Showing posts with label bendrey. Show all posts
Showing posts with label bendrey. Show all posts

Thursday, February 19, 2026

वा. सी. बेंद्रे आणि कलायोगी कांबळे यांची ऐतिहासिक देणगी: शिवरूपाचा शोध आणि रंगांची साधना

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नाहीत, तर ते एक अजोड दैवत आहेत. रयतेचा राजा, जाणता राजा आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून त्यांचे स्थान प्रत्येक मराठी मनाच्या गाभाऱ्यात अचल आहे. शतकानुशतके या महापुरुषाच्या पराक्रमाच्या गाथा गायल्या गेल्या, पोवाडे रचले गेले, आणि इतिहासाच्या पानांवर त्यांच्या शौर्याची नोंद झाली. तरीही, एका प्रश्नाने इतिहासकारांना आणि शिवभक्तांना दीर्घकाळ अस्वस्थ केले होते, तो प्रश्न म्हणजे—"आपले राजे खरोखर दिसायला होते तरी कसे?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे ऐतिहासिक आणि संशोधनपर श्रेय ज्येष्ठ इतिहासकार वा.सी. बेंद्रे यांना जाते, तर त्या सत्याला रंगांचे लेणे चढवून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य कोल्हापूरचे सुप्रसिद्ध चित्रकार 'कलायोगी' जी. कांबळे यांनी केले.
या दोन दिग्गजांमधील ऐतिहासिक दुवा म्हणून चित्रकार जी. कांबळे यांनी वा.सी. बेंद्रे यांना मे १९८४ मध्ये लिहिलेले एक पत्र अत्यंत महत्त्वाचे ठरते. बेंद्रे यांच्या नातीच्या अर्थात साधना बेंद्रे यांच्या संग्रहात हे पत्र आहे. या पत्रातून केवळ एका चित्राचा प्रवास उलगडत नाही, तर त्यामागील संशोधकीय आणि कलात्मक तपश्चर्याही समोर येते. कोल्हापूरात राहत असताना लिहिलेल्या या पत्रात कांबळे यांनी अत्यंत विनम्रतेने कबूल केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ आणि खरे रेखाचित्र मिळवून ते जगासमोर प्रकट करण्याचे संपूर्ण श्रेय हे वा.सी. बेंद्रे यांनाच आहे. विशेष म्हणजे याच पत्रामध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे चित्र देखील रेखाटण्याची इच्छा बोलवून दाखवलेली आहे. परंतु संभाजी राजांचे मूळ चित्र त्यांना मिळाले नाही.

मराठी मातीशी आणि भारताच्या भाग्याशी एकरूप झालेल्या शिवरायांचे रूप नक्की कसे असावे, याबद्दल समाजात अनेक तर्कवितर्क होते. अशा वेळी, वा.सी. बेंद्रे यांनी संशोधकाच्या चिकाटीने शिवरायांचे अस्सल समकालीन रेखाचित्र शोधून काढले. हेच रेखाचित्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या माध्यमातून चित्रकार कांबळे यांच्यापर्यंत पोहोचले. एका इतिहासकाराने शोधलेले सत्य आणि एका शिवशाहिराने केलेला पाठपुरावा, याला एका प्रतिभावान चित्रकाराची जोड मिळाली आणि इतिहास घडला.

 

 


मात्र, संशोधकाने शोधलेल्या सत्याचे रूपांतर कलेत करणे ही सोपी गोष्ट नव्हती. केवळ कल्पनेच्या भरारीवर चित्र काढणे वेगळे आणि इतिहासाच्या पुराव्यांवर आधारित अस्सल चित्र साकारणे वेगळे. जी. कांबळे यांनी या पत्रात आपल्या या पाच वर्षांच्या कठोर साधनेचे वर्णन केले आहे. बेंद्रे यांनी शोधलेल्या त्या मूळ रेखाचित्राचा कांबळे यांनी सलग पाच वर्षे सखोल अभ्यास केला. त्या चित्रातील प्रत्येक रेषा, चेहऱ्यावरील भाव आणि ऐतिहासिक बारकावे तपासून पाहण्यासाठी त्यांनी सुरुवातीला अनेक पेन्सिल स्केचेस तयार केली.
एखाद्या तपस्वी साधकाप्रमाणे पाच वर्षे अभ्यास केल्यानंतरच कांबळे यांनी कुंचला हातात घेतला. या प्रदीर्घ अभ्यासांती १९७४ साली त्यांनी शिवरायांचे ते भव्य तैलचित्र  साकारले, जे आज आपल्याला शिवरायांच्या खऱ्या रूपाची साक्ष देते. हे ऐतिहासिक तैलचित्र त्यांनी १९७४ मध्येच महाराष्ट्र शासनास अर्पण केले. आज शासकीय कार्यालयांपासून ते घराघरापर्यंत, आणि पुस्तकांपासून ते हृदयापर्यंत शिवरायांचे जे अधिकृत, तेजस्वी आणि प्रसन्न रूप आपण पाहतो, ते याच संशोधनाचे आणि कलेचे फलित आहे.
हे पत्र म्हणजे त्या ऐतिहासिक प्रवासाचा एक मूक साक्षीदार आहे. त्यात कांबळे यांनी "शिवरायांचे रूप खरोखर कसे होते?" या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचे श्रेय पूर्णपणे बेंद्रे यांना दिले आहे. इतिहासकार वा.सी. बेंद्रे यांची संशोधक दृष्टी आणि जी. कांबळे यांचा कलात्मक संयम यांच्यामुळेच महाराष्ट्राला आणि भारताला आपल्या लाडक्या राजाचे खरेखुरे रूप पाहण्याचे भाग्य लाभले. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरले जावे असे हे कार्य आहे, ज्याची साक्ष हे पत्र आजही देत आहे.

--- तुषार भ. कुटे

 

Thursday, October 13, 2022

सतराव्या शतकातील गोवळकोंड्याची कुत्बशाही

महाराष्ट्राच्या इतिहासाला धार चढते ती #छत्रपती #शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठेशाहीच्या उदयानंतरच. आज स्थापन झालेले मराठी राज्य शिवशाहीबरोबरच उदयास आले. परंतु इस्लामी राज्यकर्त्यांनी भारतावर कब्जा मिळवलेला असताना स्वकीयांचे राज्य निर्माण करणे, ही त्या काळातली अशक्यप्राय अशीच घटना होती. त्यातूनच शिवरायांनी सतराव्या शतकात रयतेचे राज्य स्थापन केले. तत्पूर्वी #मराठी प्रदेशांमध्ये तसेच पूर्ण दक्षिण भारतामध्ये बहमनी सुलतानाचे वर्चस्व होते. परंतु #बहमनी राज्याची शकले पडली आणि #निजामशाही, #इमादशाही, #बरीदशाही, #आदिलशाही व #कुत्बशाही राज्ये निर्माण झाली. यातील कुत्बशाही राज्य सर्वात शेवटचे राज्य होय. त्यांची राजधानी गोवळकोंड्याला होती.
शिवशाहीचा उदय झाला त्यावेळी या पाचही शाह्या दख्खनवर राज्य करत होत्या. त्यामुळे शिवशाहीचा सखोल अभ्यास करण्यासाठी तत्कालीन इस्लामिक राज्यकर्त्यांचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे. याच दृष्टीकोणातून इतिहासाचे भिष्माचार्य वासुदेव सीताराम #बेंद्रे यांनी 'सतराव्या शतकातील गोवळकोंड्याची कुत्बशाही' हा ग्रंथ संपादिला. शिवशाहीचा काळ चालू झाला त्यावेळी मराठी राज्य चोहोबाजूंनी इस्लामी राज्यकर्त्यांनी घेरलेले होते. त्यातच दक्षिणेतील #गोवळकोंड्याची कुत्बशाही देखील समाविष्ट होती. मराठी राज्य विस्तारत असताना अनेकदा अप्रत्यक्षपणे कुत्बशाहीचा आधार मिळाला.
हा ग्रंथ मराठी आणि #इंग्रजी अशा दोन भागांमध्ये तयार करण्यात आलेला आहे. याकरता वा. सी. बेंद्रे यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून येते. त्यांनी कुत्बशाहीची विश्वसनीय #सनावळ बनवलेली आहे. कुत्बशाहीच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये झालेल्या विविध राज्यकर्त्यांची विस्तृत माहिती तसेच तत्कालीन #उल्लेखनीय ऐतिहासिक घटना या सदर ग्रंथामध्ये विस्तृतपणे नोंदविलेल्या आहेत. या ग्रंथाचे संपादन बेंद्रे यांनी प्रा. भगवत दयाळ शर्मा यांच्या साहाय्याने सन १९३४ मध्ये केले होते. तसं पाहिलं तर त्या काळामध्ये इतिहासावर फारसे #संशोधन झाले नव्हते. परंतु त्यांनी अभ्यासलेल्या परकीय साधनांमधून कुत्बशाहीची बरीच माहिती जमा केली गेली. त्याचाच उपयोग मराठेशाहीचा #अभ्यास करण्यासाठी झालेला दिसतो. या ग्रंथामध्ये कुत्बशाहीच्या लेखनाचे सर्व प्रयत्न, हकीकत, तत्कालीन #लढाया, #युद्धपद्धती तसेच इतर पातशहांचे असणारे संबंध याविषयी सखोल माहिती पुरवलेली आहे. विशेष म्हणजे कुत्बशाहीचे शिवशाहीची संबंध व त्यावरील परिणाम याचा उपयोग मराठेशाहीच्या अभ्यासकांना निश्चित करता येण्याजोगा आहे.
इतिहास लेखन करत असत असताना तत्कालीन कालगणनेची भान ठेवणे गरजेचे असते. सदर ग्रंथामध्ये बहुतांश ठिकाणी #ऐतिहासिक साधनांमध्ये इस्लामी #हिजरी कालगणनेचा उल्लेख येतो. या कालगणनेचे आजच्या जागतिक कालगणनेमध्ये रूपांतर करून #दिनांक व वर्ष यांचा उल्लेख बेंद्रे यांनी या ग्रंथांमध्ये केलेला आहे.
या ग्रंथाच्या इंग्रजी भागामध्ये तत्कालीन इंग्रजीचा बेंद्रे यांनी वापर केलेला आहे. आजच्या काळात वापरण्यात येणारे स्पेलिंग तसेच व्याकरण हे काही प्रमाणात वेगळे आहे. पुस्तकामध्ये मात्र इंग्रजीतील तत्कालीन #व्याकरण व स्पेलिंगचा वापर करण्यात आलेला आहे.
ग्रंथाचे पुन:प्रकाशन करत असताना प्रकाशकांनी यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. इतिहास अभ्यासकांना तसेच भाषासंशोधकांना तत्कालीन #भाषा कशी होती, याचा अभ्यास करणे सुलभ होईल असे वाटते.