Showing posts with label village. Show all posts
Showing posts with label village. Show all posts

Tuesday, January 10, 2023

खेड्याकडे चला

एका मराठी वृत्तपत्रामध्ये नुकतीच प्रसिद्ध झालेली ही बातमी. मागच्या काही वर्षांमध्ये वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे सध्या जगामध्ये कोणती परिस्थिती ओढवली आहे, याचा अंदाज या बातमीने येऊ शकतो. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे शहर म्हणजे जपानची राजधानी टोकियो होय. आज टोकियो शहरामध्ये साडेतीन कोटी लोक राहतात. म्हणून प्रशासनाला इतकी लोकसंख्या नियंत्रण करणे व त्यांच्या सोयीसुविधा पाहणे अवघड होत चाललेले आहे. म्हणूनच अधिकाधिक लोकसंख्येला खेड्याकडे वळवण्यासाठी जपान सरकार विविध योजना आखत आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहता जनतेचा प्रतिसाद हा अतिशय अल्प असाच आहे.
मागील काही दशकांपासून भारतामध्ये देखील शहरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक शहरांची सीमारेषा रुंदावत चाललेली आहे. मुंबईसारखी शहरे तर आता काही वर्षात राहण्यासारखी देखील राहणार नाहीत. कसेही असलं तरी शहरांमध्येच राहायचं, असा अनेकांचा अट्टाहास देखील बनत चाललेला आहे. अनेक तरुणांना शहरात राहत नसेल तर लग्नासाठी कोणी मुलगी देखील देत नाही! एकंदर काय भविष्यात शहरीकरण ही समस्या अधिक बिकट होताना दिसणार आहे. कदाचित पुढील काही वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये देखील सरकारला शहरीकरण थांबवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील. अर्थात ही समस्या अजून तरी सरकारची डोकेदुखी बनलेली नाही. त्यांच्याकडे येणाऱ्या पैशाचा ओघ वाढतो आहे. पण त्याबरोबरच सोयी सुविधांवर ताण आल्यानंतर कदाचित परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. म्हणून वेळीच सावध होणे व योग्य उपाययोजना करणे, हाच त्यावरील सर्वोत्तम इलाज ठरू शकतो.


 

Monday, June 1, 2020

इमान

"एक म्हैना व्हऊन गेला राव. इमानं अजून बंदच हायेत!", पहिला चिंतातुर होऊन बसला होता.
"तुला काय करायचं रं इमानाचं? तू आपलं एष्टीचं बघ की, ती बी बंदच हाय!" - दुसरा.
"असं काय करतूस राव, तुला म्हाईत नाय का इमानानं परदेशात जायचं लई मोठं सपनं हाय माझं."
"व्ह्यय की, इतकी वर्षं तेच ऐकतोय ना!"
"इमानं कधीच चालू व्हनार नाय का रं?"
"आजूक दोन-तीन म्हैनं तरी न्हाय व्हनार."
"म्हंजी... नंतर व्हतीलच ना?"
"व्हतीलच रं. पन तू लई सपान नको बघू. काईतरी दुसरा इषय काढू."
"दुसरा काय इषय आता?" - पहिला चिंताग्रस्त.
"टीवी वरचं रामायण संपलं ना? मग मला सांग, त्यातून तू काय शिकला?"
या प्रश्नावर पाहिल्याने गहन विचार केला व बोलू लागला.
"परदेशात इमानानं जाणारी सीता ही पहिली भारतीय व्हती!"
"अरे खुळ्या, ते न्हाय. दुसरं काय तरी सांग."
पुन्हा पाहिल्याने काही काळ डोके खाजविले व बोलू लागला.
"सोताच्या ताकदीवर परदेशात जाणारा हनुमान हा पहिला भारतीय व्हता!"
"खुळं तेच डोक्यात घेऊन बसलंय अजून. तू नाय सुधारणार बाबा!"
अशी तणतण करत दुसरा तेथून निघून गेला. पहिला मात्र अजून काही सुचतंय का? याचा विचार करत तिथेच डोकं खाजवत उभा होता.  


Thursday, May 26, 2011

रस्ते नसलेले गांव

रस्ता हा विकासाचा पाया मानला जातो. परंतू, रस्ते नसतानाही विकसित झालेले गांव जगाच्या नकाशावर आहे. ’गिएथूर्न’ नावाचे रस्ते नसणारे गांव हॉलंड (नेदरलॅंण्ड्स) मध्ये असून तिथे प्रवास केवळ बोटींच्या साहय्याने केला जातो. हॉलंडच्या ओवरिसेल प्रांतात हे टुमदार गांव वसलेले आहे.
गिएथूर्नला "हॉलंडचे व्हेनिस" किंवा "उत्तरेकडचे व्हेनिस" म्हटले जाते. १९५८ मध्ये हे गांव सर्वप्रथम जगाच्या निदर्शनात आले. डच फिल्म निर्माता बर्ट हंस्त्रा याने "फॅनफेयर" नावाच्या चित्रपटात या गावाचे चित्रिकरण केले होते. त्यानंतर हे गांव डच नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले. त्याची प्रत्यक्षात स्थापना सन १२३० मध्ये करण्यात आली होती. १९७३ पर्यंत या गावाची वेगळी नगरपालिका होती. तदनंतर ते ब्रेडरविड या शहराचा भाग बनून गेले.
गिएथूर्नची काही मोहक छायाचित्रे इथे देत आहे.....