पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आज प्रचंड गर्दी झाली होती. आमच्या स्टॉलमध्ये वाचकांना पुस्तके पाहण्यासाठी बऱ्यापैकी मोकळी जागा ठेवलेली होती. तरी देखील अनेकांना चालता येत नव्हते. आमच्यावरील बिलिंगचा भार देखील वाढलेला होता. अशावेळी ज्ञानेश्वरीने एका बिलबुकाची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. आणि पटापट एका बाजूने ती बिले करू लागली. पुस्तकांची नावे लिहून, त्यांची किंमत लिहून त्यावरील सवलतीसह किती किंमत आहे, हे ती पटापट बिलांवर लिहित होती आणि अंतिम बिल बनवून देत होती. तिचा आम्हाला बराच हातभार लागला. पुस्तके विकत घेतल्यानंतर बिल करण्यासाठी येणारे वाचक तिच्याकडे कौतुकाने पाहत होते. इतकी लहान मुलगी पटापट बिले लिहून त्यांना देत असताना दिसली. अनेकांनी तिचे तोंड भरून कौतुक देखील केले. काहींनी फोटो काढले. अनेकांनी तर त्यांच्यासोबत आलेल्या मुलांना दाखवले देखील की, बघ ती मुलगी कसं काम करत आहे!
इतकी लहान मुलगी पटापट मराठीमध्ये कसं लिहू शकते? विशेष म्हणजे तिचे आकडेदेखील मराठीमध्ये होते, याचे देखील खूप आश्चर्य वाटलं. ती मराठी माध्यमामध्ये शिकत आहे, हे ऐकल्यावर काहींचे डोळे विस्फारले होते. पुस्तकांच्या जगात वावरताना दिवसभर तिची आम्हाला हातभार लावण्यासाठी चाललेली चाललेली लगबग अखेरीस रात्री महोत्सव बंद होईपर्यंत चालूच होती. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिची यावर्षीची पुस्तकांची खरेदीही खूप मोठी झाली!
--- तुषार भ. कुटे
Sunday, December 22, 2024
पुस्तक महोत्सवात ज्ञानेश्वरी
Tuesday, October 15, 2024
वाचनवेडी ज्ञानू
जवळपास दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीला कांजण्या झाल्या होत्या म्हणून आम्ही तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी तपासून निदान केले, औषधे दिली आणि तिला सांगितले, 'आता आठवडाभर आराम करायचा आणि छान टीव्ही बघत बसायचं'. यावर तिने डॉक्टरांना सांगितले की, 'आमच्याकडे टीव्ही नाही मी पुस्तके वाचत असते'. तिच्या बोलण्याने डॉक्टर आश्चर्यचकित झाले. कदाचित त्यांना आजवर असं कोणीही भेटलं नसेल की ज्याच्या घरी टीव्ही नाही आणि घरातील लहान मुल पुस्तके वाचत असते. डॉक्टरांनी देखील शाबासकीची थाप ज्ञानेश्वरीला दिली.
ती दोन वर्षाची असल्यापासून तिची आई तिला विविध पुस्तकांमधील गोष्टी वाचून दाखवायची. तेव्हाच तिला बऱ्याच गोष्टी पाठ झाल्या होत्या. तीला जेव्हापासून अक्षर ओळख झाली तेव्हापासूनच हळूहळू वाचायची गोडी वाढत गेली. घराच्या भिंती पुस्तकांनी भरलेल्या होत्या. शिवाय तिच्या आईला आणि मलाही वाचनाची आवड असल्याने तिच्या आजूबाजूला तसं वातावरण तयार होत होतं. आई-बाबा बहुतांश वेळा वाचताना दिसायचे. त्यामुळे तिला देखील पुस्तके वाचनाची गोडी लागत गेली. शिवाय मातृभाषेतूनच शिकत असल्याने तिला अजूनच सोपे झाले. मग आम्ही देखील तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करू लागलो. तिला पुस्तकांच्या दुकानात घेऊन जाऊ लागलो. पुस्तक प्रदर्शनामध्ये बालसाहित्य दाखवू लागलो. ती देखील मनसोक्तपणे पुस्तकांची खरेदी करत होती आणि सर्व पुस्तके वाचून काढत होती. आज आमच्या पुस्तकांच्या कपाटामध्ये तिची देखील शंभरहून अधिक पुस्तके आहेत. तिच्या कपड्यांइतकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक खरेदी ही पुस्तकांची होते!
घरामध्ये टीव्ही नसल्याचा हा खूप मोठा फायदा आम्हाला झाला. विरंगुळा म्हणून ती पुस्तके वाचू लागली. तिला कधीकधी काही शब्द समजायचे नाहीत. मग ती आम्हाला विचारायची. यातून तिचा शब्दसंग्रह देखील वाढत गेला. आजही ती कधीकधी असे विशिष्ट शब्द वाक्यांमध्ये प्रयोग करून आमच्याशी बोलत असते. अनेकदा तिची वाक्यरचना ऐकून त्रयस्थ व्यक्ती देखील आश्चर्यचकित होते. ही सर्व वाचनाची किमया आहे. अनेकांना असंही वाटतं की, या मुलीला किती अभ्यास असतो. ती सदानकदा अभ्यासच करत असते. आजकाल कोणतीच मुले अवांतर वाचत नसल्याने बहुतांश जणांचा हा भ्रम होणं साहजिकच आहे!
बाहेर कुठेही फिरायला गेलो तरी तिच्या पिशवीमध्ये तीन-चार पुस्तके असतातच. प्रवासात गाडीमध्ये देखील ती पुस्तके वाचत बसते. रोज रात्री झोपताना पुस्तक वाचन करणे, हाच तिचा सर्वात मोठा छंद आहे. आम्ही दोघेही वाचत असलो की ती देखील आमच्यामध्ये सामील होते. कोणते पुस्तक वाचले आहे, कोणते वाचले नाही, तसेच कोणत्या पुस्तकात कोणती गोष्ट आहे, हे देखील तिच्या व्यवस्थित ध्यानात आहे.
यावर्षीपासून तर ती पुस्तकांवरचा आपला अभिप्राय देखील द्यायला लागली आहे. तिची सर्जनशीलता विकसित व्हायला लागली आहे. अर्थात वाचनामुळेच ती आता स्वतः स्वतःच्या मनाने लिहू देखील लागली आहे! मागच्या काही महिन्यात तिने स्वरचित कविता देखील केल्या आहेत. स्वतःच्या कथा कवितांचे पुस्तक तिच्या आईने प्रकाशित करावे, अशी देखील तिची मनोकामना आहे. तिच्या वाचन वेडाचीच ही परिणीती आहे असे आम्हाला वाटते.
मागच्या नऊ वर्षांपासून आम्ही वाचन प्रेरणा दिनी विविध शाळांमध्ये पुस्तके वाटपाचा कार्यक्रम करतो. ज्ञानेश्वरी एक वर्षाची असल्यापासून तिला देखील आम्ही या कार्यक्रमांमध्ये नेत असतो. यातून तिला पुस्तकांचे वाचनाचे महत्त्व समजते. त्यातूनच विचारांची आणि मनाची समृद्धी देखील येते. याची जाणीव तिला हळूहळू होऊ लागली आहे.
आजच्या वाचन प्रेरणा दिनी तिच्या वाचनवेडाची ओळख व्हावी आणि इतरांनाही प्रेरणा मिळावी... हाच या पोस्टचा मुख्य उद्देश.
Tuesday, April 11, 2023
स्नेहसंमेलन
मागील महिन्यामध्ये मुलीच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने जाणे
झाले. मागील काही वर्षांपासून प्राथमिक विद्यालयांमध्ये देखील स्नेहसंमेलने
भरू लागलेली आहेत. यानिमित्ताने मुलांना शालेय वयातच कलागुणांचे प्रदर्शन
करण्याची संधी मिळू लागली आहे. परंतु इंग्रजी शाळांचे स्तोम वाढल्यानंतर
स्नेहसंमेलनांमध्ये हिंदी चित्रपटांतील गलिच्छ गाण्यांचा मोठ्या प्रमाणात
समावेश झाला.
पण माझ्या मुलीच्या मराठी शाळेतील हे स्नेहसंमेलन खऱ्या
अर्थाने मराठी संस्कृती दाखवणार संमेलन होतं. कार्यक्रमाचे संयोजन,
व्यवस्थापन आणि नियोजन अतिशय उत्कृष्ट होते. इतक्या लहान मुलांना मोठ्या
प्रमाणात समूह गीतांमध्ये हाताळणे अवघड होते. परंतु, आपल्या शिक्षकांनी हे
शिवधनुष्य देखील सुंदररित्या पेलले. सर्व मराठी गीतांवरील नृत्य दिग्दर्शन
खूप छान होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद
लुटल्याचे दिसून आले.
Monday, April 10, 2023
पहिली ट्रॉफी
गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेला तो क्षण आज अखेर आलाच. आमच्या
ज्ञानेश्वरीने तिच्या शाळेसाठी मिळवलेली पहिली ट्रॉफी तिला आज प्रदान
करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच वर्षी तिने शाळेसाठी प्रतिनिधित्व करून ही
ट्रॉफी मिळवून दिली. घरी पोहोचल्यावर तिचा आनंद आज गगनात मावत नव्हता.
मागील
महिन्यामध्ये चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांपैकी तिने
चित्रकला, हस्ताक्षर आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला
होता. यापैकी हस्ताक्षर आणि चित्रकला स्पर्धा शाळेमध्येच घेण्यात आली. तर
फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी आम्ही तिला घेऊन चिंचवडमध्ये प्रत्यक्ष
स्पर्धास्थळी पोहोचलो होतो. तिथे पिंपरी चिंचवड मधील बहुतांश शाळांमधील
शालेय स्पर्धक सहभागी झाले होते. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तिला पारितोषिक
मिळता मिळता राहून गेले. आपल्यालाही सर्वांसमोर ट्रॉफी मिळावी, अशी तिची
मनोमन इच्छा होती. त्यासाठी तिने मेहनतही घेतली होती. पण या स्पर्धेत तिचे
स्वप्न पूर्ण झाले नाही. आणि एक दिवस अनपेक्षितपणे चित्रकला स्पर्धेत सर्व
शाळांमधून तिच्या गटात ती तृतीय क्रमांकावर आल्याचे समजले. परंतु ज्या
दिवशी ट्रॉफी दिली जाणार होती त्याच दिवशी ती आजारी असल्याने घरी होती.
तेव्हापासूनच आपल्याला ट्रॉफी कधी मिळणार, याची उत्सुकता तिला आणि आम्हाला
देखील होती. आज अखेरीस मुख्याध्यापकांच्या हस्ते शाळेसाठी तिने मिळवलेली ही
ट्रॉफी सर्वांसमक्ष तिला देण्यात आली. तिची स्वप्नपूर्ती झाली होती. नेमकी
आजच शाळेची बस सुमारे अर्धा तास उशिरा आली. पण याचे देखील तिला भान
नव्हते. घरी आल्यावर तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आमच्या डोळ्यात
देखील आनंदाश्रू घेऊन आला. तिने अभिमानाने सर्वांना ही ट्रॉफी दाखवली.
तिच्यासाठी ती पुढील प्रवासासाठी प्रेरणास्त्रोत ठरणार याची आम्हाला खात्री
आहे. आजवर आम्ही देखील बऱ्याच ट्रॉफी मिळवल्या. पण आज घरी आलेल्या या
ट्रॉफीचे मोल या सर्वांपेक्षा अधिक आहे.
Friday, April 30, 2021
सकारात्मकतेकडे
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शेजारच्या बिल्डिंगमध्ये समांतर मजल्यावरील एका गॅलरीमध्ये रोज सकाळी दहा वाजल्यापासून भिंतीवर हातोडे मारल्याचे आवाज येत होते. फ्लॅटचा कठडा तोडून तिथे काहीतरी वेगळं करत असावेत, असं दिसत होतं. दोन कामगार रोज नित्यनेमाने ते काम सकाळी काही काळ करत बसायचे. सकाळी त्यांचं हातोडा मारण्याचं काम चालू झालं की, आमच्या ज्ञानेश्वरीचं लक्ष त्यांच्याकडे जात होतं. घराच्या खिडकीमध्ये उभी राहून ती थोडावेळ त्यांचं निरीक्षण करत बसत असे. आणि मग नंतर आपल्या खेळण्याची सुरुवात करत असे.
एक दिवस न राहवून तिने मला विचारले,
"बाबा, हे लोक काय करतायेत?"
मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो,
"काहीतरी तोडफोड चालली आहे त्यांची, तू नको लक्ष देऊ तिकडे."
माझ्या या बोलण्यावर तिने तात्काळ उत्तर दिले,
"नाही बाबा... ते काहीतरी बनवतायेत!"
तिच्या या उत्तराने मी काहीसा आश्चर्यचकित झालो आणि पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला की रिकामा? या गोष्टीची आठवण झाली. त्या एका वाक्यातून तिचा दृष्टीकोण प्रतीत होत होता. मागच्या अनेक दिवसांपासून आजूबाजूला तयार झालेल्या नकारात्मक वातावरणामुळे की काय, आपलेही विचार नकारात्मकतेकडे झुकत आहेत असं वाटून गेलं. पण या सर्व नैराश्यपूर्ण वातावरणापासून जी पिढी अनभिज्ञ आहे ती अजूनही हा सकारात्मक दृष्टिकोन राखून आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली. हीच सकारात्मक ऊर्जा आजच्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला प्रेरित करत राहणार आहे, असं वाटतं. त्यामुळे ती निरंतरपणे आपल्या हृदयात जागृत ठेवण्याची खरोखर गरज आहे, इतकंच.
Saturday, February 27, 2021
श्री सखी राज्ञी जयति।
ज्या दिवशी घरात अभिज्ञचे आगमन झाले त्याच दिवशी नव्या बाळाच्या आगमनाची चाहूल लागली आणि घर पुन्हा एकदा आनंदाने फुलून गेले. पूर्ण ९ महिने कोरोनाची टांगती तलवार डोक्यावर होती. बाळाच्या आईने सर्वोतोपरी काळजी घेऊन तिचे कामही शेवटपर्यंत चालू ठेवले होते. २५ जानेवारीला त्याचे आईच्या उदरातून पृथ्वीवर आगमन प्रस्तावित होते. त्याच दिवशी बाळाच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. हा दुग्धशर्करा योगच होता. पण प्रत्यक्षात मात्र त्या दिवशी कोणतीच हालचाल झाली नाही. दुसऱ्या दिवशी २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिवस होता. या दिवशी बाळाच्या मोठ्या आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. ह्या दिवशी तरी बाळाचे आगमन होईल, असे आम्हांला वाटत होते आणि झालंही तसंच. दुपारच्या सुमारास आम्हाला त्याच्या बाहेर येण्याची चाहूल लागली. मग काय आमची पळापळ सुरू झाली. आवराआवरी झाली आणि सर्वजण रूग्णालयामध्ये आईसह पोहोचलो. बाळाच्या आगमनाची चाहूल तर लागली होती, पण अनेक तास झाले तरी ते बाहेर येण्याची चिन्ह दिसेना. त्याच्या आईने आजवर कधी एक इंजेक्शन सुद्धा घेतले नव्हते, पण त्यादिवशी चक्क सहा इंजेक्शन्स तिने घेतली. ही तिच्या आईपणाच्या कसोटीची सुरुवात होती. २६ तारखेची मध्य रात्र उलटून गेली. अखेरीस २७ तारखेला सकाळी सातच्या सुमारास बाळाची धडाक्यात एन्ट्री पृथ्वीतलावर झाली. पुन्हा एकदा लक्ष्मीची पावले मुलीच्या रूपाने आमच्या घरात अवतरली होती. घर पूर्णपणे आनंदून गेले. परंतु आईच्या उदरात अधिक काळ राहिल्यामुळे तिला प्राणवायूची कमतरता जाणवू लागली. त्यामुळे सर्वांची धावपळ सुरू झाली. तिला लहान मुलांच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ती पाहिजे तेवढा प्राणवायू शरीरात घेत नव्हती. त्यामुळे अतिदक्षता विभागात ठेवावे लागणार होते. लहान मुलांसाठीचा अर्थात नवजात बालकांसाठीचा अतिदक्षता विभाग आसपास कुठेही नसल्याने दुसऱ्या गावात हालवावे लागणार होते. परिस्थिती जोखमीची होती. अखेर रुग्णवाहिकेत दुसऱ्या गावात हलविण्याचे ठरवले. बाळाला ऑक्सिजनचा मास्क लावून ॲम्बुलन्सद्वारे दुसऱ्या गावामध्ये हलविण्यात आले. यादरम्यान गेलेली १५ ते २० मिनिटे काळजाचा ठोका चुकवणारी अशीच होती. अखेर नवीन रुग्णालयामध्ये तिला अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले. प्राणवायूचा व्हेंटीलेटरद्वारे पुरवठा सुरू झाला. शरीरातील प्राणवायूची पातळी खालावलेली होती. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढीला लागली. पण ती मात्र खंबीर राहिली. तिची एन्ट्रीच या पृथ्वीतलावर धडाक्यामध्ये झाली होती. एका योद्धयाप्रमाणे वीस दिवस रुग्णालयामध्ये तिने झुंज दिली आणि शेवटी सुखरूप बाहेर पडली. तिची ही लढाई सदैव आमच्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी राहील. तिच्या ह्या लढाईतील विजयासाठी कुटुंबातील सगळेच प्रार्थना करत होते. जन्माला येताच तिने आयुष्याशी झगडून विजय मिळवला आणि तिचे नाव सार्थ ठरवले. अशी आमची... श्री सखी राज्ञी जयति।
(अशी राणी की जिचा नेहमीच विजय होतो)
आज राज्ञी एक महिन्याची झाली.
Saturday, November 26, 2016
माझी ज्ञानेश्वरी
अनेकांना वाटत होतं... इतक्या आधीपासून तू तयारी केली होतीस! खरं तर तशी तयारी वगैरे काही नव्हतीच. रश्मीची सोबत लाभली व आमचे विचारही जुळू लागले. तेव्हा तीला मी ही गोष्ट सांगितली होती. फेब्रुवारी मध्ये आमच्या बाळाच्या आगमनाची चाहूल लागली अन तेव्हापासून आम्ही तीला तीच्या नावाने बोलावू लागलो. परिचयातील अनेकांना वाटत होतं की, मुलगाच होईल. पण, शेवटी आईवडिलांची इच्छाशक्तिच महत्वाची असते, हे आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. घरात अनेक वर्षे मुलीचा जन्म झाला नव्हता. ज्ञानेश्वरीच्या रूपाने कित्येक वर्षांनी लक्ष्मीची पाऊले लक्ष्मीपूजनाच्या आधीच घरात आली. माझा व तीचा जन्मदिवस एकच! तीचा जन्म माझ्या वाढदिवशी व्हावा, अशी आमची इच्छा होतीच. पण, त्या गोष्टी आमच्या हातात नव्हत्या. ऑक्टोबर महिन्यात घरातील व परिचयातील सर्वाधिक जणांचे वाढदिवस असतात. प्रत्येकजण रश्मीला स्वत:च्या वाढदिवसाची आठवण करून द्यायचा... याच दिवशी तुझ्या बाळाचा जन्म होऊ दे! पण, आमच्या मुलीने माझ्या वाढदिवशीच या जगात पाऊल ठेवायचे निश्चित केले होते. जन्मापासूनच ती तीच्या बाबाला साथ देऊ लागली होती. आदल्या दिवशी अर्थात २४ ऑक्टोबरला रश्मीला रूग्णालयात दाखल केले तेव्हापासून माझ्याही हृदयाची धडधड वाढीस लागली होती. परंतु, सर्व काही ठिक होईल यावरही विश्वास होताच. रात्रभर तब्बल आठ तास रश्मीच्या कळा चालू होत्या. त्या रात्री मी प्रथमच स्त्रीच्या मातृत्वाचा आविष्कार अनुभवला. सकाळी सहा वाजुन पन्नास मिनिटांनी नर्सने सांगितले.... ’तुम्हाला मुलगी झाली’ व तीने बाळाला माझ्या हातात दिले. त्याक्षणी असलेल्या भावना मी आज शब्दात व्यक्त करू शकत नाही. काही गोष्टींवर विश्वास ठेवायला कठीण जाते, अशीच अवस्था रश्मीचीही झाली होती. आयुष्यात पहिल्यांदा इतक्या छोट्याश्या बाळाला हातात घेतले होते. आनंदाचा तो परमोच्च क्षण होता.
प्राचीन काळात मातृसत्ताक असलेली भारतीय पद्धती कालांतराने पितृसत्ताक पद्धतीकडे झेपावली. याच कारणाने स्त्रीचे स्थान दुय्यम मानले गेले. आपली मुलगी कालांतराने आपले नाव लावणार नाही, हे माहित असल्याने भारतीय समाजात मुलाला वंशाचा दिवा मानलं जातं अन मुलीला परक्यांचं धन म्हटलं जातं. रश्मीचं नाव बदलण्याचं कोणीतरी सुचवलं तेव्हा मी तीचं नाव बदलणारच नाही, हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. अनेकांनी यावर नाकं मुरडली. ती तीचं नाव न बदलता राहू शकत नाही का? समाजाचा दृष्टिकोनच आम्हाला पूर्णत: चुकिचा वाटतो. आमच्या मुलीच्या बाबतीतही आम्ही ही गोष्ट ठरवली. तीच्या आईने तीला नऊ महिने पोटात वाढवलय. म्हणजे तीच्या जन्मात तीच्या आईचंच जास्त योगदान आहे. माझी मुलगी ’ज्ञानेश्वरी रश्मी तुषार’ असे दोघांचेही नाव लावेल. ज्या परंपरांमुळे समाजात चुकीची मानसिकता तयार होते, त्या परंपरांचा उपयोग तरी काय? स्त्रीला समाजामध्ये बरोबरीचं स्थान देण्यासाठी प्रत्येकाने या मानसिकतेचा अंगिकार करायला हवा. त्या दृष्टीने हे आमचे पुढचे पाऊल आहे...



















