Showing posts with label achyut godbole. Show all posts
Showing posts with label achyut godbole. Show all posts

Thursday, June 12, 2025

“नंबर्स” संख्यांचं अद्भुत विश्व

अच्युत गोडबोले सहलिखित “गणिती” हे पहिले पुस्तक काही महिन्यांपूर्वी वाचनात आले. गणितातील बहुतांश संकल्पना अतिशय उत्तमरीत्या या पुस्तकांमध्ये मांडलेल्या होत्या. त्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये त्यांचे सहलिखित पुढचे पुस्तक “स्टॅटिस्टिक्स” अर्थात संख्याशास्त्र हे देखील वाचुन झाले. डेटा सायन्सचा अभ्यास करत असल्याने या पुस्तकाची उपयुक्तता माझ्यासाठी खूप काही होती. परंतु या पुस्तकातील तांत्रिक संज्ञा अजूनही इंग्रजाळलेल्या भासल्या. याच शृंखलेतील गणित विषयावर लिहिले गेलेले ‘नंबर्स’ हे पुस्तक नुकतेच वाचनात आले.
गणित आणि संख्याशास्त्र यामध्ये नक्की काय फरक आहे? याचे उत्तर हे पुस्तक देते. सुरुवातीला गणिती या पुस्तकांमधील बऱ्याच संकल्पना पुन्हा एकदा वाचनामध्ये आल्या. परंतु खऱ्याखुऱ्या अर्थाने नंबर्सची सुरुवात झाल्यानंतर हे पुस्तक उत्तमरीत्या संख्यांची लय पकडते. संख्यांचा अद्भुत विश्व आपल्यासमोर उभे करते. शून्यापासून अनंतापर्यंतच्या संख्या तसेच गणिती संकल्पनांचा अभ्यासपूर्ण आणि रंजक वेध घेताना बऱ्याचदा आपल्या मेंदूचा कस देखील लागतो. पण गणित सोपे आहे, ही भावना मनात ठेवली तर सर्वच संकल्पना सहजपणे समजायला लागतात. इन्फिनिटी, पाय, यूलर्स समीकरण, प्राईम नंबर, फिबोनाची क्रमिका, लॉगॅरिथम अशा विविध संकल्पना उत्तमरीत्या या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. गणिताला अनुभवाची आणि उपयोगाची जोड दिली तर ते लवकर समजते. हेच या पुस्तकाने सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे शुभ आणि अशुभ संख्या नावाच्या प्रकरणांमध्ये मनुष्य संख्यांना कसा घाबरतो याचे रंजक वर्णन आपल्याला वाचायला मिळते. जगभरामध्ये अनेक संख्या अशुभ मानल्या जातात. अर्थात अनेकांच्या अनुभवातून हे आलेले आहे. यातूनच न्यूमरोलॉजी या विषयाचा उदय झाला. आजही भारतामध्ये लाखो लोक यावर विश्वास ठेवतात. एका अर्थाने गणिताला देखील अंधश्रद्धेमध्ये ओढण्याचा हा प्रकार आहे.
संख्यांच्या गमतीजमती आणि रंजक गणिती कोडी ही दोन प्रकरणे अतिशय सुरेख वाटली. कालीन रूम संख्या कापरेकर स्थिरांक, अपरिमेय संख्या, नऊ ची गंमत, ७२ चा नियम, २२ नावाची गुणसंख्या, पायथागोरिअन त्रिकुट, मित्र संख्या, परिपूर्ण संख्या, पास्कल त्रिकोण, रामानुजन-हार्डी नंबर, जादूचे चौकोन, कटपयादी पद्धत, गणेश गुणाकार अशा विविध रंजक गणिती गोष्टी या प्रकरणांमध्ये आपल्याला खिळवून ठेवतात. रंजक गणिती कोडी ही आपल्याला मेंदूला चालना द्यायला लावतात. अनेक गोष्टींमध्ये गणित विचार करायला भाग पाडतं. अर्थात जगाची एकंदरीत रचनाच गणितावर आधारलेली आहे, हे आपल्याला समजून घेता येतं.
डॉ. विद्यागौरी प्रयाग आणि अच्युत गोडबोले यांनी महत्प्रयासाने या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. हे प्रत्येक प्रकरणामध्ये दिसून येतं. गणित आवडणाऱ्यांसाठी आणि विशेषत: गणित न आवडणाऱ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच वाचनीय असंच आहे!

--- तुषार भ. कुटे

#मराठी #पुस्तक_परीक्षण #गणित #इतिहास


 

Sunday, April 7, 2024

गणिती

गणित म्हणजे अनेकांचा डोक्याबाहेरचा अर्थात नावडता विषय. माझ्या बाबतीत सांगायचं तर शालेय जीवनामध्ये गणित मला कधी कठीण वाटलं नाही. दहावीला सुद्धा १५० पैकी १४२ गुण मला या विषयात मिळाले होते. परंतु या गणिताचे रूपांतर जेव्हा “मॅथेमॅटिक्स”मध्ये झालं त्यानंतर आमची आकलनक्षमता कमी होत गेली. अर्थात हे गणित आम्हाला व्यवहारिक गणित म्हणून समजलं नाही.
डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला असताना माझा वर्गात दुसरा क्रमांक आला होता. या परीक्षेतील अभियांत्रिकी गणितामध्ये मला १०० पैकी केवळ ५० गुण मिळाले होते तर पहिल्या क्रमांकावरील आमच्या मित्राला १०० पैकी १०० गुण होते! एकंदरीत अभियांत्रिकीच्या सहाही वर्षांमध्ये जवळपास सारखीच परिस्थिती राहिली. गणिताचा आणि आमचा अनेकदा संबंध आला पण तो केवळ पास होण्यापुरता!
तसं पाहिलं तर गणित हाच विश्वाचा पाया आहे. प्रत्येक गोष्ट ही गणिताशी अतिशय घट्टपणे जोडलेली आहे. किंबहुना गणिताशिवाय जगाचे पान देखील हलणार नाही, अशी परिस्थिती आहे. पण हे गणित व्यवहारांमध्ये नक्की कशा पद्धतीने वापरले जाते, याची माहिती आपल्याला होत नाही. म्हणजे गणित शिकवतानाच त्याचा व्यवहारांमध्ये नक्की कुठे कसा उपयोग होतो, हेच आपल्याला समजत नाही. किंबहुना समजावले जात नाही. म्हणूनच गणित अवघड वाटते.
मी देखील त्यातीलच एक होतो. परंतु जवळपास दहा वर्षांपूर्वी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विदा विज्ञान क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केल्यापासून हळूहळू मला गणित आणि त्याचा व्यवहारातील उपयोग समजायला लागला. कोणते सूत्र, समीकरण कुठल्या ठिकाणी वापरायचे याची माहिती व्हायला लागली. परंतु त्याची खोली अजूनही फारशी जास्त नव्हती. आजही मला उच्च दर्जाचे गणित माहिती आहे हे मी खात्रीने सांगू शकत नाही. एकंदरीतच गणित हा प्रत्येकासाठीच गुढ, किचकट आणि मेंदूला ताण देणारा विषय आहे.
गणित या विषयाशी संदर्भ असणारी खूप कमी पुस्तके मराठीमध्ये लिहिली गेलेली आहेत. परंतु या सर्वांमधील सर्वोत्तम पुस्तक म्हणजे अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूर देसाई लिखित “गणिती” होय. गणिताचा उगम कशा पद्धतीने झाला आणि त्याची मागील हजारो वर्षांची प्रगती कशी होती, याची इत्यंभूत माहिती रोचक आणि रोमांचक घटनांद्वारे लेखकद्वयींनी या पुस्तकामध्ये विस्तृतपणे मांडलेली आहे. तुम्हाला गणित आवडो अथवा न आवडो हे पुस्तक निश्चित एक उत्तम मार्गदर्शक म्हणून काम करेल.
जगाने ही गोष्ट स्वीकारलेलीच आहे की, शून्य या संकल्पनेचा जनक भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांनी लावला. कोणतीही गोष्ट शून्यापासून सुरुवात होते. म्हणजेच भारतीयांनीच गणिताची सुरुवात केली, असं म्हणायला हरकत नाही! परंतु भारतीयांव्यतिरिक्त दोन हजार वर्षांपूर्वी मेंदुने आणि संस्कृतीने प्रगत असणाऱ्या अनेक देशांनी गणिताच्या प्रगतीमध्ये बहुमूल्य असा हातभार लावलेला आहे. त्याची सुरुवात ग्रीक गणितज्ञांपासून होते. युक्लीड, पायथागोरस सारख्या गणितज्ञांनी खऱ्या अर्थाने गणिताचा पाया समृद्ध केला. अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि बीजभूमिती सारख्या गणिती शाखांचा दोन हजार वर्षांपूर्वी उगम झाला. त्यामध्ये अनेक महान गणितज्ञांचा बहुमूल्य वाटा होता. गणिताच्या आधारे अनेक सूत्रे आणि समीकरणे रचली गेली. विचारवंतांचे मेंदू पणाला लागले. अनेक गूढ प्रश्नांची उकल करण्यासाठी गणिती समीकरणे उदयास आली. यात भारतीय तसेच बहुतांशी युरोपीय गणितज्ञांचा भला मोठा वाटा दिसून येतो.
गणिताचा अभ्यास करत असताना वापरली गेलेली अनेक सूत्रे संकल्पना आणि समीकरणे ज्या गणितज्ञांच्या नावाने आहेत ते सर्व या पुस्तकातून मला भेटले. नेपियर आणि लॉगॅरिथम, देकार्तची बीजभूमिती, फर्माची प्रमेये, बायनॉमियल थियरम आणि कॅल्क्युलसचा शोध लावणारा सर आयझॅक न्यूटन, कॅल्क्युलेटरच्या प्रगतीमध्ये मोलाची भर घालणारा पास्कल, लेबनीट्स, बर्नोली यांचे गणिती घराणं, लँगरज, लाप्लास, गाऊस, बंडखोर गणितज्ञ गॅल्व्हा, रिमान, हार्डी पॉइनकरे, कॅण्टर, न्यूमन, नॅश यासारखे अनेक गणितज्ञ या पुस्तकातून आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात.
बहुतांश गणितज्ञ हे त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय सामान्य बुद्धीचे होते. कदाचित त्यावेळी त्यांना त्यांच्या मेंदूची प्रतिभा लक्षात आलेली नसावी. परंतु आपल्या सुगीच्या काळामध्ये त्यांनी गणिती विश्वात अतिशय बहुमूल्य कामगिरी करून दाखवली. काही गणितज्ञ अतिशय कमी वयाचे देखील होते. परंतु इतक्या कमी कालावधीमध्ये देखील त्यांनी गणिती विश्व समृद्ध केले. विज्ञानाला पडणाऱ्या कोड्यांची उकल गणितज्ञांनी आपल्या उच्च बुद्धिमत्तेचा वापर करून केलेली दिसते. विशेष म्हणजे मागील हजार वर्षांमधील बहुतांश गणितज्ञ हे फ्रान्स, जर्मनी आणि रशिया याच तीन प्रमुख देशांमध्ये जन्मलेले दिसतात. यामध्ये अमेरिकी वंशाचा एकही नाही. न्युटन आणि जॉर्ज बुली वगळला तर एकही इंग्लिश देखील नाही.
अंकगणितापासून सुरू झालेला प्रवास आजच्या आधुनिक गणितातील टोपोलॉजी, सेट थियरी, गेम थिअरी, बुलियन अल्जेब्रा, सॅटिस्टिक्स अर्थात सांख्यिकी, प्रॉबाबिलिटी अर्थात संभाव्यताशास्त्र आणि लॉजिक अर्थात तर्कशास्त्रापर्यंत पोहोचल्याचा दिसतो. गणितातील प्रत्येक शाखेचा अंतर्भाव या पुस्तकामध्ये अतिशय विस्तृतरित्या केलेला आहे. काही संकल्पना ज्या इंग्रजीमध्ये समजायला अवघड जातात, त्यांचे विस्तृत विश्लेषण आपल्याला वाचायला मिळते.
गणिताचे विश्वदेखील गणितातील इन्फिनिटी या संकल्पनेप्रमाणेच अमर्याद आहे, याची प्रचिती या पुस्तकाद्वारे होते. कोणत्याही संकल्पनेचा प्रवास कधीच थांबत नाही. गणिताचे देखील तसंच आहे. अनेक गणितज्ञांनी त्यांच्या ज्ञानाने गणितीविश्व समृद्ध केलेले आहे. त्याचाच वापर करून पुढील गणितज्ञ याच गणिताला पुढच्या पातळीवर घेऊन चाललेले आहेत. आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये गणित हा प्रमुख पाया मानला जातो. यात टिकून राहायचं असेल तर गणिती संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांचा व्यवहारिक उपयोग शोधता आला पाहिजे. तरच मानवी अर्थात नैसर्गिक बुद्धिमत्ता संगणकामध्ये आपल्याला गणिती संकल्पनांचा वापर करून अंतर्भूत करता येईल.
गणिताची भीती घालवणारे तसेच त्याच्या रोमांचक प्रवासाची सफर घडवून आणणारे हे पुस्तक प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचायलाच हवं.


- तुषार भ. कुटे
जुन्नर, पुणे. 



Saturday, August 13, 2022

प्रकाशतंत्राची रोमहर्षक गाथा

सृष्टीच्या अनेक मुलतत्त्वांपैकी एक म्हणजे प्रकाश होय. जगातील सर्वात वेगवान गोष्ट म्हणजेच प्रकाश होय. प्रकाशाविना विश्व अंधारमय आहे. अशाच प्रकाशतंत्राची रोमहर्षक गाथा अच्युत गोडबोले यांच्या 'प्रकाश' या पुस्तकांमध्ये वर्णिलेली आहे.
अनेक शतकांपासून माणूस प्रकाशाचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करत होता. प्रकाशाचा मूळ स्त्रोत मात्र सूर्य आहे, असे मानले जायचे. परंतु मानवाने कृत्रिम प्रकाशाची निर्मिती केली. आगीचा शोध लागला. त्यातून प्रकाश कसा निर्माण करायचा? हे मानवाला समजले. तिथून मेणबत्त्या तयार झाल्या आणि विजेचा शोध लागल्यानंतर कृत्रिम प्रकाश दिवे तयार झाले. मनुष्याला प्रकाशामागचं विज्ञान कळत गेलं. हाच प्रकाश मानवी प्रगतीचे एक साधनच बनून गेला. मानवी प्रगतीच्या नव्या पिढ्या घडत गेल्या. विज्ञान प्रगत होत गेलं. तसतसं प्रकाशाचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये होत गेला. याच प्रकाशामुळे मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, कॅमेरा, फोटोग्राफी टेलिव्हिजन, लेझर आणि फायबर ऑप्टिकचा जन्म झाला. या तंत्रज्ञानाने अनेक विविध प्रकारच्या नव्या शोधांना जन्म दिले. एका अर्थाने प्रकाशाधारित शोध हे विज्ञानाच्या शेकडो शोधांची जननी आहे, असे म्हणावे लागेल.
या सगळ्यांची कहाणी अच्युत गोडबोले यांच्या 'प्रकाश' या पुस्तकामध्ये वाचायला मिळते. यातून आपल्याला भेटतात अनेक ध्येयवेडे तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ! त्यांच्या वेगळेपणामुळे अथवा अभ्यासामुळेच आपण सहज उपलब्ध होणाऱ्या तंत्रविश्वामध्ये वापरत आहोत. त्यांचे स्मरण देखील करणं तितकंच गरजेचं आहे. भविष्यामध्ये मनुष्य प्रकाशाचा वेग गाठायला पाहतो आहे. कदाचित ते काही दशकांमध्ये शक्य देखील होईल. परंतु त्यामागची प्रेरणा काय होती? हेही आपण ध्यानात ठेवायला हवे.

 


 

Friday, October 29, 2021

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स - अच्युत गोडबोले

#पुस्तक_परीक्षण
📖 आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
✍️ अच्युत गोडबोले
📚 मधुश्री प्रकाशन

तंत्रज्ञानाची अमर्याद क्षितिजे पार केलेले आधुनिक काळातील यंत्र म्हणजे संगणक होय. गेल्या शंभर वर्षांमध्ये अशक्य असलेल्या अनेक गोष्टी याच संगणकाने शक्य करून दाखवलेल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता होय!
मागच्या पाच-सहा वर्षांपासून या क्षेत्रात विकसन आणि प्रशिक्षण देण्याचे कार्य मी करत आहे. केवळ 'अमर्याद' याच एका शब्दाने या क्षेत्राची व्याप्ती वर्णन करता येईल. यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संकल्पनेवर आधारलेले व ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले लिखित 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' हे पुस्तक म्हणजे खरोखरच एक जग हदरवणारे तंत्रज्ञान आहे, हेच ध्यानात येते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या विषयाला वाहिलेले मराठीतील पहिलेच परिपूर्ण पुस्तक अच्युत गोडबोले यांनी लिहिले आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच 'जग हादरवणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख, इतिहास, उपयोग आणि भविष्य यांचा रंजक वेध' असं लिहिलेलं आहे. पुस्तकाचा पूर्ण सारांश या एका वाक्यात आपल्याला लगेच ध्यानात येईल.
तसं पाहिलं तर गोडबोले सरांचं अनेक वर्षानंतर संगणक तंत्रज्ञानाशी निगडित प्रकाशित झालेलं हे पुस्तक होतं. त्यामुळे त्याची उत्सुकताही तितकीच लागलेली होती. आपल्या सर्व अपेक्षांची पूर्ती करणारं हे पुस्तक होय.
संगणक माणसाची जवळपास सर्व कामे हळूहळू शिकू लागला आहे आणि करू लागला आहे. असं एकही क्षेत्र उरलेले नाही की जिथे संगणकाचा उपयोग होत नाही. संगणकाधारित स्वयंचलनामुळे आज लाखो नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. भविष्यातही ही व्याप्ती आणखी वेगाने वाढत जाणार आहे. कारण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे संगणक मानवी बुद्धिमत्ता प्राप्त करू लागला आहे. शिवाय मानवापेक्षा अधिक अचूकतेने तसेच वेगाने आणि सातत्याने सर्वच कामे करू लागला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये हे तंत्रज्ञान अधिक वेगाने विकसित होणार आहे. ते कसे? याची इत्यंभूत माहिती अच्युत गोडबोले यांनी या पुस्तकात वर्णिलेली आहे.
तसं पाहिलं तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही संकल्पना ७० ते ८० वर्षे जुनी आहे. त्या काळातील संगणक आणि गणितज्ञांनी या अद्भुत तंत्रज्ञानाची ओळख विश्वाला करून दिली. परंतु संगणकाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधील मर्यादांमुळे हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष साकारायला अनेक दशके जावी लागली. आज संगणनाचा वेग प्रचंड गतीने वाढतो आहे. त्याच वेगाने संगणक मानवी कार्यक्षमता विकसित करू लागला आहे. मशीन लर्निंग,  डीप लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग सारख्या तंत्रज्ञानाद्वारे बुद्धिमत्ता प्राप्त करू लागलेला आहे. याच कारणास्तव फायनान्स, मार्केट रिसर्च, रिटेल, जाहिराती, मार्केटिंग, सेल्स, शिक्षण आणि आरोग्यसेवेत देखील आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने शिरकाव केलेला दिसतो. याव्यतिरिक्त शेती, पर्यटन, कला, संगीत, लीडरशिप सारखी क्षेत्रे देखील लवकरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या अधिपत्याखाली येतील, असे दिसते. सर्व कामे वेगाने व अचूकतेने होत आहेत. परंतु जगदेखील त्याच वेगाने बदलू लागलेले दिसते. बेरोजगारी वाढलेली आहे. असं असलं तरी या तंत्रज्ञानाद्वारे नवनवे रोजगारही विकसित होताना दिसत आहेत. त्यामुळे ज्यांना टिकायचं असेल त्यांना हे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा प्रवाहाच्या बाहेर पडण्याची भीती देखील आहे. या सर्वांचा उहापोह अच्युत गोडबोले यांनी विस्तृतपणे या पुस्तकामध्ये घेतलेला दिसतो.
सेल्फ ड्रायव्हिंग कार्स अर्थात स्वयंचलित वाहने, चॅटबॉट सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित संकल्पना देखील त्यांनी विस्तृतपणे मांडलेल्या आहेत. ज्याद्वारे भविष्यामध्ये हे तंत्रज्ञान कितपत प्रगती करू शकेल, याचा आपल्याला अंदाज येतो. कधी कधी असंही जाणवतं की, जर संगणकच सर्व काम करत असेल तर मनुष्याचा या जगामध्ये नक्की काय उपयोग होईल? हा प्रश्न पडतो. एकंदरीत माणूस रोबोट बनत चाललेला आहे आणि संगणक नवनवे रोबोट विकसित करत आहे. याचा ताळमेळ भविष्यामध्ये कसा लागेल, हे सांगणं आता तरी अवघड दिसते इतकच!


 

Thursday, April 29, 2021

मुसाफिर: अच्युत गोडबोले

साधारण तेरा-चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नाशिकच्या कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेने अच्युत गोडबोले यांचे परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये व्याख्यान आयोजित केले होते. तोपर्यंत मी अच्युत गोडबोले हे नाव केवळ ऐकून होतो. त्यांचं "ऑपरेटिंग सिस्टिम" हे पुस्तक आम्ही अभ्यासक्रमामध्ये 'रेफरन्स बुक' म्हणून वापरले होते. परंतु त्यापलीकडे अच्युत गोडबोले कोण आहेत, हे त्या दिवशी पहिल्यांदाच या व्याख्यानातून आम्हाला समजले. दोन तासात त्यांनी त्यांचा बराचसा जीवन प्रवास उलगडून सांगितला. त्याच वेळेस लक्षात आले की, हा माणूस कोणीतरी एक वेगळाच अवलिया आहे! आयआयटी सारख्या मोठ्या संस्थांमधून पास होणारे विद्यार्थी अशाच प्रकारे असतात, हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. खरतर तेव्हापासून मला अच्युत गोडबोले समजले. मग त्यांचे प्रकाशित होणारे प्रत्येक पुस्तके मी विकत घ्यायला लागलो. 'किमयागार' हे मी वाचलेलं त्यांचं पहिलं पुस्तक होतं. वैज्ञानिकांबद्दल असलेली जुजबी माहिती विस्तृतपणे या पुस्तकातून समजली. मग त्यांची सर्व पुस्तके वाचून काढली. ते जेव्हा-जेव्हा नाशिकला व्याख्यानासाठी यायचे, आमची तिथे हजेरी असायची. शिवाय नाशिकला महाविद्यालयामध्ये काम करत असताना देखील आम्ही त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. शिवाय माझ्या पहिल्या मराठी पुस्तकाला प्रस्तावना देण्यासाठी मी त्यांना विनंती केली होती. इतके मोठे लेखक माझ्या सारख्या नवख्या लेखकाला प्रस्तावना देतील का? याची शाश्वती नव्हती. परंतु त्यांचा प्रतिसाद अनपेक्षितच होता. चांगली तीन पानांची प्रस्तावना त्यांनी माझ्या पुस्तकासाठी लिहून पाठवली. तसेच नाशिकला आल्यानंतर या पुस्तकाच्या पहिल्या प्रतिवर स्वाक्षरी देखील केली त्यांनी दिली होती. सन २०१२ मध्ये प्रकाशित झालेले ते पुस्तक आजही मी जपून ठेवले आहे. गोडबोले सरांचे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे, हे समजले तेव्हाच त्याची प्रकाशनपूर्व नोंदणी करून आपला अंक राखून ठेवला होता. परंतु निवांत वेळ मिळत नाही तोवर हे पुस्तक वाचायचे नाही, असे ठरवले होते. कारण इतक्या वेगवेगळ्या विषयांवर लिहिणारा हा माणूस नक्की कसा घडला, हे मला व्यवस्थित जाणून घ्यायचे होते. शेवटी तो योग आलाच सोलापूर सारख्या एका छोट्या शहरात जन्मलेला व मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा इतक्या उच्च स्तरावर कशापद्धतीने पोहोचला, हा प्रवास निश्चितच प्रेरणा देणारा होता. आमच्या संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मी नेहमी त्यांचे उदाहरण देत असे. अच्युत गोडबोले केमिकल इंजिनिअर असूनही संगणकशास्त्रामध्ये त्यांचा किती हातखंडा आहे, ते जरा पहा. हे वाक्य अगदी सहज बोलून जात असलो तरी त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी गोडबोले सरांनी काय मेहनत घेतली होती, याची प्रचिती हे पुस्तक वाचल्यानंतर आली. कधीकधी अनेक घटना माझ्या शैक्षणिक आयुष्याशीही जोडल्या जात असल्यासारख्या वाटत होत्या. स्वतःमध्ये बदल केल्याशिवाय अनुभव येत नाही आणि व्यक्तिमत्त्वही संपन्न होत नाही, हा धडा मात्र निश्चितच गोडबोले सरांच्या एकूण प्रवासातून मिळतो. तो अतिशय प्रेरणादायी आहे. विशेषत: अशा मुलांसाठी जे ग्रामीण भागातून येऊन शहरातल्या वातावरणाला घाबरतात. तसेच इथल्या फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या लोकांसमोर मान खाली घालून बसतात. ध्येय, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो, हे गोडबोले सरांच्या एकंदरीत प्रवासातून जाणवले. त्यांनी त्यांची आवड कधीच सोडली नाही. उलट तिला 'पॅशन' बनवून ते चालत राहिले. म्हणूनच आज देशातल्या यशस्वी लोकांमध्ये त्यांची गणना होते. ते संगणक तज्ञ आहेत, लेखक आहेत, मराठी भाषेचे जाणकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत, संगीत विशारद आहेत, मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्याच मराठी मातीमध्ये जन्मले याचा निश्चितच अभिमान वाटतो. धडपडणाऱ्या मुलांसाठी प्रेरणा देणारे व त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणारे असे हे पुस्तक निश्चितच आहे. 



Sunday, March 4, 2012

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने....


साधारणत: दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी इंजिनियरिंगला शिकत होतो, तेव्हा मी कधी विचारही केला नव्हता की, मी एखाद्या पुस्तकाचा लेखक होईल. सन २००० मध्ये मी माझ्या मराठी लेखनाला सुरुवात केली होती परंतु, पुस्तक लिहिण्याचा विचार मनातही नव्हता. लेखन करणे, हे केवळ छंद म्हणून मी जोपासू लागलो होतो. आज त्याचे फलित मला माझ्या पहिल्या पुस्तकाच्या रूपाने समोर दिसत आहे.
इंजिनियर आणि तोही शिक्षक व मराठी लेखकही... हे समीकरण काहींना न समजणारे आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीची पदवी घेऊन शिक्षक बनणाऱ्याला काहीजण मूर्ख म्हटले होते. त्यांच्या भावना मी समजू शकतो. परंतु, ’काही मिळविण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो’, हेही तितकंच खरं आहे. माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर मला मिळालेल्या प्रतिक्रियांत मी माझ्या विद्यार्थ्यांपेक्षा माझ्या महाविद्यालयीन मित्रांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या मानतो. त्याचे कारणही तसेच आहे. त्यांनी मला घडताना पाहिले होते व मी काय करू शकतो, याची जाणीवही त्यांना होती. आज मागे वळून बघताना मला काहीही गमावल्याचे दु:ख वाटत नाही. असो... पुस्तकाच्या खऱ्या कथेकडे वळूयात.
 पूर्वी केवळ अलंकारिक लिहिणं वगैरे किंवा नव्या पिढिच्या प्रतिनिधीच्या भावना मांडणे, अशा कल्पनांतून मी पुण्याच्या दैनिक युवा सकाळमधून लिहिणे सुरू केले होते. सकाळ समूहाचे ते नुकतेच सुरू झालेले दैनिक होते. माझे लेख वृत्तपत्रांतून प्रकाशित होऊ लागल्यावर मला खरोखर नवा हुरूप मिळू लागला होता. पूर्वी पेपरात नाव आलं की खूप अभिमान वाटायचा. पण, आता त्याचं फारसं काही वाटत नाही. आता नावापेक्षा आपलं लिहिलेलं प्रसिद्ध झालंय, याची किंमत जास्त वाटू लागलीय. गेल्या बारा वर्षांची लेखन तपस्या आज ’बिटस अॅन्ड बाईट्स’ या नितीन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाद्वारे मला प्रकाशित करता आली. पूर्वीचं हलकंफुलकं लेखन गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाकडे वळून गेलं व पुस्तकरूपी प्रकाशितही झालं. मला त्याचा विशेष आनंद वाटतो.
माझा सतत लिहित राहण्याचा छंद मला या पुस्तकासाठी कामाला आला. संगणक विषयावर वृत्तपत्रांत लिहावे, असे अनेक दिवसांपासून मनात होते. त्यासाठी सर्वप्रथम नाशिकच्या ’दैनिक गांवकरी’ ला संपर्क साधला. नोव्हेंबर २००८ मध्ये त्यांच्या कार्यालयातून फ़ोन आला. ’दैनिक गांवकरी’चे उपसंपादक श्री. शैलेंद्र तनपुरे यांच्याशी भेट निश्चित झाली. संगणकाच्या विविध हार्डवेअर व सॉफ़्टवेअर शोधामागील नक्की इतिहास काय आहे? हे समजावून सांगण्याकरीता दैनंदिन लेखमालिका तयार करण्याची संकल्पना तनपुरे सरांनीच मला सांगितली. संगणकाचा इतिहास माझा पक्का असल्याने मला या विषयी लिखाण करण्यास काहीच अडचण येणार नव्हती. माझ्या या दैनंदिन स्तंभाला मीच ’बिट्स अॅन्ड बाईट्स’ हे नाव सुचविले व तनपुरे सरांनीही त्याला तात्काळ होकारही दिला. वृत्तपत्रात दैनंदिन लिहिण्यासाठी मला मिळालेली ही पहिलीच संधी होती.
१ जानेवारी २००९ रोजी ’बिट्स अॅन्ड बाईट्स’ मधला पहिला लेख प्रसिद्ध झाला. महिनाभरातच उत्तर महाराष्ट्रातून अनेक फ़ोन व ई-मेल प्राप्त झाले. विशेष म्हणजे यात शहरी भागातून कमी तर ग्रामीण भागातून जास्त प्रतिसाद प्राप्त झाला होता. संगणकाविषयी वृत्तपत्रांमधून प्रथमच अशी दैनंदिन लेखमालिका प्रसिद्ध झाली होती. या मालिकेचा फ़ायदा जितका वाचकवर्गाला होत तितकाच तो मलाही झाला. संगणकाच्या एखाद्या भागाविषयी केवळ वरकरणी माहिती असून चालणार नव्हती म्हणून अनेक लेखांना समृद्ध करण्याकरीता मला इंग्रजीतील दर्जेदार पुस्तकांचा तसेच इंटरनेटवरील लेखांचा मोठा आधार घ्यावा लागला. त्यातून मला ही मोठी ज्ञान प्राप्ती झाली. शिक्षकी पेशात असल्यामुळे या ज्ञानाचा मला सतत फ़ायदा सतत झाला आहे. एखाद्या संकल्पनेला शिकवताना सुरुवात करतेवेळी मी यातील नक्की इतिहास काय आहे! अशा प्रकारच्या उत्तराने सुरुवात करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढत जाते. एकंदरीत लेखमालिका लिहताना मला तनपुरे सरांच्या सूचनांचाही मोठा फ़ायदा झाला आहे. या लेखमालिकेला पुस्तक रुपात आणण्याची संकल्पना मला त्यानीच दिली होती.
संगणक इतिहास मांडताना अनेक धडाडीच्या संशोधकांची व संगणक विकसकांची चांगलीच ओळख होते. प्रत्येक  क्षेत्रात व्यवस्थापन शास्त्राला वाव आहे, याची कल्पना येते. संगणकाचा मुलभूत विषय  मानला जाणारा ’कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन’ हा विषय शिकवताना मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो. ’Computer is not a magic, but it is a logic!’ हे १०० टक्के खरे आहे. अनेक धडपड्या व ध्येयवेड्या संगणक तज्ञांनी आजचा परिपूर्ण संगणक तयार केला आहे यात वाद नाही. त्यांनी संगणकाच्या विविध संकल्पना तयार केल्या नसत्या तर आजचा संगणक अस्तित्वात आलाच नसता. एखादे हार्डवेअर वा सॉफ़्टवेअर वापरताना ते बनविण्याचे श्रेय कोणाचे आहे याची माहीती जवळपास कोणालाच नसते. पण त्यांचे योगदान आपण कधीच हिरावून घेऊ शकत नाही. जुन्या पिढीतील संगणक विकसकांनी जो संगणकाचा विकास केला आहे अशा ज्ञात व अज्ञात तज्ञांना माझा सावंद्य नमस्कार ! त्यांचे कार्य मराठी वाचकांना समजावे याकरीता मी केलेला हा एक प्रयत्न होय.
नितीन प्रकाशनाकडे जेंव्हा मी ’बिट्स अॅन्ड बाईट्स’ च्या पुस्तकरूपी प्रकाशनाचा प्रस्ताव मांडला तेंव्हा त्यांनी मला तात्काळ होकार दिला. आज नितीन प्रकाशन मराठीमध्ये तंत्रज्ञानाला आणू पाहत आहे, याचा मला अभिमान वाटतो. मराठीतील माझे पहिले पुस्तक प्रकाशित करत असल्याबद्द्ल मी श्री. नितीन गोगटे व श्री. अविनाश काळे यांना मन:पूर्वक धन्यवाद देतो.
प्रस्तावना लिहण्याकरीता मी अच्युत गोडबोले सरांना जेंव्हा विनंती केली तेंव्हा त्यांनी तात्काळ मला होकार दिला. माझ्यासारख्या नवोदित लेखकाला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांचे शतश: धन्यवाद. मराठी तंत्रज्ञान लिखाणासाठी मी गोडबोले सरांना माझा आदर्श मानत आलो आहे. त्यांचीच प्रस्तावना माझ्या पुस्तकाला लाभली, हे मी माझे भाग्य मानतो.
माझ्यातील संगणक अभियंत्याची ओळख मराठी तंत्रज्ञान लेखक म्हणून दैनिक गांवकरी मुळे झाली. गांवकरी वृत्तपत्र समूहाचा मी ऋणी आहे. माझे धाकटे बंधू अमित व अमोल यांचे सहकार्य ही लेखमालिका व पुस्तक लिहिण्यासाठी खूप मोलाचे ठरले. याशिवाय क. का. वाघ तंत्रनिकेतन मधील तसेच संदिप तंत्रज्ञान संस्था व संशोधन केंद्र येथील सर्व सहकाऱ्यांचा मी आभारी आहे.
प्रत्यक्ष दिसत नसले तरी माझ्या सर्व यशात मोलाचा सहभाग असणारे माझी आई-वडील, काका-काकी, ज्यांच्या कडून मी लिखाणाचा वसा घेतला ते मामा विजय आवटे व नेहमीच मला प्रोत्साहित करणारे माझे इतर सर्व कुटुंबिय व लिखाणाबद्द्ल नेहमीच चौकस असणारे मित्र अर्जून, प्रमोद, माणिक व पत्रकार अशोक डेरे यांचही योगदान मोलाचं आहे, हे देखिल तितकच खरं.

Tuesday, May 17, 2011

’मराठी’ लेखक

मराठी भाषेमध्ये लिहिणारे अनेक मराठी व अमराठी लेखक आजवर अनेक होऊन गेले. प्रत्येक भाषेला स्वत:चे साहित्य असते. व साहित्य समृद्धीमुळेच भाषेची ओळख अधिक भक्कम होत असते. तंत्रज्ञानाचा विचार केला तर भारतीय भाषांमध्ये खूप कमी प्रमाणात लेखन केले गेले आहेत. कारण, आपल्या इथे इंग्रजी हीच तंत्रज्ञानाची अर्थात ज्ञानभाषा मानली जाते. तंत्रज्ञान विषयांवर इंग्रजी भाषेत लिहिणारे अनेक नामवंत भारतीय लेखक आहेत. शिवाय ’मॅक्ग्रा हील’, ’प्रेंण्टाईस हॉल’, ’विले’, स्प्रिंगर’, यासारख्या आंतरराष्ट्रीय नामांकित प्रकाशकांकडून अनेक भारतीय लेखकांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. भारतीय लेखकांच्या लिखानाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय वाचकांना त्यांची भाषा व संकल्पना समजण्यास अवघड जात नाहीत व त्यांची भाषा ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांस सोपीच वाटते.

अभियांत्रिकी शिक्षणामध्ये विविध विषयांची पुस्तके वाचताना मला अनेक मराठी लेखकांचीही पुस्तके वाचनात मिळाली. विशेष म्हणजे ही पुस्तके त्या विषयांसाठी ’टॉप प्रेफरन्स बुक्स’ म्हणून ओळखली जातात. यात मी सर्वप्रथम यशवंत कानेटकर यांचे नाव घेईन. भारतात जिथेजिथे ’सी प्रोग्रामिंग’ शिकविले जाते तिथे यशवंत कानेटकरांचे ’लेट अस सी’ वाचले जाते. ’सी प्रोग्रामिंग’ लॅंग्वेज शिकण्यासाठी ’बीपीबी’ प्रकाशनाने कानेटकरांचे हे पुस्तक प्रकाशित केले होते. या विषयावर भारतात सर्वात लोकप्रिय पुस्तक म्हणून या पुस्तकाने मान्यता मिळविली आहे. नुकतीच त्याची दहावी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. मी डिप्लोमाला शिकत असताना त्याची केवळ दुसरी आवृत्ती बाजारात आली होती. कालांतराने त्यात अनेक सुधारणा घडवून आणण्यात आल्या. माझ्यासारख्या अनेक जणांनी त्यांच्या ’सी प्रोग्रामिंग’ची बाराखडी या पुस्तकानेच सुरू केली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यशवंत कानेटकरांची ’सी प्रोग्रामिंग’ विषयावर सुमारे वीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. एकाच विषयावरील विविध संकल्पनांवर इतकी पुस्तके लिहिणारे कानेटकर हे पहिलेच लेखक असतील. शिवाय सी++ विषयावरही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. ’ऑब्जेक्ट ओरियन्टेड प्रोग्रामिंग’, ’डेटा स्ट्रक्चर्स’, ’कॉम्प्युटर ग्राफिक्स’, ’मायक्रोप्रोसेसर प्रोग्रामिंग’, ’विंडोज प्रोग्रामिंग’ ’सिस्टीम प्रोग्रामिंग’ या विषयांसाठी कानेटकरांची पुस्तके रेफरन्स बुक म्हणून वाचली जातात. गूगलच्या ’http://books.google.com या साईटवर त्यांची पुस्तके ऑनलाईन वाचता येतील.

“मायक्रोप्रोसेसर” हा विषय जेव्हा भारतीय विद्यापीठांच्या तसेच विविध तंत्रशिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमांत शिकवला जायला लागला तेव्हा 8085 ह्या प्रोसेसरचा अभ्यास ’मायक्रोप्रोसेसर’ विषयांत ठेवण्यात आला होता. ह्याच मायक्रोप्रोसेसरवर लिहिलेल्या सर्वात लोकप्रिय पुस्तकाचे लेखक आहेत रमेश गांवकर व त्या पुस्तकाचे नाव आहे ’मायक्रोप्रोसेसर आर्किटेक्चर प्रोग्रामिंग ऍण्ड अप्लिकेशन्स विथ 8085’. मायक्रोप्रोसेसर शिकण्यासाठी सर्वोत्तम पुस्तकांपैकीच हे एक पुस्तक. याशिवाय प्रा. गांवकर यांनी मायक्रोप्रोसेसर एम्बेडेड सिस्टिम्स व झेड 80 मायक्रोप्रोसेसर या विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. मायक्रोप्रोसेसरवर पुस्तके लिहिणारे अतुल गोडसे हेही उत्तम लेखकांपैकी एक. इंजिनियरिंगला दुसऱ्या वर्षाला शिकत असताना ’मायक्रोप्रोसेसर टेक्निक्स’ व तिसऱ्या वर्षाला ’मायक्रोप्रोसेसर बेस्ड सिस्टीम्स’ या विषयांसाठी त्यांची पुस्तके वाचण्याचा योग आला. 8086 व 80386 हे मायक्रोप्रोसेसर त्यांनी आपल्या पुस्तकांत अतिशय छान पद्धतीने समजावले आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके आंतरराष्ट्रीय प्रकाशकांनी प्रकाशित नसली तरी ती मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून वाचली जातात. त्यांची भाषाही सर्वसामान्य वाचकांना समजेल अशीच आहे. उगाच फार टेक्निकल न लिहिता गर्भित ज्ञान त्यांनी या पुस्तकांतून दिले आहे. याव्यतिरिक्त ’कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन’ व ’कॉम्युटर ग्राफिक्स’ या विषयांवरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. ही पुस्तके ’टेक्निकल पब्लिकेशन’ने प्रकाशित केली आहेत.

अच्युत गोडबोले हे मराठीतील आणखी एक उत्कृष्ट लेखक होय. सर्वसामान्य मराठी वाचकाला अच्युत गोडबोले हे पहिल्यापासूनच परिचित आहेत. इंग्रजी भाषेतील ज्ञान मराठी भाषेत सादर करण्याचे काम अच्युत गोडबोले यांनी केले आहे. शिवाय त्यांनी ’टाटा मॅग्रा हील’ कडून पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. स्वत: संगणक अभियंता नसतानाही त्यांनी लिहिलेली संगणक अभियांत्रिकीमधील पुस्तके ही विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. ’ऑपरेटिंग सिस्टीम’ हे त्यांनी लिहिलेले माझे एक आवडते पुस्तक होय. संगणक प्रणाली अर्थात ’ऑपरेटिंग सिस्टीम’ समजवून घेण्यासाठी हे एक उत्तम पुस्तक आहे. आजही हा विषय शिकवण्यासाठी गोडबोलेंचे पुस्तक टॉप प्रेफरन्स लिस्ट मध्ये येते. भारतीय लेखकाने फारशी किचकट भाषा न वापरता भारतीय पद्धतीने ’ऑपरेटिंग सिस्टीम’ समजावून सांगितली आहे. या पुस्तकाबरोबरच त्यांचे ’डेटा कम्युनिकेशन’ हे पुस्तकही ’टाटा मॅग्रा हील’ने प्रकाशित केले आहे. हे पुस्तक ’इलेक्ट्रॉनिक्स’ अभियांत्रिकी शाखांसाठी रेफरन्स बुक म्हणून वापरले जाते. गोडबोलेंच्या मराठी वाचनाबद्दल तर मराठी वाचकांना यापूर्वीच माहिती आहे.

अंतिम वर्ष संगणक व माहिती तंत्रज्ञान या अभियांत्रिकी शाखांना असलेल्या ’ऑब्जेक्ट ओरियन्टेड मॉडेलिंग ऍण्ड डिझाईन’ या विषयासाठी मी वाचलेले सर्वोत्तम पुस्तक हे अतूल कहाते यांनी लिहिलेले आहे. एक मराठी लेखक म्हणून मी त्यांनी नेहमी वृत्तपत्रांतून वाचत आलो आहे. परंतु, त्यांनी टेक्निकल पुस्तक प्रथमच वाचण्यास मिळाले. या पुस्तकाचे नाव आहे- ’ऑब्जेक्ट ओरियन्टेड ऍनालिसिस ऍण्ड डिजाईन’. याशिवाय कहाते यांनी अनेक टेक्निकल रेफरन्स बुक्स लिहिलेली आहेत. तसेच अच्युत गोडबोले यांच्या सोबत मराठी मध्येही त्यांचे लिखाण चालूच आहे.

’मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ हा विषय जेव्हा मी शिकवायला घेतला तेव्हा त्यासंबंधी मला विशेष माहिती नव्हती. अभ्यासक्रमानुसार जेम्स ओब्रायन या लेखकाचे पुस्तक रेफरन्स बुक म्हणून देण्यात आले होते. नेहमीप्रमाणे “फॉरेन ऑथर” असल्याने अर्थातच त्याची भाषा समजायला थोडी अबघडच होती. परंतु, वामन जावडेकर यांचे ’मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम- डिजिटल फर्म पर्स्पेक्टीव्ह’ हे पुस्तक जेव्हा वाचायला मिळाले तेव्हा या विषयाचा पाया मला समजला, तसेच केवळ थियरी विषय असूनही त्यात खऱ्या अर्थाने गोडी निर्माण झाली. त्यांनी लिहिलेले व टाटा मॅग्रा हीलने प्रकाशित केलेले हे पुस्तक उत्कृष्ट पुस्तकांपैकीच एक आहे. माहिती तंत्रज्ञान अभियंत्यांना ’मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ म्हणजे नेमके काय? याची माहिती हे पुस्तक देते. आणि अर्थातच भाषा ही समजायला अत्यंत सोपी आहे.

’मराठी लेखकांनी संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात केवळ एवढीच पुस्तके लिहिलेली नाहीत. मी फक्त स्वत: वाचलेल्या पुस्तकांची माहिती इथे सादर केली. वाचकांना अधिक माहिती असल्यास त्यांनी इथे लिहावे...