Showing posts with label computer virus. Show all posts
Showing posts with label computer virus. Show all posts

Sunday, June 18, 2023

फेसबुक नावाचा व्हायरस

लोकसंख्येनुसार भारत जरी जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असला तरी इंटरनेट वापरकर्त्यांचा विचार केला तर फेसबुक हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल. आज जगभरातील २११ कोटी लोक फेसबुकचा वापर करतात. भारताचा विचार केला तर भारतात ३१ कोटी सक्रिय फेसबुक सदस्य आहेत. 'सक्रिय'चा अर्थ असा की ते दररोज एकदा तरी फेसबुक उघडून पाहतात. म्हणजेच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे असल्यास फेसबुक हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. परंतु हेच लोकभावना बिघडवण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वात मोठे माध्यम देखील आहे. 



फेसबुकच्या रिकमंडेशन सिस्टीम अल्गोरिदमनुसार आपण ज्या प्रकारच्या पोस्टवर अधिक काळ राहतो किंवा त्यावर क्लिक करतो, तशाच प्रकारच्या पोस्ट आपल्याला सातत्याने आणि वेगाने दिसायला लागतात. यातून मतपरिवर्तन होण्यास देखील मदत होते. फेसबुकचा हा सर्वाधिक विषारी अल्गोरिदम आहे. याद्वारे लोक अधिकाधिक आपला वेळ फेसबुकवर खर्च करतात. त्यामुळे फेसबुकला मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. परंतु यातून लोकांची मने देखील दूषित होण्याचा मोठा संभव असतो. खरंतर ही संभाव्यता नाही, ही वस्तुस्थिती आहे! फेसबुकमध्ये अर्थात मेटा कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने याबाबतीत गौप्यस्फोट देखील केला आहे. मागील काही वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर वाढल्यानंतरच भारतीय समाजामध्ये विषारी वातावरण तयार झाल्याचे दिसते. यात फेसबुकसारख्या माध्यमांचा सर्वात मोठा वाटा आहे. या माध्यमाद्वारे कोणतीही माहिती चुटकीसरशी पूर्ण जगभरामध्ये पोहोचते. ती खरी आहे ती खोटी याची शहानिशा देखील केली जात नाही. याच कारणास्तव सामाजिक सौहार्द आणि शांतता यांना निश्चितच धोका पोहोचला जात आहे. आधुनिक इंटरनेटवर वेगाने पसरलेला हा एक प्रकारचा धोकादायक व्हायरस म्हणता येईल. अजूनही सर्वसामान्य इंटरनेट वापरकर्त्यांना याविषयी निश्चित माहिती नाही. म्हणूनच लोक फेसबुकच्या अनिर्बंध वापराला बळी पडल्याचे दिसतात. राजकीय लोकदेखील याचा गैरफायदा करून घेत आहेत. आज आपण साक्षर तर झालो आहोत परंतु अजूनही 'इंटरनेट साक्षर' झालेलो नाही, असं दिसतं. कदाचित दुष्परिणाम वाढत गेल्यानंतर शहाणपण येऊ शकतं. परंतु त्यासाठी बराच काळ जावा लागेल.

- तुषार भ. कुटे.

Friday, August 13, 2021

फ्रायडे द थर्टीन

संगणक विश्वामध्ये कॉम्प्युटर व्हायरस हा नेहमीच कुतूहलाचा आणि भीतीचा विषय राहिलेला आहे! मागच्या अनेक दशकांमध्ये नवनवे व्हायरस संगणकामध्ये प्रवेशकर्ते झाले. त्यातील बऱ्याच संगणकीय विषाणूंनी दहशत देखील पसरवली होती. अशाच संगणक विषाणूपैकी एक विषाणू म्हणजे फ्रायडे द थर्टीन (Friday the 13th) होय. आज २०२१ या वर्षातील एकमेव फ्रायडे द थर्टीन आलेला आहे. अर्थात महिन्याची १३ तारीख शुक्रवारी आलेली आहे. 


कित्येक दशकांपासून युरोपीय देशांमध्ये शुक्रवार आणि १३ तारीख ही अशुभ मानली जाते. शिवाय त्यांचे मीलन झाल्यास त्याची अशुभता आणखी प्रखर होते. अशी अंधश्रद्धा आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी जेव्हा संगणकामध्ये मायक्रोसॉफ्टची डॉस नावाची संगणक प्रणाली वापरली जात होती, त्या काळात फ्रायडे द थर्टीन नावाच्या व्हायरसने धुमाकूळ घातला होता. या विषाणूला जेरूसलेम व्हायरस असे देखील म्हटले जायचे. या काळात विंडोज, लिनक्स किंवा ऍपल मॅक सारख्या माउसद्वारे वापरण्यात येणाऱ्या संगणक प्रणाली विकसित झालेल्या नव्हत्या. 'डॉस' सारखी संगणकीय कमांडद्वारे वापरण्यात येणारी संगणक प्रणाली लोकप्रिय होऊ लागली होती. त्यातच फ्रायडे द थर्टीन या मालवेअर अर्थात आणि हानिकारक सॉफ्टवेअरचा प्रवेश संगणकामध्ये झाला. हा व्हायरस म्हणजे एक 'लॉजिक बॉम्ब' होता. लॉजिक बॉम्ब हे व्हायरसचे एक विशिष्ट रूप आहे. असे व्हायरस इतर वेळी सुप्त पडून संगणकामध्ये राहतात. परंतु ते एका विशिष्ट वेळीच कार्यरत व्हायला लागतात. जेरुसलेम व्हायरस हा वर्षाच्या महिन्याच्या १३ तारखेला शुक्रवार असेल तरच आपले कार्य सुरु करायचा! संगणकामधील सर्व सॉफ्टवेअर फाइल्स अर्थात एक्झिक्युटेबल फाईल्सची रचना तो बदलून टाकत असे. त्यामुळे कोणतेच सॉफ्टवेअर चालत नसत. याच कारणामुळे संगणक वापरकर्त्यांमध्ये दहशत तयार झालेली होती. त्याकाळात वापरण्यात येणाऱ्या फ्लॉपी डिस्कद्वारे त्याचा प्रसार एका संगणकातून दुसऱ्यामध्ये होत होता. फ्लॉपी डिस्कला रीड ओन्ली नावाचा एक 'नॉच' असायचा. तो जर चालू केलेला असेल तर कोणत्याही व्हायरसचा प्रवेश फ्लॉपी डिस्क मध्ये होत नव्हता. हीच सुरक्षा या व्हायरस पासून वाचण्याकरता उपलब्ध होती! व्हायरसचा शिरकाव संगणकामध्ये झाल्यावर संगणक केवळ त्याच्या २० टक्के क्षमतेने चालू राहत होता. या कारणास्तव अनेक वर्षे संगणक वापरकर्ते १३ तारखेच्या शुक्रवारी संगणक देखील चालु करत नसत! परंतु कालांतराने नव्या ऑपरेटिंग सिस्टिम उदयास आल्यानंतर मात्र या व्हायरसचा प्रभाव शून्य झाला. कारण डॉस आधारित सूचनांचा संग्रह निष्क्रिय झाला होता. पण संगणकीय व्हायरस च्या इतिहासात या विषाणूने घातलेला धुमाकूळ आजही संगणक विश्वात आपले स्थान राखून आहे. फ्रायडे द थर्टीन या नावाने हॉलिवूडमध्ये चित्रपटांची शृंखला देखील तयार झाल्याचे दिसून येते!

Monday, January 23, 2012

संगणक व्हायरसच्या विश्वात


संगणक वापरकर्त्यांना सर्वात जास्त घाबरविणारी गोष्ट म्हणजे व्हायरस होय. व्हायरस म्ह्टले म्ह्टले की, भल्याभल्यांची भांबेरी उडते. आपल्या संगणकात व्हायरस कसा येणार नाही, याची काळजी आपापल्या परीने प्रत्येक जणच घेत असतो. कॉम्प्युटर विकत घेताना त्याच्यासोबत अँटीव्हायरस आहे का याची काळजी प्रत्येकालाच घ्यावी लागते कारण नावाप्रमाणेच व्हायरस अर्थात विषाणू हे विंडोज असणाऱ्या संगणकाला होणाऱ्या विविध रोगांना कारणीभूत ठरत आहेत असेच जगातील सर्वात खतरनाक १० व्हायरस पुढीलप्रमाणे-

क्रमांक १०- मेलिसा
१९९९ मध्ये डेव्हिड स्मिथ नावाच्या संगणक तज्ञाने याची निर्मिती केली होती मायक्रोसॉफ्ट वर्डच्या ’मॅक्रो’ या संकल्पनेवर हा व्हायरस कार्य करतो. ईमेल द्वारे हा व्हायरस कार्यान्वित झाल्यावर ईमेलद्वारेच ते समोरच्या व्यक्तिला सुचना करतो की तुम्हाला हवी असलेली फ़ाईल आम्ही ता मेलने पाठवली आहे व एकदा ही फ़ाईल डाऊनलोड झाली की या व्हायसरचे काम चालू होते पुन्हा त्याच मेल बॉक्स मधून ५० जणांना असाच मेल पाठवला जातो.१९९९ साली वेगाने या व्हायरसचा प्रसार झाला शिवाय डेव्हिड स्मिथला या व्हायरसचा प्रसार केल्यामुळे पाच हजार डॉलरच्या दंडाची शिक्षा व २० महीने कैदही झाली आहे.
क्रमांक ९- आय लव्ह यू
फ़िलिपाईन्स मध्ये २००० साली तयार झालेला व ईमेलनेच प्रसार होणारा हा व्हायरस होय. ईमेलमधून हा व्हायरस संदेश प्रसारीत करतो की तुमच्या गुप्त प्रेमिकेने तुम्हाला प्रेमसंदेश पाठविला आहे त्यासोबर फ़ाईल डाऊनलोड करुन उघडल्यास हा व्हायरस स्वत:चे प्रताप चालू करतो. मॅकेफ़ी अँटीव्हायरस कंपनीच्या संशोधनानूसार हा व्हायरस स्वत:च्याच कॉपी तयार करण्याचे, नव्या रेजिस्ट्री तयार करण्याचे तसेच पासवर्ड चोरी करण्याचे उद्योग करतो. या व्हायरसच्या निर्मात्याला फ़िलिपाईन्स पोलिसांनी अटक केली होती. पण त्यावेळी या देशात कोणतेच सायबर कायदे अस्तित्वात नसल्याने त्याला शिक्षा झाली नाही.
क्रमांक ८- क्लेझ
सन २००१ मध्ये या व्हायरसची निर्मिती झाली. ईमेलद्वारे वेगाने प्रसार झाल्यावर अनेक हॅकर्सनी या व्हायरसवर प्रयोग केले आहेत. ’स्पूकिंग’ नावाची संज्ञा याच व्हायरसने अस्तित्वात आणली त्यात एखाद्या व्यक्तिच्या मेल बॉक्स मधून पाठवले जातात, पण तो मेल कुणाकडून आला आहे, याची माहिती मेल प्राप्त करणाऱ्यास मिळत नाही. त्यातूनच ’जंकमेल’ वा ’स्पॅम मेल’ची संख्या वाढत जाते.
क्रमांक ७- कोड रेड व कोड रेड २
या दोन्ही व्हायरसची निर्मिती सन २००१ मध्ये झाली. संगणकातील ऑपरेटिंग सिसिस्ट्मवर मोठ्या प्रमाणावर भार देण्याचे काम या व्हायरसनी केले. विंडोज २००० व विंडोज NT या संगणक प्रणालींना खराब करण्याचे काम प्रामुख्याने या दोन व्हायरसनी केले आहे. हे व्हायरस कार्यान्वित झाल्यावर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधील वेब सर्व्हरला आपोआप मेल पाठवत राहयचे. शेवटी मायक्रोसॉप्ट कंपनीनेच यावर उपाय सुचवून आपल्या संगणक प्रणालींसाठी ’पॅच’ तयार करायचे ठरवले. त्यानंतर ही या व्हायरसचे उड्योग मात्र बंद पडले नाहीत.
क्रमांक ६- निमडा
इंटरनेटद्वारे प्रसार झालेला हा व्हायरस सन २००१ मधील निर्मिती आहे. ’अँडमिन’ या इंग्रजी शब्दाचा उलटा उच्चार ’निमडा’ असा होतो. याच काळात इंटरनेटद्वारे सर्वात वेगाने प्रसारित झालेला हा व्हायरस होय. त्याने केवळ २२ मिनिटांत इंटरनेट जगतात आपले बस्ताने मांडले होते. संगणकावर ’ Administrator’  म्ह्णून लॉगीन झाल्यावर हा व्हायरस सर्व हक्क स्वत:कडे ठेऊन तो संगणक वापरण्याचे सर्व हक्क मर्यादित करण्याचे काम करायचा. व्हायरसच्या ’वर्म’ या गटात मोडणारा हा व्हायरस होय.
क्रमांक ५- एस.क्यू.एल. स्लॅमर/ सॅफ़ायर
सन २००३ च्या जानवारी महिन्यात या व्हायरसचा जन्म झाला त्यावेळी अँटीव्हायरस सॉफ़्ट्वेसर च्या क्षमतांची कमतरता पाहूनच या व्हायरसची निर्मिती करण्यात आली होती.बॅंक ऑफ़ अमेरीकेचे >>>> व्हायरसने नष्ट केले. तसेच कॉन्टिनेंटल एअरलाईन्सला या व्हायरसच्या अटॅकमुळे आपली सर्व उड्डाने रद्द करावी लागली होती. अँटिव्हायरस कंपन्यांनी आपले अपडेट्स पाठवण्यापूर्वीच या व्हायरसने १०० कोटी डॉलर्सचे नुकसान केले होते. हा व्हायरस कार्यान्वित झाल्यानंतर जवळपास प्रत्येक पंधरा मिनिटांत इंटरनेट विश्वातील आपली व्याप्ती दुप्पट करत होता. जवळपास  ५० टक्के वेबसर्व्हरवर त्याने आपले आक्रमण केले पण या व्हायरसने एक चांगला धडा शिकवला. कोणत्याही संगणकात अँटीव्हायरसने अत्याधुनिक अपडेट्स असायलाच हवेत. अर्थात prevention is better than cure म्हणतात ते हेच.
क्रमांक ४- मायड्रम
’वर्म’ या प्रवर्गात मोडणारा हा व्हायरस ’नोव्हार्ग’ या नावानेही ओळखला जातो. १ फ़ेब्रुवारी २००४ ते १२ फ़ेब्रुवारी २००४ या बारा दिवसात मायड्रमचे स्वत:चे ईप्सित साध्य केले. यानंतरही तो बऱ्याच संगणकांत धूमाकुळ घालत होता. यानंतरच्या सर्च इंजिन कंपन्यांना त्याचा मोठा फ़टका बसला. ’गूगल’ सारख्या सर्च इंजिनवर त्याने बरेच शब्द ’सर्च’ पाठवले, जेणेकरून त्यांचा वेबसर्व्हर कमी वेगाने कार्य करेल. ’मॅसेजलॅब्ज’ च्या अहवालानूसार त्यावेळी प्रत्येक बारा ईमेल्समध्ये एका मायड्रमचा शिरकाव होत होता. क्लेझ व्हायरसप्रमाणेच ’मायड्रम’नेही स्पूफ़िंगचेच कार्य केले.
क्रमांक ३ – सॅसर व नेटस्काय
स्वेन जॅशन नावाच्या १७ वर्षीय जर्मन मुलाने हे दोन संगणकीय प्रोग्राम्स बनविले होते. दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करणारे ’वर्म’ होते. सॅसर व्हायरसने मायक्रोसॉफ़्ट विंडोज वर आक्रमण केले. अन्य व्हायरसप्रमाणे तो ईमेलद्वारे पसरला नाही. परेटिंग ऑसिस्टिमध्ये कार्यान्वित झाल्यावर स्वत:चेच अपडेट्स हा व्हायरस डाऊनलोड करायचा. संगणक बंद करण्यावरही या व्हायरसने बंधने घातली होती. नेटस्काय व्हायरस प्रामुख्याने ईमेल विंडोज नेटवर्क द्वारे प्रसारीत झाला. स्पुफ़िंगच्या साह्याने २२०१६ बाईट्सची फ़ाईल तो ईमेलने पाठवायचा व स्वत:च प्रसार करायचा. जवळपास २५ टक्के संगणकात या व्हायरसने शिरकाव केला होता. शिवाय त्याचा निर्माता स्वेन जॅशन हा अल्पवयीन असल्याने त्याच्यावर मोठी कारवाई झाली नाही.
क्रमांक २ – लिप-ए
हॅकरसाठी संगणक विश्वात कोणतेच कार्य अशक्य नसते तेच लिप-ए या व्हायरसने सिद्ध केले. अँपल कॉम्प्युटर्स हि संगणक विश्वातील नावाजलेली सॉफ़्ट्वेअर व हार्डवेअर कंपनी होय. त्यांच्या संगणकावर केवळ त्यांचीच ’मॅक’ ही ऑपरेटिंग सिस्टिम चालते. कंपनीने आपल्या संगणकावर केलेल्या उपाययोजनांमुळे ’मॅक’ साठी व्हायरस तयार झालेले नाहीत. पण सन २००९ मध्ये काही हॅकर्सनी ’मॅक’ साठी लिप-ए या व्हायरसची निर्मिती केली. तो ’आयचॅट’ द्वारे एक सुंदर चित्र पाठवून द्यायचा. या व्हायरसने फ़ारसे नुकसान केले नसले तरी ’मॅक’ पण ’हॅक; होऊ शकतो. याची प्रचिती आली.
क्रमांक १ – स्टॅार्म वर्म
तुमच्या संगणकात अँटीव्हायरस नसेल तर एकदा तो टाका व संगणक स्कॅन करा. कदाचित एखादा तरी स्टॅार्म वर्म सापडेल. २००६ मध्ये तयार झालेला हा व्हायरस शेकडो पद्धतीने आपली ’कार्य’ करत आहे. सन २००९ मध्ये ईमेलद्वारे ‘230 dead storm batters Europe’ या विषयाने व्हायरसचा प्रसार झाला, त्यावरुनच त्याला स्टॅार्म वर्म हे नाव पडले. सन २००१ मध्ये याच नावाचा व्हायरस तयार झाला होता. पण दोघांचाही काहीच संबंध नाही. तुमच्या स्पॅम मेलमध्ये आजही हा व्हायरस दडलेला असेल. ’स्टॅार्म वर्म’ व्हायरस ’ट्रोजन हॅार्स या प्रवर्गात मोडतो. व्हिडिओ, ऑडिओ वेबसाईट्स, ब्लॅाग्ज याद्वारे वेगाने प्रसारित होणारा हा व्हायरस आहे.
अशा विविध व्हायरसपासून संगणकाचा बचाव करण्यासाठी एकच उपाय आहे, आपल्या अँटीव्हायरसला सतत काळाच्या प्रवाहासोबत ठेवणे . अर्थात, तो सतत अपडेट असणे आवश्यक आहे.