Sunday, November 10, 2019

ट्रेनमध्ये घोरणारी प्रवृत्ती

घोरणे ही सर्वसामान्य माणसाची एक प्रवृत्ती आहे. मीही कधीकाळी घोरत नव्हतो. परंतु, आमच्या हीच्या म्हणण्यानुसार मीही बऱ्याचदा झोपेत घोरत असतो. पण झोप नीट आली नाही की, झोपेत घोरणं होत नाही! 


कामाच्या निमित्ताने ट्रेनमध्ये बराचसा प्रवास होतो आणि आजवर अनेकदा ट्रेनचा रात्रीचा प्रवास आम्हाला घडलाय. आता रात्र आली की, झोप येते आणि झोप आली की, घोरणंही येतच! ट्रेनच्या ३A च्या डब्यात जवळपास 64 प्रवासी असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस आपण आपल्या बर्थवर झोपलेलो असताना कुठून ना कुठून तरी घोरण्याचा आवाज येत राहतात. चित्रविचित्र घोरण्याने कधीकधी मनोरंजन होतं तर कधीकधी वैतागून किळस वाटायला लागतो. या जगात मनोरंजकरित्या घोरणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे! ट्रेनच्या इतक्या वेळेसच्या प्रवासात आजवर फक्त एकदाच ट्रेनमधल्या प्रवाश्याचे घोरणे लक्षात ठेवावे, असे वाटले होते.
नांदेडची आमची नेहमीची पनवेल-नांदेड एक्सप्रेस ही ट्रेन होती आणि नेहमीप्रमाणे ट्रेन आरक्षण करणाऱ्या सॉफ्टवेअरने अप्पर बर्थ आमच्या माथी मारला होता! आमच्या उंचीमुळे तीन बर्थ असलेल्या जागेत आम्हाला कधीच बसता आले नाही. त्यामुळे हा बर्थ नेहमी कंटाळवाणा वाटतो. आमच्या समोरच्या अप्पर बर्थवर एक ९० ते १०० किलो वजनाचा मनुष्यप्राणी येऊन ठेपला. खरेतर तो ठेपला नव्हता तर त्याला ठेपवला होता! म्हणजेच आप्तस्वकीयांनासोबत राहता यावे म्हणून कोणीतरी आपली सीट बदलून घेतली होती. यामुळे सदर इसम समोरच्या अप्पर बर्थवर आला. रात्री दहा वाजेपर्यंत सर्व काही ठीक चालले होते. परंतु त्यानंतर सदर इसमास झोप लागली आणि त्याचा जो मूळ आवाज आहे, त्याच्या दुप्पट आवाजात तो घोरायला लागला. घोरण्याचा इतका भयंकर आवाज पहिल्यांदाच आमच्या कानावर पडत होता. एखाद्याच्या घोरण्याने दुसऱ्याच्या कानाचे पडदे फाटू शकतात का? या प्रयोगासाठी कदाचित हाच आवाज योग्य असावा, असे वाटून गेले. सदर इसम मुद्दामहून तर असा आवाज काढत नाहीये ना? हाही विचार आला. परंतु त्याच्यामध्ये इतकं सातत्य असावा का? या प्रश्नाचे उत्तर आमच्याही मनाने 'नाही' असेच दिले. आजूबाजूच्या कंपार्टमेंट मधून येणारे इतर घोरण्याचे आवाज या आवाजाची बिलकुलच स्पर्धा करू शकत नव्हते. त्यांनी तर केव्हाच तलवार म्यान केल्याचे जाणवत होते. एकटा शिपाई किती वेळ लढणार? केव्हातरी थांबेल, असा विचार मनात आला. पण एकट्याची लढाई काही थांबेचना. त्या इसमाच्या नाकातून मध्येच चित्रविचित्र आवाज यायचे. नाकात काहीतरी अडकलेय आणि ते बाहेर येण्यासाठी तडफडते आहे, असं भासत होतं. पण एवढ्या एक तासात ते बाहेर यायला होतं. तरीही आलं नाही. जवळपास दोन तास तो कर्कश्य आवाज आमच्या श्रवणेंद्रियातून थेट मेंदूत जाऊन घुमत होता. त्यामुळे आमचा मेंदू विश्रांतीला सुरुवात करण्याची वेळ सतत पुढे पुढे ढकलत असल्याचे जाणवले. म्हणून निद्राधीन होण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्यावाचून आमच्यापुढे काहीच पर्याय नव्हता. इसमाच्या घोरण्याची तीव्रता एक वेळी एवढी व्हायची की, जणू आत्ताच त्याचा कंठ फुटून नाकातून बाहेर येईल. त्यादिवशी आम्हाला जाणवले की, बॅग मधील गरजेच्या वस्तू ठेवतो त्या पर्समध्ये कापसाचे बोळे ठेवायला हवेत. वेळ कुणावर सांगून येत नाही. कधी कशाचा वापर करावा लागू शकेल, हेही सांगता येणार नाही. अशा या बिकट परिस्थितीत रात्री कधीतरी आम्हास झोप लागली. परंतु ती अल्पकालीनच ठरली. पहाटेपासून परत तोच दंगा चालू झाला आणि सकाळी 7 वाजेपर्यंत तो चालू होता! तदनंतर तो इसम आमच्या झोपेची वाट लावून साडेसात वाजता परभणी स्टेशनला उतरून निघून गेला. जाता जाता हेही म्हणाला की, 'ट्रेन मध्ये काय झोप होत नाही ओ नीट... !'. आम्ही स्मितहास्य करून त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर एका महाभयंकर संकटातून सुटल्याची जाणीव आम्हाला झाली. अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासानंतर झोपेची जोरदार गुंगी यायला लागली होती. पण थोड्याच वेळात ट्रेन हुजूर साहिब नांदेड स्टेशनला पोहोचली.

© तुषार कुटे

Saturday, November 9, 2019

रीवाल्युसीऑन डेल युनिफॉर्मे

स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचे खरे पर्व आपल्या देशात चालू झालं. मुलांना मारून मुटकून शाळेत पाठवायला लागले. शाळेत शिक्षक आणि घरी पालक अशी बऱ्याचदा दुहेरी पिटाई विद्यार्थ्यांची होत असे. हळूहळू मुलांच्या कपड्यांकडे लक्ष जायला लागलं. त्यातून गणवेश हा प्रकार उदयास आला. त्याला आपण आज मराठीत युनिफॉर्म म्हणतो. सगळी मुले सारख्याच कपड्यात यायला लागली. अनेकांना शाळेसाठी कपडे परवडत नसल्याने एकच गणवेश चार-पाच वर्षे घातला जायी. किंवा नवीन कपडे घेताना युनिफॉर्मच्या रूपाने घेतला जायी. कधीकधी हा युनिफॉर्म वाढत्या अंगाचा असायचा. पहिल्या वर्षी घालताना तो एकदमच ढगळ वाटायचा. जसजसे वर्षे पुढे सरकायची, तसा तसा तो नीट यायला लागायचा आणि पूर्ण व्यवस्थित येईपर्यंत तो फाटलेला असायचा! आजही दुर्गम भागातल्या शाळांमध्ये अशीच परिस्थिती आहे. अनेक मुले शाळेत व्यतिरिक्त इतर ठिकाणीही युनिफॉर्म मध्येच असतात. शहरे मात्र आता युनिफॉर्मच्या पुढच्या पायरीवर जाऊन पोहोचलीत.

काही वर्षांपूर्वी युनिफॉर्ममध्ये टायचा समावेश झाला. सुटाबुटाच्या कपड्यांवर घालण्यात येणारे टाय, आता लहान मुलांच्या गणवेशात येऊ लागले होते. सुरुवातीला जेव्हा मुले काय घालायची, तेव्हा कोणीतरी सतत आपला गळा आवळतोय की काय? असं वाटत राहायचं. अनेकदा पालक मुलांच्या टायला त्यांचं मंगळसूत्र म्हणायचे! या मंगळसूत्रानंतर बुटांचा अर्थात शूजचा समावेश युनिफॉर्ममध्ये झाला. सर्व मुलांचे बूट एकाच काळ्या रंगात दिसायला लागले. जी मुले बूट घालून येत नसत, त्यांना एकतर दंड पडायचा किंवा मार मिळायचा. त्यामुळे बूटसंस्कृतीने पुन्हा पालकांच्या खिशाला गळती लावायला सुरुवात केली. यानंतर थोड्याच कालावधीत सॉक्सचा युनिफॉर्ममध्ये समावेश झाला. त्यामुळे व्हाईट सॉक्स कंपल्सरी झाले. अनेकांकडे सॉक्सची एकच जोडी असल्याने त्याला भोक पडेपर्यंत वापरले जात असत. अजूनही ही परिस्थिती सुधारलेली नाही.
कालांतराने युनिफॉर्ममध्ये आणखी एका नव्या भिडूची भर पडली. पीटीच्या तासाला अर्थात शारीरिक शिक्षणासाठी नवीन वेगळा टी-शर्टचा युनिफॉर्म आला. खेळाच्या तासाला मुले मग एकाच रंगाचा व एकाच प्रकारचा टी-शर्ट घालून यायला लागले. या सर्वांतून किती खेळाडू तयार झाले? या प्रश्नाचे उत्तर सापडले तसं फार अवघड आहे. पण, या टी-शर्ट ने त्याच्यासोबत आणखी एका साथीदाराला सोबत आणले होते, ते म्हणजे स्पोर्ट्स शूज! आता खेळताना रेग्युलर शुज घालणार का? मग खेळासाठी वेगळे शूज युनिफॉर्म बरोबर शाळेच्या प्रांगणात दाखल झाले. पुन्हा तोच प्रश्न, किती खेळाडू तयार झाले?
थंडीच्या दिवसांमध्ये मुलांना फक्त युनिफॉर्ममध्ये यायला अवघड जायचं. म्हणून मुले स्वेटर वगैरे घालून यायचे. परंतु त्यामुळे शाळेचे युनिफॉर्म दिसेनासे व्हायचे. यावरही उपाय शोधला गेला. काय तर, स्वेटर्सचाही अंतर्भाव युनिफॉर्ममध्ये झाला! मग मुलं एकाच प्रकारचा व एकाच रंगाचा स्वेटर घालून यायला लागले. आत्तापर्यंत युनिफॉर्म वर बराच खर्च होत होता. पण पालकांची इनकमही वाढत होती, ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी.
पावसाळा आला आणि परिस्थिती पालटली. मुले स्वेटर्स न घालता रेनकोट घालून यायला लागली. पुन्हा शाळेची पंचाईत झाली. मग युनिफॉर्मसाठी रेनकोट असा शोध घेतला गेला व त्याचाही समावेश शाळेच्या नव्या गणवेशात करण्यात आला. आतापर्यंत गणवेषाचा आकार जवळपास संपत आला होता. पुढे काय... पुढे काय... करता करता शाळेच्या (आतापर्यंत स्कूल झालेल्या) एक गोष्ट ध्यानात आली की, मुलं शाळेत येतात तेव्हा प्रत्येकाचे दप्तर (माफ करा... स्कूल बॅग) ही वेगवेगळ्या रंगाची व आकाराची असते. तिथे पण आमच्या झिरमिळ्या लावलेल्या कापडी पिशवी पासून मॉडर्न स्कूल बॅग पर्यंत उत्क्रांती झालीच होती! आता युनिफॉर्ममध्ये तिचा समावेश होणार होता. पण पालकांना काय कारण सांगायचे? मुलं एकमेकांची दप्तरे बघतात व तुलना करतात, त्यांना वाईट वाटते, त्यांच्यात भांडणं होतात... ही कारणं आता पटण्यासारखी होती आणि अखेरीस दप्तराचा समावेशही युनिफॉर्ममध्ये झाला. याच कारणास्तव मुलांची पाण्याची बाटली अर्थात वॉटर बॅग सारख्याच रंगात आली१
अशी ही सर्व गणवेशाची उत्क्रांती प्रक्रिया आहे. कदाचित यापुढे नव्या क्लृप्त्या शोधल्या जातील. जसे जे पालक मुलांना सोडायला शाळेत येतात त्यांचे पण कपडे वेगळे असतात. कदाचित त्यामुळे पण मुलं तुलना करतील व भांडतील, तेव्हा काय करायचं? कधीतरी विज्ञानाच्या प्रयोगाला मुलांच्या गणवेशावर काहीच सांडलं तर काय करायचं? याही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.
सर्वात महत्त्वाचं या लेखाचे शीर्षक असं का दिले? याचा विचार केला असेल, तर ध्यानात असू द्या गणवेशाची उत्क्रांती हे मी स्पॅनिशमध्ये लिहिलय, फक्त लिपी देवनागरी आहे!!!

पहिला भाग इथे पहा

© तुषार कुटे

Thursday, November 7, 2019

बोलतो 'ना' मराठी!

भारतातल्या सर्व राज्यांमध्ये विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात व प्रत्येक राज्याला स्वतःची एक किंवा अनेक राज्यभाषा आहेत. आपल्या राज्याची ही राज्यभाषा व इथली बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे, मराठी. तिला आपण लाडाने 'मायबोली' म्हणतो! महाराष्ट्र हे इतर राज्यांपेक्षा व प्रामुख्याने दक्षिण भारतातील पाच प्रमुख राज्यांपेक्षा जरा वेगळे राज्य आहे. म्हणजे सांगायचं असं की, इथला मराठी भाषिक सर्वसामान्यपणे मराठी बोलण्यास प्राधान्य देत नाही. कदाचित त्याला भारतातल्या अन्य काही भाषा 'इंटरनॅशनल' वाटत असाव्यात! या कारणास्तव आम्ही सदर विषयांवर थोडे संशोधन केले व त्यानुसार काही निष्कर्ष काढले आहेत. ते तुमच्या समोर सादर करतो. 

मराठी भाषिक सहजपणे इतर भाषिकांशी मराठीत बोलत नाहीत याची अनेक कारणे आहेत-
पहिले कारण: जाज्वल्य अभिमान
मराठी लोकांना आपल्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे ती भाषा फक्त आपणच बोलावी, असे त्यांना वाटत असते. आपण जर परभाषिकाशी मराठीत बोललो तर त्यालाही आपली भाषा येऊ लागेल व लवकरच तो तिच्यावर प्रभुत्व प्राप्त करेल. असं कोणीही येऊन आपली भाषा बोलावी, हे मराठी भाषिक कसं खपवून घेऊ शकेल? आमच्या भाषेवर फक्त आमचाच अधिकार आहे, यावर मराठ्यांची नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे ते सहसा मराठी लोकांशी मराठीत बोलण्याचे टाळतात. मुंबईत तर त्याचा कधी कधी कहरच होतो. तिथे मराठी लोकही मराठीत बोलत नाहीत. इतका जाज्वल्य अभिमान फक्त आणि फक्त मराठी लोकच दाखवू शकतात!
दुसरे कारण: भाषाप्रभुत्व
इतिहासावर व वर्तमानावरही नजर टाकली तर देशाला सर्वाधिक बुद्धिमान व तेजस्वी माणसे महाराष्ट्राने दिली आहेत, असे दिसेल. त्याचे कारणही मराठी लोकांना माहित आहे. आम्ही लोक बहुभाषिक आहोत. आमच्या राज्यात कमीत-कमी ऐंशी टक्के लोकांना किमान तीन भाषा तरी सहज देतात ( अर्थात समजतात). भाषा तज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्याला अधिक भाषा येतात त्याचा मेंदू तितका तल्लख असतो. तीन-तीन भाषांच्या ज्ञानप्राप्तीमुळे मराठी माणसाचा मेंदू तल्लख झालाय. त्यामुळे तो आपली भाषा समोरच्याला शिकू देत नाही. पण, समोरच्याची भाषा बोलून तिच्यावरही प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करतो. अमराठी लोकांचं बोलणं त्यांच्याच भाषेत ऐकतो व त्याच भाषेत उत्तर देतो. त्यामुळे मराठी लोकांना नव्या भाषेवर प्रभुत्व मिळवणं सोपं जातं. मग समोरच्याला वाटतं, याला तर आपली भाषा येतीये, मग कशाला याच्याशी मराठीत बोला? यामुळे दोन गोष्टी साध्य होतात अमराठी लोकांना आपली भाषा येत नाही व ते वा दोन भाषांतच अडकून पडतात आणि मराठी लोकांची बहुभाषिकत्वामुळे मात्र बौद्धिक पातळी वाढत राहते.
तिसरे कारण: दुसऱ्याच्या भाषेची वाट लावणे
एखादा अमराठी भाषिक तोडकी-मोडकी मराठी बोलत असेल तर मराठ्यांना हा आपल्या भाषेचा हा अपमान वाटतो. म्हणून ते दुसऱ्या भाषेत मुद्दाम चुकीचे शब्द भरवतात. जसे ते हिंदीत बोलताना मुद्दाम तेरेकू, मेरेको, इसकू, उसकू टाइप टपोरी शब्दांचा वापर करतात व त्या भाषेचे सौंदर्य बिघडवतात. यामुळे त्यांना सिद्ध करता येते की, मराठी भाषा ही किती सुंदर व शुद्ध आहे.
चौथे कारण: आपले शब्द घुसडवणे
वरच्याच कारणाला जोडून हेही एक कारण आपण सांगू शकतो. समोरच्याची भाषा अशुद्ध करण्यासाठी मराठी भाषिक आपल्या भाषेतले शब्द त्यात घुसडवतात. उदाहरणार्थ कांदा, बटाटा, नक्की वगैरे शब्द हिंदी नसून मराठी आहेत, हे महाराष्ट्रातल्या अनेक परप्रांतीयांना माहीतच नाहीये! अशाप्रकारे समोरच्याच्या भाषेत भेसळ करून तिचे सौंदर्य बिघडवले जाते व मराठी भाषा कशी श्रेष्ठ आहे, हे मराठी लोक अप्रत्यक्षपणे दाखवून देतात.
अशाप्रकारे मराठी लोकांना माहित आहे की, आम्हाला मराठी येतंय म्हणून आम्हाला मराठी राज्यात किंमत आहे जर कोणीही ऐरागैरा येऊन मराठीत बोलू लागला तर आमची किंमत काय राहणार? या प्रश्नाच्या उत्तरापायी मराठी लोकांची ही सारी खटपट चालू आहे.
बरोबर ना? 

© तुषार कुटे 

Monday, November 4, 2019

टाइप ऑफ स्कूल्स

फार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा आम्ही शाळा शिकत होतो, त्या काळात फक्त एकच प्रकारची शाळा असायची. स्वतःच्या मातृभाषेतून शिकण्याचे स्वातंत्र्य आणि मजा होती. पण झालं असं की, आज अनेकांना असं वाटते की आम्ही शासनाच्या एका लोकल आणि फालतू शाळेत शिकलो म्हणून मागे राहिलो आहे. नाहीतर एकेदिवशी नोबेल पारितोषिकच जिंकून आलो असतो अथवा मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारखी कंपनी माझ्या नावावर असली असती. मी आज ऑडी, मर्सिडीज, रोल्स-रॉइस सारख्या गाड्यांमधून फिरत असलो असतो. पण मी आज कुठे आहे? इथे भारतात खितपत पडलोय. 
 

आजच्या पालकांची हीच समस्या ओळखून जुन्या आणि अनेक नव्या शिक्षण सम्राटांनी (ते शिक्षण महर्षी जुनं झालं!) नव्यानव्या शाळांची निर्मिती केली व त्यांनी नवा मॉडर्न इंडियन घडवण्याची शपथ घेतली आहे. काहींनी एवढ्या हायफाय शाळा काढल्या आहेत की, शिक्षण क्षेत्रातील 'बलिदानाबद्दल' त्यांना कोणता पुरस्कार द्यावा? हा प्रश्न सरकारला भविष्यात पडू शकतो.
तर एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता आपल्या महाराष्ट्रातल्या शाळांचे प्रामुख्याने पाच प्रकार पडतात. मागे एकदा प्रायव्हेट शाळांनी फुकट 'पब्लिक स्कूल' लावल्याने संतापलेल्या शासनाने त्यांचा पब्लिकचा लेबल काढून घेतला! अशा शाळा आता पुढच्या कुठल्यातरी एका कॅटेगरीत मोडतात.
पहिला प्रकार- लोकल स्कूल
या शाळा आहेत सर्वात कमी दर्जाच्या! जिथे मुलांना त्यांच्या मातृभाषेतून हसत-खेळत व आनंदी वातावरणात शिकवले जाते. याच कारणामुळे या शाळेत आजकाल स्टॅंडर्ड विद्यार्थी तयार होत नाहीत. त्यामुळे या शाळांना तसा भाव कमीच आहे. शिवाय ते पालकांकडून पैसे घेत नाहीत. मग अशा शाळांचा दर्जा काय असणार आहे? या शाळांमध्ये स्पर्धा नावाचा प्रकार फारसा अस्तित्वात नसतो. त्यामुळे इथे प्रवेश घेऊन पालकांना आपली मुले रेसमध्ये पळवता येत नाहीत.
दुसरा प्रकार- नॅशनल स्कूल
ही आहे राष्ट्रीय दर्जाची शाळा! जागतिक भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्रजीची सुरुवात होते इथून. इथे प्रवेश घेणाऱ्या मुलांची स्पर्धा थेट देशातल्या प्रत्येक मुलासोबत होत असते मग तो कुठल्याही राज्याचा असो! त्यामुळे त्याला नॅशनल कॉम्पेटेटरचा दर्जा मिळाल्याशिवाय राहत नाही! 
तिसरा प्रकार- इंटरनॅशनल स्कूल
ही आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा. कोणत्या 'इंटरनेशन' ने यांना तो दर्जा दिला असो वा नसो ते स्वतःला आम्ही इंटरनॅशनल आहोत, हे सांगण्याचा अतोनात प्रयत्न करतात. इथे शिकणाऱ्या मुलांची स्पर्धा जगातल्या सर्व देशातील सर्व मुलांसोबत असते. त्यामुळे ऍपल व अमेझॉन चा मालक होण्यासाठी किंवा नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी इथे सर्वात जास्त स्कोप आहे.
चौथा प्रकार- ग्लोबल स्कूल
इथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची स्पर्धा भुतलावर अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक सजीव प्राण्यासोबत होत असते. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने ग्लोबल सिटीझन म्हणून ओळखला जाऊ शकतो. किंबहुना चित्त्यापेक्षा वेगवान पळण्याची व पाण्यात डॉल्फिनपेक्षा मोठी उडी मारण्याची क्षमता कदाचित प्राप्त करू शकतो! 
पाचवा प्रकार- युनिव्हर्सल स्कूल
युनिव्हर्स म्हणजे विश्व. या विश्वात असंख्य आकाशगंगा आहेत, दीर्घिका आहेत व त्यात अनेक सूर्यमालाही असतील. कदाचित अनेक ठिकाणी सजीवसृष्टी असेल. त्यामुळे युनिव्हर्सल स्कूल मध्ये शिकणाऱ्या मुलांची स्पर्धा या विश्‍वात अस्तित्वात असणाऱ्या सजीव सृष्टीतील प्रत्येक सजीव प्राण्याची होत असते! एवढी मोठी स्पर्धा केल्यावर तो किती बुद्धिमान प्राणी होऊ शकतो? याची आपण कल्पनाही करू शकत नाही. परंतु त्यासाठी दरवर्षी लाखात पैसे मोजावे लागतात. एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सजिवांशी स्पर्धा करायला शिकायचं, तर लाखभर रुपये त्यापुढे काहीच नाहीत.
एकंदरीत काय, पालकांना निर्णय घेणे सोपे जावे म्हणून हा आमचा सर्व प्रपंच. तसे पाहिले तर मज पामरासी जास्त काही ज्ञान नाही. अर्थात मीही लोकल स्कूलचा विद्यार्थी आहे. तेव्हा घ्या थोडं समजून.

© तुषार कुटे

Sunday, November 3, 2019

नांदेडचा येवले चहा

नांदेडच्या विद्यापीठात एकेदिवशी कामानिमित्त जाणे झाले होते. त्यावेळी विद्यापीठातल्या एका प्राध्यापकांनी सांगितलेला हा किस्सा.
येवले अमृततुल्य बद्दल आता सबंध महाराष्ट्राला माहिती झालीये. नांदेडमध्येही येवले चहाची शाखा चालू झाली आहे. याठिकाणी अन्य ठिकाणांसारखी रांगेत उभे राहून चहा पिण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसते अर्थात त्यांची लोकप्रियता वाढतच आहे.


गणपतीच्या काळामध्ये प्राध्यापकांच्या गल्लीतही एका सार्वजनिक गणेशाची स्थापना झाली होती. परंतु, प्रत्येकच गल्लीत गणपती असल्याने संध्याकाळच्या आरतीला फारशी गर्दी होत नसे. एक दिवस गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाने सकाळी पाटी लावली- "आज संध्याकाळी आरतीनंतर सगळ्यांना येवले यांच्या कडून चहा मिळणार आहे!" म्हणता म्हणता दिवसभरात ही बातमी आजूबाजूच्या सगळ्या गल्ल्यांमध्ये पोहोचली आणि त्यादिवशी गणपतीच्या आरतीला भली मोठी गर्दी झाली! आरती सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण ती कधी संपेल, याची वाट पाहत होता. एवढी गर्दी पाहून मंडळवाले खुश झाले. अखेर आरती संपली व सर्वजण बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये येवले चहा पिण्यासाठी जाऊ लागले. पण, पार्किंगमध्ये दृश्य तर वेगळेच होतं. तिथे एक मनुष्य टेबलावर चहाचा थर्मास घेऊन व एका हातात चहाचे कागदी कप घेऊन सगळ्यांची वाट बघत उभा होता. प्राध्यापकांच्या लक्षात आले की सदर मनुष्य त्यांच्या कॅन्टीन मध्येच कामाला आहे. याने पण येवले चहा जॉईन केलं की काय? असाही विचार त्यांच्या मनात आला. पण, नंतर चौकशी केल्यावर समजलं की, कॅन्टीन वाल्याचेही आडनाव येवले आहे! मग काय सर्वजण 'येवले' यांचा चहा पिऊन तृप्त झाले.

© तुषार कुटे

Wednesday, October 30, 2019

अवघे जग बदलून टाकणारे महान द्रष्टे

"टॉप व्हिजनरीज हू चेंज्ड द वर्ल्ड" या जॉर्ज इलियन लिखित पुस्तकाचा "अवघे जग बदलून टाकणारे महान द्रष्टे" हा अनुवाद होय. तंत्रज्ञानाच्या विश्वाचे राजे असणारे स्टीव जॉब्स, जॅक मा, बिल गेट्स, एलोन मस्क व मार्क झुकेरबर्ग यांचे हे छोटेखानी प्रेरणादायी चरित्र आहे. कोणतीही संकल्पना मनात येणे, ती प्रत्यक्षात उतरवणे व व्यावसायिकरित्या यशस्वी करून दाखवणे, याची गोष्ट या पुस्तकातून वाचायला मिळते. वरील सर्व तंत्रज्ञ व व्यावसायिकांनी आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय काय मेहनत घेतली? अपयशाच्या कोणत्या पायऱ्या पार केल्या? व आज ते इतक्या उंचीवर पोहोचूनही सामाजिक भावनेने कशा प्रकारे कार्य करत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळतात. शिवाय अन्य देशांची विचारसंस्कृती व भारतीय विचारपद्धती यातील फरकही प्रकर्षाने जाणवतो. म्हणजे सांगायचं असं की, यातील एक जण जरी भारतीय कुटुंबात व भारतात जन्माला आला असता तर कदाचित तो या स्थानी असला नसता. आपल्या देशात अनेक धडपडे तरुण आहेत. परंतु, त्यांना प्रोत्साहन देणारे वातावरण इथे नाहीये. ते कसे असावे? या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकातून मिळू शकेल. 


स्टीव जॉब्स वगळता इतर चौघे आजही अविरतपणे कार्यरत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात विविध प्रकारची सकारात्मक व नकारात्मक वळणे आली. त्यांचा योग्य रीतीने सामना केला गेला. त्यांची एक विचारसरणी तयार होत गेली. हेच त्यांच्या यशस्वीतेचे मुख्य कारण आहे. अगदी सारांश सांगायचा तर "थ्री इडियट्स" या हिंदी चित्रपटात फुनसुख वांगडू सांगतात तसं "सक्सेस के पीछे मत भगो, एक्सलन्स का पीछा करो. सक्सेस झक मार के तुम्हारे पिछे आयेगी".

डिंभक

डॉ. जयंत नारळीकर, निरंजन घाटे व बाळ फोंडके यांच्यानंतर मी वाचलेले डॉ. संजय ढोले हे चौथे विज्ञान कथा लेखक आणि त्यांचा "डिंभक" हा विज्ञान कथासंग्रह! आपल्या आवडत्या विषयात वाचन करण्याची मजाच काही और असते. 'मनोरंजनाबरोबरच कुतूहल जागृत करणाऱ्या लक्षवेधक विज्ञानकथा' या सारांशाने मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. विज्ञानाला अनुसरून लिहीलेल्या जवळपास सर्वच कथांची भट्टी छान जमून आलीये.


पुस्तकाच्या मलपृष्ठावर नमूद केल्याप्रमाणे कथांचा सारांश असा...
नॅनो तंत्रज्ञानाद्वारे मृतांना जिवंत करण्याचा प्रयोग...  मृत माणसाच्या मेंदूचे रोपण जिवंत कुत्रीच्या शरीरात करणे...  भविष्यात नेऊ शकणारी खुर्ची आणि एका राजकीय नेत्याने तिचा केलेला गैरवापर...  शिशाच्या अणूचे सोन्याच्या अणूमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी झाल्याने मालामाल झालेला शास्त्रज्ञ...  परग्रहावरील डिंभक... पिंजकामुळे लाभलेल्या अदृश्य होण्याच्या शक्तीमुळे एका शास्त्रज्ञाने अतिरेक्यांचा केलेला खात्मा...  क्लोननिर्मिती...  गर्भाबरोबरच वाढणाऱ्या ट्युमरला शास्त्रज्ञाने दिलेली मात...  ग्राफीनच्या कणांवरचे संशोधन...  विशिष्ट प्रयोगाद्वारे खुन्यापर्यंत पोहोचणारा शास्त्रज्ञ...  एक विचित्र कीटक. अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांचा सदुपयोग व दुरुपयोग करणारे शास्त्रज्ञ. त्यातून घडणारे मानवी मनाचं दर्शन. वैज्ञानिक संकल्पना आणि मानवी मन यांच्या कल्पनेतून साकारलेल्या रंजक विज्ञान कथांचा वाचनीय संग्रह...
थोडसं वेगळं सांगायचं तर बऱ्याच कथांमध्ये ध्येयवेडे शास्त्रज्ञ व त्यांची प्रयोगशाळा अशी कथा रचना तयार झाली आहे. त्यामुळे कथेचा मूळ गाभा जरी वेगळा असला तरी त्यात सारखेपणा जाणवत राहतो. लेखकाने विज्ञानाच्या सर्व अंगांचा विचार केल्याचेही दिसते. एकंदरितच विज्ञान प्रेमींनी हे पुस्तक वाचावे असेच आहे.

गोष्ट एका परीक्षेची

इंजीनियरिंग झाल्यानंतर वयाच्या 22 व्या वर्षीच नोकरीला लागलो. नाशिकच्या के. के. वाघ पॉलिटेक्निकमध्ये लेक्चरर म्हणून मला नोकरी मिळाली होती. पहिल्याच वर्षी परफॉर्मन्स चांगला राहिला. लागलीच दुसऱ्या वर्षी मला एक्स्टर्णल एक्झामिनर म्हणून जाण्याची संधीही मिळाली पॉलिटेक्निकच्या समर एक्झाम चालू होणार होत्या मी त्यावेळी 'कॉम्प्युटर आर्किटेक्चर अँड मेंटेनन्स' हा विषय शिकवायचो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या या विषयाला फक्त ओरल एक्झाम अर्थात तोंडी परीक्षा होती. त्याच्या आधीच्या सेमिस्टरला मात्र मी चांदवडच्या पॉलिटेक्निकमध्ये एक्स्टर्णल एक्झामिनर म्हणून जाऊन आलेलो होतो. परंतु ती फक्त ऑनलाईन एक्झाम होती. त्यामुळे एक्झामिनरचा रोल फक्त सुपरवायझर म्हणूनच होता. आता मुलांना थेट प्रश्न विचारण्याची परीक्षा मला पहिल्यांदाच मिळाली होती आणि कॉलेज होतं... महावीर पॉलीटेक्निक! शिक्षक होतो तरी देहयष्टी शिक्षका सारखी नव्हती. त्यावेळी मी कोणत्याच अँगलने पॉलिटेक्निकचा मास्तर वाटत नव्हतो. या गोष्टीचे कधी फायदे व्हायचे तर कधी तोटे. केवळ 55 किलो वजन आणि पाच फूट 10 इंच उंची असलेल्या माणसाला कोण शिक्षक म्हणेल? सडपातळ बांधा आणि आत गेलेले गाल हीच माझ्या देहयष्टीची ओळख! त्यामुळे त्या काळात बरेच किस्से घडले. एकदा तर एका इंडस्ट्रियल व्हिजिटला मला कोणी शिक्षक आहे, अशी ओळख देईनाच. जेव्हा विद्यार्थ्यांनी समजावून सांगितले तेव्हा त्यांना समजले की, मी शिक्षक आहे असाच एक किस्सा त्या वर्षीच्या परीक्षांमध्ये घडला होता.
पॉलिटेक्निकला नुकतेच 'कॅरिऑन' लागू झाले होते कॅरीऑन चा अर्थ असा की, कधीही नापास झालेला मुलगा पुढच्या वर्गात ढकलला जात असे. शिवाय इयरली पॅटर्न मधून सेमिस्टर पॅटर्न आल्यामुळे तंत्रशिक्षण मंडळाला सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणे अनिवार्य झाले होते. अर्थात यामुळे वर्षानुवर्षे डिप्लोमा करत असलेली मुले एकाच वर्गात आली होती. यातले कितीतरी मुले माझ्या पेक्षा वयाने मोठी होती आणि शरीरानेही!


यंदा पहिल्यांदाच ओरल एक्झाम आल्यामुळे मीही भलताच खूष होतो आणि विद्यार्थ्यांची चांगलीच ओरल घेऊ असाही, विचार मनात पक्का केला होता. त्याकाळात परीक्षेच्यावेळी माझ्यातला आदर्श शिक्षक जागा होत असे! मला पहिलीच परीक्षा आली ती महावीर पॉलिटेक्निकला.
हे महाविद्यालय नाशिकच्या दिंडोरी रोड वरील म्हसरूळ गावापासून आत मध्ये वरवंडी गावच्या रस्त्यावर आहे. या रस्त्याने नाशिकची सिटीबस दिवसातून एक ते दोन वेळा जायची. शिवाय गावाकडचा भाग असल्यामुळे रिक्षांची संख्या अत्यंत कमी होती. कॉलेजची बस मात्र नियमित जायची. तिथल्या इंटरनल एक्झामिनरने मला त्यांच्या बसचे वेळापत्रक दिले होते. तरीही त्या दिवशी माझी बस चुकली. मग मी अमृतधाम ते पंचवटी आणि पंचवटी ते म्हसरूळ असा रिक्षाने प्रवास केला. परीक्षेची वेळ होत आली होती आणि मलाही जायची घाई होती. म्हसरूळच्या वरवंडी फाट्यावर उतरलो. तर तिथे एकही रिक्षा उभी असलेली दिसली नाही. अर्थात मला फक्त शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध होता. थेट परीक्षा करणे मात्र परवडणारे नव्हते. त्यामुळे लिफ़्ट मागण्याचा एक सहज सोपा पर्याय माझ्यापुढे होता. त्याचीच वाट बघत मी वरवंडी फाट्यावर उभा राहिलो. परंतु या रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी फार नव्हती. जाणारे बाइकस्वार फारफार तर म्हसरूळ गावात घुटमळत. आता काय करावे? हा प्रश्न उभा ठाकलेला होताच.
फाट्यावर उन्हात उभे असताना एका बाईकस्वाराने पाहिले व तो थोडं पुढे अंतरावर जाऊन थांबला. त्याने मागे वळून बघितले आणि मला हाक मारली. डोळ्यावर टिपिकल चष्मा अडकवलेला, छोटे केस आणि माझी बारीक देहयष्टी घेऊन मी त्याच्याकडे गेलो.
'कॉलेजला जायचं का?' तो म्हणाला.
त्याच्या या प्रश्नावर मनात आनंदी होऊन मी होकारार्थी मान डोलावली. अखेर काही मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर मला लिफ्ट मिळाली होती. त्यामुळे हायसे वाटले. त्या दहा मिनिटांच्या प्रवासात आमच्या थोड्या गप्पा झाल्या.
'परीक्षेला चालला काय?' त्याने विचारले.
त्याच्याच प्रश्नावर मला समजले की, त्याला वाटतंय मी विद्यार्थी आहे. मग मनातल्या मनात म्हटलं, बघूया काय होतंय ते आणि होकारार्थी मान डोलावली.
मग आमचे प्रश्न-प्रश्न आणि उत्तरे-उत्तरे चालू झाली.
'कोणत्या क्लासमध्ये आहेस' त्याने विचारले.
'टीवाय आयटी'.
'मी पण त्याच वर्गात आहे'.
'कॅमच्या (कम्प्युटर आर्किटेक्चर अँड मेंटेनन्स) ओरलला चाललाय का?'.
'हो' मी म्हटले.
त्यालाही आपला जोडीदार मिळाल्याचे समाधान वाटले. अर्थात कॅरीऑन मुळे अनेक उडाणटप्पू मुले एकाच वर्गात आली होती. त्यातले बरेच जण कॉलेज अटेंड करत नव्हते. आमचा हा स्वारही त्याच कॅटेगरीतला! त्यामुळे माझ्या उत्तरावर त्याचा लगेच विश्वास बसला.
'तू कोणत्या बॅचचा?' त्याने पुढे विचारले.
'2004'
'हो का? मी 2003 च्या बॅचचा...'
'हे एक्स्टर्नल लई खडूस असतात का रे?'
'हो... लै खडूस असतात. मी तीन वेळा नापास झालोय'
'मी तर काहीच प्रिपरेशन केला नाही भाऊ!'
'अरे मी तरी कुठे केलीये? मी असंच चाललोय.'
'जाऊदे पास तर पास नापास तर नापास!'
असं म्हणत त्याने एक्स्टर्णल एक्झामिनरला दोन-चार शिव्या दिल्या आणि पुढचा संवाद सुरू ठेवला.
कॉलेजच्या गेट पाशी गेल्यावर मात्र माझी गोची झाली. त्याने तर त्याचे आयकार्ड दाखवले. पण माझ्याकडे तर तेही नव्हते आणि वॉचमनला एक्स्टर्णल एक्झामिनर आहे, असे सांगावे तर माझाच भांडाफोड झाला असता. वॉचमन मात्र कार्ड वरती अडून बसला होता.
काय भाऊ तुला परीक्षेला आयकार्ड लागतं हे पण माहीत नाही का? असं सांगून तो लगबगीने आत मध्ये निघून गेला. मग मी लगेचच इंटर्णल एक्झामिनर ला फोन लावला आणि वॉचमनशी बोलायला सांगितले. मग काय वॉचमनने तातडीने आत सोडून दिले आणि अखेरीस आमची परीक्षा चालू झाली. मी आणि इंटरनल एक्झामिनर टेबलसमोर बसलेलो आणि एक एक विद्यार्थी आत यायला सुरुवात झाली. आणि पाहतो तर काय, आमचा बाईकस्वार पहिल्या क्रमांकावर होता!!! खूप जुन्या बॅचचा असल्यामुळे त्याचा पहिला क्रमांक लागला होता. मला समोर एक्झामिनर म्हणून बघितल्यावर तर त्याला धक्काच बसला. काय करावं काय नाही, या प्रश्नाचे उत्तरही त्याच्याकडे नव्हते. त्याला हेही माहीत होते की, त्यांनी काहीच अभ्यास केलेला नाहीये, हे मला माहितीये! शिवाय माझ्या नावाने त्याने दोन-चार शिव्या हासडल्या होत्या. बिचाऱ्याची अवस्था मात्र मला बघवली नाही. कदाचित त्याचा मेंदू हँग झालेला असावा! ओरल ला दोन-चार सोपे प्रश्न विचारले आणि त्याला सोडून दिले. परंतु एकाही प्रश्नाचे उत्तर बिचाऱ्याला आले नाही. परीक्षा संपल्यावर त्या विद्यार्थ्याला मी परत कधीच पाहिले नाही. परंतु एका अनपेक्षित प्रसंगाची मजा मात्र तो घेऊन गेला. हा किस्सा जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचो तेव्हा त्यांचा शेवटचा एकच प्रश्न असायचा, तो पास झाला की नापास? मग मी हसून उत्तर द्यायचो, 'मी माझ्या दहा मिनिटांच्या मित्राला नापास थोडी करणार होतो?'