पाकिस्तानमध्ये जेव्हा एखादी स्त्री मला स्वातंत्र्य हवं आहे असं म्हणते तेव्हा लोकांना वाटतं की, तिला आपल्या वडिलांची, भावाची किंवा नव-याची आज्ञा पाळावयाची नाही; पण तिला स्वातंत्र्य हवं आहे…. याचा अर्थ असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की, तिला तिचे निर्णय स्वतः घ्यायचे आहेत, तिला मुक्तपणे शाळेला जायचं आहे, मुक्तपणे काम करायचं आहे. पवित्र कुराणामध्ये असं कुठंही लिहिलं नाही की, स्त्रीनं पुरुषांवर अवलंबून राहायला हवं. प्रत्येक स्त्रीनं पुरुषाचं ऐकायला हवं. हे शब्द देखील स्वर्गातून आलेले नाहीत. हे विचार आहेत सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मलाला युसुफझाई हीचे.
“मलाला: सामान्यामधल्या असामान्यत्वाची कहाणी” या ऋतुजा बापट-काणे लिखित पुस्तकातून मलालाच्या व्यक्तिमत्त्वाची, संघर्षाची आणि विचारांची ओळख होते. पाकिस्तानमधील स्वात नदीचे खोरे म्हणजे नैसर्गिक सौंदर्याची खाणच. या प्रदेशावर जवळच्याच अफगाणिस्तानमध्ये प्रभाव असणाऱ्या तालिबान्यांचे राज्य होतं किंबहुना आजही असेल. तालिबानी प्रशासन म्हणजे काय, हे आज सर्वांनाच समजुन आलेले आहे. इस्लामच्या नावाखाली यांचे हक्क हिरावून घेणे हेच तालिबानचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सुशिक्षित लोकांची वस्ती असणाऱ्या पाकिस्तान मधील स्वात या शांत आणि सुखी प्रदेशावर तालिबानची वक्रदृष्टी पडली. आणि इथूनच हळूहळू वातावरण बदलायला सुरुवात झाली. पाकिस्तानी प्रशासनाच्या अंतर्गत हा प्रदेश असला तरी येथे तालिबांचे कायदे चालतात. म्हणूनच इस्लामच्या नावाखाली स्त्रीशिक्षणाला येथे पूर्ण बंदी घातली गेली. परंतु आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असणाऱ्या झिउद्दीन युसूफझाई मात्र डगमगले नाहीत. त्यांनी शिक्षणाचा वसा कायम चालू ठेवला. त्यांच्याच संस्कारात वाढलेली त्यांची मुलगी मलाला. वडिलांप्रमाणेच विचार आणि व्यक्तिमत्व असणारी ही मुलगी देखील शिक्षणासाठी शाळेत जाऊ लागली. वारंवार धमक्या देऊनही मुलींच्या शिक्षणामध्ये काही फरक पडला नाही. आणि अचानक अनेक एकेदिवशी तालिबानकडून शाळेच्या बसवर जीवघेणा हल्ला झाला. यातून मलाला थोडक्यात बचावली. तिला उपचारासाठी इंग्लंडमधील बरमिंगहॅम येथे देण्यात आले. आणि येथून पुढेच खरी मलालाची संघर्ष कहाणी जगापुढे यायला सुरुवात झाली. तिचे विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले. शिक्षणाविषयीची तिच्या कार्याची दखल जग घ्यायला लागले. यानंतर शिक्षण क्षेत्रातील तिला बरेचसे पुरस्कार देखील प्राप्त झाले. परंतु त्यावेळी पाकिस्तानमधील परिस्थिती वेगळी होती. तालिबानने तिला इस्लाम विरोधी ठरवले होतेच तर बहुतांश पाकिस्तानी जनता देखील मलालाला पाश्चिमात्य देशांची बाहुली आणि इस्लामची विरोधकच मानत होते. किंबहुना आजही ती परिस्थिती बदलली नसावी. एकंदरीत तिचे विचार पाहता खूपच कमी वयात तिच्या अंगी प्रगल्भता जाणवत होती. भवतालची परिस्थिती आणि वडिलांचे संस्कार यातूनच ती तावून-सुलाखून निघालेली असावी. ती उपचारार्थ इंग्लंडमध्ये असताना देखील तालिबानने तिला दोन वेळा पत्र पाठवून मायदेशी परतण्याचे आवाहन देखील केले होते. परंतु शिक्षणापासून दूर राहून आणि बंधनात अडकवून घेण्याचे तिला मान्य नव्हते. म्हणून आजही ती आपल्या मायदेशाबाहेर राहून शिक्षणाचा प्रसार करण्याचे कार्य करत आहे.
दहा वर्षांपूर्वी बालमजुरी विरोधात काम करणाऱ्या भारताच्या कैलास सत्यार्थी यांच्यासह शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजही मलाला फाउंडेशनच्या सहाय्याने शिक्षण क्षेत्रामध्ये मलालाचे कार्य चालूच आहे.
ऋतुजा बापट-काणे यांच्या या पुस्तकातून सहज सोप्या आणि काळानुरूप लिहिलेल्या घटनांद्वारे मलालाच्या संघर्षाची एकंदरीत ओळख होते. आधुनिक पिढीतील युवकांना विशेषत: युवतींना प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे.
--- तुषार भ. कुटे
Thursday, November 28, 2024
मलाला
Sunday, May 26, 2024
कोणत्याही क्षेत्रातील सर्जनशीलतेची शक्ती
➡️ नवकल्पनांना प्रोत्साहन:
सर्जनशीलता नवीन कल्पना तसेच समस्यांवर उपाय सुचवते.
ती व्यवसायांना स्पर्धात्मक बाजारपेठांमध्ये पुढे राहण्यास मदत करते.
➡️ समस्या चुटकीसरशी सोडवते:
सर्जनशील विचारांना अद्वितीय दृष्टीकोन देते.
ती आव्हानांचे संधीत रूपांतर करते.
➡️ उत्पादकता वाढवते:
"आउट-ऑफ-द-बॉक्स" विचारांना प्रोत्साहन देते.
कार्यक्षमता आणि उत्पादकता वृद्धिंगत करते.
➡️ अनुकूलता वाढवते:
सर्जनशीलता बदल सहजतेने करण्यात मदत करते.
तसेच कार्यात लवचिकता तयार करते.
➡️ सहयोग सुधारते:
विविध कल्पना आणि संघशक्तीला प्रोत्साहन देते.
अधिक समृद्ध, आणि अधिक प्रभावी परिणामांकडे नेते.
➡️ वैयक्तिक वाढीस चालना देते:
सतत शिकण्यास आणि विकासाला प्रोत्साहन देते.
तसेच आपल्याला सतत उत्सुक आणि प्रेरित ठेवते.
तुमचे कार्य आणि जीवन बदलण्यासाठी सर्जनशीलतेची शक्ती स्वीकारा! 🚀
(संकलित)
Thursday, April 6, 2023
अनन्या
ही गोष्ट आहे एका राजकुमारीची. परी कथेतल्या परी प्रमाणे ही एक अनन्यसाधारण
अशी राजकुमारी आहे. तिच्या रूपास अनुरूप असणाऱ्या एका राजकुमाराशी तिचे
लग्न देखील ठरलेले आहे. दोघे अतिशय आनंदामध्ये असतात. आपल्या
विवाहपूर्वीच्या सहवासाचा आनंद ते घेत असतात. राजकुमारीला वडील आणि भाऊ
आहेत. ते देखील तिच्यावर खूप प्रेम करत असतात आणि तिचा विवाह ठरल्यामुळे ते
अतिशय आनंदामध्ये असतात. विशेष म्हणजे ज्या मुलाशी विवाह ठरलेला आहे तो
सुशिक्षित, प्रतिष्ठित आणि गर्भ श्रीमंत घरातील आहे. म्हणून सर्वच गोष्टी
अतिशय स्वप्नवत पुढे सरकत असतात. परंतु राजकुमारीच्या या आनंदात विरजण पडते
आणि एका अपघातामुळे तिचे महत्त्वाचे अवयव निकामी होतात! तो तिच्यासाठी एक
मोठा धक्का असतो. ज्या अवयवांवर आपल्या जवळपास पूर्ण जीवन अवलंबून आहे, तेच
नाहीत या कल्पनेने कल्पनेचा तिला भयंकर धक्का बसतो. तो फक्त तिच्यापुरताच
मर्यादित राहत नाही तर त्यामुळे तिच्या वडील आणि भावांची देखील स्वप्ने
तुटतात. ती पूर्णपणे परावलंबी होते. आपल्या मैत्रिणी शिवाय तिला कुणाचाही
आधार राहत नाही. आयुष्याच्या महत्त्वाच्या क्षणी ती खचलेल्या परिस्थितीकडे
जात असते. एक दिवस घरी एकटी असताना घरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते.
संकट जीवाशी आलेले असते. शरीरातील महत्त्वाचे अवयवच नसल्यामुळे तिला
कोणतीही हालचाल करता येत नाही. पण त्यामुळे ती खचून जात नाही उलट त्यावर
पर्यायी शोधते आणि संकटातून बाहेर पडते. हा प्रसंग तिच्या जीवनाला कलाटणी
देणारा ठरतो. आपला केवळ एकच अवयव निकामी झालेला आहे बाकीचे अवयव मात्र
अजूनही शाबूत आहेत. त्यांच्याच आधारे ती नव्या जीवनाची सुरुवात करते. आणि
यशस्वी देखील होते. तिची ही प्रेरणादायी कहाणी अनेकांना भारावून टाकते.
एक दिवस अचानक एक राजकुमार तिच्या प्रेमात पडतो. अगदी घरातला असल्यासारखाच
सर्वांशी वागत असतो. ती मात्र त्याला भाव देत नाही. परंतु अखेरीस तिला
देखील त्याचे प्रेम मान्य करावे लागते. अशी आहे अनन्यसाधारण राजकुमारी
अर्थात अनन्याची कथा.
चित्रपटाच्या उत्तरार्धात ज्या राजकुमाराचा
प्रवेश दाखवला आहे तिथे कहानी भरकटल्यासारखी वाटते बाकी चित्रपट मात्र
उत्तम बनवलेला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण त्यामध्ये गुंतून राहतो
आणि चित्रपट अनुभवू देखील लागतो.
अनन्याच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या हृता
दुर्गुळे हिचा हा पहिलाच चित्रपट. तिची भूमिका तिने अतिशय उत्तमरीत्या
साकारलेली आहे. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत.
Sunday, February 5, 2023
दोन कथा ऐका...
दोन कथा ऐका...
1. नोकियाने अँड्रॉइडला नाकारले
2. 'याहू'ने गुगलला नकार दिला
कथा संपली!
शिकलेले धडे:
1. जोखीम घ्या
2. बदल स्वीकारा
3. जर तुम्ही वेळेनुसार बदलण्यास नकार दिला तर तुमचा नाश होईल!
आणखी २ कथा
1. फेसबुकने व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम विकत घेतले
2. 'मिंत्रा' ने जबॉन्ग विकत घेतले, फ्लिपकार्टने मिंत्रा आणि नंतर वॉलमार्टने फ्लिपकार्ट विकत घेतले
कथा संपली
शिकलेले धडे:
1. इतके शक्तिशाली व्हा की तुमचे प्रतिस्पर्धी तुमचे सहयोगी बनतील.
2. वरच्या स्थानावर पोहोचा आणि नंतर स्पर्धा काढून टाका.
2 आणखी कथा
1. कर्नल सँडर्स यांनी वयाच्या 65 व्या वर्षी KFC सुरू केले
2. जॅक मा, ज्यांना KFC मध्ये नोकरी मिळू शकली नाही, त्यांनी अलीबाबाची स्थापना केली
कथा संपली
शिकलेले धडे:
1. वय फक्त एक संख्या आहे
2. जे प्रयत्न करत राहतात तेच यशस्वी होतात
शेवटचे पण अतिशय महत्वाचे,
1. फेरारीचे संस्थापक एन्झो फेरारी यांनी ट्रॅक्टर मालकाचा अपमान केला
2. ट्रॅक्टर मालकाने लॅम्बोर्गिनीची स्थापना केली
कथा संपली
शिकलेले धडे:
1. कधीही कोणालाही कमी लेखू नका
2. यश हा सर्वोत्तम बदला आहे
सर्वांचा आदर करा !!
तुमचा वेळ हुशारीने गुंतवा !!
मेहनत करत रहा !!
शिकत रहा आणि वाढत रहा !!
तुमची वेळ येईल !
(संकलित)
- तुषार कुटे
Friday, December 9, 2022
डॉ. संजय तलबार
"अलार्ड अभियांत्रिकी महाविद्यालय, मारुंजी" चे प्राचार्य डॉ. संजय तलबार म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व. सहा वर्षांपूर्वी नांदेडच्या श्री. गुरु गोविंद सिंहजी तंत्रज्ञान संस्थेमध्ये ते कार्य करत असताना माझी त्यांच्याशी ओळख झाली. ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये 'पीएचडी' आहेत. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'पीएचडी' देखील पूर्ण केली आहे. वेगळ्या शाखेचे प्राध्यापक असून देखील सरांना प्रोग्रामिंग मध्ये विशेष रुची आहे. ते सातत्याने नवीन गोष्टी शिकत असतात. म्हणूनच माझ्यासाठी ते प्रेरणास्थानी आहेत. पायथॉन प्रोग्रामिंगवर लिहिलेल्या माझ्या पहिल्या मराठी ई-पुस्तकासाठी सरांना अभिप्राय देण्यासाठी विनंती केली. तेव्हा त्यांनी लगेचच होकार कळविला आणि काही दिवसांमध्येच आपल्या अभिप्रायाचा व्हिडिओ बनवून देखील मला पाठविला. त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आम्ही या व्हिडिओचा समावेश केला होता. त्या त्यातीलच सारांशरुपी अभिप्राय पुस्तकाच्या प्रिंट आवृत्तीमध्ये देखील घेण्यात आलेला आहे. आज सरांना हे पुस्तक स्वहस्ते देताना होणारा आनंद अवर्णनीय होता. माझ्या नवनवीन कार्याला त्यांची त्यांचा सदैव पाठिंबा असतो. या भेटीत देखील त्यांनी दिलेल्या शुभेच्छा व सूचना बहुमूल्य अशा होत्या!
Sunday, May 16, 2021
द अल्केमिस्ट
Monday, January 18, 2021
गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल
मागच्या शंभर वर्षांमध्ये झालेल्या प्रगतीमध्ये प्रथम पुरुषांना प्राधान्य दिले गेले व काही वर्षांनी त्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनीही ही प्रवेश केला. परंतु, हा प्रवेश काही साधा सोपा निश्चितच नव्हता. प्रत्येक स्त्रीला पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रामध्ये प्रवेश करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यातीलच एक क्षेत्र म्हणजे हवाई दल होय. आज भारताच्या स्थलसेना, नौसेना व वायुसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रिया कार्यरत आहेत. परंतु काही दशकांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. ती हळूहळू बदलत गेली. पण, ज्या स्त्रियांनी सुरुवातीच्या काळात या क्षेत्रात प्रवेश केला, त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातीलच एक क्षेत्र म्हणजे भारतीय हवाईदल होय. गुंजन सक्सेना या भारतीय हवाई दलातील पहिल्या पायलट होत्या, ज्यांनी प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभाग घेतला होता! मागील शतकाच्या अखेरीस झालेल्या भारत पाकिस्तान कारगिल युद्धामध्ये त्यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून प्रत्यक्ष युद्धभूमीवर महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांचा जीवनपट दाखविणारा चित्रपट म्हणजे "गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल" होय.
लहानपणापासूनच विमानाच्या पायलट होण्याचे स्वप्न घेऊन मोठी झालेली गुंजन ही एक मध्यमवर्गीय मुलगी. दहावी झाल्यानंतर तिने लगेच पायलट होण्यासाठी तयारी चालू केली. परंतु तोवर या क्षेत्रामध्ये एकही महिला कार्यरत नव्हती. अर्थात याच कारणास्तव घरातील लोकांचा तिला विरोध होता. पण वडिलांच्या पाठिंब्यावर तिने पावले टाकायला सुरुवात केली. यातही बऱ्याच अडचणी आल्या. परंतु, त्यातून ती मार्ग काढत गेली. एक दिवस भारतीय हवाई दलामध्ये महिलांना प्रशिक्षण व प्रवेश देण्यासाठी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात आली होती. तिने यासाठी अर्ज केला व कठोर परिश्रम करून शेकडो महिलांमधून तीच एकमेव निवडली गेली. शेवटच्या वैद्यकिय परीक्षेमध्ये मात्र उंची कमी व वजन जास्त असल्याच्या कारणावरून तिला प्रवेश नाकारण्यात आला. यावरही तिने मात केली व भारतीय हवाई दलामध्ये तिचा प्रवेश झाला. पूर्णपणे पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात प्रवेश करताना एक स्त्री म्हणून विविध अडचणी समोर येत होत्या. त्यावर ती मार्ग काढत गेली. प्रत्येक अडचणीला तिने यशाची पायरी बनवली. अनेकांची साथ तिला मिळत होती. तसेच तिचे पाय मागे खेचणारे देखील या प्रवासात तिला भेटले. अखेर पुरुषांच्या बरोबरीने स्त्री देखील पराक्रम गाजवू शकते हे तिने कारगिल युद्धामध्ये दाखवून दिले. अशा कथेचा प्रेरणादायी प्रवास दाखवणारा हा चित्रपट होय.
अनेक ठिकाणी पुन्हा सिनेमॅटिक लिबर्टीचा आधार घेत दिग्दर्शकाने प्रसंग दाखवले आहेत. अर्थात ते कथानकापासून फारसे लांब जात नाहीत. त्यामुळे वेगळे वाटत नाहीत. कथेचा वेग आणि रोमांच राखण्यास दिग्दर्शक यशस्वी झालेला आहे. सर्वसामान्य घरातील युवतींना प्रेरणादायी ठरेल, असाच हा चित्रपट आहे. परंतु गुंजन सक्सेना ही भूमिका करणारी जान्हवी कपूर मात्र अभिनयामध्ये अनेकदा मागे पडल्याचे दिसते. तिच्या ऐवजी आजच्या काळातील एखादी चांगली अभिनेत्री घेता आली असती. त्यामुळे चित्रपट आणखी प्रभावी बनू शकला असता. ही एक गोष्ट वगळता बाकी चित्रपट निश्चितच प्रेक्षणीय आहे.
Wednesday, August 19, 2020
खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा
अनेकांना हे नाव कदाचित परिचित नसावे. खलील जिब्रान हे इंग्रजी आणि अरेबिक साहित्यातील एक प्रसिद्ध लेखक व चित्रकार होते. त्यांनी एकूण पंचवीस पुस्तके लिहिलेली आहेत. शिवाय त्यांच्या कथांचा जगातील २० पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादही झालेला आहे. त्यांच्या या साहित्यातील सर्वोत्कृष्ट कथांचा स्मिता लिमये यांनी केलेला हा अनुवाद होय.
खलील यांचा जन्म लेबेनॉन सारख्या सतत अराजकतेमध्ये वावरणाऱ्या देशामध्ये झाला होता. तरीही अशा वातावरणात त्यांची निर्मल विचारधारा साहित्य रुपाने बाहेर आली, हे विशेष! कमीत कमी शब्दांमध्ये कथा सादर करून त्याचे तात्पर्य वाचकांसमोर मांडण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. या पुस्तकाचे प्रामुख्याने तीन भाग आहेत. यातल्या पहिल्या भागामध्ये लेखकाचे विचार सुविचार रूपामध्ये मांडलेले आहेत. दुसऱ्या भागात लघु-बोधकथा वाचता येतात. तर तिसऱ्या भागामध्ये दोन दीर्घकथा आहेत. मनाला भावणारे विचार व लघु कथांमधून येणारी त्याची प्रचिती अनुभवायची असल्यास खलील जिब्रान यांचे साहित्य निश्चितच उपयोगी आणि प्रेरणादायी ठरेल असेच आहे.







