Showing posts with label autobiography. Show all posts
Showing posts with label autobiography. Show all posts

Sunday, August 2, 2026

मरुभूमीतील मृदगंध

एखाद्या पुस्तकाचे मुखपृष्ठच आपल्याला त्याच्या अंतरंगाची भुरळ घालते. 'मरुभूमीतील मृदगंध' या पुस्तकाच्या बाबतीत माझ्यासोबत नेमके तसेच घडले. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एका अत्यंत आकर्षक अशा कृष्णवर्णीय मुलीचा चेहरा होता. त्याखाली लिहिलेली ओळ अधिक लक्षवेधी होती: "अत्यंत खडतर परिस्थितीशी संघर्ष करत टॉप मॉडेल बनलेल्या आणि समाजसेवेसाठी अविरत झटलेल्या वारिसची कहाणी." या कृष्णवर्णीय मुलीचा चेहरा मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता, त्यामुळे साहजिकच माझ्या मनात या पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण झाली. पुस्तकाच्या मलपृष्ठावर नमूद केले होते की, तिची निवड 'पिरेल्ली कॅलेंडर'च्या मुखपृष्ठावर छापल्या जाणाऱ्या छायाचित्रासाठी झाली होती; जो फॅशनच्या झगमगत्या जगातला सर्वोच्च सन्मान मानला जातो. हे 'पिरेल्ली कॅलेंडर' नेमके काय असते, याची मला तेव्हा अजिबात कल्पना नव्हती. तरीही केवळ त्या मुलीच्या चेहऱ्यावरील तेज आणि संघर्षाची ओढ यामुळे मी श्रीकांत मुंदरगी लिखित हे पुस्तक वाचायला सुरुवात केली.

ही अंगावर काटा आणणारी सत्यकथा आहे आफ्रिकेतील सोमालियासारख्या मागास आणि गरिबीने ग्रासलेल्या देशातील वारिस डिअरी या मुलीची. सोमालियाच्या एका अतिदुर्गम भागातील रखरखीत वाळवंटात आणि एका गरीब कुटुंबात वारिसचा जन्म झाला. गरिबीच्या चटक्यांमुळे तिला शिक्षणाची दारे तर कधी उघडलीच नाहीत, उलट लहानपणापासूनच कुटुंबासाठी कष्टाची कामे करावी लागली. तिच्या आयुष्यातील खरा संघर्ष तेव्हा सुरू झाला, जेव्हा वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तिच्या वडिलांनी तिचे लग्न एका साठ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीशी लावून देण्याचा घाट घातला. वारिसला हा अन्याय अजिबात मान्य नव्हता. आपल्या आईच्या मूक पाठिंब्याने आणि सहकार्याने तिने जीवाच्या आकांताने तिथून पळ काढला. सोमालियाच्या त्या भयानक, तप्त आणि निर्जन वाळवंटातून कित्येक दिवस अनवाणी पळत ती मोगादिशू शहरापर्यंत पोहोचली. या प्रवासात एका क्षणी तिचा सामना चक्क एका सिंहाशीही झाला होता, पण सुदैवाने ती त्यातून सुखरूप वाचली. मोगादिशूमध्ये आश्रयासाठी गेलेल्या वारिसला स्वतःच्या बहिणीकडूनच कटू अनुभव आला. अखेर, मावशीच्या आधारावर ती इंग्लंडमध्ये पोहोचली. तिथे लंडनमधील सोमालियन राजदूताच्या घरात तिने पडेल ती मोलमजुरीची कामे केली. तोपर्यंत तिचे खडतर आयुष्य काहीसे सुकर झाले होते.

काही काळानंतर अचानक राजदूताची बदली झाली आणि त्यांना मायदेशी परतावे लागले. वारिससाठी हा एक मोठा धक्का होता, पण तिने सोमालियाला न परतता लंडनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी एका प्रख्यात छायाचित्रकाराची नजर तिच्यावर पडली आणि तिचे नशीबच पालटले. त्याने टिपलेली तिची छायाचित्रे थेट जगप्रसिद्ध 'पिरेल्ली कॅलेंडर'च्या मुखपृष्ठावर झळकली. वारिसच्या आयुष्याला कलाटणी देणारा आणि तिचे संपूर्ण जीवन बदलून टाकणारा हा तो क्षण होता. त्याकाळी फॅशनच्या जगात कृष्णवर्णीय मॉडेल्सची मोठी वानवा होती, वारिसने आपल्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाने ती उणीव भरून काढली. तिला नवनवीन ऑफर्स येऊ लागल्या, जगभरातील नामांकित नियतकालिकांमध्ये तिच्या मुलाखती प्रसिद्ध होऊ लागल्या आणि तिचे नाव फॅशन विश्वात आदराने घेतले जाऊ लागले. या संपूर्ण खडतर प्रवासात तिला 'अ‍ॅना' नावाच्या मैत्रिणीची अतिशय खंबीर साथ लाभली.

सोमालियाच्या वाळवंटातील एका मोलकरणीपासून ते फॅशन जगतातील सर्वोच्च मॉडेलपर्यंतचा तिचा हा प्रवास अत्यंत स्वप्नवत आणि थक्क करणारा होता. परंतु, या यशाच्या शिखरावर असतानाच, एका मुलाखतीमध्ये तिने आपल्या आयुष्यातील एक असे भयानक सत्य जगासमोर मांडले, ज्याने संपूर्ण जग हादरून गेले. ती केवळ तिचीच वैयक्तिक व्यथा नव्हती, तर सोमालियामध्ये जन्माला येणाऱ्या लाखो निष्पाप मुलींची ती एक अमानुष आणि दर्दनाक कहाणी होती. वारिसच्या या धैर्यामुळे सोमालियात वर्षानुवर्षे चालत आलेल्या एका अत्यंत अनिष्ट आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या क्रूर प्रथेची माहिती पहिल्यांदाच जगासमोर आली. तिच्या या निर्भय खुलाशामुळे या प्रथेच्या उच्चाटनासाठी जागतिक पातळीवर एक मोठी चळवळ उभी राहिली. तिच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत 'युनेस्को'ने तिला आपले विशेष सदिच्छा दूत बनवले. एका योद्ध्याप्रमाणे ती या अन्यायाविरुद्ध प्राणपणाने लढत राहिली आणि यशस्वीही झाली. आज ती केवळ फॅशन विश्वातील एक निवृत्त मॉडेल नाही, तर स्वतःचे आयुष्य समाजसेवेसाठी आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी अर्पण केलेली एक जागतिक प्रेरणास्थान बनली आहे.

ही संपूर्ण कहाणी 'मरुभूमीतील मृदगंध' या पुस्तकात सविस्तरपणे वाचायला मिळते. वरील वृत्तांत हा केवळ या कथेचा सारांश आहे, परंतु प्रत्यक्ष पुस्तक वाचताना वारिसने सुरुवातीच्या काळात सोसलेले भयंकर अनुभव अक्षरशः अंगावर काटा आणतात. आज आपण जरी एका सुरक्षित वातावरणात जगत असलो, तरी जगाच्या पाठीवर आजही अनेक अमानुष प्रथा अस्तित्वात आहेत, ज्यांची आपल्याला साधी कल्पनाही नसते. जगभरातील स्त्रियांना सर्वत्र समानतेची आणि सन्मानाची वागणूक मिळत नाही आणि विविध भागांतील स्त्रियांची दुःखे काळीज पिळवटून टाकणारी आहेत, हे विदारक सत्य हे पुस्तक आपल्यासमोर उभे करते. या दुःखाविरुद्ध कोणीतरी ठामपणे उभे राहायला हवे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा, हीच अत्यंत मोलाची शिकवण यातून मिळते.

हे पुस्तक वाचून भारावलेल्या मनःस्थितीत मी इंटरनेटवर वारिस डिअरी यांच्याबद्दल अधिक माहिती शोधली. तेव्हा मला समजले की तिने स्वतः 'डेझर्ट फ्लॉवर' या नावाने आपले मूळ आत्मचरित्र इंग्रजीत लिहिले आहे. विशेष म्हणजे, याच नावाचा एक चित्रपटही युट्युबवर मोफत उपलब्ध आहे, ज्यामध्ये तिचे हे प्रेरणादायी संपूर्ण जीवनचरित्र जिवंत झालेले पाहायला मिळते. एका अत्यंत कणखर, जिद्दी आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानणाऱ्या स्त्रीच्या संघर्षपूर्ण प्रवासाचे हे पुस्तक म्हणजे एक प्रेरणादायी उदाहरण आहे, असेच म्हणावे लागेल.

--- तुषार भ. कुटे 

#मराठी #पुस्तक #परीक्षण #चरित्र #आफ्रिका

 




Sunday, August 17, 2025

लेफ्ट टू टेल

मागच्या वर्षी “मृत्यू पाहिलेली माणसं” नावाचं एक पुस्तक वाचनात आलं. त्यामध्ये रवांडा देशातल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुनर्जीवन मिळालेल्या इम्माकुलीची गोष्ट पहिल्यांदा समजली. अतिशय रोमांचकारी वाटले. त्याच पुस्तकामध्ये लेफ्ट टू टेल या तिच्या आत्मचरित्राबद्दल देखील लिहिलेले होते. त्यामुळे हे चरित्र सविस्तरपणे वाचण्याची उत्सुकता देखील चाळवली गेली.
मध्य आफ्रिकेतील रवांडा हा अतिशय छोटा देश. चहूबाजूंनी वेगवेगळ्या देशांच्या सीमा याला लाभलेल्या आहेत. शिवाय आफ्रिकेतील अन्य देशांप्रमाणेच हा देशही निसर्गसंपन्न. परंतु परकीय आक्रमकांच्या विविध काटाकारस्थानांमुळे वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहत असलेल्या दोन वांशिक गटांमध्ये संघर्ष पेटायला सुरुवात होते. हुतु आणि तुत्सी हेच ते दोन गट. एक बहुसंख्यांक तर दुसरा अल्पसंख्यांक. अनेक वर्षांपासून एकमेकांच्या सोबतच राहत असल्याने दोघांमध्ये भेद ओळखणे तसं कठीणच. परंतु एकदा लागलेली ठिणगी पेटली ती पेटलीच. राजकीय नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि आततायीपणामुळे दोन्ही गटांमधील संघर्ष वेगाने पेटायला सुरुवात होते. आणि त्याची परिसीमा गाठली जाते. ही परिसीमा आहे क्रौर्याची, अन्यायाची, आक्रोशाची आणि वंशविच्छेदाची. शिवाय हा संघर्ष ही फार जुना नाही. अगदीच ३० एक वर्षांपूर्वी आफ्रिकेतील निसर्गसंपन्न देशात तो घडलेला आहे. या देशांमध्ये शांत वातावरणात राहणाऱ्या इम्माकुली हिने अनुभवलेला हा वांशिक संघर्ष आहे.


गावातील एका शिक्षक जोडप्याच्या पोटी जन्मलेले इम्माकुली हे तिसरे अपत्य. तिला दोन मोठे भाऊ आणि एक लहान भाऊ आहे. गावाच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या वातावरणात कुटुंबातील सहाही जण गुण्यागोविंदाने नांदत होते. परंतु मागील काही वर्षांपूर्वी पासून चालू झालेला वांशिक संघर्ष हळूहळू मोठा होतो आणि त्याची देशभर व्याप्ती वाढते. स्वतः अल्पसंख्यांक वंशामध्ये जन्मलेल्या इम्माकुलीच्या घरापर्यंत हा संघर्ष येतो. तिला घरातून पलायन करावे लागते. आजूबाजूला दिसेल त्याला थेट ठार मारून वंशविच्छेदाची योजना अमलात येत असते. अशातच बहुसंख्यांक समाजातील एक पाद्री तिला आणि अन्य सहा ते सात स्त्रियांना आसरा देतात. हा आसरा म्हणजे तरी नक्की काय? घरातील एका अतिशय छोट्या आणि दुर्लक्षित स्वच्छतागृहामध्ये त्यांना एक प्रकारे डांबूनच ठेवले जाते. या स्वच्छतागृहात तीन महिन्यांमध्ये घडलेल्या विविध घटनांचे सखोल वर्णन इम्माकुली ने आपल्या या पुस्तकामध्ये केलेले आहे.
खरोखर संघर्ष म्हणजे काय? याची प्रचिती देणारे हे पुस्तक. मनुष्यप्राणी इतक्या क्रूरतेने कसा वागू शकतो? हाही प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. माणसाला माणूस म्हणून जगता येत नाही का? किंवा इतरांना देखील जगवता येऊ शकत नाही का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. राजकारणी लोक देशावर वर्चस्व ठेवायचे म्हणून सामान्य लोकांमध्ये संघर्ष पेटवून देतात. यातून केवळ मानवी मूल्यांचा ऱ्हास होत असतो. 
हे आत्मचरित्र म्हणजे अमानवता कशी असते याचे खरेखुरे चित्रण आहे. आपण आजही किती सुरक्षित वातावरणामध्ये राहत आहोत? याबद्दल निश्चितच धन्यवाद मानायला हवे. हाच विचार पुस्तक पूर्ण झाल्यानंतर मनात येतो. 
पुस्तकाच्या सुरुवातीलाच रवांडा आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाचा नकाशा दिलेला आहे. त्याच्यावरून एकदा व्यवस्थित नजर टाकली की एकंदरीत पुस्तकांमध्ये कोणती घटना कुठे घडली याचे प्रारंभिक चित्रण आपण रंगवू शकतो.
प्रकाशकांच्या कार्यालयात हे पुस्तक चक्क पन्नास टक्के सवलतीमध्ये उपलब्ध होते. कदाचित याविषयी अधिक माहिती अजूनही मराठी वाचकांपर्यंत पोहोचली नसावी. म्हणूनच या पुस्तकाचा खप तितका झालेला नाही.

— तुषार भ. कुटे

Thursday, November 28, 2024

मलाला

पाकिस्तानमध्ये जेव्हा एखादी स्त्री मला स्वातंत्र्य हवं आहे असं म्हणते तेव्हा लोकांना वाटतं की, तिला आपल्या वडिलांची, भावाची किंवा नव-याची आज्ञा पाळावयाची नाही; पण तिला स्वातंत्र्य हवं आहे…. याचा अर्थ असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की, तिला तिचे निर्णय स्वतः घ्यायचे आहेत, तिला मुक्तपणे शाळेला जायचं आहे, मुक्तपणे काम करायचं आहे. पवित्र कुराणामध्ये असं कुठंही लिहिलं नाही की, स्त्रीनं पुरुषांवर अवलंबून राहायला हवं. प्रत्येक स्त्रीनं पुरुषाचं ऐकायला हवं. हे शब्द देखील स्वर्गातून आलेले नाहीत. हे विचार आहेत सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मलाला युसुफझाई हीचे.
“मलाला: सामान्यामधल्या असामान्यत्वाची कहाणी” या ऋतुजा बापट-काणे लिखित पुस्तकातून मलालाच्या व्यक्तिमत्त्वाची, संघर्षाची आणि विचारांची ओळख होते. पाकिस्तानमधील स्वात नदीचे खोरे म्हणजे नैसर्गिक सौंदर्याची खाणच. या प्रदेशावर जवळच्याच अफगाणिस्तानमध्ये प्रभाव असणाऱ्या तालिबान्यांचे राज्य होतं किंबहुना आजही असेल. तालिबानी प्रशासन म्हणजे काय, हे आज सर्वांनाच समजुन आलेले आहे. इस्लामच्या नावाखाली यांचे हक्क हिरावून घेणे हेच तालिबानचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सुशिक्षित लोकांची वस्ती असणाऱ्या पाकिस्तान मधील स्वात या शांत आणि सुखी प्रदेशावर तालिबानची वक्रदृष्टी पडली. आणि इथूनच हळूहळू वातावरण बदलायला सुरुवात झाली. पाकिस्तानी प्रशासनाच्या अंतर्गत हा प्रदेश असला तरी येथे तालिबांचे कायदे चालतात. म्हणूनच इस्लामच्या नावाखाली स्त्रीशिक्षणाला येथे पूर्ण बंदी घातली गेली. परंतु आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असणाऱ्या झिउद्दीन युसूफझाई मात्र डगमगले नाहीत. त्यांनी शिक्षणाचा वसा कायम चालू ठेवला. त्यांच्याच संस्कारात वाढलेली त्यांची मुलगी मलाला. वडिलांप्रमाणेच विचार आणि व्यक्तिमत्व असणारी ही मुलगी देखील शिक्षणासाठी शाळेत जाऊ लागली. वारंवार धमक्या देऊनही मुलींच्या शिक्षणामध्ये काही फरक पडला नाही. आणि अचानक अनेक एकेदिवशी तालिबानकडून शाळेच्या बसवर जीवघेणा हल्ला झाला. यातून मलाला थोडक्यात बचावली. तिला उपचारासाठी इंग्लंडमधील बरमिंगहॅम येथे देण्यात आले. आणि येथून पुढेच खरी मलालाची संघर्ष कहाणी जगापुढे यायला सुरुवात झाली. तिचे विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले. शिक्षणाविषयीची तिच्या कार्याची दखल जग घ्यायला लागले. यानंतर शिक्षण क्षेत्रातील तिला बरेचसे पुरस्कार देखील प्राप्त झाले. परंतु त्यावेळी पाकिस्तानमधील परिस्थिती वेगळी होती. तालिबानने तिला इस्लाम विरोधी ठरवले होतेच तर बहुतांश पाकिस्तानी जनता देखील मलालाला पाश्चिमात्य देशांची बाहुली आणि इस्लामची विरोधकच मानत होते. किंबहुना आजही ती परिस्थिती बदलली नसावी. एकंदरीत तिचे विचार पाहता खूपच कमी वयात तिच्या अंगी प्रगल्भता जाणवत होती. भवतालची परिस्थिती आणि वडिलांचे संस्कार यातूनच ती तावून-सुलाखून निघालेली असावी. ती उपचारार्थ इंग्लंडमध्ये असताना देखील तालिबानने तिला दोन वेळा पत्र पाठवून मायदेशी परतण्याचे आवाहन देखील केले होते. परंतु शिक्षणापासून दूर राहून आणि बंधनात अडकवून घेण्याचे तिला मान्य नव्हते. म्हणून आजही ती आपल्या मायदेशाबाहेर राहून शिक्षणाचा प्रसार करण्याचे कार्य करत आहे.
दहा वर्षांपूर्वी बालमजुरी विरोधात काम करणाऱ्या  भारताच्या कैलास सत्यार्थी यांच्यासह शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजही मलाला फाउंडेशनच्या सहाय्याने शिक्षण क्षेत्रामध्ये मलालाचे कार्य चालूच आहे.
ऋतुजा बापट-काणे यांच्या या पुस्तकातून सहज सोप्या आणि काळानुरूप लिहिलेल्या घटनांद्वारे मलालाच्या संघर्षाची एकंदरीत ओळख होते. आधुनिक पिढीतील युवकांना विशेषत: युवतींना प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे.

--- तुषार भ. कुटे 



Sunday, June 19, 2022

'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस' - उमेश करंबेळकर

मानववंशशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला होमो सेपियन अस हे नाव नक्की कोणी दिले असावं? असा प्रश्न पडला होता. त्याचे उत्तर देखील मी शोधले होते. तो नामदाता होता, कार्ल लिनियस!
परंतु त्याच्याविषयी अगदीच जुजबी माहिती काही पुस्तकांमध्ये उपलब्ध होती. तीदेखील सारांश रूपामध्ये. अच्युत गोडबोले यांच्या 'किमयागार' या पुस्तकामध्ये लिनियसवर एक पूर्ण प्रकरण लिहिलेले सापडले. त्यातून बरीचशी माहिती मिळाली. शिवाय दीपा देशमुख लिखित 'जग बदलणारे ग्रंथ' या पुस्तकामध्ये जग बदलणाऱ्या पन्नास ग्रंथामध्ये कार्ल लिनियस लिखित 'सिस्टिमा नॅचुरी' या पुस्तकाचा समावेश केलेला आढळला. तेव्हा लिनियस नक्की कोण होता? याविषयी कुतूहल जागृत झाले. म्हणूनच डॉ. उमेश करंबेळकर लिखित 'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस' हे पुस्तक वाचायला घेतले आणि लिनियस नावाच्या वादळाची कहाणी समजून आली.
जगामध्ये पशु, पक्षी, कीटक, जलचर, फळझाडे, फुलझाडे, वृक्ष, वेली अशाच प्रकारचे सजीवांचे गट पाडले जातात. परंतु प्रत्यक्षात लाखो प्रकारचे सजीव या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. त्यातील अजूनही काही सजीवांशी मनुष्याचा संपर्क झालेला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या सजीवांची वर्गवारी करणारा शास्त्रज्ञ म्हणजे कार्ल लिनियस होय! त्याने सजीवांचा हा पूर्ण पसारा एका सिस्टीममध्ये मांडला. शिवाय त्या प्रत्येकाला नाव दिलं. त्याचं वर्गीकरण केलं. त्यातूनच सजीवांच्या जातीची ओळख झाली. ही नामकरण पद्धत जीवशास्त्राने कायमची स्वीकारलेली आहे. म्हणूनच काल लिनियस याला 'सजीवांचा नामदाता' असे म्हटले जाते.
स्विडन म्हटलं की विज्ञानविश्वाला आठवतो तो 'अल्फ्रेड नोबेल'. याच स्वीडनमध्ये तीनशे वर्षांपूर्वी कार्ल लिनियसचा जन्म झाला. पहिल्यापासूनच तो निसर्ग वेडा होता. त्याने वनस्पती संशोधनासाठी केलेली लॅपलँड या स्वीडनमधील जंगलाची सफर मात्र अद्भुत आणि रोमहर्षक अशीच होती. आजही आपण कोणी भारतातल्या जंगलांमध्ये इतके दिवस एकट्याने सफर करू शकत नाही. त्यामुळे लिनियसची ही भटकंती धाडसी अशीच म्हणता येईल. आपल्या आयुष्यातील अनेक दशके त्याने निरनिराळ्या सजीवांचा शोध घेतला व त्यांचे वर्गीकरण केले. त्यासाठी त्याने भटकंती देखील मोठ्या प्रमाणात केली. एका अर्थाने तो आपल्या जीवनातील ध्येयाने प्रेरित झालेला होता. शिवाय त्याला अनेक संशोधक शिष्यदेखील लाभले. याच शिष्यांनी जगभरामध्ये प्रवास करून विविध देशांतील जंगलांमधून वनस्पतींचे नमुने गोळा करून त्याला दिले. लिनियसचे शिष्य जगातील जवळपास प्रत्येक जंगलांमधून भटकले होते. याच कारणास्तव त्याचे 'सिस्टीमा नॅचुरी' हे परिपूर्ण पुस्तक तयार झाले. त्याची पहिली आवृत्ती १३ पानांची तर तेरावी आवृत्तीत तेवीसशे पानांची तयार झाली होती. अशा या ध्येयवेड्या वनस्पतीशास्त्रज्ञाचा प्रवास सांगणारं हे पुस्तक, 'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस'!


 

Thursday, April 29, 2021

मुसाफिर: अच्युत गोडबोले

साधारण तेरा-चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नाशिकच्या कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेने अच्युत गोडबोले यांचे परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये व्याख्यान आयोजित केले होते. तोपर्यंत मी अच्युत गोडबोले हे नाव केवळ ऐकून होतो. त्यांचं "ऑपरेटिंग सिस्टिम" हे पुस्तक आम्ही अभ्यासक्रमामध्ये 'रेफरन्स बुक' म्हणून वापरले होते. परंतु त्यापलीकडे अच्युत गोडबोले कोण आहेत, हे त्या दिवशी पहिल्यांदाच या व्याख्यानातून आम्हाला समजले. दोन तासात त्यांनी त्यांचा बराचसा जीवन प्रवास उलगडून सांगितला. त्याच वेळेस लक्षात आले की, हा माणूस कोणीतरी एक वेगळाच अवलिया आहे! आयआयटी सारख्या मोठ्या संस्थांमधून पास होणारे विद्यार्थी अशाच प्रकारे असतात, हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. खरतर तेव्हापासून मला अच्युत गोडबोले समजले. मग त्यांचे प्रकाशित होणारे प्रत्येक पुस्तके मी विकत घ्यायला लागलो. 'किमयागार' हे मी वाचलेलं त्यांचं पहिलं पुस्तक होतं. वैज्ञानिकांबद्दल असलेली जुजबी माहिती विस्तृतपणे या पुस्तकातून समजली. मग त्यांची सर्व पुस्तके वाचून काढली. ते जेव्हा-जेव्हा नाशिकला व्याख्यानासाठी यायचे, आमची तिथे हजेरी असायची. शिवाय नाशिकला महाविद्यालयामध्ये काम करत असताना देखील आम्ही त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. शिवाय माझ्या पहिल्या मराठी पुस्तकाला प्रस्तावना देण्यासाठी मी त्यांना विनंती केली होती. इतके मोठे लेखक माझ्या सारख्या नवख्या लेखकाला प्रस्तावना देतील का? याची शाश्वती नव्हती. परंतु त्यांचा प्रतिसाद अनपेक्षितच होता. चांगली तीन पानांची प्रस्तावना त्यांनी माझ्या पुस्तकासाठी लिहून पाठवली. तसेच नाशिकला आल्यानंतर या पुस्तकाच्या पहिल्या प्रतिवर स्वाक्षरी देखील केली त्यांनी दिली होती. सन २०१२ मध्ये प्रकाशित झालेले ते पुस्तक आजही मी जपून ठेवले आहे. गोडबोले सरांचे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे, हे समजले तेव्हाच त्याची प्रकाशनपूर्व नोंदणी करून आपला अंक राखून ठेवला होता. परंतु निवांत वेळ मिळत नाही तोवर हे पुस्तक वाचायचे नाही, असे ठरवले होते. कारण इतक्या वेगवेगळ्या विषयांवर लिहिणारा हा माणूस नक्की कसा घडला, हे मला व्यवस्थित जाणून घ्यायचे होते. शेवटी तो योग आलाच सोलापूर सारख्या एका छोट्या शहरात जन्मलेला व मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा इतक्या उच्च स्तरावर कशापद्धतीने पोहोचला, हा प्रवास निश्चितच प्रेरणा देणारा होता. आमच्या संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मी नेहमी त्यांचे उदाहरण देत असे. अच्युत गोडबोले केमिकल इंजिनिअर असूनही संगणकशास्त्रामध्ये त्यांचा किती हातखंडा आहे, ते जरा पहा. हे वाक्य अगदी सहज बोलून जात असलो तरी त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी गोडबोले सरांनी काय मेहनत घेतली होती, याची प्रचिती हे पुस्तक वाचल्यानंतर आली. कधीकधी अनेक घटना माझ्या शैक्षणिक आयुष्याशीही जोडल्या जात असल्यासारख्या वाटत होत्या. स्वतःमध्ये बदल केल्याशिवाय अनुभव येत नाही आणि व्यक्तिमत्त्वही संपन्न होत नाही, हा धडा मात्र निश्चितच गोडबोले सरांच्या एकूण प्रवासातून मिळतो. तो अतिशय प्रेरणादायी आहे. विशेषत: अशा मुलांसाठी जे ग्रामीण भागातून येऊन शहरातल्या वातावरणाला घाबरतात. तसेच इथल्या फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या लोकांसमोर मान खाली घालून बसतात. ध्येय, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो, हे गोडबोले सरांच्या एकंदरीत प्रवासातून जाणवले. त्यांनी त्यांची आवड कधीच सोडली नाही. उलट तिला 'पॅशन' बनवून ते चालत राहिले. म्हणूनच आज देशातल्या यशस्वी लोकांमध्ये त्यांची गणना होते. ते संगणक तज्ञ आहेत, लेखक आहेत, मराठी भाषेचे जाणकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत, संगीत विशारद आहेत, मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्याच मराठी मातीमध्ये जन्मले याचा निश्चितच अभिमान वाटतो. धडपडणाऱ्या मुलांसाठी प्रेरणा देणारे व त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणारे असे हे पुस्तक निश्चितच आहे. 



Tuesday, January 7, 2014

The journey of Dr. A. P. J. Abdul Kalam


It is always interesting to read about the stories of someone who has achieved a lot in his entire life. I used to prefer autobiographies of reknowned personalities. It gives us inspiration to do something in our life. It enlightens us to find the path for our career goal also. Indian scientist and former President of India, Dr. A.P.J. Abdul Kalam is one of such personalities. He is an ideal person for the youth of India. Many young achievers have been enlightened by the thoughts of Dr. Kalam.


Last week, I read the book, 'My Journey' by Dr. Kalam. He has given his short life stories in short and sweet fashion and in simplified English. How to live? How to struggle ? This can be learnt from this great Personality. He is from India's one of the south-most cities like Rameshwaram. Many people in his entire life have had an influence on him. He has learned a lot many things from his family mates and collegues. All these stories can be read in the book 'My Journey'. Many times, it seems like that we have a lot miles behind Dr. Kalam. The struggle that Dr. Kalam made a great personality can be seen from his short life stories.
Dr. Kalam has remained always a great source of inspiration. His books also gave me the same. 'My Journey' is a must read book for all Indian youth. They will definitely get many thoughts from this book.
I was unaware about the book of Dr. Kalam. Once, flipkart.com has sent a promotional mail for book sales to me. Most of the books were available upto 40-60% discount. I found the same book in this category. I purchased it online on flipkart.com with 40% discount. But,this was not only true benefit that I got from it !