही कादंबरी निश्चितच करून देते.

 

Saturday, March 28, 2020

शिवछत्रपती: एक मागोवा

इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडेल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली? शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते? या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते? तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते? याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल.


Tuesday, March 24, 2020

शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?

महाराष्ट्रात असे फार क्वचितच इतिहासकार असतील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिले नाही. शिवरायांवर लिहिलेल्या हजारो  पुस्तकांपैकी हेही एक छोटेखानी पुस्तक. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. खरतर शिवचरित्रापासून या अगणित गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, ज्या एका पुस्तकातून मांडणं केवळ अशक्य आहे. जयसिंगराव पवारांनी त्यांच्या लेखमालेतून शिवचरित्रातील काही अंग इतिहासकाराच्या नजरेतून उलगडून दाखवले आहेत. त्यामुळे शिवप्रेमी व अभ्यासकांसाठी हे निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल. मराठा इतिहासाचे ज्येष्ठ संशोधक प्रा. न.र. फाटक म्हणाले होते इतिहासाला चार मुख्य शत्रू असतात, ते म्हणजे नाटककार, कादंबरीकार, सिनेमावाले व राजकारणी लोक! त्यांच्या काळात टीव्ही नव्हता अन्यथा पाचव्या शत्रूचीही त्यात भर पडली असती. त्यांचे म्हणणे मात्र शंभर टक्के खरे आहे. खरा इतिहास जाणून घेणाऱ्यांनी या पाच शत्रुंपासून दूर राहायला हवे. 


डॉ. पवारांनी शिवचरित्राचे काही महत्त्वपूर्ण पैलू या पुस्तकातून सादर केले आहेत ते इथे नमूद करू इच्छितो.
  1. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. परंतु ते केवळ हिंदूंचेच राजे होते का? इस्लामी जनतेविषयी त्यांचा दृष्टिकोन कसा होता? या प्रश्नांची उत्तरे इतिहासकारांच्या नजरेतून आपल्याला मिळतात.
  2. शिवरायांना रयतेचा राजा मानले जात. इतर बादशहा प्रमाणे त्यांची त्यांनी स्वतःलाच रयतेचा राजा मानले नव्हते. तर रयतेने त्यांना खर्‍या अर्थाने राजा म्हणून स्वीकारले होते. हे ऐतिहासिक पुराव्यांतून डॉ. पवारांनी सिद्ध केले आहे.
  3. शिवछत्रपती हे मराठा आरमाराचे किंबहुना भारतीय आरमाराचे खरे जनक होय. सागरावर राज्य प्रस्थापित करणे किती महत्त्वाचे आहे, हे ते जाणून होते. इतिहासाच्या पुस्तकात नसणाऱ्या विविध आरमार मोहिमांची माहिती या पुस्तकातून होते. शिवाय स्वतः आरमाराच्या गलबलातून प्रवास करून मोहीम फत्ते करणारे शिवाजी महाराज हे पहिले व शेवटचे मराठी राजे होत!
  4. सुरतेच्या हल्ल्याच्यावेळी शिवाजी महाराजांवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचे तपशीलवार वर्णन या पुस्तकात सापडेल. शिवाय सुरतेच्या दोन्ही छाप्यांव्यतिरिक्त त्यांनी इतरही अनेक मुघलांच्या समृद्ध बाजारपेठांवर सातत्याने हल्ले केले होते. त्याचा सारांश या पुस्तकात उपलब्ध आहे.
  5. शिवराज्याभिषेक ही इतिहासातील एक मोठी घटना होती. त्यासाठी त्यांना किती दिव्ये पार पाडावी लागली होती. अनेक शतकांनंतर इस्लामी राजवटीत असलेल्या भारतात एक हिंदुराजा सार्वभौम छत्रपती झाला होता.
  6. छत्रपतींचे व इंग्रजांचे एकंदरीत राजकीय संबंध कसे होते? यावरील डॉ. पवारांचा तपशीलवार लेख आहे. इतिहासातील अनेक अज्ञात गोष्टी या माध्यमातून अभ्यासकांना निश्चितच समजतील. शिवाय सिद्धी, पोर्तुगीज, डच या पश्चिमेकडून आलेल्या अन्य परकीय शक्तींचा शिवाजी महाराजांनी कसा सामना व वापर केला याचीही माहिती या पुस्तकात आहे.
  7. शिवरायांच्या सर्व सेनानीपैकी हंबीरराव मोहिते हे असे सेनापती होते, ज्यांनी स्वराज्याच्या पहिल्या दोन्ही छत्रपतींची कारकीर्द प्रत्येकी सात वर्षे पाहिली. त्याबद्दलही इतिहासात बरीच कमी माहिती सापडते. त्यांनी ठरवले असते तर आज इतिहास वेगळा असला असता. परंतु स्वराज्य निष्ठावंत असणाऱ्या हंबीररावांनी खंबीरपणे राज्याची सेवा केली अनेक मोहिमांमध्ये विशेषत: संभाजीमहाराजांच्या काळात त्यांनी शत्रूला नामोहरम करून सोडले होते. कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेतले होते. त्यांच्यावरील सर्वात विस्तृत लेख या पुस्तकात सापडतो. तो निश्चितच वाचनीय आहे.
  8. शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमांची माहिती आजही सर्वसामान्य शिव अभ्यासकांना नाही. तंजावर, जिंजीची स्वारी, व्यंकोजी बरोबरचे युद्ध व वाटाघाटी यासंबंधी बरीचशी माहिती डॉ. पवारांनी त्यांच्या लेखांतून दिली आहे.
एकंदरीतच शिवाजी महाराजांच्या नीतीकौशल्याची, युद्धकौशल्याची व राज्यकौशल्याची तपशीलवार आढावा घेणारे काम हे पुस्तक निश्चित करते यात शंका नाही.

Tuesday, December 4, 2018

राजगड हिंदीतून

गडांचा राजा अन राजांचा गड म्हणजे राजगड...
शिवरायांचा सर्वात अधिक सहवास लाभलेला किल्ला म्हणजे राजगड...
स्वराज्यातील प्रतापगडाचे युद्ध, लाल महालातील चढाई, सुरतेचा छापा, आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह यासारख्या घटनांचा राजधानी म्हणून साक्षीदार असलेला दुर्ग म्हणजे राजगड...
या किल्ल्याविषयी बऱ्याच दिवसांपासून हिंदी लेख लिहावा असे बऱ्याच दिवसांपासून मनात होते. ही इच्छा मी एक जानेवारी २०१३ मध्ये पूर्ण केली. सदर लेख इथे http://tusharkute.blogspot.com/2013/03/blog-post_8071.html वाचता येईल. तदनंतर दोन वर्षांनी मी हाच लेख महाविद्यालयाच्या वार्षिक मासिकासाठी पाठविला होता. लेख दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिंदी संपादकीय मंडळातून मला फोन आला. त्यांना वाटत होते की, सदर लेख मी 'रायगड' या किल्ल्यासाठी लिहिला असावा पण चुकून त्यात 'राजगड' असं नाव आलंय. आपल्यालाच लोकांना आपल्या किल्यांविषयी अथवा इतिहासाविषयी माहिती नाही, याचे मला अर्थातच फारसे विशेष वाटले नाही. लेख अखेर प्रसिद्ध झाला! त्यावेळी त्यावर मला अनेक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तुमच्या प्रतिक्रिया व सूचनांचे स्वागत यावेळीही आहे.
http://tbkute.blogspot.com/2015/11/hindi_17.html

Monday, April 9, 2012

शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम सरदार


फेसबुकच्या ’मी मराठी’ ग्रूपमध्ये सुधीर चौधरी यांनी पोस्ट केलेली माहिती मी इथे देत आहे. मी सुद्धा ही पहिल्यांदाच ऐकली आहे....

छत्रपतींच्या जीवाला जीव देणारे अनेक मुस्लिम सरदार स्वराज्यात होते.

नूरखान बेग:
हा पायदळाचा प्रमुख होता.

सिद्दी अंबर वहाब हवालदार:
याने (जुलै १६४७) मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला.

सिद्दी इब्राहिम:
हा छत्रपती शिवरायांचा अंगरक्षक होता, अफजलखानाच्या भेटीच्या वेळी तो छत्रपती शिवरायांचा अंगरक्षक होता (१९ नोव्हेंबर १६५९), फोंड्याचा लढाईवेळी त्याने पराक्रम गाजविला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले.

सिद्दी हिलाल:
हा घोडदळात अधिकारी होता,पन्हाळगडाच्या वेढ्यात (२ मार्च १६६०) त्याने शिवरायांच्या सुटकेसाठी मोठा पराक्रम गाजविला, तसेच उमराणीजवळ बहलोल खानाविरूध्द झालेल्या लढाईत (१५ एप्रिल १६७३) तो होता. नेसरीजवळ बहलोल खानाशी झालेल्या युध्दात प्रतापराव
गुजराबरोबर मारल्या गेलेल्या सात वीरात सिद्दी हिलाल होता.

सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलालचा पुत्र):
हा घोडदळातील सरदार होता, पन्हाळगडाला सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत तो जखमी झाला
(
दि.२ मार्च १६६०).

मदारी मेहतर:
हा छत्रपतींचा विश्वासू सेवक होता. आग्र्याच्या बंदोबस्तातून महाराजांना सुटतेवेळी याची मोठी मदत झाली (१७ ऑगस्ट १६६६).

काझी हैदर
हा छत्रपती शिवरायांचा वकील होता (सन १६७०-१६७३). हुसेनखान मियाना याने मसौदखानाच्या कर्नाटकातील प्रांतावर हल्ला करून बिळगी, जामखिंड, धारवाड आदि प्रांत जिंकला (मार्च १६७९).

रुस्तमेजनमा
हा महाराजांना विजापूर दरबाराच्या गुप्त बातम्या पाठवण्याचे काम करीत असे, हुबळीच्या लुटीच्या वेळी त्याने मोठी कामगिरी पार पाडली (६ जानेवारी १६६५).

दर्यासारंग
हा मराठी आरमाराचा पहिला सुभेदार होता. त्याने मायनाक भंडारीसोबत खांदेरीवर (सन १६७९) विजय मिळवला. तर संभाजीराजेच्या कालात बसनूर (जानेवारी-फेब्रुवारी १६८५) लुटले.

दौलतखान, इब्राहीम खान, सिद्दी मिस्त्री
या आरमारातील अधिकार्यांनी खांदेरी (१६७९) आणि संभाजीराजेंच ्या बसनूरच्या(जानेवारी-फेब्रुवारी १६८५) मोहिमेत मोठा पराक्रम केला.

सुलतान खान
हा सुभेदार पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला होता.

इब्राहिम खान गार्दी
हा मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. त्या काळात तोफखान्यातील सर्व गोलंदाज (तोफची) मुस्लीम होते. विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेल्या ७०० पठाणी पायदळ आणि घोडदळाने स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली.
छत्रपतीच्या काळात असे अनेक निष्ठावंत मुस्लीम सैनिक होते ज्याची माहिती आपणास
ज्ञात नाही. हे लिहिण्याचे प्रयोजन एवढ्याचसाठी की आपण छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजेंना धर्माच्या बंधनात, भाषेच्या बंधनात अडकवून, या राष्ट्रपुरूषांचे महत्व कमी करू नये. छत्रपतींचे विचार आपण आचरणात आणावेत. त्यांच्या विचारांशी प्रतारणा करू
नये.
जय शिवराय....!!!
(कोणाला मूळ लेखक/इतिहासकार माहित असल्यास सांगावे).