पांडवलेणी मधील भिंतींवर कोरलेली ती गूढ अक्षरे नक्की काय आहेत? याची माहिती मला वीस वर्षांपूर्वी नव्हती. जुन्या काळातली कुठलीशी लिपी आहे आणि लेण्यांविषयी माहिती त्यामध्ये लिहिलेली असावी, असं मला वाटायचं. या लेण्या पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात बनवल्या होत्या, असे बरेच गैरसमज पसरलेले होते. परंतु कालांतराने या लेण्यांच्या इतिहासाची हळूहळू माहिती होत गेली. सातवाहन काळाचा इतिहास वाचून काढला. त्याकरिता डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांचं बऱ्याच वर्षांपूर्वी घेतलेलं "सातवाहनकालीन महाराष्ट्र" हे पुस्तक उपयोगात आलं. २००० वर्षांपूर्वी महाराष्ट्र देशावर राज्य करणारे सातवाहन राजे नक्की कोण होते? त्यांची राज्यपद्धती कशी होती? तसेच त्यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक कशी घडवली? अशा विविध प्रश्नांची उकल सर्वप्रथम या पुस्तकामुळे मला झाली. कालांतराने सातवाहनांशी संबंधित अनेक पुस्तकांचे वाचन केले. यातून दोन हजार वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची माहिती झाली.
सुदैवाने माझा जन्म जुन्नरचा. जुन्नरच्या परिसरामध्ये सातवाहनांच्या अगणित पाऊलखुणा आजही दिसून येतात. अनेक लेण्या, किल्ले आणि शिलालेख या परिसरामध्ये आहेत. तिथे वावरताना सातवाहन काळाच्या इतिहासाची सखोल ओळख करून घेता आली. शिवाय यामधून प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे विविध कंगोरे देखील ध्यानात आले.
हा प्राचीन इतिहास आपल्यासमोर आणण्यासाठी काही मोजक्या इतिहास संशोधकांनी अथक प्रयत्न केले. त्यातीलच एक रा. श्री. मोरवंचीकर होय. त्यांच्या सातवाहनकालीन महाराष्ट्र या पुस्तकामुळे ते माझ्या नेहमीच लक्षात राहिले. दोन दिवसांपूर्वी त्यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. इतिहासविश्वाने याची दखल घेतली की नाही हे माहित नाही. परंतु महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास देशासमोर आणण्याचे त्यांचे महान कार्य इथून पुढे तरी मराठी लोक लक्षात ठेवतील, अशी आशा वाटते.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
-- तुषार भ. कुटे
Thursday, January 22, 2026
रा. श्री. मोरवंचीकर
Monday, January 19, 2026
तंत्रज्ञान आणि अनुवाद
"प्रॅक्टिकल डेटा सायन्स" या माझ्या नव्या पुस्तकाची समाजमाध्यमावर पोस्ट केल्यानंतर काही दिवसांमध्ये एका वाचकाचा मला मेसेज आला. 'सर तुम्ही कोणत्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद करून हे पुस्तक लिहिले आहे?' अर्थातच हा प्रश्न काही आश्चर्यकारक नव्हता. यापूर्वी देखील 'पायथॉन प्रोग्रामिंग'च्या वेळेस दोन जणांनी मला असा प्रश्न विचारला होता.
मूलतः भारतीय भाषांमध्ये तंत्रज्ञानाचे ज्ञान तयार होत नाही किंवा लिहिले जात नाही, हा भारतीय लोकांचा गैरसमजच. संगणक तंत्रज्ञानाचा उदयच पाश्चिमात्य देशांमध्ये झाला. मुख्यत्वे इंग्रजी बोलणाऱ्या देशांमध्ये म्हणजेच अमेरिका आणि इंग्लंडसारख्या राष्ट्रांमधील संगणक विकसकांनी या तंत्रज्ञानाला गती दिली. त्यामुळे त्यांचे ज्ञान हे त्यांच्याच इंग्रजी भाषेमध्ये लिहिले गेले. परंतु युरोपियन देशांनी मात्र इंग्रजीतील हे ज्ञान स्वतःच्या भाषेमध्ये लिहिले. आजही त्यांची जवळपास सर्वच पुस्तके स्थानिक भाषेमध्ये लिहिलेली असतात. अनेक शतकांपूर्वी आपल्या देशामध्ये संस्कृत भाषेविषयी जी परिस्थिती होती तीच आज इंग्रजीच्या बाबतीत आहे. त्या काळात ज्ञान फक्त संस्कृत भाषेमध्येच लिहिले गेले होते. परंतु कालांतराने अनेक विभूतींनी प्रयत्नपूर्वक सर्वसामान्य लोकांच्या भाषेमध्ये लिहून त्यांना समाजज्ञानाची ओळख करून दिली.
भारतामध्ये मात्र संगणक तंत्रज्ञानाची ओळख व्हायला काही दशके जावी लागली. या तंत्रज्ञानाची आपल्याला बऱ्याच उशिरा आणि संथपणे ओळख झाली. इथल्या विकसकांनी इंग्रजी भाषा आत्मसात करून, पाश्चिमात्य पुस्तकांचा अभ्यास करून संगणक क्षेत्रामध्ये शिरकाव केला. मागच्या शतकामध्ये तंत्रज्ञानाची माहिती आपल्या भाषांमध्ये आणण्यासाठी कुणी प्रयत्न केल्याचे मला आठवत नाही. परंतु मागच्या दहा-पंधरा वर्षांपासून हळूहळू संगणक ज्ञान आपल्या भाषांमध्ये तयार होत आहे. या क्षेत्रामध्ये अनुवादित पुस्तके जवळपास नाहीतच. पाश्चिमात्य लेखकांनी लिहिलेली प्रेरणादायी पुस्तके अनुवादित होऊन भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झालेली आहेत. परंतु तंत्रज्ञान क्षेत्राची अशी परिस्थिती नाही. भारतीय भाषांमध्ये पुस्तके नगण्य असली तरी ती बहुतांश इथल्याच लेखकांनी लिहिलेली आहेत. अर्थात मी देखील माझ्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर करून 'पायथॉन प्रोग्रामिंग', 'डेटा सायन्स' आणि 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' अशी आजच्या युगातील तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकांसह आपल्या भाषेमध्ये लिहिली. खरं सांगायचं तर हे तंत्रज्ञान शिकताना मी अनेक पुस्तकांचा वापर केला होता. परंतु मराठीतून पुस्तक लिहिताना केवळ अनुभवाचाच वापर झाला. यासाठी कोणत्याही इंग्रजी पुस्तकाचा संदर्भ घेतला नव्हता. वाचकांच्या दृष्टिकोनातून शिकण्याचा प्रवाह कसा असावा? कोणत्या प्रात्यक्षिकांचा अंतर्भाव या पुस्तकांमध्ये असावा? तसेच एखादी संकल्पना आपल्या भाषेमध्ये कशा पद्धतीने सहज व सोपी करून सांगता येईल? अशा विविध प्रश्नांचा विचार करूनच मी पुस्तकांची रचना केली आहे. यावर्षी रोबोटिक्स, संगणकायन, प्रॅक्टिकल मशीन लर्निंग, प्रॅक्टिकल न्यूरल नेटवर्क, प्रॅक्टिकल कॉम्प्युटर व्हिजन, प्रॅक्टिकल नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, प्रॅक्टिकल जनरेटिव्ह एआय, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स, एआय आणि क्रिएटिव्हिटी, एआय आणि गूढ प्रश्नांची उकल, ड्रॅगनच्या विळख्यात एआय आणि मशीनचे मन अशी विविध पुस्तके मराठी भाषेतून प्रसिद्ध करण्याचा माझा मानस आहे. अर्थात केवळ इंग्रजीत वाचकांना असणारे ज्ञान सर्वसामान्य मराठी जनापर्यंत पोहोचावे, या एकमेव उद्देशाने या पुस्तकांचे लिखाण चालू आहे. हळूहळू एकेक पुस्तक मराठी वाचकांपर्यंत पोहोचेल. त्यांनाही यातून तंत्रज्ञानाची सखोल ओळख होईल, असा मला दृढ विश्वास आहे.
--- तुषार भ. कुटे
Saturday, January 3, 2026
९९ वे मराठी साहित्य संमेलन
९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा झाली तेव्हाच ठरवले होते की यंदाच्या संमेलनासाठी साताऱ्याला जायचे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अमोलची तब्येत फारशी बरी नसल्याने आमचे नियोजन अधांतरीत होते. याही परिस्थितीमध्ये मार्ग काढत संमेलनाच्या चार दिवसांपैकी एका दिवशी जाणे आम्ही निश्चित केले. तो दिवस होता २ जानेवारी २०२६.
सातारा पुण्यापासून फार फार तर सव्वाशे किलोमीटर अंतरावर. त्यामुळे दोन ते अडीच तासांचा रस्ता. सकाळी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जाण्याची आम्ही ठरवले होते. पुण्यातून निघता निघता साडेअकरा वाजले. मोशी होऊन कर्वेनगरला आणि कर्वेनगर होऊन थेट साताऱ्याच्या दिशेने प्रयाण केले. कालचा संमेलनाचा पहिला दिवस होता. त्यामुळे आजच्या दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी जम बसलेला असेल, असे वाटूनच आम्ही साताऱ्याच्या दिशेने प्रयाण केले. बऱ्याच महिन्यानंतर अमोल इतक्या लांबचा प्रवास करणार होता. त्यामुळे थांबत थांबतच आम्ही प्रवास करत होतो. दुपारी दोनच्या सुमारास साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमवर संमेलन स्थळी पोहोचलो. यापूर्वी सन २०२० मध्ये नाशिकला सर्वप्रथम साहित्य संमेलनाला उपस्थित राहता आले होते. साताऱ्यातील ही आमची दुसरी वेळ. तशी बऱ्यापैकी गर्दी होती. परंतु मागचे तीन वर्षे पुणे पुस्तक महोत्सवातील गर्दी पाहत असल्याने ही गर्दी फार काही वाटली नाही. पुस्तक प्रकाशकांचा आणि विक्रेतांसाठी एक डोम बनवला होता. पुण्यातील बहुतांश पुस्तक प्रकाशक या ठिकाणी होते. मागच्या तीन-चार वर्षांमध्ये बऱ्याच जणांशी ओळखी झालेल्या आहेत. आणि त्या दिवसेंदिवस वृद्धिंगत देखील होत आहेत. साकेत प्रकाशनाच्या स्टॉलवर मला मधुश्री पब्लिकेशनने माझे प्रकाशित केलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पुस्तक देखील दिसले. म्हणजे यावर्षीच्या साहित्य संमेलनामध्ये मी देखील अप्रत्यक्षरीत्या तिथे होतो. मधुश्री पब्लिकेशनच्या स्टॉलवर शरद अष्टेकर देखील भेटले. इथे देखील माझे पुस्तक होते. अनेकांशी भेटीगाठी झाल्या. दुपारच्या सुमारास कवी संमेलन देखील होते. या ठिकाणी थोड्या वेळ बसण्याचा योग आला. साडेचारच्या सुमारास आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
पुण्याच्या दिशेने परतताना उताराचा रस्ता असल्याने तशी गाडीला चार्जिंग करण्याची गरज नव्हती. परंतु जोखीम न पत्करता एका हॉटेलपाशी चार्जिंग केली आणि परतीच्या मार्गाला लागलो.
पुढच्या वर्षी शंभरावे साहित्य संमेलन होणार आहे. आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की, ते पुणे अथवा पिंपरी चिंचवड सारख्या भागामध्ये व्हावे. आशा करूया की आमची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल.
--- तुषार भ. कुटे
Thursday, December 18, 2025
प्रॅक्टिकल डेटा सायन्स
पायथॉन प्रोग्रॅमिंगचे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अगदी काहीच दिवसांमध्ये तुम्ही डेटा सायन्स चे पुस्तक लिहिणार आहात का? अशी अनेक जणांकडून विचारण्यात आली होती. खरंतर त्याआधीच डेटा सायन्सच्या मराठी पुस्तकावर मी काम चालू केले होते. परंतु प्रशिक्षणाच्या अतिशय व्यस्त वेळापत्रकामुळे पुस्तकावर काम करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. तरीदेखील अधून मधून छोट्या छोट्या संकल्पनांवर काम करत विविध प्रकारची माहिती मराठीमध्ये लिहून काढत गेलो. पुस्तकाचा असा विशिष्ट साचा ठरला नव्हता. परंतु वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमधून आलेल्या अनुभवामुळे पुस्तकाची व्यवस्थित मांडणी करता आली. "प्रॅक्टिकल डेटा सायन्स" या पुस्तकामध्ये कोणकोणत्या संकल्पनांचा समावेश असावा, याची अनुक्रमे सविस्तरपणे मांडणी केली. पायथॉन प्रोग्रॅमिंग प्रमाणेच डेटा सायन्स मध्ये देखील सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा पद्धतीने मराठीतून लिहीत गेलो. सुमारे ९०% पेक्षा अधिक संकल्पना या पायथॉनद्वारे प्रॅक्टिकलचा आधार घेऊन पुस्तकात मांडल्या. अगदी सिद्धांतिक दृष्टिकोनापासून प्रात्यक्षिकांपर्यंतचा डेटा सायन्सचा प्रवास या पुस्तकामध्ये मांडला. विदा विश्लेषणाच्या तसेच संख्याशास्त्राच्या विविध संकल्पनांना मराठीतून सहज आणि सोप्या पद्धतीत मांडण्याचा अनुभव पहिल्या पुस्तकाप्रमाणेच विलक्षण होता. आणि अखेरीस दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुस्तकाची सविस्तर मांडणी पूर्ण झाली. विदा विज्ञान म्हणजे काय पासून या विषयातील प्रकल्प व्यवस्थापनापर्यंतचा प्रवास "प्रॅक्टिकल डेटा सायन्स" या पुस्तकांमध्ये मी सविस्तरपणे मांडण्यात यशस्वी ठरलो, असे मला वाटते.
बऱ्याच दिवसांनी म्हणजे तब्बल तीन वर्षानंतर तंत्रज्ञान विश्वातील माझे पुढचे पुस्तक तयार झाले आणि प्राकृत प्रकाशनाने ते प्रकाशित देखील केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी पाया मांडल्या गेलेल्या डेटा सायन्सची प्रात्यक्षिकांद्वारे या पुस्तकातून सखोल मांडणी केली आहे. सध्या तरी हे पुस्तक पुणे पुस्तक महोत्सवांमध्ये केवळ बुक विश्वच्या स्टॉल क्रमांक H५६ वर उपलब्ध आहे.
या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी "प्रॅक्टिकल डेटा सायन्स"चा निश्चितपणे नवतंत्रज्ञांना चांगला उपयोग होईल, तेव्हाच या पुस्तकाचे सार्थक झाले असे मी समजेल.
--- तुषार भ. कुटे
Thursday, March 6, 2025
सेतूमाधवराव पगडी यांची पुस्तके
इतिहास हा इतिहासकारांच्या नजरेतून वाचला की तो अधिक चांगला समजतो. त्यांची इतिहासाकडे पाहण्याची शास्त्रशुद्ध दृष्टी आपल्या दृष्टीत देखील बदल घडवून आणते.
त्यातही तटस्थ दृष्टी असणारे इतिहासकार विरळाच. महान इतिहासकार सेतूमाधवराव पगडी हे अशाच इतिहासकारांपैकी एक. महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी लिहिलेली पुस्तके इतिहासाची रम्य सफर घडवून आणतात. आणि आपल्याला इतिहास शिकवतात देखील. अशीच काही पुस्तके मागच्या काही दिवसांमध्ये वाचनात आली. ती तुम्हाला देखील निश्चित आवडतील. शिवाय आपल्या अज्ञात पण गौरवशाली इतिहासाची ओळख देखील करून देतील.
छत्रपती शिवाजी
https://amzn.eu/d/aVbTAHs
छत्रपती नि त्यांची प्रभावळ
https://amzn.eu/d/2nPiuHy
महाराष्ट्र आणि मराठे
https://amzn.eu/d/iFsOcZr
इतिहासाचा मागोवा
https://amzn.eu/d/gQX5HaW
पानिपतचा संग्राम
https://amzn.eu/d/49epGfA
कावेरी खोऱ्यातील यक्षनगरी
https://amzn.eu/d/bsdlcHJ
बहु असोत सुंदर
https://amzn.eu/d/2itHNys
वरंगलचे काकतीय राजे
https://amzn.eu/d/fdeN4OH
--- तुषार भ. कुटे
#मराठी #इतिहास #मराठा #छत्रपती #छत्रपती_शिवाजी_महाराज #पुस्तक #पुस्तके #महाराष्ट्र
Sunday, December 22, 2024
पुस्तक महोत्सवात ज्ञानेश्वरी
पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आज प्रचंड गर्दी झाली होती. आमच्या स्टॉलमध्ये वाचकांना पुस्तके पाहण्यासाठी बऱ्यापैकी मोकळी जागा ठेवलेली होती. तरी देखील अनेकांना चालता येत नव्हते. आमच्यावरील बिलिंगचा भार देखील वाढलेला होता. अशावेळी ज्ञानेश्वरीने एका बिलबुकाची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. आणि पटापट एका बाजूने ती बिले करू लागली. पुस्तकांची नावे लिहून, त्यांची किंमत लिहून त्यावरील सवलतीसह किती किंमत आहे, हे ती पटापट बिलांवर लिहित होती आणि अंतिम बिल बनवून देत होती. तिचा आम्हाला बराच हातभार लागला. पुस्तके विकत घेतल्यानंतर बिल करण्यासाठी येणारे वाचक तिच्याकडे कौतुकाने पाहत होते. इतकी लहान मुलगी पटापट बिले लिहून त्यांना देत असताना दिसली. अनेकांनी तिचे तोंड भरून कौतुक देखील केले. काहींनी फोटो काढले. अनेकांनी तर त्यांच्यासोबत आलेल्या मुलांना दाखवले देखील की, बघ ती मुलगी कसं काम करत आहे!
इतकी लहान मुलगी पटापट मराठीमध्ये कसं लिहू शकते? विशेष म्हणजे तिचे आकडेदेखील मराठीमध्ये होते, याचे देखील खूप आश्चर्य वाटलं. ती मराठी माध्यमामध्ये शिकत आहे, हे ऐकल्यावर काहींचे डोळे विस्फारले होते. पुस्तकांच्या जगात वावरताना दिवसभर तिची आम्हाला हातभार लावण्यासाठी चाललेली चाललेली लगबग अखेरीस रात्री महोत्सव बंद होईपर्यंत चालूच होती. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिची यावर्षीची पुस्तकांची खरेदीही खूप मोठी झाली!
--- तुषार भ. कुटे
पुणे पुस्तक महोत्सवातील परकीय पाहुणे
आज पुणे पुस्तक महोत्सवामध्ये या दोन परदेशी व्यक्तींनी लक्ष वेधून घेतले. ते जवळपास सर्व स्टॉलवर फिरत होते. इथली गर्दी बघून त्यांचे व्हिडिओ देखील काढत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कौतुक मिश्रित आश्चर्याचे भाव दिसून आले. महोत्सवामध्ये पुस्तके पाहण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी झालेली गर्दी पाहून ते आश्चर्यचकित झाले असावेत. पुस्तकांनी भरलेल्या मोठमोठ्या पिशव्या घेऊन जाणाऱ्या लोकांचे त्यांनी नकळत फोटो देखील काढले. एकंदरीत पुणेकरांच्या वाचनप्रेमाने ते भारावून गेले होते. भारतीयांविषयी तसेच इथल्या वाचन संस्कृतीविषयी त्यांच्या मनात निश्चितच सकारात्मक भावना निर्माण झाली असावी, हे मात्र निश्चित.
Tuesday, October 15, 2024
वाचनवेडी ज्ञानू
जवळपास दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीला कांजण्या झाल्या होत्या म्हणून आम्ही तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी तपासून निदान केले, औषधे दिली आणि तिला सांगितले, 'आता आठवडाभर आराम करायचा आणि छान टीव्ही बघत बसायचं'. यावर तिने डॉक्टरांना सांगितले की, 'आमच्याकडे टीव्ही नाही मी पुस्तके वाचत असते'. तिच्या बोलण्याने डॉक्टर आश्चर्यचकित झाले. कदाचित त्यांना आजवर असं कोणीही भेटलं नसेल की ज्याच्या घरी टीव्ही नाही आणि घरातील लहान मुल पुस्तके वाचत असते. डॉक्टरांनी देखील शाबासकीची थाप ज्ञानेश्वरीला दिली.
ती दोन वर्षाची असल्यापासून तिची आई तिला विविध पुस्तकांमधील गोष्टी वाचून दाखवायची. तेव्हाच तिला बऱ्याच गोष्टी पाठ झाल्या होत्या. तीला जेव्हापासून अक्षर ओळख झाली तेव्हापासूनच हळूहळू वाचायची गोडी वाढत गेली. घराच्या भिंती पुस्तकांनी भरलेल्या होत्या. शिवाय तिच्या आईला आणि मलाही वाचनाची आवड असल्याने तिच्या आजूबाजूला तसं वातावरण तयार होत होतं. आई-बाबा बहुतांश वेळा वाचताना दिसायचे. त्यामुळे तिला देखील पुस्तके वाचनाची गोडी लागत गेली. शिवाय मातृभाषेतूनच शिकत असल्याने तिला अजूनच सोपे झाले. मग आम्ही देखील तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करू लागलो. तिला पुस्तकांच्या दुकानात घेऊन जाऊ लागलो. पुस्तक प्रदर्शनामध्ये बालसाहित्य दाखवू लागलो. ती देखील मनसोक्तपणे पुस्तकांची खरेदी करत होती आणि सर्व पुस्तके वाचून काढत होती. आज आमच्या पुस्तकांच्या कपाटामध्ये तिची देखील शंभरहून अधिक पुस्तके आहेत. तिच्या कपड्यांइतकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक खरेदी ही पुस्तकांची होते!
घरामध्ये टीव्ही नसल्याचा हा खूप मोठा फायदा आम्हाला झाला. विरंगुळा म्हणून ती पुस्तके वाचू लागली. तिला कधीकधी काही शब्द समजायचे नाहीत. मग ती आम्हाला विचारायची. यातून तिचा शब्दसंग्रह देखील वाढत गेला. आजही ती कधीकधी असे विशिष्ट शब्द वाक्यांमध्ये प्रयोग करून आमच्याशी बोलत असते. अनेकदा तिची वाक्यरचना ऐकून त्रयस्थ व्यक्ती देखील आश्चर्यचकित होते. ही सर्व वाचनाची किमया आहे. अनेकांना असंही वाटतं की, या मुलीला किती अभ्यास असतो. ती सदानकदा अभ्यासच करत असते. आजकाल कोणतीच मुले अवांतर वाचत नसल्याने बहुतांश जणांचा हा भ्रम होणं साहजिकच आहे!
बाहेर कुठेही फिरायला गेलो तरी तिच्या पिशवीमध्ये तीन-चार पुस्तके असतातच. प्रवासात गाडीमध्ये देखील ती पुस्तके वाचत बसते. रोज रात्री झोपताना पुस्तक वाचन करणे, हाच तिचा सर्वात मोठा छंद आहे. आम्ही दोघेही वाचत असलो की ती देखील आमच्यामध्ये सामील होते. कोणते पुस्तक वाचले आहे, कोणते वाचले नाही, तसेच कोणत्या पुस्तकात कोणती गोष्ट आहे, हे देखील तिच्या व्यवस्थित ध्यानात आहे.
यावर्षीपासून तर ती पुस्तकांवरचा आपला अभिप्राय देखील द्यायला लागली आहे. तिची सर्जनशीलता विकसित व्हायला लागली आहे. अर्थात वाचनामुळेच ती आता स्वतः स्वतःच्या मनाने लिहू देखील लागली आहे! मागच्या काही महिन्यात तिने स्वरचित कविता देखील केल्या आहेत. स्वतःच्या कथा कवितांचे पुस्तक तिच्या आईने प्रकाशित करावे, अशी देखील तिची मनोकामना आहे. तिच्या वाचन वेडाचीच ही परिणीती आहे असे आम्हाला वाटते.
मागच्या नऊ वर्षांपासून आम्ही वाचन प्रेरणा दिनी विविध शाळांमध्ये पुस्तके वाटपाचा कार्यक्रम करतो. ज्ञानेश्वरी एक वर्षाची असल्यापासून तिला देखील आम्ही या कार्यक्रमांमध्ये नेत असतो. यातून तिला पुस्तकांचे वाचनाचे महत्त्व समजते. त्यातूनच विचारांची आणि मनाची समृद्धी देखील येते. याची जाणीव तिला हळूहळू होऊ लागली आहे.
आजच्या वाचन प्रेरणा दिनी तिच्या वाचनवेडाची ओळख व्हावी आणि इतरांनाही प्रेरणा मिळावी... हाच या पोस्टचा मुख्य उद्देश.
Monday, July 29, 2024
बालभारतीचे शि. द. फडणीस
९० च्या दशकात बालभारतीने छापलेली गणिताची पुस्तके विविधरंगी व्यंगचित्रांनी आणि निरनिराळ्या रेखाटनांनी भरलेली असायची. ती चित्रे पाहण्यात व त्यातून शिकण्यात एक वेगळीच मजा असायची. इयत्ता बदलली की नवीन पुस्तक हातात पडायचे. मग आम्ही ते पुस्तक पूर्ण चाळून त्यातील चित्रे अनुभवायचो. यातून फार गंमत वाटायची. आणि प्रत्यक्ष जेव्हा गणित शिकायला सुरुवात होत असे तेव्हा या चित्रांमधून गणित हा विषय अधिक जवळचा वाटायचा. त्यावेळेसच या चित्रांवर शि. द. फडणीस यांचे नाव मी वाचले होते. आज या चित्रकाराला शंभरी पूर्ण झाली तेव्हा आम्ही अभ्यासलेल्या त्या पुस्तकांचा काळ पुन्हा एकदा नव्याने जागृत झाला!
“गणिताची अशी पुस्तके जर आम्हाला मिळाली असती तर आम्ही गणितज्ञ झालो असतो.” असं त्यावेळी जेष्ठ साहित्यिक शंकर पाटील यांनी म्हटलं होतं. बालभारतीच्या पुस्तकांमध्ये विशेषतः गणित आणि विज्ञान या पुस्तकांमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच झाला. कदाचित त्या पिढीमध्ये तयार झालेल्या गणिताच्या गोडीला हीच चित्रे कारणीभूत असावीत.
Monday, March 20, 2023
देहू ते आळंदी सायकलवारी
मराठी वाङ्मयाला हजारो वर्षांची परंपरा आहे. याच परंपरेतील आणि वारकरी
संप्रदायाला पूजनीय व मार्गदर्शक असणारे ग्रंथ म्हणजे संत तुकारामांची गाथा
आणि संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. आपल्या इथे ग्रंथ पूजनाची परंपरा तर
आहेच, याशिवाय ग्रंथांची मंदिरे देखील बांधलेली आहेत. अशीच मंदिरे गाथा आणि
ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथांची अनुक्रमे देहू आणि आळंदी या गावांमध्ये
बांधलेली आहेत. या मंदिरांच्या भिंतींवर ग्रंथांचे श्लोक संगमरवरी
दगडामध्ये कोरलेले आहेत. महाराष्ट्रीय किंबहुना संपूर्ण जगाला मार्गदर्शक
ठरणारे हे ग्रंथ मंदिररूपात आपल्याला पाहायला मिळतात.
आजची सायकल स्वारी
ही या दोन्ही मंदिरांच्या आणि त्यांच्या मराठी साहित्यातील योगदानाला
समर्पित केली. श्रीक्षेत्र देहूमध्ये इंद्रायणी काठी असणाऱ्या संत तुकाराम
महाराज गाथा मंदिरात सकाळी सात वाजून सात मिनिटांनी पोहोचलो होतो. तिथून
आळंदी रस्त्याने मार्गक्रमण करत आळंदीतील इंद्रायणी काठावर बांधलेल्या
ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरात सात वाजून ५७ मिनिटांनी पोहोचलो. हा एक
अविस्मरणीय अनुभव होता.
Tuesday, March 16, 2021
गोष्ट लहानपणीच्या पुस्तकांची
Saturday, August 8, 2020
कल्पित-अकल्पित - सुधा रिसबूड
सुधा रिसबूड यांच्या लेखणीतून अवतरलेला 'कल्पित-अकल्पित' हा कथा संग्रह होय. विज्ञानातील भविष्यातील प्रगती या विषयाला प्रामुख्याने अनुसरून यातील कथा लेखिकेने लिहिलेल्या आहेत. भविष्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान तसेच प्रामुख्याने खगोल विज्ञान कसे असेल? या कल्पनेतून कथा साकारलेल्या दिसून येतात. विज्ञान हा नेहमीच रंजक विषय राहिलेला आहे. त्यामुळे भविष्यातील विज्ञान अधिक रंजकता प्राप्त करून देतो. याच अनुषंगाने लिहिलेल्या कथा विज्ञान-मनोरंजन करून जातात. यातील काही कथांची व्याप्ती हजारो वर्षे भविष्यातील आहे. या कथा मांडताना लेखिकेच्या कल्पना कौशल्याचा कस लागल्याचे दिसते. बऱ्याचदा हे स्वप्नरंजन भासत असले तरी अशक्य नाही, याचीही जाणीव होते. शिवाय काही ठिकाणी शेकडो वर्षांनी विज्ञान याहीपेक्षा कितीतरी प्रगत असू शकते, हेही जाणवते.
एकंदरीत विज्ञान कथा वाचण्यासाठी एक सुंदर खजिना सुधा रिसबूड यांनी मराठी वाचकांसमोर या पुस्तकाद्वारे ठेवल्याचे या पुस्तकातून दिसते.
Saturday, February 15, 2020
बारा कथा
कवीचे भाषेवर जबरदस्त प्रभुत्व असते, हे शिरवाडकरांच्या साहित्यकृतीतून जाणवते. त्यामुळे कथा आणि साहित्यप्रेमींसाठी सदर पुस्तक मेजवानी ठरावे असेच आहे.
Friday, December 20, 2019
एका पुस्तक प्रदर्शनात
प्रदर्शनातून बाहेर आल्यावर मी विचार केला, अशा मोठ्या पुस्तक प्रदर्शनाच्या काउंटरवर जर मी बसलो असतो तर कदाचित मी दिवसभर फक्त तिथली पुस्तकेच वाचत बसलो असतो! किंबहुना कोणत्याही पुस्तक प्रेमीने हेच केलं असतं. पुस्तके वाचायची सोडून मोबाईल मधले व्हिडिओ पाहण्यात हे लोक किती वेळ वाया घालवतात? त्यांना नक्की त्यातून कोणते ज्ञान मिळतं? हा टाईमपास नाही का?
पण थोड्याच वेळात मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. विचार केल्यानंतर समजले की, तो वाचत नाहीये.. कदाचित त्याला वाचनाची आवड नाहीये. म्हणून तो आज या ठिकाणी फक्त गल्ल्यावर पैसे गोळा करण्याची कामं करतोय. त्याचा त्याच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असता तर कदाचित त्यालाही त्याच्या प्रगतीचा मार्ग सापडला असता. अर्थात तुमचा दृष्टीकोनच तुमचा भविष्य ठरवत असतं, हे पुनश्च एकदा त्या दिवशी समजलं.
© तुषार कुटे
Monday, November 18, 2019
हॉटेलात पुस्तक वाचणारा
यातून एक गोष्ट समजली की, सर्वसामान्य जीवनात वावरताना आपण मनात कितीतरी समजुती घेऊन फिरत असतो व आपल्या निरीक्षणाने वेगवेगळ्या प्रतिमा मनात तयार करत असतो. प्रत्येक वेळेस या प्रतिमा तंतोतंत तशाच असतील असेही नाही.
Thursday, November 14, 2019
पुस्तके रस्त्यावरची
मी ती सर्व पुस्तक लहान मुलांना वाटण्यासाठी घेतली होती. परंतु त्यात विक्री करणाऱ्या मुलांचे समाधानही मला प्राप्त झाले होते. आज मी त्यातील बरीच पुस्तके लहान मुलांना वाटून टाकलीयेत. थोडीशी उरलीत, ती पण संपतील. परंतु वाचनाची संस्कृती आज रस्त्यावर पडली, हे मात्र या घटनेतून मला मनापासून जाणवले.
© तुषार कुटे
Tuesday, November 12, 2019
मराठी पुस्तके मिळवा ऑनलाईन
१. बुक गंगा (https://www.bookganga.com/)
मराठीतील सर्वात जास्त पुस्तके असणारी ही वेबसाइट आहे. तुम्हाला हवे असणारे जवळपास प्रत्येक पुस्तक तुम्हाला या वेबसाइटवर मिळू शकेल. शिवाय सदर पुस्तकाची पहिली दहा-पंधरा पाने तुम्ही वाचू शकता. जेणेकरून पुस्तकाचा आशय व लेखकाची लेखनशैली तुम्हाला तपासता येईल. अनेक पुस्तके ई-बुक स्वरूपात ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रत्येक पुस्तकावर तुमचा अभिप्राय अर्थात रीव्ह्यू टाकण्याची सुविधा बुकगंगा ने उपलब्ध करून दिली आहे. अनेक पुस्तकांवर कमीत कमी पाच ते दहा टक्के सूटही तुम्हाला मिळू शकेल. बुकगंगाचं बुक स्टोअर पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरात आहे. तिथेही तुम्ही पुस्तके खरेदी करू शकता.
२. अक्षरधारा (https://www.akshardhara.com/)
पुण्याच्या बाजीराव रस्त्यावर असणारे अक्षरधारा बुक गॅलरी हे पुस्तकालय होय. या पुस्तकालयातही मोठ्या प्रमाणात पुस्तके उपलब्ध आहेत. ती तुम्ही प्रत्यक्ष जाऊन वा ऑनलाईन खरेदी करू शकता. त्यांच्या वेबसाइटवर शाखानुसार, प्रकाशननुसार, लेखकानुसार पुस्तक शोधण्याची सुविधा दिली आहे. व बहुतांशी पुस्तकांवर थेट कमीत कमी दहा टक्के सुटही उपलब्ध आहे. सभासदत्वाची सुविधाही अक्षयधाराने देऊ केली आहे. या अंतर्गत पुस्तकांवर अधिक सूटही मिळवता येते.
३. अमेझॉन इंडिया (https://www.amazon.in/)
ही भारताची सर्वाधिक पुस्तके विक्री करणारी वेबसाईट आहे. मराठीतील खूप पुस्तके त्यांच्या संकेतस्थळावरून तुम्ही खरेदी करु शकता. अमेझॉन सर्च साठी उपलब्ध असणारे सर्व ऑप्शन्स तुम्हाला पुस्तके शोधण्यासाठी वापरता येतात. अमेझॉन चे स्पेशल सेल चालू असताना अमेझॉन बुक्स ला भेट द्यायला विसरू नका. अनेक मोठी पुस्तके भल्यामोठ्या सूटच्या रूपाने इथे उपलब्ध होऊ शकतात. मी स्वतः मेहता पब्लिकेशनच्या सर्व मोठ्या कादंबऱ्या (स्वामी धरून!) 49 टक्के डिस्काऊंट मध्ये खरेदी केल्या होत्या! एवढा डिस्काउंट मला मेहतांच्या गॅलरीत पण मिळत नाही.
सर्वात अभिमानाची बाब म्हणजे सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकात अमेझॉन इंडियावर मराठी ही हिंदी नंतरची दूसरी भारतीय भाषा आहे! अमेझॉनचे स्वतःचे किंडल नावाची ई-बुक रीडर आहे. अनेक मराठी पुस्तके किंडल धारकांना मोफत ही वाचता येतात.
४. मेहता पब्लिशिंग हाऊस (http://www.mehtapublishinghouse.com/)
या ठिकाणी फक्त मेहता पब्लिशिंग हाऊसनेच प्रकाशित केलेली पुस्तके तुम्हाला विकत घेता येतील. शिवाय त्यांची सभासद होण्याची सुविधाही उपलब्ध आहे, ज्यात तुम्हाला 30 टक्क्यांपर्यंत एका पुस्तकावरही सूट मिळू शकते! आनंद यादव, वि. स. खांडेकर, द. मा. मिरासदार, रणजित देसाई, व. पु. काळे, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, विश्वास पाटील, सुधा मूर्ती, स्वाती चांदोरकर यांच्यासारख्या दिग्गज मराठी लेखकांची पुस्तके या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आज-काल इथे नव्याने येणारी पुस्तके ही बहुतांशी अनुवादित असतात.
५. बुक्सनामा (https://www.booksnama.com/)
डायमंड पब्लिकेशनची सर्व पुस्तके या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याशिवाय विविध विषयांची पुस्तके येथून तुम्ही भरघोस सूट घेऊन खरेदी करू शकता.
वरील साईट व्यतिरिक्त अजूनही काही वेबसाइट्स आहेत, जिथून सहजपणे पुस्तके मागवता येतात. त्यांचाही वापर तुम्ही बिनधास्त करू शकता.
https://www.flipkart.com/
https://www.granthdwar.com
https://www.bookvishwa.com/
https://www.rasik.com/
https://www.shubhambooksonline.com/
http://www.menakabooks.com/
https://www.suyashbookgallery.com/
कधीकधी बुक गॅलरीतून पुस्तक मागण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रकाशनाकडूनच मागण्यास सोयीचे पडते व कमी किमतीत ते उपलब्ध होऊ शकते. बऱ्याच मोठ्या प्रकाशकांनी ऑनलाईन पुस्तके विक्रीची सोय वाचकांना करून दिली आहे.
१. मेहता पब्लिशिंग हाऊस (http://www.mehtapublishinghouse.com/)
२. मनोविकास (https://www.manovikasprakashan.com/)
३. राजहंस (https://www.rajhansprakashan.com/)
४. सकाळ (http://sakalpublications.com/)
५. कॉन्टिनेन्टल (http://continentalprakashan.com/)
Friday, October 11, 2019
वाचन प्रेरणेचे एक पाऊल
हे सर्व इथे लिहिण्याचा उद्देश असा की आपणही आपल्या परीने आपल्या जवळच्या शाळेत सदर उपक्रम राबवू शकता. मराठी वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने आपले योगदान निश्चितच बहुमूल्य राहणार आहे.

































