Showing posts with label blogs. Show all posts
Showing posts with label blogs. Show all posts

Sunday, September 6, 2026

तंत्रज्ञानाच्या साथीने बहरलेला माझा मराठी लेखनप्रवास: कोऱ्या कागदापासून ते 'व्हॉईस टायपिंग'पर्यंत

सन १९९९ चा तो काळ होता. 'सकाळ' वृत्तपत्र समूहाकडून तरुणांसाठी 'दै. युवा सकाळ' नावाचे विशेष वर्तमानपत्र प्रकाशित केली जात असे. तरुणांना व्यक्त होण्यासाठी आणि त्यांच्यातील लेखकाला चालना देण्यासाठी त्यात हक्काचे व्यासपीठ दिले जायचे. त्याकाळी माझी मराठी भाषेवर फारशी पकड नव्हती, परंतु केवळ एक उत्सुकता म्हणून मी 'युवा सकाळ'साठी पहिल्यांदाच एक छोटासा विनोद लिहून पाठवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो विनोद त्या पुरवणीत छापून आला! स्वतःच्या नावाने छापून आलेले ते पहिले 'साहित्य' पाहून मला जे अप्रूप वाटले, ते शब्दांत सांगता येणार नाही. नकळतपणे मिळालेल्या याच प्रोत्साहनातून मी विविध विषयांवर विचारमंथन करू लागलो आणि माझ्या प्रत्यक्ष लेखनाचा खऱ्या अर्थाने 'श्रीगणेशा' झाला. सुरुवातीच्या काळात लेखनाचा फारसा आत्मविश्वास नसल्याने, मी रेषा असलेल्या कागदांवर आधी कच्चे लिखाण करत असे. ते पुन्हा पुन्हा वाचून, योग्य ती शब्दरचना करून मग दुसऱ्या कागदावर स्वच्छ हस्ताक्षरात पक्के लिखाण करत असे. या प्रक्रियेत वेळ भरपूर जायचा, पण यामुळेच माझी एक स्वतंत्र लेखनशैली आकार घेऊ लागली होती. अवांतर वाचन वाढल्यामुळे शब्दसंग्रहही प्रगल्भ होत गेला. जसजसा अनुभव वाढत गेला, तसतशी थेट आणि अचूक वाक्यरचना करण्याची सवय जडली आणि कच्च्या लिखाणाची गरजच उरली नाही. अवघ्या पाच-सहा वर्षांच्या या सातत्यपूर्ण सरावानंतर, पूर्णपणे कोऱ्या कागदावर एका सरळ रेषेत आपले विचार अतिशय सुस्पष्टपणे मांडण्याचे कौशल्य मी आत्मसात केले.


पुढे संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना आणि पदवी पूर्ण केल्यानंतर, माझ्या या लेखनात खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाचा प्रवेश झाला. संगणकावर विविध देवनागरी फॉन्ट्सचा वापर करून मी मराठी टायपिंग शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला इंग्रजी कीबोर्डवर मराठी शब्द जुळवणे थोडे जिकिरीचे वाटायचे. पण साधारण २००८ च्या सुमारास, भारतात 'युनिकोड'चा वापर वाढू लागला. युनिकोडमुळे कोणत्याही विशिष्ट फॉन्टवर अवलंबून न राहता, आपण थेट संगणकावर मराठीत लिहू लागलो. त्याच काळात इंटरनेटवर 'बाराह' (Baraha) नावाचे एक अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर उपलब्ध झाले. यातील एडिटरमध्ये आपण भारतातील बारा भाषांपैकी हवी ती भाषा निवडून सहज टायपिंग करू शकत होतो. यात इंग्रजी अक्षरांचा वापर करून उच्चारांच्या साधर्म्यावरून (Phonetic Similarity) थेट देवनागरी लिपी टाईप केली जायची. ही पद्धत सोपी आणि वेगवान होती. याच तंत्रज्ञानाच्या साथीने मी २००९ मध्ये स्वतःचा ब्लॉग आणि संकेतस्थळ इंटरनेटवर प्रकाशित केले. नियमित ब्लॉग लेखनासाठी मी पूर्णपणे संगणकावर आधारित याच 'फोनेटिक' मराठी टायपिंगचा आधार घेऊ लागलो.

काही वर्षांनंतर गुगलने 'क्लाऊड इनपुट टूल्स' (Google Cloud Input Tools) आणले आणि संगणकावरील मराठी टायपिंग अधिकच सुखकर झाले. कमीत कमी कीज (Keys) वापरून अचूक देवनागरी शब्दरचना करणे शक्य झाल्याने माझे काम अधिकच सोपे व गतिमान झाले. मात्र, खरी क्रांती गेली पाच-सहा वर्षे अनुभवत असलेल्या गुगलच्या 'स्पीच रिकग्निशन' तंत्रज्ञानामुळे झाली. काहीही हाताने टाईप न करता, केवळ बोलून संगणकामध्ये आपोआप टाईप होण्याची ही सुविधा सुरुवातीला फक्त इंग्रजीपुरती मर्यादित होती. पण लवकरच गुगल डॉक्युमेंट्समध्ये सर्व भारतीय भाषांसाठी ही सुविधा उपलब्ध झाली आणि माझ्या लेखनाचा वेग अफाट वाढला. याच 'व्हॉईस टायपिंग'चा प्रभावी वापर करून मी सन २०२० च्या कोविड लॉकडाऊनच्या काळात 'पायथॉन प्रोग्रामिंग'वरील माझे पहिले मराठी ई-बुक केवळ दोन दिवसांत लिहून पूर्ण केले. सुरुवातीला मराठी भाषेचा डिजिटल डेटा कमी असल्याने याची अचूकता शंभर टक्के नव्हती, पण आज ती जवळपास १०० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. आता तर मी माझ्या अँड्रॉइड मोबाईलमधील 'गुगल कीप' (Google Keep) वापरून प्रवासात किंवा फावल्या वेळेत कुठेही लेख लिहू शकतो. मनात आलेले विचार फक्त मोबाईलमध्ये बोलायचे आणि ते आपोआप मराठीत टाईप होतात. नंतर लॅपटॉपवर केवळ पाच मिनिटांत थोडेफार बदल करून संपूर्ण मोठा लेख प्रकाशनासाठी तयार होतो, ज्यामुळे वेळेची मोठी बचत होते.

मागील पंचवीस वर्षांतील कागद-पेन ते थेट व्हॉईस टायपिंगपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास म्हणजे तंत्रज्ञानामुळे वेगाने बदललेल्या मानवी जीवनपद्धतीचे एक उत्तम उदाहरण आहे. एकेकाळी एखादे तंत्रज्ञान दशकानुदशके बदलत नसे, पण आता अतिशय सहज, सुलभ आणि आधुनिक पद्धतीने आपण संगणकावर अनेक गोष्टी करू शकतो. याच आधुनिक लेखन पद्धतींचा वापर करून संगणक आणि इंटरनेटच्या जगात मराठी भाषेतील ज्ञान साठवण्यासाठी तसेच तिचा जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. भविष्यात याहूनही अधिक प्रगत तंत्रज्ञान नक्कीच विकसित होईल आणि त्या माध्यमातून आपली मायबोली मराठी तंत्रज्ञानाच्या विश्वात अधिक वेगाने आणि दिमाखाने पसरेल, असा मला सार्थ विश्वास वाटतो.

--- तुषार भ. कुटे 

#मराठी #लेखन

Friday, January 2, 2026

दिवस संकल्पचा

एक जानेवारी अर्थात वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाच्या संकल्पचा दिवस देखील. बरोबर एक वर्षापूर्वी मी लिहून काढलेले संकल्प पुन्हा एकदा आठवले. त्यातले ५०% पेक्षा अधिक संकल्प देखील पूर्ण झाले नव्हते. तरीदेखील यावर्षी पुन्हा नव्याने, नव्या जोमाने संकल्प करायला सिद्ध झालो. वाचन, लेखन, आरोग्य आणि भ्रमंती याविषयीच बहुतांश संकल्प निगडित असतात. यावर्षी काही वेगळी परिस्थिती नाही. आपल्याला इतकेच पैसे मिळवायचे आहेत, असा काही संकल्प मी आजवर केलेला नाही. कदाचित याच कारणास्तव खोऱ्याने ओढता येईल इतका पैसा आमच्याकडे येत नाही. मागच्या दोन-तीन दिवसांपासून समाज माध्यमांवर विविध वर्तमानपत्रांच्या पानांवर कोणत्या राशीला शुभयोग आहेत? हे दाखवतायेत. त्यामध्ये माझी तूळ रास देखील आहे. या राशीला २०२६ मध्ये भरभराटीचा योग आहे, असं सर्वच ज्योतिषांचं म्हणणं आहे. माझा या ज्योतिषशास्त्रावर काडीचाही विश्वास नाही. पण तरी देखील आपल्या समाधानासाठी अशा गोष्टी मी देखील चवीने वाचतो. असो. आपले प्रयत्न करीत राहिलं की यश मिळतच, हे मी पक्क जाणून आहे. 
यावर्षीचा मुख्य संकल्प हा लेखनाचा आहे. मागच्या वर्षी तीन पुस्तकं लिहिली आणि प्रकाशित देखील झाली. ई-बुक्स विचार केला तर तीन-चार पुस्तक तर आरामात झाली होती. यावर्षी लिखाणाचा हा संकल्प अधिक वेगाने चालू ठेवायचा आहे. जी पुस्तकं मला यावर्षी लिहायची आहेत त्यांची मुखपृष्ठ तयार केले प्रिंट काढल्या आणि समोरच्या भिंतीवर लावून ठेवलेल्या आहेत. जेणेकरून मला सातत्याने या पुस्तकांची आठवण होत राहील. यावर्षी प्राकृत प्रकाशनाच्या प्रगतीकडे अधिक जोमाने लक्ष द्यायचे आहे. कमीत कमी २५ प्रिंट पुस्तके तरी बाजारात यावी, असा मानस आहे. वाचनाचा संकल्प विचारात घेतला तर यावर्षी अधिकाधिक पुस्तके वाचून काढू असं मनाशीच ठरवलं आहे. त्या दृष्टीने आज पहिल्याच दिवशी ऋषिकेश गुप्ते यांची दोन पुस्तकं वाचून काढली. त्यापैकी एक दीर्घकथासंग्रह तर दुसरी लघुकादंबरी होती. वाचनाला वेग तर येतो आहे. बघूया पुढे काय होतं ते. 
लिखाणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अन्य संगणक तंत्रज्ञानाशी निगडित बरेच विषय मनात घोळत आहेत. प्रिंट बुक नाही निघाल्या तरी यावर्षी निदान ई-बुक तरी प्रकाशित करायचं असं ठरवलं आहे. मागच्या वर्षी कमीत कमी बारा किल्ल्यांची भ्रमंती करावी असं ठरवलं होतं. परंतु प्रत्यक्षात केवळ एकाच किल्ल्यावर जाता आले. बारास एक हे गुणोत्तर अगदीच नगण्य आहे. कदाचित यावर्षी किमान १२ चा आकडा तरी पार करू असं वाटतंय. 
बऱ्याच गोष्टींचा दृश्यीकरण करणं अतिशय महत्त्वाचं असतं. ज्या मधून ती गोष्ट सातत्याने आपल्या मनावर ठासत राहते. म्हणूनच सर्व गोष्टी लिहून आणि सातत्याने डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न राहील. मागील वर्ष अतिशय खराब होतं. एकंदरीतच आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये घडलेल्या नकारात्मक घडामोडींमुळे २०२५ काही चांगले गेले नाही. परंतु २०२६ मध्ये परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होईल, अशी आशा आहे. बघूया नव्या सकारात्मक दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात तर झाली आहेत आता पुढची पावले अधिक आत्मविश्वासाने टाकता येतील.


--- तुषार भ. कुटे 

Friday, June 22, 2012

शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर


विज्ञानाच्या कक्षा अधिकाधिक रुंदावत असताना संगणक क्षेत्रातील प्रगतीचा वेग मात्र अफ़ाट असल्याचा दिसून येते. माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार तंत्रज्ञान या दोहोंच्याही प्रगतीच्या वेगाला सीमाच नाही. रोज नवनव्या संकल्पना संगणक विश्वात येऊ घालत आहेत. तंत्रज्ञानातील अशा विविध संपल्पनांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात आता अपरिहार्य होऊ पाहत आहे. शिक्षण क्षेत्र हे तंत्रज्ञानाच्या वापरापासून आता दूर राहू शकलेले नाही. एका अर्थाने तंत्रज्ञानातून साध्य वेगाची भुरळ ही प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे शिक्षणपद्धतीत बदल हा निश्चितच घडत आहे व तो स्वागतार्ह मानला पाहीजे. पाश्चिमात्य देशांमध्ये शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती घडवून आणली. याच कारणामुळे तेथील शिक्षणाच्या दर्जात व वेगातही वाढ झालेली आहे. या गोष्टी भारतीय शिक्षणक्षेत्रातही रुजणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारच्या आधुनिकीकरणाने आपण भारतीय शिक्षणपद्धतीचा दर्जा निश्चित सुधारु शकु. माहिती तंत्रज्ञानाचा वापर एक शिक्षक म्हणून रोजच्या शिक्षणात कसा करता येऊ शकेल, याचाच आढावा घेत असलेला हा लेख.
शहरात संगणक वापरकर्त्यांची संख्या जशी वाढत आहे तशी ती ग्रामीण भागातही वाढत आहे. आज संगणकाच्या किमती बऱ्याच अंशी कमी झाल्याने शहरी व ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय जनांना आता संगणक विकत घेणे हे परवडण्यासारखे आहे. इंटरनेटच्या वापराविषयी आजची युवा पिढी अतिशय जागरूक झाली आहे. अगदी १२-१३ वर्षाचा मुलगाही इंटरनेट सहजपणे वापरु लागतो. शिवाय बीएसएनएल सारख्या सरकारी कंपन्यांनी अतिशय कमी दरात इंटरनेट सुविधा सर्वसामान्यांच्या घरात पोहचवली आहे. इंटरनेटविषयी कुतूहल असणारी मुले बहुतांश वेळा संगणकीय खेळ खेळण्यासाठी किंवा चित्रपट पाहण्यासाठी व गाणी ऐकण्यासाठी संगणक व इंटरनेटचा वापर करतात. अर्थातच, हा संगणक व इंटरनेटचा ’योग्य’ उपयोग निश्चित नाही. परंतु संगणकाचा वापर एखाच्या शिक्षकाने ठरविले तर खुपच उत्तम प्रकारे विद्यार्थांच्या दैनंदिन जीवनात शिक्षणासाठी करवून घेता येऊ शकतो. त्याचे काही उदाहरणे पहा.
           १) पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अर्थात PPT
संगणकाद्वारे सादरीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वोत्तम सॉफ़्टवेअर म्हणजे मायक्रोसॉफ्टचे ’पॉवरपॉइंट’ होय. विविध तंत्रज्ञान संस्थांमध्ये PPT चा वापर आपल्या विषयाचे सादरीकरण करण्यासाठी केला जातो. खडू व फळा या पारंपारीक पद्धतीला पर्याय म्हणून या संगणकीय पद्धतीचा वापर होतो. त्याचा वापर तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थांना अपरिहार्य आहे. परंतू केवळ तंत्रज्ञानाशीच याचा संबंध न राहता संपूर्ण शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांसाठी PPT चा वापर करता येऊ शकतो. अनेक पाश्चिमात्य संस्थांनी विविध ज्ञानशाखांकरिता PPT ह्या इंटरनेटवर उपलब्ध करुन दिल्या आहेत. शिवाय त्या इंटरनेटवरून डाऊनलोडही करता येतात. अशा प्रकारचा एक प्रकल्प अमेरिकेतील ’एमआयटी’ संस्थ्येने 'Open Course Ware' या नावाखाली इंटरनेटद्वारे उपलब्ध करुन दिला आहे. ह्यातील विविध विषयांवरील PPT मुलांना अभ्यास म्हणून उपलब्ध करुन दिल्यास, ते निश्चितच संगणकाद्वारे अभ्यास करु शकतील.
२) गुगल न्युजग्रुप:-
News Group ही संकल्पना पाश्चिमात्य देशांत जवळपास तीस पेक्षा अधिक वर्षांपासून राबवली जात आहे. संगणक क्षेत्रातील अनेक शोध हे न्युजग्रुप मुळेच प्रकाशझोतात आले. असे असले तरी भारतात ही संकल्पना फ़ारशी रुजलेली नाही. न्युजग्रुप मध्ये इंटरनेटद्वारे विविध चर्चा सत्रे व बातमी विवरण सत्रे आयोजित केली जातात. त्याचा वापर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी होतो. एका विशिष्ट विषयाला वाहिलेले लाखो न्युजग्रूप्स हे गूगलवर उपलब्ध आहेत. अशा ग्रूप्सचे ईमेलद्वारे सभासद होऊन एखाद्या विशिष्ट विषयावरची नवनवी माहिती मिळवता येऊ शकते. शिवाय शिक्षकही असे न्युजग्रूप्स तयार करुन विद्यार्थ्यांशी माहितीची देवाणघेवाण करू शकतात. याची माहिती groups.google.com वर उपलब्ध आहे.
३) गूगल साईट्स:-
स्वत:ची मोफत साईट तयार करण्याची संकल्पना गूगलने यशस्वीपणे राबवली आहे. ’याहू’ने तयार केलेली geocities ही मोफत साईट्सची सुविधा बंद झाल्याने गूगल साईट्सने मोठी झेप घेतली. गूगलच्या या सुविधेद्वारे आपल्याला स्वत:ची मोफत साईट तयार बनविता येते. त्यासाठी वेबसाईट बनविता येणारे सॉफ्टवेअर वा संगणक भाषा वापरण्याची आवश्यकता नसते. ह्या वेबसाईटचा पत्ता sites.google.com/sites ने सुरू होतो. १०० मेगाबाईट्स पर्यंत माहिती आपण एका वेबसाईटवर साठवू शकतो. एखाद्या विषयावरची इत्यंभूत माहिती देण्याकरिता अशा प्रकारच्या साईट्सचा वापर करता येतो. विषयाची ई-बुक प्रश्नसंच, बोर्डाच्या / विद्यापीठाच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका यासारखे soft copy साहित्य आपल्या साईट्सला जोडता येतात व जगातून ती साईट कुठुनही उघडल्यास डाऊनलोडही करता येतात. ई-मेल न वापरता विविध विषयांवरील माहितीची देवाणघेवाण करण्याकरिता हे उत्तम साधन आहे. स्वत:ची वेबसाईट तयार करण्यासाठी sites.google.com ला भेट द्यावी लागेल.
४) युट्युब (व्हीडिओ साईट):-
विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी वापरण्यात येणारी जगातील सर्वात मोठी वेबसाईट म्हणजे youtube.com होय. गेल्या तीन वर्षांपासून या वेबसाईटची लोकप्रियता कैकपटीने वाढली आहे. ती इतकी आहे की, आज इंटरनेटवरील कोणताही व्हिडिओ प्रथम युट्युबवर शोधला जातो. याच कारणास्तव जगातील अनेक नामांकित संस्थांनी त्यांचे व्हिडिओ लेक्चर्स या वेबसाईटवर अपलोड केले आहेत, जे जगात कुठेही पाहता येतात. शिवाय आयआयटी व आयआयएम सारख्या भारतीय संस्थाही याच वेबसाईटवर आपले व्हिडिओ अपलोड करत असतात. अशा प्रकारे युट्युबने ज्ञानाचे विपुल भांडार उपलब्ध करून दिले आहे. त्यातील आपल्याला हवे असलेले उपयुक्त व्हिडिओ डाऊनलोड करून किंवा थेट ऑनलाईन विद्यार्थ्यांसोबत प्रदर्शित करता येऊ शकतात. वर्गात मिळाणाऱ्या ज्ञानाबरोबरच इतर ज्ञानाचाही स्त्रोत म्हणुन युट्युबचा वापर करता येवू शकेल.
५) ब्लॉग:-
इंटरनेटद्वारे आपले विचार आपल्या भाषेत खुलेपणाने मांडण्याकरिता गेल्या काही वर्षांपासून ब्लॉग या संकल्पनेची लोकप्रियता वाढत आहे. केवळ अभ्यासक्रमातीलच नव्हे तर दिशादर्शक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी ब्लॉगचा वापर शिक्षकांद्वारे करता येऊ शकतो. ब्लॉगचे विश्व इंटरनेटद्वारे झपाट्याने विस्तारले आहे. लहान मुलांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेक जण ब्लॉगच्या माध्यमातून विचारमंथन करत असतात. मार्गदर्शक ब्लॉग लिहुन शिक्षक नक्कीच विद्यार्थ्यांच्या करियरला नवी दिशा देऊ शकतात. ज्या गोष्टी सांगण्यासाठी शिक्षकांना वर्गात वेळ मिळत नाही, अशा अनेक मार्गदर्शक गोष्टी ब्लॉगमधुन मांडता येतील. शिवाय आज संगणकात ’युनिकोड’ उपलब्ध झाल्याने सर्वच भारतीय भाषांत ब्लॉग लिहिता येतात. या युनिकोडचा वापर केवळ ब्लॉगपुरताच मर्यादित नसुन इंटरनेटवर प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर करता येतो. त्याची अधिक माहिती www.baraha.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. शिवाय ब्लॉग तयार करण्यासाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या वेबसाईटस आहेत:- blogger.com व wordpress.com.
६) SMS चॅनेल:-
एकाच वेळी अनेक जणांना माहितीवजा SMS पाठविण्यासाठी गूगलने तयार केलेली सेवा म्हणजे SMS channel होय. याद्वारे आपल्याला स्वत:चे SMS channel तयार करता येते व एकाच वेळी अनेकांना SMS पाठविता येतात. गूगलच्या विश्वात अनेक माहितीपूर्ण SMS channel उपलब्ध आहेत. ज्याद्वारे विविध विषयांवरील नवी व जुनी माहिती SMS द्वारे मिळवता येते. विद्यार्थ्यांना अशी उपयुक्त माहिती देण्याकरिता शिक्षक असे SMS channel तयार करू शकतात. मोबाईलचा विधायक वापर करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्याची माहिती labs.google.co.in वर उपलब्ध आहे.
७) सोशल नेटवर्किंग:-
आजची युवा पिढी फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सला चिकटुन असते. विविध गोष्टी ’शेयर’ करण्यासाठी व नवे मित्र जोडण्याकरिता फेसबुकची मदत होते. याच फेसबुक बरोबरच twitter सारख्या मायक्रोब्लॉगिंग साईटसचाही विद्यार्थ्यांशी इंटरनेटद्वारे संवाद साधण्याकरिता उपयोग करता येऊ शकेल.
वरील सातही संकल्पना मी माझ्या दृष्टीने सादर केल्या आहेत. त्यामुळे शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर केवळ यापुरताच मर्यांदित नाही, तो ज्याच्या-त्याच्या दृष्टीकोनावर अवलंबुन आहे. भविष्यात शिक्षणपद्धतीला गती येण्यासाठी अशा तंत्रांचा वापर वाढत जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी याचा वापर आतापासूनच सुरू केल्यास त्याच्या निश्चितच चांगला फायदा मिळू शकेल.
                                                                  - तुषार भ. कुटे....