मागील आठवड्यामध्ये ट्विटर वरील एका युजरने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. चीनमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारची चाचणी घेतली जाते, हे या व्हिडिओ मधून दाखविण्यात आले होते. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला अंदाज येईल की गाडी चालवण्यासाठी लागणारी सर्व कौशल्ये या चाचणीद्वारे कुणालाही तपासता येऊ शकतील. या व्हिडिओची बातमी देखील भारतातील सर्वच इंग्रजी वर्तमानपत्रांनी दिली होती! शिवाय तो चीनमधीलच आहे का याची खात्रीलायक माहिती मात्र कोणत्यात बातमीमध्ये दिलेली नाही.
तसं पाहिलं तर अशा प्रकारची चाचणी भारतामध्ये देखील घ्यायला हवी. परिवहन विभाग हा भ्रष्टाचारामध्ये अव्वल क्रमांकावर आहे. याच कारणास्तव मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात आपल्या देशात होत असतात. गाडी व्यवस्थित चालवता येत नसली तरी देखील अनेकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना असतो. शिवाय आपल्या इथे कौशल्यांपेक्षा कागदाला जास्त महत्व दिलं जातं. आठचा आकडा काढणारा कोणीही आपल्या इथे सहज ड्रायव्हर बनून जातो. यावर पुनर्विचार करणे निश्चितच गरजेचे आहे!
Sunday, December 11, 2022
चिनी ड्रायव्हर टेस्ट
Friday, December 9, 2022
डॉ. संजय तलबार
"अलार्ड अभियांत्रिकी महाविद्यालय, मारुंजी" चे प्राचार्य डॉ. संजय तलबार म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व. सहा वर्षांपूर्वी नांदेडच्या श्री. गुरु गोविंद सिंहजी तंत्रज्ञान संस्थेमध्ये ते कार्य करत असताना माझी त्यांच्याशी ओळख झाली. ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये 'पीएचडी' आहेत. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'पीएचडी' देखील पूर्ण केली आहे. वेगळ्या शाखेचे प्राध्यापक असून देखील सरांना प्रोग्रामिंग मध्ये विशेष रुची आहे. ते सातत्याने नवीन गोष्टी शिकत असतात. म्हणूनच माझ्यासाठी ते प्रेरणास्थानी आहेत. पायथॉन प्रोग्रामिंगवर लिहिलेल्या माझ्या पहिल्या मराठी ई-पुस्तकासाठी सरांना अभिप्राय देण्यासाठी विनंती केली. तेव्हा त्यांनी लगेचच होकार कळविला आणि काही दिवसांमध्येच आपल्या अभिप्रायाचा व्हिडिओ बनवून देखील मला पाठविला. त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आम्ही या व्हिडिओचा समावेश केला होता. त्या त्यातीलच सारांशरुपी अभिप्राय पुस्तकाच्या प्रिंट आवृत्तीमध्ये देखील घेण्यात आलेला आहे. आज सरांना हे पुस्तक स्वहस्ते देताना होणारा आनंद अवर्णनीय होता. माझ्या नवनवीन कार्याला त्यांची त्यांचा सदैव पाठिंबा असतो. या भेटीत देखील त्यांनी दिलेल्या शुभेच्छा व सूचना बहुमूल्य अशा होत्या!
Thursday, December 8, 2022
एआय: द फायनल काउंटडाऊन
इतिहास साक्षीदार आहे की, या पृथ्वीवर एका वेळी केवळ एकाच शक्तिशाली प्राण्याने राज्य केले आहे! ज्याकाळी डायनासोरची या जगावर सत्ता चालू होती, त्या काळात मनुष्यप्राणी अस्तित्वात देखील नव्हता. कदाचित डायनोसॉरच्या विनाशानंतर ही पोकळी भरून काढण्यासाठी होमो सेपिअन्स अवतरले असावेत. मनुष्य प्राण्यांमध्ये देखील कमीत कमी सहा प्रजाती अस्तित्वात होत्या. पण त्यातील केवळ होमो सेपियन्स अर्थात हुशार मानव अर्थात आपण शिल्लक राहिलो आहोत! लाखो वर्षांपूर्वी होमो निअँडर्थल मानव नाहीसा झाला आणि राहिले केवळ होमो सेपियन्स.
एकविसाव्या शतकात मनुष्य स्वतःची नवीन प्रजाती निर्माण करू पाहत आहे, ती म्हणजे होमोनाइड रोबोट्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाद्वारे मानवी बुद्धिमत्ता संगणकीय बुद्धिमत्तेमध्ये परावर्तित होताना दिसत आहे. याच कारणास्तव यंत्रे देखील मानवाच्या बुद्धिमत्तेची बरोबरी करायला चालली आहेत. त्यांचा सध्याचा वेग पाहता पुढील काही दशकांमध्येच हुबेहूब मानवासारखा यंत्रमानव तयार होईल, यात शंकाच नाही. एका अर्थाने मनुष्यप्राणी आणि यंत्र प्राणी अशा दोन प्राण्यांचे वर्चस्व पृथ्वीवर तयार होईल. परंतु दोघांमधून राज्य कोण करेल? अर्थात संगणकाद्वारे तयार झालेले यंत्र प्राणी निश्चितच आपल्यापुढे एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांची यशस्वी होण्याची शक्यता ९९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे! म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स लवकरच पृथ्वीवर राज्य करण्याची क्षमता राखून आहे, असं दिसून येतं. या सर्व प्रक्रियेचा उहापोह करणारा हा डॉक्युमेंटरीवजा चित्रपट म्हणजे "एआय: द फायनल काउंटडाऊन".
तसं पाहिलं तर ही एक बोधकथा आहे. या चलचित्रांमधून मनुष्याला बोध घेण्यासारखं बरंच काही आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे आपण विनाशाकडे तर जात नाही ना? या प्रश्नाचे उत्तर तंत्रज्ञान विकसित करताना शोधण्याची नितांत गरज वाटते. शिवाय कोणतीही गोष्ट नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी योग्य काळजी घ्यायला हवी, हे देखील तितकेच महत्त्वाचे. तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी जीवन सुकर आणि सुलभ करण्यासाठी होतो आहे. तरीही त्याच्या वापरातील धोके जर संपूर्ण मनुष्यजगताला विनाशाकडे नेणार असतील तर यावर निश्चितच सखोल विचार करणे गरजेचे आहे.
बाकी चलचित्र आणि त्यातील ॲनिमेशन्स हे उत्तमरीत्या बनवलेली आहेत. एकदा तरी नक्की पहाच!
Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे
पायथॉन प्रोग्रामिंगवर कार्यशाळा
नुकतीच पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन, पुणे येथे पायथॉन प्रोग्रामिंगवर कार्यशाळा घेतली. यामध्ये द्वितीय वर्ष माहिती तंत्रज्ञानाच्या मुलांनी सहभाग घेतला होता. संगणक प्रोग्रामिंग अनेकांना अतिशय अवघड वाटते. परंतु ती रंजकपणे शिकवल्यास त्यातील रुची वाढण्यास मदत होते. शिवाय कमी वयामध्ये आकलनक्षमता अतिशय उत्तम असते, याची प्रचिती या कार्यशाळेमध्ये आली. विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच त्यांच्या परीक्षणांवरून मलादेखील पुन्हा नव्या गोष्टी शिकविण्यासाठी ऊर्जा प्राप्त झाली. धन्यवाद!
Monday, December 5, 2022
मी, ती आणि चित्रपट
नाशिक मध्ये राहत असताना आम्ही दोघे अर्थात मी आणि आमची पत्नी नियमितपणे
प्रत्येक मराठी चित्रपट बघायला जात असू. त्या काळामध्ये एकही मराठी चित्रपट
आम्ही चुकवलेला नव्हता. सन २०१५ ची गोष्ट असेल. 'कट्टी-बट्टी' नावाचा
मराठी चित्रपट नाशिकच्या सिटी सेंटर मॉल मधील चित्रपटगृहामध्ये लागला होता.
सकाळचा खेळ असावा. चित्रपट सुरू होण्याच्या अगदी बरोबर वेळेमध्येच आम्ही
चित्रपटगृहासमोर दाखल झालो. परंतु दरवाजा बंद होता. नंतर समजले की आज
चित्रपट बघणारे आम्ही दोघेच जण आहोत! त्यामुळे कमीत कमी पाच तिकिटांची
विक्री झाल्याशिवाय चित्रपटाचा शो चालू करता येणार नाही, असे आम्हाला
सांगण्यात आले. आम्हाला उशीर झाला आहे की काय? अशी धाकधूक वाटत होती ती आता
चित्रपट सुरू होईल की नाही? या काळजीमध्ये बदलली गेली. मग वाट
पाहण्याशिवाय आमच्यासमोर कुठलाही पर्याय नव्हता.
आमचे नशीब चांगले
होते. त्यामुळे आणखी तीन मुलींनी या चित्रपटाची तिकिटे खरेदी केली आणि शो
चालू झाला! सर्वात शेवटच्या रांगेमध्ये मध्यभागी आमच्या खुर्च्या होत्या
आणि आमच्या बरोबर समोरच्या रांगेमध्ये समोरच्याच खुर्च्यांमध्ये त्या तिघी
बसलेल्या होत्या. चित्रपटाचे कथानक फारसे मनोरंजक असे नव्हते. त्यामुळे
त्या तिघींची चलबिचल चाललेली आम्हाला दिसली. मध्यंतर झाले आणि त्या तिघीही
चित्रपटगृहातून निघून गेल्या व परतल्या नाहीत. आता पूर्ण चित्रपटगृहांमध्ये
केवळ आम्ही दोघेच उरलो होतो! त्या स्क्रीनची काळजी घेणारा कर्मचारी एकदा
डोकावून बघून गेला. त्याने पाहिले की फक्त दोनच जण हा चित्रपट बघत आहेत.
त्यानंतर पूर्ण चित्रपट संपेपर्यंत त्याने चार ते पाच वेळा तरी डोकावले
असेल! आता हे दोघे देखील निघून जातील, मग शो थांबवता येईल. या आशेवर तो
ये-जा करत होता. पण आम्हाला मात्र चित्रपट पूर्णपणे बघायचाच होता. पूर्ण
चित्रपटगृहामध्ये आम्ही दोघे त्या चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटत होतो. असा
अनुभव पुन्हा घ्यायला मिळणार नाही, याची आम्हालाही खात्री होती. म्हणून
पूर्णवेळ बसून आम्ही चित्रपट पहिला. तो संपल्यावर बाहेर पडत असताना त्या
कर्मचाऱ्याला हास्य वदनाने नमस्कार केला आणि घरी आलो.
Saturday, December 3, 2022
एक भेट
मागील आठवड्यामध्ये जुन्नर मधील बेल्हे इथल्या समर्थ महाविद्यालयामध्ये पायथॉन प्रोग्रामिंगच्या व्याख्यानाच्या निमित्ताने जाणे झाले. समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त श्री. वल्लभ शेळके यांची देखील त्यादिवशी भेट झाली. खरंतर या औपचारिक भेटीचे अनौपचारिक संवादामध्ये कसे रूपांतर झाले, ते आम्हाला देखील समजले नाही. वल्लभ शेळके हे इतिहासाचे एक गाढे अभ्यासक होय. त्यांनी इतिहासामध्ये मास्टर्स पदवी देखील प्राप्त केली आहे, हे त्यादिवशी आम्हाला पहिल्यांदाच समजले. आम्ही देखील ऐतिहासिक पुस्तकांचे प्रकाशक आहोत, हे ऐकल्यावर त्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी इतिहासातील विविध विषयांवर, ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर आणि इतिहास संशोधकांवर आमच्याशी सखोल चर्चा केली. यातूनच त्यांच्या एकंदरीत अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा आम्हाला देखील अंदाज आला. शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळातील सदस्य इतका अभ्यासू असू शकतो, याचे उदाहरण म्हणजे वल्लभ शेळके होत. वाचनाची आवड असलेल्या या व्यक्तिमत्वाला मी माझे पुस्तक दिले याचा मला देखील मनस्वी आनंद झाला.
Friday, December 2, 2022
चंद्र आहे साक्षीला - देवेन्द्र पुनसे
या अनुवादित कथासंग्रहाची प्रस्तावना विशेष भावते. त्यात लिहिलेलं आहे की,
जॉन शिवर म्हणतो "शॉर्ट स्टोरी इज डेड, लॉँग लिव्ह दि शॉर्ट स्टोरी".
समकालीन जीवनाची अस्वस्थता, अगतिकता, अतिरेक यातून साऱ्यांचा वेध घेणारा हा
अमेरिन कथाकार कथा या वाङ्मयाबद्दल असे उदात्तपणे आपले मत मांडतो. कथा मृत
झाली आहे. कथा चिरायू होवो, असे विधान करताना तो कथा या वाङ्मय प्रकाराचे
चिरंतन सार सांगून जातो. सत्य हे आहे की, या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक
मानवी जीवनाची स्वतःची एक कथा असते. पृथ्वीवर पहिला मानव अवतरला तो ही
स्वतःची एक कथा घेऊनच. तेव्हा मानव व कथा यांचे नाते चिरंतन नाही अतूट आहे!
कथा ही मानवाच्या जीवनातील प्राण आहे, असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरते.
जगाचा प्रारंभ हीसुद्धा कथाच आहे. अगदी पाषाणयुगातील मानवापासून आजच्या
महासंगणकीय युगापर्यंत कथा आपली सोबत करीत आहे.
या कथेला किंबहुना
जागतिक कथेचे एक सारांशरुपी चित्रण करणारा हा छोटेखानी कथासंग्रह आहे.
जागतिक साहित्यामध्ये कथा हा प्राचीन साहित्य प्रकार मानला जातो. पूर्वी
कथाकथनाचा रूपात तो नांदत होता. आजचा कथालेखन हा त्यानंतरचा महत्त्वपूर्ण
टप्पा. जगातील विविध देशांमधील प्रतिभासंपन्न कथाकारांच्या कथा या
कथासंग्रहामध्ये लेखकाने एकवटविलेल्या आहेत. प्रत्येकाची शैली, रचना,
मांडणी वेगवेगळी आहे. त्यातून सदर लेखकाच्या अन्य कथा कशा असतील, याची
देखील प्रचिती येते. एडगर ॲलन पो, सर आर्थर कॉनन डायल, अंतोन चेखोव तसेच
सत्यजित रे यांसारख्या जागतिक दर्जाच्या कथाकारांच्या कथा आपल्याला वाचायला
मिळतात. शिवाय अर्नेस्ट हेमिंग्वे, थीन पे मियंत, गी द मोपांसा यांच्या
विविध प्रकारच्या कथांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे.
या
पुस्तकातून शेरलॉक होम्सची कथा मी पहिल्यांदाच वाचली. शिवाय अंतोन चेखोव या
रशियन कथा काराची कथा देखील पहिल्यांदाच वाचावयास मिळाली. जागतिक कथा
विश्वामध्ये कोणत्या प्रकारचे विषय हाताळले जातात, याची प्रचिती या
कथासंग्रहातून निश्चितच येते. त्यामुळे हे पुस्तक काही वाचनीय असे ठरते.
Thursday, December 1, 2022
ल्युसी: मेंदूच्या वापराची कहाणी
माणसाच्या मेंदूमध्ये कोट्यावधी न्यूरॉन असतात. याच न्यूरॉनचा वापर करून
मानवाने इतर प्राण्यांपेक्षा अनेक पावले पुढची बुद्धिमत्ता प्राप्त केली
आहे. प्रत्यक्षात मनुष्यप्राणी आपल्या मेंदूमधील किती टक्के न्यूरान्सचा
वापर करतो? या प्रश्नाचे उत्तर जेव्हा शास्त्रज्ञांनी शोधले तेव्हा त्यांना
समजले की आपण फार-फार तर दहा टक्के मेंदू आजवर वापरलेला आहे! जर आपण
इतक्या कमी प्रमाणात मेंदू वापरलेला असेल आणि अन्य प्राणी जगताला हेवा
वाटेल अशी प्रगती केली असेल तर जेव्हा १००% मेंदू वापरू त्यावेळेस काय
होईल? याची कल्पना देखील करवत नाही. याच संकल्पनेवर आधारित असणारा हा
हॉलीवुडपट म्हणजे "ल्युसी" होय.
ल्युसी ही एक सर्वसामान्य युवती आहे.
चीनमधल्या एका शहरामध्ये ती काम करते. आपल्या प्रियकराने दिलेल्या
धोक्यामुळे ती मोठ्या संकटात सापडते. त्यातून बाहेर येण्याचा ती जीवाच्या
आकांताने प्रयत्न करत असते. परंतु याच घडामोडींमध्ये तिच्या शरीरात
झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे तिच्या मेंदूची क्षमता वाढायला सुरुवात
होते. पहिल्यांदा २०% मग २८% नंतर ४०% नंतर ६०% कालांतराने ८० टक्के आणि
अखेरीस ती आपल्या मेंदूचा शंभर टक्के वापर करते. या प्रत्येक टप्प्यामध्ये
तिचा मेंदू कशा पद्धतीने काम करतो, किंबहुना ती तिच्या मेंदूचा कसा वापर
करते? हे अतिशय रंजकपणे चित्रपटामध्ये दाखवलेले आहे.
जेव्हा मेंदू १००%
कार्यरत होतो त्यावेळेची स्थिती काहीशी अनाकलनीय आहे. पण चित्रपट
विज्ञानातील एक अद्भुतरंजकता आपल्याला दाखवून जातो. विशेष म्हणजे प्रत्येक
टप्प्यागणिक तो खिळवून ठेवतो आणि खरोखरच असं झालं तर काय? या प्रश्नाचे
उत्तर आपल्याला देत राहतो. काही विज्ञान रंजन मनाला सुखवणारे असतात. काही
कल्पना प्रत्यक्षात येण्याजोग्या असतात पण कधी येतील याची खात्री नसते?
त्यातीलच ही विज्ञान रंजक कल्पना होय.
भविष्यामध्ये कदाचित आपण देखील
आपल्या मेंदूचा शंभर टक्के वापर करण्यास यशस्वी होऊ. त्यावेळेस कदाचित
विश्वाची रहस्ये आपल्यासमोर खुली देखील होतील. ...बाकी स्कार्लेट
जोहान्सनने ल्युसीची भूमिका अप्रतिम पार पाडली आहे!













