Showing posts with label literature. Show all posts
Showing posts with label literature. Show all posts

Thursday, June 12, 2025

साहित्य अकादमी आणि मराठी

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्य अकादमीने भारतातील प्रमुख २२ भाषांमधील सर्वोत्तम भाषांतरित साहित्यकृतींसाठी पुरस्कार जाहीर केले होते. अर्थात यावर्षी देखील मराठी भाषेतील भाषांतरित पुस्तकाला पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.


साहित्य अकादमीच्या पुरस्कार यादीतील तक्त्याप्रमाणे चौथ्या रकाण्यांमध्ये भाषांतरित पुस्तक मूळ कोणत्या भाषेमध्ये लिहिले गेलेले आहे, याची माहिती दिलेली आहे. अर्थात नेहमीप्रमाणे सर्वाधिक पुस्तके इंग्रजीमधून भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झालेली दिसतात. आणि सर्वाधिक वाचक संख्या असल्याने हिंदी भाषा द्वितीय क्रमांकावर आहे. असामी सारख्या भाषेतून देखील तब्बल दोन पुस्तके अन्य भाषांमध्ये भाषांतरित झाल्याची दिसतात. याशिवाय कन्नड, मल्याळम, बंगाली, गुजराती या भाषेतील साहित्यकृतीदेखील अन्य भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या आहेत. दुःखाची गोष्ट म्हणजे या यादीमध्ये एकही पुस्तक मराठी नाही! म्हणजे मराठीतून अन्य भाषेमध्ये भाषांतरित झालेल्या एकाही पुस्तकाला पुरस्कार मिळालेला नाही. खरंतर ही खेदाची बाब आहे. मराठीमध्ये उत्तम उत्तम कलाकृती तयार होत नाहीत का?? हा प्रश्न पडतो. आणि झाल्या तरी त्यांचे भाषांतर करण्याचे कष्ट कोणी घेत नाही का? या प्रश्नाचे उत्तर देखील शोधणे गरजेचे आहे. मागच्या दशकभरापासून जगभरातील बहुतांश भाषांमधील पुस्तके मराठीमध्ये भाषांतरित होत आहेत. एकंदरीत अशा पुस्तकांचा प्रवाह पाहिला तर भाषांतरित पुस्तके ५०% आणि मूळ पुस्तके ५०% असावीत अशी तुलना करता येईल. मूळ मराठी भाषेत लिहिलेल्या पुस्तकांचे अन्य भाषेत तितक्या प्रमाणात भाषांतर होताना दिसत नाही. एका अर्थाने आपल्या अभिजात भाषेतील साहित्य अन्य भाषेमध्ये प्रसारित होत नाही. यावर मराठी सारस्वतांनी सखोल विचार करणे गरजेचे आहे. आपल्या भाषेतील संस्कृतीत साहित्य परंपरा अन्य भाषिकांना सांगायचे असल्यास साहित्यकृती हा सर्वोत्तम मार्ग असतो. परंतु त्याचा वेग मंदावलेला दिसतो. मराठी संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करण्याचा हा एक मार्ग आहे. परंतु त्याच्या प्रगतीची चाके अजूनही वेगाने धावताना दिसत नाहीत.

---- तुषार भ. कुटे