चित्रपटाची सुरुवात होते एका आणीबाणीच्या प्रसंगाने. आजोबांच्या छातीमध्ये
अचानक दुखू लागतं. घरामध्ये आजोबा आजी हे दोघंच. आजीला काय करावे ते सुचत
नाही. पण तरी देखील ती धीराने मुसळधार कोसळणाऱ्या पावसामध्ये आजोबांना
हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आणि ते वाचतात.
या प्रसंगातून आजोबा मात्र एक
मोठा धडा घेतात. आयुष्याची इतकी वर्षे घालवली, पण आता आजवर काय कमावलं?
याचा ते विचार करतात. त्याचे उत्तर त्यांना नकारात्मक येतं. आयुष्याचा सार
काय ते समजत नाही. आपण आजवर किती माणसे कमावली, जी आपल्याला योग्य वेळी
मदतीला येतील? आपण गेल्यावर आपली आठवण किती लोक काढतील? या विचाराने ते
अस्वस्थ होतात. आयुष्याची अखेरची काही वर्षे केवळ औषधाच्या गोळ्यांच्या
भरवशावर घालवत असतात. आयुष्यातील नाकर्तेपन त्यांना ठळकपणे जाणवायला लागते.
यावर ते त्यांच्या पद्धतीने उपाय शोधून काढतात. विशेष म्हणजे दर आठवड्याला
त्यांना डायलिसिस करावे लागत असते. तरीदेखील लोकसेवेचा वसा हाती घेऊन ते
जीवनाची पुढची वर्षे काढायला सज्ज होतात. आपण जेव्हा जाऊ तेव्हा चार लोक
तरी आपल्याला खांदा द्यायला येतील का? या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळते.
एका
वेगळ्या विषयाला हात घालणारा हा चित्रपट म्हणजे 'प्रवास'. अशोक सराफ आणि
पद्मिनी कोल्हापुरे यांनी या आजी-आजोबांची भूमिका केली आहे. केवळ
त्यांच्याच नव्हे तर अन्यही काही प्रसंगातून जीवन जगण्याची गुपिते आपल्याला
समजतात. दोघांचा कसदार अभिनय आणि दमदार कथा आपल्याला शेवटपर्यंत खेळवून
ठेवते. केवळ एकच नाही तर त्याहीपेक्षा अधिक वेळा हा चित्रपट आपण पाहू शकतो.
Friday, September 13, 2024
प्रवास
Thursday, August 29, 2024
जीवनसंध्या
वकिलाच्या कार्यालयाबाहेर दोन वृद्ध व्यक्ती अर्थात आजी आजोबा
गप्पा मारत बसलेले आहेत. रिसेप्शनिस्ट मात्र त्यांच्याकडे कौतुकाने पाहत
आहे. एका ड्रायव्हर्स लॉयरच्या कार्यालयात हे दोघे नक्की काय करतायेत हा
प्रश्न त्याला पडतो. तो त्यांना विचारतो देखील. त्यावर ते म्हणतात की
आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे. दोघांमधील इतका सुंदर नातं बघून त्याला हा
प्रश्न पडतो की ते घटस्फोट का घेत आहेत आणि ते देखील या वयात?
इथून
चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये सुरू होतं. दोघांचं नातं पाच वर्षांपूर्वी सुरु
झालेलं असतं. अर्थात त्यापूर्वी दोघेही आपल्या मुलांसमवेत एकांतात जीवन
व्यतीत करत असतात. परंतु एक दिवस त्यांची भेट होते. हळूहळू ते दोघेही
एकमेकांना आवडायला लागतात. आणि एकत्रित राहण्याचा अर्थात लग्नाचा निर्णय
घेतात. हा निर्णय मात्र त्यांच्या मुलांना बिलकुल पटत नाही. मग ते
मुलांविरुद्ध बंड करतात आणि वयाच्या सत्तरी मध्ये स्वतःचा संसार सुरू
करतात. तो अतिशय आनंदात आणि सुरळीत चालू असतो. फक्त त्याला त्यांच्या
मुलांची साथ लावत नाही. अचानक एक दिवस एका प्रसंगामुळे आजी अडचणीत येते.
आणि त्यामुळेच त्यांना घटस्फोट घ्यावा लागतो. तरीदेखील एकमेकांशिवाय राहवत
नाही. आणिकथा एक वेगळे वळण घेते. दोघांनाही एकत्रित राहण्याची संधी मिळते.
पुढे त्यांचा संसार कसा चालतो हे चित्रपटात पाहणे सोयीस्कर ठरेल.
जीवनसंध्या या चित्रपटातील जीवन म्हणजे अशोक सराफ आणि संध्या म्हणजे किशोरी
शहाणे. कित्येक वर्षांपासून या दोघांचे चित्रपट मराठी प्रेक्षक पाहत आलेले
आहेत. अगदी तारुण्यापासून वृद्धत्वापर्यंत त्यांनी अनेक चित्रपट मराठी
रसिकांना दिले. कदाचित कोणताच चित्रपट फ्लॉप गेला नाही किंवा कंटाळवाणा
देखील वाटला नाही. हा चित्रपट जरी विनोदी नसला तरी देखील वेगळ्या धाटणीचा
आहे. कदाचित जीवन आणि संध्या ची भूमिका त्यांच्यासाठीच लिहिली असावी हे
चित्रपट पाहून आपल्याला समजते.
Tuesday, April 11, 2023
अशोक सराफ
काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये मला प्रश्न विचारला होता की, तुमचे आवडते कलाकार कोण? मी तात्काळ उत्तर दिले... अशोक सराफ. केवळ मीच नाही तर महाराष्ट्रातील करोडो लोकांचे ते आवडते कलाकार आहेत!
झी गौरव सोहळ्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याचा व्हिडिओ संपूर्ण समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानिमित्ताने अशोक सराफ यांच्याबद्दल थोडं लिहावंसं वाटलं. आजवर अनेक मराठी चित्रपट पाहिले पण अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि निळू फुले यांच्या बरोबरीचा अभिनय करू शकेल असा अन्य कोणताही अभिनेता दिसला नाही. अशोक सराफ यांची गोष्टच पूर्णपणे वेगळी आहे. अतिशय सहज आणि नैसर्गिक अभिनयाचे ते विद्यापीठ आहेत. त्यांनी अभिनय केलेला कोणताही चित्रपट असो कधीच कंटाळवाणा वाटत नाही. किंबहुना त्यांचे चित्रपट कित्येकदा पाहिले तरीही त्यातली मजा कमी होत नाही. महाराष्ट्रातील असंख्य मराठी चित्रपट प्रेमींची कदाचित हीच भावना असावी. विनोद करावा तो अशोक सराफ यांनीच!
आजकालचे काही अभिनेते किळसवाणे विनोद करून हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते पाहून अशोक सराफ यांचा अभिनय किती उच्च दर्जाचा होता, याची कल्पना येते. बऱ्याचदा अगदी खळखळून हसायचं वाटल्यास अशोक सराफ यांचे चित्रपट आम्ही पाहतो. मराठी चित्रपट आणि अशोक सराफ यांचं अतूट नातं आहे. कदाचित यापुढे देखील मराठी चित्रपटसृष्टी अशोक सराफ यांच्यामुळेच ओळखली जाईल, यात शंका नाही.
Monday, June 21, 2010
मृत्युपूर्वीची मजा... ’हसतील त्याचे दात दिसतील’



