Showing posts with label experience. Show all posts
Showing posts with label experience. Show all posts

Tuesday, November 22, 2022

मनमाड-येवला रस्त्यावर

मागील एका घटनेमध्ये जसं मी सांगितलं होतं की कुणीही ट्राफिक पोलीस कर्मचारी वर्दीमध्ये समोर दिसला की तो आपल्याकडे आले आपले गिराईक अशा नजरेने पाहताना आम्हाला जाणवतो आणि त्याच्या तोंडातून गळत असलेली लाळ देखील दिसत असते. नाशिक जिल्ह्यातील किल्ले सर करून परत जात असताना घडलेला हा किस्सा देखील अशाच प्रकारचा आहे.
३१ डिसेंबर २०२१ हा दिवस होता. ३१ डिसेंबर म्हटलं की सगळीकडेच पोलिसांची गस्त असते. मनमाड शहरानजीक असलेल्या अंकाई-टंकाई किल्ल्यांचा ट्रेक करून आम्ही पुन्हा येवला शहराच्या दिशेने निघालो होतो. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गवरून अहमदनगर तसेच पुण्याकडे येणारा हा हमरस्ता आहे. म्हणूनच या रस्त्यावर मोठमोठ्या मालवाहू गाड्यांची सातत्याने वर्दळ असते. अनकाई किल्ल्याकडून येवला शहराकडे येताना अशीच भली मोठी गर्दी या रस्त्यावर झाली होती. साधारणतः सहा ते सात किलोमीटर अंतरावर ट्राफिक पोलीस गाड्यांना अडवताना दिसून आले. बहुतांश गाड्या या मालवाहू प्रकारातील होत्या. ३१ डिसेंबर असल्यामुळे कदाचित वेगळ्या प्रकारची चौकशी चालू असावी, असे आम्हाला वाटले. आमच्या गाडीचा MH14 हा क्रमांक बघून आमची गाडी बाजूला घ्यायला लावली. अगदी दुर्दैवानेच म्हणावं लागेल की १५ डिसेंबरलाच माझ्या गाडीची पीयूसी संपलेली होती! खरंतर यात माझीच चुकी होती की माझ्या ध्यानात राहिले नाही. संबंधित ट्राफिक हवालदाराने मागितलेली सर्व कागदपत्रे त्यांना सुपूर्द केली. फक्त पीयूसीची तारीख निघून गेलेली होती. साहेबांना नवीन बकरा पकडल्याने आनंद झाला असावा. त्यांनी मला बाजूला घेतले आणि सांगितले, 'पियूसीचे हजार रुपये दंड पडतात, तुम्ही दोनशे रुपये द्या आणि निघून जा.' १००० रुपयांचे काम जर दोनशे रुपयांमध्ये होत असेल तर कोणीही ते देऊन निघून जाईल. परंतु मला ते पटत नव्हते. त्यांना मी सरळ सांगितले, "ऑनलाइन फाईन करून द्या. मी भरतो."
पीयूसी नसल्याच्या कारणावरून दंड भरणारा त्यांना मी कदाचित पहिलाच व्यक्ती भेटलो असेल. त्यामुळे ते देखील चक्रावले.
हवालदार पुढे बोलू लागला, "साहेब तुम्ही चांगले दिसता. सगळी कागदपत्रे देखील आहेत. कशाला हजार रुपयाचा भुर्दंड भरताय? त्यापेक्षा दोनशे रुपयांमध्ये तुमचं काम करून देतो! कागदावर दंड देखील लागणार नाही."
त्यांना दोनच शब्दांमध्ये उत्तर दिले, "चालेल मला! करा फाईन."


मग त्याचा देखील नाईलाज झाला. त्याने मशीनमध्ये माहिती टाकली आणि बराच वेळ वाट बघत होता. इंटरनेटला रेंज नसण्याचे कारण सांगून तो शेजारच्या गाडीपाशी असलेल्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याजवळ गेला व त्याला देखील काहीतरी सांगितले. मग तो त्याच्या जवळचे मशीन घेऊन इकडे आला. त्याने देखील पहिल्याचीच री ओढली. "साहेब तुम्ही चांगले दिसता कशाला फाईन वगैरे भरताय? दोनशे रुपये द्या लगेच गाडी मोकळी करतो."
मी पुन्हा म्हटलं, "साहेब ऑनलाईन फाईन करा. मी भरायला तयार आहे. आधीच्या साहेबांना सुद्धा मी हे सांगितलं आहे. यापेक्षा वेगळं मी काही करू शकत नाही."
मग त्याचा देखील नाईलाज झाला. गाडीला ऑनलाइन फाईन पडला. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो एक हजार रुपये नसून ५०० रुपये होता! लाखो ड्रायव्हरपैकी पियूसी नसल्यामुळे ऑनलाईन फाईन भरणारा कदाचित मी एकमेव ड्रायव्हर असावा!
दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित भाव होते. त्यांच्यासमोरच मी आरटीओच्या वेबसाईटवर फाईन भरला आणि गाडी चालू केली. एक मात्र धडा घेतला की लांबच्या प्रवासाला जाण्याच्या आधी गाडीची सगळं कागदपत्रे योग्य आहेत की नाही, हे तपासून घ्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांशी कुठलाही काळा व्यवहार करू नका.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे

Sunday, April 11, 2021

शिकाऊ अनुज्ञप्ती पुराण

जवळपास दोन वर्षांपासून नियमितपणे फेरफटका मारण्याची आमचे सरकारी कार्यालय म्हणजे एमएच १४ चे परिवहन कार्यालय. त्यावेळी नुकतीच पिंपरीहुन मोशीच्या नव्या इमारतीत स्थलांतरित झाले होते. तेव्हापासून आम्ही त्याची 'प्रगती' अनुभवत आहोत! जवळपास सर्वच सरकारी कार्यालयांची प्रगती ही समान संथगतीने होत असते. त्यात हेही सुटलेले नाही!
मागच्या काही महिन्यांपासून चारचाकीची शिकाऊ अनुज्ञप्ती अर्थात लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आम्ही सदर कार्यालयात अनेक फेऱ्या मारल्या. गेल्या काही वर्षांपासून परिवहन कार्यालयाने सदर पद्धती ऑनलाईन केल्याने आपले कार्य सुलभ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु नागरिकांना त्रास देण्यासाठी व पैसे लाटण्यासाठी ही सोय होती, हे आमच्यासारख्या पामरास खूप उशिरा समजले. आम्ही स्वतः संगणक अभियंता असल्याने आमची दृष्टी वेगळी आणि पैसे लाटणाऱ्याची दृष्टी वेगळी पडते, हे आमच्या फारच उशिरा ध्यानात आले. आमचे आधीचे लायसन्स हे एमएच १५ द्वारा वितरित करण्यात आले होते. त्यामुळे नवे लायसन्स एमएच १४ कडून मिळण्यात इतक्या अडचणी येतील, याची जराही कल्पना आमच्या मनात नव्हती. परंतु त्यामुळे ही सर्व कार्यालये एकाच भारतीय संघराज्यात किंवा भारताच्या एकाच राज्यात येतात का? हाही प्रश्न आमच्या मनात घर करून राहिला होता. त्याला आता दोन वर्षे उलटली आहेत. नव्या कार्यालयातले साहेबही बदलले आहेत. त्यामुळे आम्ही आता ताज्या दमाने नवा अर्ज करण्यासाठी सज्ज झालो होतो.

 

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शासनाने जी ई-पद्धतीची अर्ज प्रक्रिया चालू केली आहे, तिचा आम्ही पुरेपूर वापर केला. ऑनलाईन भरलेल्या अर्जाच्या, त्याच्या पावतीच्या, आमच्या ओळखपत्राच्या, जन्म पुराव्याच्या आम्ही "प्रिंट्स" काढल्या व पुनश्च त्या स्कॅन करून अपलोड करण्याच्या कामाला लागलो. कुठूनतरी ढापलेल्या वेब टेम्प्लेट वर बनवलेले संकेतस्थळ आम्ही शोधले! त्यावर अजूनही "साईट टायटल हियर" असं लिहिलेलं आहे! हे विशेष! अशा नावीन्यपूर्ण संकेतस्थळावर आपले सर्व दस्तावेज अपलोड करताना आमची ऑनलाइन दमछाक झाली. चार एमबीची फाईल 200 केबीमध्ये बसवताना ऑनलाईन दमछाक होते, हे लक्षात असू द्यात! त्यानंतरचा ऑनलाइन पेमेंट गेटवे हा तब्बल तीन वेळा कोसळला! तोही ऑनलाईनच! सुमारे एक-दीड तासानंतर आमचेही ऑनलाइन पुराण समाप्त झाले. आता लवकरच आपल्या लायसन्स (ऑनलाईन!) मिळणार याची स्वप्ने पडायला लागली.
शहरात सगळ्यात जास्त बेशिस्त पार्किंग कुठे होत असेल तर, ती आरटीओ कार्यालयाच्या बाहेर! 'दिव्याखाली अंधार' ही उक्ती सार्थ ठरवणारी ही खरीखुरी जागा होय. अशा विविध सरकारी कार्यालयाची पायरी चढायची म्हणजे मोठा आत्मविश्वास व धैर्य लागते. खासकरून तेव्हा.. जेव्हा तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याचा खिसा गरम करणार नसाल! कार्यालयात प्रवेश करताच एंडोर्समेंट लायसन्स अर्थात लायसन्स वर लायसन्स काढण्यासाठी भली मोठी रांग लागलेली दिसली. अर्थात ती नव्याने लायसन्स काढणाऱ्या व्यक्तींना पेक्षा निश्चितच छोटी होती. समोर एका खुर्चीवर एक अधिकारी महिला अर्जांची छाननी करत होत्या. रांग पुढे सरकू लागली. वेग तसा चांगला होता. आजूबाजूला उभे असणाऱ्या अनेकांच्या हातातील त्यांचे अर्ज मी पाहिले. प्रत्येकाच्या अर्जावर कोणत्या ना कोणत्यातरी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा शिक्का होता. मीच आपुला उघडा बोडका अर्ज घेऊन त्या रांगेत उभा होतो, याची जाणीव झाली. चौकशी नंतर समजले की मोटार ड्रायव्हिंग स्कूलकडून दोनशे रुपये तपासणी करणार्‍या अधिकार्‍यांना दिले जातात. मी मात्र त्यात नव्हतो, याची खंत की लाज वाटली हे मला समजले नाही. त्या दोनशे रुपयांना कदाचित ते मानधन म्हणत असावेत. त्याला लाच म्हणणे म्हणजे अधिकाऱ्याचा व पैशाचाही अपमानच होय. खरं तर एखादा सरकारी अधिकारी व कर्मचारी पाहिला की, तो आपल्याकडे 'बकरा' या नजरेने पहात असावा असं आम्हाला बऱ्याचदा जाणवतं. आपल्याकडे पाहताना त्याच्या तोंडातून लाळ गळत आहे व प्रत्येक थेंबाची किंमत सुमारे पाचशे रुपये असावी, असेही आम्हाला सतत जाणवत राहतं. प्रामाणिक अधिकारी ही आमच्या दृष्टीने अंधश्रद्धा आहे. तिचं श्रद्धेत रुपांतर करण्याची हिम्मत आजवर एकाही सरकारी अधिकाऱ्याने केलेली नाही. या वेळीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. कार्यालयातील ती रांग सरकत सरकत पुढे आली. आमचा नंबर आला. मॅडमने प्रथम पाहिलं, अर्जावर कोणत्याही मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा शिक्का नव्हता. "च्यायला दोनशे रुपये गेले!", असे भाव मॅडमच्या मनात उमटले असावेत व त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला,
"अर्ज नीट अपलोड केला नाहीये परत अपलोड करा!", असे म्हणत आमचे कागद आमच्या अंगावर फेकले व संगणकात उघडला गेलेले अर्ज तात्काळ डिलीट करून टाकला. पुढचा क्रमांक घ्यायला मग त्या सज्ज झाल्या. ऑनलाइन अर्ज डीलीट केल्याने आमच्याकडे कोणताच पुरावा राहिला नव्हता. मग आम्ही निमूटपणे मागे हटलो व खुर्चीत जाऊन बसलो. आमचा मांडी-संगणक अर्थात लॅपटॉप आमचा सोबती म्हणून सतत बरोबर असतो. आम्ही तो बाहेर काढला व पुन्हा अर्ज अपलोड करायच्या मागे लागलो. मॅडमच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. 'मला खुन्नस देतोस काय?', ही भावना त्यांच्या मनात तयार झाली असावी. आमचा अर्ज पुन्हा अपलोड होईस्तोवर रांग संपून गेली होती. मग अर्ज घेऊन आम्ही पुन्हा मॅडमच्या समोर दाखल झालो. त्यांनी पुन्हा दहा मिनिटे काहीतरी काम केल्याची नाटकं केली आणि परत आमचा फॉर्म घेतला. त्यांच्यासमोरच संपूर्ण फॉर्म अपलोड झाल्याने कदाचित त्या मनातल्या मनात नवं कारण शोधत असाव्यात. तसेच त्या दोनशे रुपयांच्या नुकसानीची खंत त्यांना सतावत असावी. यावेळेस त्यांनी फॉर्म व्यवस्थित तपासून पाहिला आणि विचारलं, "जन्मतारखेचा प्रूफ कुठे आहे?" यावर मी त्यांना तात्काळ माझं अजून दुचाकीचं लायसन्स दाखवलं व लगेच उत्तर मिळालं,
"हे नाही चालत ओ!"
ज्या आरटीओ कार्यालयाने स्वतःला दुचाकीचं लायसन्स दिलं आहे, ते तिथे खोटं ठरवण्यात आलं! ही बाई स्वतःच्या कार्यालयाने जारी केलेल्या ओळखपत्र नामंजूर करत होती! एका २०० रुपयांसाठी हे लोक काय काय करू शकतात, याचा नमुना त्यादिवशी आमच्या समोर दिसत होता. तेव्हा मनाची खात्री पटली की, काहीही झाले तरीही बाई आज आपल्याला लायसन्स मिळवून देणार नाहीये. त्यामुळे तेथून काढता पाय घेणं योग्य होतं. जाताजाता कार्यालयात शोभेसाठी लावलेला लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या फलकही आम्हाला नजरेस पडला. त्याला मनातल्या मनात आम्ही सलाम ठोकला!
जवळपास दहा दिवसांनी एक सुट्टीचा दिवस मिळाला. मग काय... पुनश्च आम्ही सरकारी लोकांची तोंडं बघायला याच कार्यालयात डेरेदाखल झालो! पुन्हा तीच मोठी रंग. आणि याही वेळी तेच आम्ही एकुलते एक यांच्या अर्जावर कोणताही स्टॅम्प नव्हता! यावेळी महिला अधिकार्‍याची जागा एका पुरुष अधिकाऱ्याने घेतली होती. सर्वांनाच प्रतिव्यक्ती दोनशे रुपये मिळायला हवेत, असा समानतेचा कायदा असल्याने कदाचित या खुर्चीवर रोज नवनवे अधिकारी बसत असावेत. यावेळी मात्र आमचा क्रमांक येईपर्यंत कामकाज संपायची वेळ झाली होती. अखेरीस जवळपास एकच्या सुमारास आमच्या क्रमांक आला. साहेबांनी आपल्या संगणकाचा पडदा कोणालाही दिसू नये म्हणून पूर्ण तिरका करुन ठेवलेला होता. त्यांनी आमचा अर्ज क्रमांक टाकला आणि ओरडले,
"डॉक्युमेंट नीट अपलोड केलेले नाहीयेत... हे बघा!"
असं सांगत त्यांनी संगणकाची स्क्रीन आमच्याकडे वळवली व त्यावरील "पेज नॉट फाऊंड" हा मेसेज दाखवला. यावर आम्ही उत्तरलो,
"पण बाकीच्यांचे कसे काय दिसत आहेत?"
"तुम्ही नीट अपलोड नाही केलीत."
"अहो पण दहा दिवसांपूर्वी तर दिसत होती."
"दहा दिवस ती डॉक्युमेंट राहणार आहेत का तिथं?"
साहेबांचा हा प्रतिप्रश्न ऐकून आम्हाला संगणक अभियंता असण्याची लाज वाटली! त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित ती कोणीतरी चोरून नेली असावित वा पावसाच्या पाण्याने भिजली असावीत. मग काय, त्यांनी आमच्या अंगावर फेकलेली कागदपत्रे पुनश्च गोळा करून आम्ही तिथून चालते पडलो. या भाऊने दोनशे रुपयांसाठी "पेज नॉट फाउंड"ची युक्ती केली होती. ती काय असावी? हा प्रश्न मात्र आमच्या मनात पडूनच राहिला.
तिसऱ्या खेपेला मात्र गयावया करून आम्ही आमचा अर्ज ऑनलाइन मंजूर करून घेतला व लर्निंग लायसन्स आमच्या हाती पडले!
सरकारी कार्यालयांकडे पाहिलं तर खऱ्या अर्थाने समजतं की, तंत्रज्ञानाच्या फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत! तुम्ही कितीही ठरवले तरी सरकारी कर्मचारी तुम्हाला त्रास देणारच आहेत. शेवटी पैसा कोणी सोडतं का? पण त्यात ही पेक्षा खरे आहेत की, फुकटचा पैसा कधी पचतो का? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच ठाऊक आहे.
शिधापत्रिकेच्या शेवटी लिहिलेलं कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी अशा प्रसंगी मला नेहमी आठवतात. #टारगेट #१००कोटी

गोरगरिबा छळू नका । पिंड फुकाचे गिळू नका।
गुणीजनांवर जळू नका।

© तुषार कुटे

Tuesday, January 19, 2021

ज्ञानार्थी विरुद्ध घोकंपट्टीवाले

पुणे विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम करत असताना अनेकदा विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा घेण्याची वेळ आली. बाहेरच्या महाविद्यालयातून परीक्षा घेण्यासाठी एखादा शिक्षक आला की त्याचा दरारा वेगळाच असायचा. याचा अनुभव मी बर्‍याचदा घेतला आहे. प्रत्यक्ष तोंडी परीक्षा चालू झाली की, परीक्षा खोलीच्या बाहेर घोळक्या घोळक्याने मुलं अभ्यास करत बसलेली दिसायची. आपल्याला नक्की कोणता प्रश्न विचारला जाईल, या प्रश्नांचे काहूर जवळपास सर्वांच्याच मनात माजलेले असायचे. यात एक गोष्ट निरीक्षणाने मला निश्चितच समजली. काहीसा भेदरलेला चेहरा आणि थोडा आत्मविश्वासाचा अभाव असलेली मुले आपल्या मातृभाषेतून शिकलेली असावी तर चेहऱ्यावर आत्मविश्वास दाखवणारी मुले बहुतांश इंग्रजी माध्यमातून शिकलेली असायची. जेव्हा प्रत्यक्ष तोंडी परीक्षेला सुरुवात होत असे त्यावेळेस मुलांच्या चेहऱ्यावरुनच त्यांची ओळख होत होती. पण आत्मविश्वासात फरक असला तसाच त्यांच्या ज्ञानामध्ये ही त्याच प्रमाणात फरक दिसून यायचा. मराठी माध्यमातून किंवा स्वतःच्या मातृभाषेतून शिकणारी मुले इंग्रजी आत्मविश्वासाने बोलू शकत नव्हती. पण त्यांचे प्रात्यक्षिकाचे ज्ञान मात्र खूप उत्तम असायचे. दुसरीकडे इंग्रजी फाडफाड बोलणारी मुले फक्त आम्हा परीक्षकांना इंग्रजीतले मोठमोठाले शब्द टाकून गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करायची. समोरचा बसलेला व्यक्ती हा कोणी तरी मूर्ख आहे, ज्याला आपण अस्खलितपणे इंग्रजीत काहीही बोललो तरी तो लगेच प्रभावित होईल, अशा अशा प्रयत्नात ही मुले असायची. अक्कलशून्य पद्धतीने इंग्रजीमध्ये बडबड करत समोरच्याला वेड्यात काढायची कामे ही मुले व्यवस्थित करत होती. परंतु त्यांच्यापेक्षा कित्येक पावसाळे अधिक बघितलेले आम्ही परीक्षेत मात्र त्यांचा डाव व्यवस्थित ओळखून होतो. तेव्हाच मातृभाषेतली ज्ञानार्थी शिक्षण पद्धती व इंग्रजीतली घोकंपट्टीतून आलेली शिक्षण पद्धती यांच्यातला खराखुरा फरक लक्षात आला. मातृभाषेतील शिक्षण घेतलेल्या मुलांना विषय व्यवस्थित समजलेला असायचा, परंतु त्यांना इतरांसारखा तो अस्खलितपणे इंग्रजीमध्ये मांडता येत नव्हता. हाच काय तो फरक. यातून एक गोष्ट मात्र खूप खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण करता आली की, मातृभाषेतून शिकलेले मुले उत्तम प्रकारे ज्ञानप्राप्ती करतात किंबहुना त्यांना ती पहिल्यापासूनच सवय झालेली असते. एकदा सवय लागल्यावर मग भाषा बदलली तरी काही फरक पडत नाही. याउलट परभाषेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांची स्थिती असते. पहिल्यापासूनच अनेक गोष्टी न समजल्याने त्यांना रट्टा मारायची अर्थात घोकंपट्टी करण्याची सवय झालेली असते. हेच शिक्षण आहे, असं कदाचित त्यांना वाटत असतं. पण जसं फाडफाड इंग्रजी बोलणं प्रतिष्ठा मिळवून देतं त्याहीपेक्षा तुमचं ज्ञान तुम्हाला अधिक प्रतिष्ठा मिळवून देतं असं अनुभवावरून मला वाटतं. 

आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतल्यावर आलेले ज्ञान इंग्रजीत मांडायचे असल्यास त्यावर थोडी मेहनत घेण्याची गरज आहे. माझ्यासारख्या मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या अनेकांनी अशी मेहनत घेऊन इंग्रजीवर प्रभुत्व प्राप्त केले आहे. एक मात्र नक्की आहे कि, तुमचा तुमच्या भाषेचा पाया पक्का असेल तर तुम्ही कोणतीही भाषा सहजरित्या आत्मसात करू शकता. आपल्याला इंग्रजी भाषा शिकणे जितके सोपे आहे, त्यापेक्षा एखाद्या इंग्रजाला मराठी भाषा शिकणे अवघड आहे, हेही तितकेच खरे! 


Sunday, November 10, 2019

ट्रेनमध्ये घोरणारी प्रवृत्ती

घोरणे ही सर्वसामान्य माणसाची एक प्रवृत्ती आहे. मीही कधीकाळी घोरत नव्हतो. परंतु, आमच्या हीच्या म्हणण्यानुसार मीही बऱ्याचदा झोपेत घोरत असतो. पण झोप नीट आली नाही की, झोपेत घोरणं होत नाही! 


कामाच्या निमित्ताने ट्रेनमध्ये बराचसा प्रवास होतो आणि आजवर अनेकदा ट्रेनचा रात्रीचा प्रवास आम्हाला घडलाय. आता रात्र आली की, झोप येते आणि झोप आली की, घोरणंही येतच! ट्रेनच्या ३A च्या डब्यात जवळपास 64 प्रवासी असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस आपण आपल्या बर्थवर झोपलेलो असताना कुठून ना कुठून तरी घोरण्याचा आवाज येत राहतात. चित्रविचित्र घोरण्याने कधीकधी मनोरंजन होतं तर कधीकधी वैतागून किळस वाटायला लागतो. या जगात मनोरंजकरित्या घोरणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे! ट्रेनच्या इतक्या वेळेसच्या प्रवासात आजवर फक्त एकदाच ट्रेनमधल्या प्रवाश्याचे घोरणे लक्षात ठेवावे, असे वाटले होते.
नांदेडची आमची नेहमीची पनवेल-नांदेड एक्सप्रेस ही ट्रेन होती आणि नेहमीप्रमाणे ट्रेन आरक्षण करणाऱ्या सॉफ्टवेअरने अप्पर बर्थ आमच्या माथी मारला होता! आमच्या उंचीमुळे तीन बर्थ असलेल्या जागेत आम्हाला कधीच बसता आले नाही. त्यामुळे हा बर्थ नेहमी कंटाळवाणा वाटतो. आमच्या समोरच्या अप्पर बर्थवर एक ९० ते १०० किलो वजनाचा मनुष्यप्राणी येऊन ठेपला. खरेतर तो ठेपला नव्हता तर त्याला ठेपवला होता! म्हणजेच आप्तस्वकीयांनासोबत राहता यावे म्हणून कोणीतरी आपली सीट बदलून घेतली होती. यामुळे सदर इसम समोरच्या अप्पर बर्थवर आला. रात्री दहा वाजेपर्यंत सर्व काही ठीक चालले होते. परंतु त्यानंतर सदर इसमास झोप लागली आणि त्याचा जो मूळ आवाज आहे, त्याच्या दुप्पट आवाजात तो घोरायला लागला. घोरण्याचा इतका भयंकर आवाज पहिल्यांदाच आमच्या कानावर पडत होता. एखाद्याच्या घोरण्याने दुसऱ्याच्या कानाचे पडदे फाटू शकतात का? या प्रयोगासाठी कदाचित हाच आवाज योग्य असावा, असे वाटून गेले. सदर इसम मुद्दामहून तर असा आवाज काढत नाहीये ना? हाही विचार आला. परंतु त्याच्यामध्ये इतकं सातत्य असावा का? या प्रश्नाचे उत्तर आमच्याही मनाने 'नाही' असेच दिले. आजूबाजूच्या कंपार्टमेंट मधून येणारे इतर घोरण्याचे आवाज या आवाजाची बिलकुलच स्पर्धा करू शकत नव्हते. त्यांनी तर केव्हाच तलवार म्यान केल्याचे जाणवत होते. एकटा शिपाई किती वेळ लढणार? केव्हातरी थांबेल, असा विचार मनात आला. पण एकट्याची लढाई काही थांबेचना. त्या इसमाच्या नाकातून मध्येच चित्रविचित्र आवाज यायचे. नाकात काहीतरी अडकलेय आणि ते बाहेर येण्यासाठी तडफडते आहे, असं भासत होतं. पण एवढ्या एक तासात ते बाहेर यायला होतं. तरीही आलं नाही. जवळपास दोन तास तो कर्कश्य आवाज आमच्या श्रवणेंद्रियातून थेट मेंदूत जाऊन घुमत होता. त्यामुळे आमचा मेंदू विश्रांतीला सुरुवात करण्याची वेळ सतत पुढे पुढे ढकलत असल्याचे जाणवले. म्हणून निद्राधीन होण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्यावाचून आमच्यापुढे काहीच पर्याय नव्हता. इसमाच्या घोरण्याची तीव्रता एक वेळी एवढी व्हायची की, जणू आत्ताच त्याचा कंठ फुटून नाकातून बाहेर येईल. त्यादिवशी आम्हाला जाणवले की, बॅग मधील गरजेच्या वस्तू ठेवतो त्या पर्समध्ये कापसाचे बोळे ठेवायला हवेत. वेळ कुणावर सांगून येत नाही. कधी कशाचा वापर करावा लागू शकेल, हेही सांगता येणार नाही. अशा या बिकट परिस्थितीत रात्री कधीतरी आम्हास झोप लागली. परंतु ती अल्पकालीनच ठरली. पहाटेपासून परत तोच दंगा चालू झाला आणि सकाळी 7 वाजेपर्यंत तो चालू होता! तदनंतर तो इसम आमच्या झोपेची वाट लावून साडेसात वाजता परभणी स्टेशनला उतरून निघून गेला. जाता जाता हेही म्हणाला की, 'ट्रेन मध्ये काय झोप होत नाही ओ नीट... !'. आम्ही स्मितहास्य करून त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर एका महाभयंकर संकटातून सुटल्याची जाणीव आम्हाला झाली. अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासानंतर झोपेची जोरदार गुंगी यायला लागली होती. पण थोड्याच वेळात ट्रेन हुजूर साहिब नांदेड स्टेशनला पोहोचली.

© तुषार कुटे

Sunday, November 3, 2019

नांदेडचा येवले चहा

नांदेडच्या विद्यापीठात एकेदिवशी कामानिमित्त जाणे झाले होते. त्यावेळी विद्यापीठातल्या एका प्राध्यापकांनी सांगितलेला हा किस्सा.
येवले अमृततुल्य बद्दल आता सबंध महाराष्ट्राला माहिती झालीये. नांदेडमध्येही येवले चहाची शाखा चालू झाली आहे. याठिकाणी अन्य ठिकाणांसारखी रांगेत उभे राहून चहा पिण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसते अर्थात त्यांची लोकप्रियता वाढतच आहे.


गणपतीच्या काळामध्ये प्राध्यापकांच्या गल्लीतही एका सार्वजनिक गणेशाची स्थापना झाली होती. परंतु, प्रत्येकच गल्लीत गणपती असल्याने संध्याकाळच्या आरतीला फारशी गर्दी होत नसे. एक दिवस गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाने सकाळी पाटी लावली- "आज संध्याकाळी आरतीनंतर सगळ्यांना येवले यांच्या कडून चहा मिळणार आहे!" म्हणता म्हणता दिवसभरात ही बातमी आजूबाजूच्या सगळ्या गल्ल्यांमध्ये पोहोचली आणि त्यादिवशी गणपतीच्या आरतीला भली मोठी गर्दी झाली! आरती सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण ती कधी संपेल, याची वाट पाहत होता. एवढी गर्दी पाहून मंडळवाले खुश झाले. अखेर आरती संपली व सर्वजण बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये येवले चहा पिण्यासाठी जाऊ लागले. पण, पार्किंगमध्ये दृश्य तर वेगळेच होतं. तिथे एक मनुष्य टेबलावर चहाचा थर्मास घेऊन व एका हातात चहाचे कागदी कप घेऊन सगळ्यांची वाट बघत उभा होता. प्राध्यापकांच्या लक्षात आले की सदर मनुष्य त्यांच्या कॅन्टीन मध्येच कामाला आहे. याने पण येवले चहा जॉईन केलं की काय? असाही विचार त्यांच्या मनात आला. पण, नंतर चौकशी केल्यावर समजलं की, कॅन्टीन वाल्याचेही आडनाव येवले आहे! मग काय सर्वजण 'येवले' यांचा चहा पिऊन तृप्त झाले.

© तुषार कुटे

Sunday, October 13, 2019

पोलिसांची प्रतिमा

पोलीस व प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित एक वेगळ्याच प्रकारचा विषय असतो. कधी ना कधी ह्या विषयाची आपल्याबरोबर गाठ पडत असते. परंतु, ही गाठ सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकते कडे जास्त झुकलेली दिसते. केवळ माझाच नाही तर अनेकांचा अनुभव कदाचित असाच असावा.
साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. पुणे ते नाशिक रस्त्यावर आंबेगाव तालुक्यात कळंब नावाचे एक खेडे आहे. या गावातून पुणे-नाशिक महामार्ग अतिशय अरुंद भागातून जातो. घोड नदीच्या काठावर वसलेल्या या गावात नदीवरचा एक अरुंद पूलही आहे. त्यादिवशी नाशिकला जाताना या पुलावर आमचा अपघात झाला होता. एका सेलेरियो कारने s-cross कारला मागून धडक दिली. त्यामुळे त्या कारने आमच्या कारला धडक दिली व आमची कार पुढच्या एसयूव्ही कारला धडकली! अशा तऱ्हेने एकाच वेळी चार गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या. आमच्यासह सर्वजण सर्वात शेवटच्या कार ड्रायवरवर भयंकर भडकले होते. त्याला फक्त मारायचे बाकी ठेवले होते. त्यातच आमच्या मागच्या गाडीच्या ड्रायव्हरने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. प्रत्यक्षात त्याने तसे केले नसते. परंतु जवळच्या पोलिस चौकीला कुठून तरी वास लागलाच! थोड्याच वेळात दोन कॉन्स्टेबल पंचनामा करण्यासाठी दाखल झाले. हे सर्व अपघात प्रकरण पोलिसात लवकरच नोंद होणार, अशी परिस्थिती होती. परंतु याबाबतीत आजूबाजूच्या लोकांनी आमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे असेच म्हणणे होते की, पोलिसात गेल्यावर त्यांना चार-पाच हजार रुपये द्यावे लागतील. विशेष म्हणजे अशा मताचे जवळपास सर्वच लोक तिथे होते! सर्वांना हेच वाटत होते की, तुम्ही आपापसात मिटवून घ्या. कशाला पोलिसांची 'झंझट'? त्यावेळी एकंदरीत पोलिसांची जनमानसात काय प्रतिमा असेल, हे ध्यानात आले आणि हा विषय पोलिसात मात्र गेला नाही.
वरील घटनेनंतर साधारणत: चार महिन्यांनी भोसरीच्या स्पाईन रोड सिग्नलपाशी मला असाच अनुभव आला. एक दारू पिऊन चाललेला बेवडा माझ्या गाडीला मागून येऊन घासून गेला. अर्थात त्यामुळे त्याच्यात गाडीचे जास्त नुकसान झाले होते. तरीही बेवडे साहेब गाडीतून उतरून तावातावाने भांडायला आले. त्यावेळेसही सदर प्रकरण पोलिसात जाण्याच्या वाटेवर होते. परंतु पुन्हा सर्वांच्या म्हणण्यानुसार पोलिसात जाणे म्हणजे पैसे आणि वेळ दोन्ही वाया घालवणे होय. पोलीस खायलाच टपलेले असतात, असे अनेकांचे म्हणणे होते आणि हेही प्रकरण इथेच थांबले.


फक्त याच दोन नाही तर अशा अनेक त्रयस्थ ठिकाणी अशाच प्रकारचा अनुभव येतो. यातून कोणता बोध घ्यावा, तेच समजत नाही. सिंघम आणि दबंग हे केवळ चित्रपटात शिट्ट्या मिळवण्यासाठी असतात, असेच यातून एकंदरीत दिसते. केवळ पोलिसच नाही तर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना बद्दल अशाच प्रकारचे अनुभव आपल्या नागरिकांकडे आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना त्याची सवय झालीये! अनेक ठिकाणी तर ही संस्कृती मानली जाते. त्यामुळे एकंदरीत सरकारी कर्मचारी ही जमात वेगळीच आहे. त्यांच्या वाटेला जायला नको. असा ग्रही आमच्यासारख्यांच्या मनात तयार झालाय. कधी कोणत्या सरकारी कार्यालयात गेले की तेथील लोक केवळ आपल्या कडून पैसे उकळायला बसलेत, असंही बऱ्याचदा वाटून जातं. हा ग्रह पुसून टाकण्यासाठी कधीतरी एखादा प्रामाणिक अधिकारी आमच्यासारख्यांच्या अनुभवात जमा व्हावा असेही वाटते. वाट बघुयात.