Monday, July 17, 2023

होमो डेअस: मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध

होमो सेपियन्स अर्थात आपण अर्थात आजचा सर्वात प्रगत मानव. होमो सेपियन्सने मागच्या लाखो वर्षांपासून या जगावर राज्य केलं. परंतु त्याची आजवरची प्रगती पाहता यापुढे होमो सेपिअन्स कशा पद्धतीने वागतील? याचा नेम नाही. होमो सेपियन्स ज्या वेगाने प्रगती करत आहेत तो वेग कदाचित अन्य कोणत्याही  प्राण्याला आजवर गाठता आलेला नाही. यासाठी त्याने विकसित केलेले तंत्रज्ञान कारणीभूत आहे. आजवरची प्रगती पाहता भविष्यात होमो सेपियन्स हे होमो डेअस अर्थात भविष्यातील मानवाकडे कशा पद्धतीने प्रवास करतील, याची माहिती सांगणारे पुस्तक म्हणजे युवाल नोवा हरारी लिखित "होमो डेअस" होय.
हरारी यांचे सेपियन्स हे पुस्तक वाचल्यानंतरच मी त्यांचा मोठा चाहता झालो होतो. भूतकाळामध्ये इतिहासात होऊन गेलेल्या अनेक विचारवंतांबद्दल ऐकलं होतं. त्यांची पुस्तके देखील वाचली. पण आजच्या काळातील खराखुरा विचारवंत कसा असतो, याची माहिती किंबहुना प्रचिती सेपियन्स वाचल्यानंतर आली. सेपियन्स हे मानव जातीच्या इतिहासाचे पुस्तक होते. त्याचाच पुढचा खंड हरारी यांनी होमो डेअस या पुस्तकाद्वारे आणला आहे. हे पुस्तक म्हणजे आधुनिक विश्वाची सांगड घालणारं एक तत्त्वज्ञानाचे पुस्तक आहे. मला तर यातील वाक्यनवाक्य हे आधुनिक सुविचारांशी मिळतं जुळतं आहे, असं वाटलं. बरीच वाक्ये मी अजूनही बाजूला काढून ठेवलेली आहेत. त्यांचे विचार पटतात किंबहुना जुळतात म्हणून हे पुस्तक अधिक भावलं.
मानवी प्रगतीचा वेग पाहता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जेनेटिक इंजीनियरिंग या तंत्रज्ञानाद्वारे मानवाची भविष्यातील वाटचाल चालू राहणार आहे, असं हरारी म्हणतात. या तंत्रज्ञानाद्वारे कदाचित प्रत्यक्ष अस्तित्वात नसणारा देवही घडविण्याची ताकत मानवात आहे. सेपियन्समध्ये त्यांनी मानवानं देव, पैसा, समानता आणि स्वातंत्र्य यासारख्या काल्पनिक पण सर्वमान्य संकल्पनांवर विश्वास ठेवून सारं जग काबीज केलेले आहे, असं म्हटलं होतं. आणि या पुस्तकामध्ये इथून पुढचे जग मनुष्य कशा पद्धतीने काबीज करेल, याची माहिती दिलेली आहे. भूतकाळाची भविष्याशी घातलेली सांगड हा या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आज आपण तंत्रज्ञानाने घेरलेले आहोत. हे तंत्रज्ञान आपल्याला कुठवर येईल याची निश्चित माहिती सांगता येणार नाही. पण सद्य परिस्थिती पाहता इथून पुढे तंत्रज्ञानच मानवी आयुष्यावर नियंत्रण करू शकेल, हे मात्र निश्चित.
आज आपण स्वतःला पृथ्वीवरच्या देवांच्या रूपात घडवत असलो तर नेमके कोणते कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत? हे हरारी सांगतात. आपला ग्रह आजच्या मानवी करामती पाहता लवकरच मरणाच्या दिशेने प्रवास करताना दिसतो. आपणच आपल्या कबरी नकळतपणे खोदत चाललो आहोत. एकविसावे शतक तंत्रज्ञानाचे असलं तरी त्यातील विनाशकारी तोटे आपल्यावर वर्चस्व गाजवू शकतात. मग यातून बाहेर कसं  पडायचं? या मायाजालातून बाहेर पडणं खरोखर सोपं आहे का? याकरता कोणत्या विचारधारेची किंवा नवसंकल्पनेची आवश्यकता आहे? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून हरारी आपल्याला देतात. कादंबरी किंवा कथा नसली तरी वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकत लेखकाच्या लेखणीमध्ये आहे.
एकविसाव्या शतकाला आकार देत असताना होऊ शकणारा मानवी प्रवास हा अंधारमय आणि प्रकाशमय अशा दोन्ही वाटा दाखवतो. त्यातली कोणती वाट निवडायची हे मानवानेच ठरवायचे आहे. पुढचं शतक पाहताना मानवी प्रगती कुठपर्यंत वाटचाल करेल? याचा अंदाज हरारी यांना आलेलाच आहे. कदाचित त्यांनी आपल्याला सावध करण्यासाठी या पुस्तकाचा मार्ग अवलंबला असावा.

- तुषार भ. कुटे




Saturday, July 15, 2023

लंगर

चित्रपटाची सुरुवात होते ती ज्येष्ठ समाजसेवक अनिल अवचट यांच्या भाषणाने. खंडोबाच्या मुरळीच्या समस्येवर ते त्यांचे विचार मांडत असतात. यातीलच एक मुरळी अर्थात मालन होय. तिला इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले जाते आणि चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये जातो.
आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुरळीची प्रथा दिसून येते. अशाच एका कुटुंबातील मालन देखील याच प्रथेला बळी पडलेली आहे. खंडोबाच्या सेवेसाठी लहानपणीच तिला वाघ्या असणाऱ्या तिच्या मामाकडे पाठवले जाते.  इथूनच तिचा खडतर प्रवास सुरू होतो. खंडोबा सोडून इतर कुणा पुरुषाचा विचार करणे देखील त्यांना पाप असते. परंतु एक दिवस तिच्या जीवनामध्ये ‘त्याचा’ प्रवेश होतो. आयुष्य बदलू लागलं असतं. पण ते पुन्हा एकदा अनपेक्षित वळणावर जातं. आणि सुरू होते तिची फरपट. यातून ती आपल्या प्रियकराला आणि मामाला देखील गमावते. कधीतरी घरी येते तेव्हा वडील आणि भाऊ ओळख देखील दाखवत नाहीत. आईची मात्र जीवापाड माया असते. आयुष्याची ही फरपट सांगत असताना होणाऱ्या वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतात.
महाराष्ट्रातील अनेक सामाजिक समस्यांपैकी एक असणाऱ्या या मुरळीच्या कथेवर आधारित असणारा कदाचित हा एकमेव चित्रपट असावा.



Tuesday, July 11, 2023

बाबू बँड बाजा

संघर्ष हा मानवी जीवनाचा पाया आहे. याच संघर्षातून मनुष्य घडत असतो. वाईट परिस्थिती मनुष्याच्या जीवनाला योग्य दिशा देत असते. जे लोक इतिहासामध्ये घडले त्यांनी बऱ्याचदा अशाच वाईट परिस्थितींचा सामना केलेला असतो. याच प्रकारचे चित्रण दाखविणारा चित्रपट म्हणजे "बाबू बँड बाजा" होय.
गावाकडील लग्नामध्ये अंत्यविधीमध्ये तसेच विविध मंगल प्रसंगी बँड बाजा वाजविणारा जग्गू हा अतिशय हालाकीत जीवन जगत आहे. त्याची पत्नी देखील पैसे कमवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे करते. त्यांचा मुलगा बाबू हा मात्र दररोज शाळेमध्ये जातो. परंतु त्याच्या शालेय जीवनाला देखील संघर्षाची पार्श्वभूमी आहे. त्याच्याकडे गणवेश नाही. वह्या आणि पुस्तके देखील नाहीत. म्हणूनच गुरुजी त्याला सातत्याने टोचून बोलत असतात. यातून देखील तो आपल्या उपजत बुद्धिमत्तेमुळे शिकत असतो. एके दिवशी चुकून त्याचे दप्तर हरवले जाते आणि पुन्हा नव्या संघर्षाला सुरुवात होते. त्याच्या आईला अतिशय मनापासून वाटत असते की आपल्या मुलाने शिकावे आणि मोठे व्हावे. जे आपल्याला करता आले नाही ते त्याने करून दाखवावे. म्हणूनच ती जिद्दीने काम करत असते आणि आपल्या मुलाला शाळेमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन देत असते. त्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून पोट तिडकीने प्रयत्न करत असते. तिची तळमळ विविध प्रसंगातून आपल्याला दिसून येते. वडिलांना मात्र आपल्या कुटुंबाला जगवायचे असते. पण त्यांचा संघर्ष देखील वेगळ्या प्रकारचा आहे. गावात १०० लग्न एकाच वेळी होणार म्हटल्यावर त्यांचा व्यवसाय देखील बुडतो. कामे हातची जायला लागतात. अशा प्रसंगी एक निराळाच माणूस त्यांना मदत करतो. एकंदरीत हळूहळू सर्वकाही सुरळीत व्हायला सुरुवात झालेली असते. पण अचानक एक अनपेक्षित प्रसंग घडतो ज्याने बाबूच्या आयुष्याची दिशाच बदलून जाते आणि चित्रपट संपतो.
कोणालाही आवडेल अशी ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. भारतातल्या अनेक कुटुंबांच्या दैनंदिन जीवनातील संघर्षाची गोष्ट आहे. जी आपल्याला अनेक धडे शिकून जाते!

 


Friday, June 30, 2023

व्हॅनिला स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट

माथेरान म्हणजे महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आणि पर्यटकांचा ओघ असलेले डोंगरावरील एक गाव होय. याच गावाची पार्श्वभूमी या चित्रपटाला लाभलेली आहे. माथेरानमधील शाळेमध्ये जाणारी तेजू अर्थात तेजश्री ही पंधरा-सोळा वर्षांची मुलगी. तिच्या शाळेमध्ये व्हॅनिला नावाची एक कुत्री आहे. तिचे तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. परंतु घरी आवडत नसल्याने ती व्हॅनिलाला घरी आणू शकत नाही. पण या दोघींचे एकमेकांवरील प्रेम पूर्ण शाळेला किंबहुना पूर्ण माथेरानला ठाऊक आहे.
एक दिवस भटकी कुत्री पकडण्यासाठी तालुक्याहून माणसे गावामध्ये येतात. त्यामुळे तेजूला व्हॅनिलाला घरी आणावे लागते. अशातच तेजूची मोठी बहीण देखील गरोदरपणासाठी माहेरी आलेली असते. वडिलांची इच्छा नसताना देखील व्हॅनिलाला काही दिवस घरी ठेवले जाते. नंतर सर्वांनाच तिचा लळा लागतो. व्हॅनिला देखील गरोदर असल्याचे लक्षात येते. परंतु एक दिवस अचानक व्हॅनिला गायब होते. तिच्या शोधासाठी सर्वजण पूर्ण माथेरान पालथे घालतात. पण त्यांच्या हाती फारसे काही लागत नाही. अखेरीस ती त्यांच्या घराशेजारीच जखमी अवस्थेत सापडते आणि तिने पिलांना देखील जन्म दिलेला असतो. त्याच रात्री तिच्या मोठ्या बहिणीचे देखील बाळंतपण होते.
अशी या चित्रपटाची कथा आहे. काही वेगळ्या धाटणीचे नाव दिल्यामुळे या चित्रपटात नक्की काय असावे, याची उत्सुकता होती. या उत्सुकतेतूनच हा चित्रपट पाहिला. तसं पाहिलं तर हा एक 'बालपट' आहे. मुलांचे प्राणी प्रेम यातून दाखविण्याचा दिग्दर्शकाचा हा प्रयत्न दिसतो. कदाचित त्याला सत्य घटनेची देखील पार्श्वभूमी असावी. म्हणूनच माथेरान सारख्या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले आहे. तसेही चित्रीकरण दुसरीकडे कुठे केले असते तरी कथानकामध्ये फारसा फरक पडला नसता. बालकांचे भावविश्व उलगडून दाखविण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न मात्र या चित्रपटातून दिसून आला. व्हॅनिला हे नाव ठीक आहे पण स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट कुठून आले? याचा उलगडा मात्र शेवटच्या प्रसंगांमध्येच होतो. 



Saturday, June 24, 2023

पानिपतचा संग्राम

#पुस्तक_परीक्षण
#इतिहास
#सेतुमाधवराव_पगडी
मराठे आणि अब्दाली त्यांच्यामध्ये लढले गेलेले पानिपतचे तिसरे युद्ध म्हणजे मराठा साम्राज्याच्या भाळावरील भळभळती जखम होय. मराठ्यांच्या इतिहासामध्ये या ऐतिहासिक युद्धाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या युद्धाची मीमांसा करत असताना समकालीन साधनांचा आधार घ्यावा लागतो. तत्कालीन उपलब्ध असलेल्या अनेक मराठी तसेच फारसी साधनांमधून पानिपतच्या संग्रामामध्ये नक्की कोणत्या घटना कशा पद्धतीने घडल्या होत्या, याची माहिती मिळवता येते. ही मराठी आणि फारसी साधने पानिपतमध्ये घडलेल्या घटनांचे विस्तृतपणे वर्णन करतात. याद्वारे तत्कालीन युद्धाची परिस्थिती तसेच रणनीती आपल्याला ध्यानात यायला मदत होते.
अशाच मराठी आणि फारसी साधनांचा समावेश सेतू माधवराव पगडी यांनी प्रस्तुत ग्रंथामध्ये केला आहे. मराठी साधनांमध्ये प्रामुख्याने कुंजपुरा आणि पानिपतची पत्रे समाविष्ट आहेत. तर फारसी साधनांमध्ये तत्कालीन लिहिल्या गेलेल्या अनेक ग्रंथांचा व साधनांचा सहज व सुलभ मराठी अनुवाद पगडी यांनी या ग्रंथामध्ये दिलेला आहे. यातून पानिपतच्या रणांगणावर घडलेल्या घटनांची इत्यंभूत माहिती होऊन मराठ्यांच्या शौर्याची परंपरा सर्वसामान्य वाचकांना अभ्यासता येते.



आरॉन

कोकणातल्या एका छोट्या गावामध्ये राहणारा मुलगा म्हणजे बाबू. आपल्या काका आणि काकीसोबत तो राहत आहे. लहान असतानाच त्याची आई त्याला सोडून परदेशामध्ये अर्थात फ्रान्सला निघून गेलेली आहे. त्याच्या आईचा त्याच्यावर आणि त्याचा देखील आईवर खूप जीव आहे. परंतु ते भेटत असतात फक्त पत्रांमधून. पत्रांद्वारे होणारा हा संवाद मायेचा ओलावा टिकवून ठेवत असतो. कालांतराने हा पत्रसंवाद देखील कमी कमी होत जातो. बाबूवर जितके त्याच्या आईचे प्रेम असते तितकेच काका आणि काकीचे देखील असते. त्यांना मुल नसते. कदाचित याच कारणास्तव बाबूवर ते मुलाप्रमाणेच प्रेम करत असतात.
आपल्या वहिनीला वचन दिल्याप्रमाणे बाबूचे काका त्याला दहावीची परीक्षा झाल्यानंतर त्याच्या आईकडे सोडण्यासाठी निघतात. ही गोष्ट अपरिहार्यच असते. त्याच्या काकीला देखील त्याचा सहवास सोडवत नाही. पण तरीदेखील दोघेही फ्रान्सला जाण्यासाठी निघतात. प्रत्यक्ष पॅरिसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना असे समजते की बाबूची आई सध्या तिथे राहत नाही. तिचा कुठेच पत्ता नसतो. मग इथून सुरू होतो तिला परदेशामध्ये शोधण्याचा प्रवास. फ्रान्ससारख्या अनोळखी देशामध्ये दोघेही तिथल्या अन्य दोन अनोळखी लोकांना घेऊन बाबूच्या आईला शोधायला निघतात. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय छोट्या छोट्या घटनांमधून ते पुढचा मार्ग शोधत जातात.
चित्रपटाचे कथानक तसे साधे आणि सरळ आहे. पण मूळ कथा ही भावभावनांच्या खेळाभोवती गुंफल्याचे दिसते. चित्रपटाच्या अखेरीस बाबूला त्याची आई मिळते का आणि मिळाली जरी तरी तो तिच्यासोबत राहतो का या प्रश्नांची उत्तरे मिळतात.


 

Sunday, June 18, 2023

फेसबुक नावाचा व्हायरस

लोकसंख्येनुसार भारत जरी जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असला तरी इंटरनेट वापरकर्त्यांचा विचार केला तर फेसबुक हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल. आज जगभरातील २११ कोटी लोक फेसबुकचा वापर करतात. भारताचा विचार केला तर भारतात ३१ कोटी सक्रिय फेसबुक सदस्य आहेत. 'सक्रिय'चा अर्थ असा की ते दररोज एकदा तरी फेसबुक उघडून पाहतात. म्हणजेच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे असल्यास फेसबुक हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. परंतु हेच लोकभावना बिघडवण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वात मोठे माध्यम देखील आहे. 



फेसबुकच्या रिकमंडेशन सिस्टीम अल्गोरिदमनुसार आपण ज्या प्रकारच्या पोस्टवर अधिक काळ राहतो किंवा त्यावर क्लिक करतो, तशाच प्रकारच्या पोस्ट आपल्याला सातत्याने आणि वेगाने दिसायला लागतात. यातून मतपरिवर्तन होण्यास देखील मदत होते. फेसबुकचा हा सर्वाधिक विषारी अल्गोरिदम आहे. याद्वारे लोक अधिकाधिक आपला वेळ फेसबुकवर खर्च करतात. त्यामुळे फेसबुकला मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. परंतु यातून लोकांची मने देखील दूषित होण्याचा मोठा संभव असतो. खरंतर ही संभाव्यता नाही, ही वस्तुस्थिती आहे! फेसबुकमध्ये अर्थात मेटा कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने याबाबतीत गौप्यस्फोट देखील केला आहे. मागील काही वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर वाढल्यानंतरच भारतीय समाजामध्ये विषारी वातावरण तयार झाल्याचे दिसते. यात फेसबुकसारख्या माध्यमांचा सर्वात मोठा वाटा आहे. या माध्यमाद्वारे कोणतीही माहिती चुटकीसरशी पूर्ण जगभरामध्ये पोहोचते. ती खरी आहे ती खोटी याची शहानिशा देखील केली जात नाही. याच कारणास्तव सामाजिक सौहार्द आणि शांतता यांना निश्चितच धोका पोहोचला जात आहे. आधुनिक इंटरनेटवर वेगाने पसरलेला हा एक प्रकारचा धोकादायक व्हायरस म्हणता येईल. अजूनही सर्वसामान्य इंटरनेट वापरकर्त्यांना याविषयी निश्चित माहिती नाही. म्हणूनच लोक फेसबुकच्या अनिर्बंध वापराला बळी पडल्याचे दिसतात. राजकीय लोकदेखील याचा गैरफायदा करून घेत आहेत. आज आपण साक्षर तर झालो आहोत परंतु अजूनही 'इंटरनेट साक्षर' झालेलो नाही, असं दिसतं. कदाचित दुष्परिणाम वाढत गेल्यानंतर शहाणपण येऊ शकतं. परंतु त्यासाठी बराच काळ जावा लागेल.

- तुषार भ. कुटे.

Friday, June 9, 2023

ड्रीम मॉल

सई नावाची एक स्त्रीवादी विचारांची मुलगी आहे. एका फिल्म प्रोड्युसरकडे ती सध्या काम करत आहे. त्याचे कार्यालय 'ड्रीम मॉल' नावाच्या एका मोठ्या मॉलमध्ये स्थित आहे. सध्या ते एका हॉरर चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. बऱ्याचदा घरी जाण्यासाठी तिला आणि तिचा सहकारी सचिन याला उशीर होत असतो. त्या दिवशी देखील त्यांना असाच उशीर झालेला असतो. मॉलमधील सर्वच दुकाने बंद झालेली असतात. त्यांना सुरक्षा अधिकाऱ्याकडून बाहेर जाण्याकरता फोनही येतो. ते बाहेर जायला निघतात परंतु काही विचित्र घटना घडायला सुरुवात होते. सई पार्किंग मध्ये आल्यानंतर तिची भेट याच मॉलमधील सिक्युरिटी गार्डशी होते. त्याचं तिच्यावर अनेक दिवसांपासून प्रेम असतं. तिच्या पायी तो ठार वेडा झालेला असतो! यातून सुरू होते एक जीवघेणी पळापळ आणि झटापट!
मॉल बंद झालेला असतो. एकही दुकान उघडे नसते आणि त्यामध्ये या दोघांचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो.
सईची भूमिका नेहा जोशी तर सेक्युरिटी गार्डची भूमिका सिद्धार्थ जाधव याने साकारलेली आहे. पूर्ण चित्रपटात सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेमध्ये दिसून आलेला आहे. चित्रपटाच्या कथानकात तसं पाहिलं तर फारसा दम नाही. दोन्ही कलाकारांचा अभिनय सोडला तर चित्रपटाला फारसे गुण देता येणार नाहीत. सिद्धार्थला केवळ नकारात्मक भूमिकेमध्ये पाहायचे होते, म्हणून हा चित्रपट पाहिला. सध्या तरी पन्नास टक्के गुण देता येतील. अजूनही मराठी रहस्यपट वेगाने प्रगती करू शकतील... याला बराच वाव आहे, असे दिसते.