Showing posts with label new year. Show all posts
Showing posts with label new year. Show all posts

Friday, January 2, 2026

दिवस संकल्पचा

एक जानेवारी अर्थात वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाच्या संकल्पचा दिवस देखील. बरोबर एक वर्षापूर्वी मी लिहून काढलेले संकल्प पुन्हा एकदा आठवले. त्यातले ५०% पेक्षा अधिक संकल्प देखील पूर्ण झाले नव्हते. तरीदेखील यावर्षी पुन्हा नव्याने, नव्या जोमाने संकल्प करायला सिद्ध झालो. वाचन, लेखन, आरोग्य आणि भ्रमंती याविषयीच बहुतांश संकल्प निगडित असतात. यावर्षी काही वेगळी परिस्थिती नाही. आपल्याला इतकेच पैसे मिळवायचे आहेत, असा काही संकल्प मी आजवर केलेला नाही. कदाचित याच कारणास्तव खोऱ्याने ओढता येईल इतका पैसा आमच्याकडे येत नाही. मागच्या दोन-तीन दिवसांपासून समाज माध्यमांवर विविध वर्तमानपत्रांच्या पानांवर कोणत्या राशीला शुभयोग आहेत? हे दाखवतायेत. त्यामध्ये माझी तूळ रास देखील आहे. या राशीला २०२६ मध्ये भरभराटीचा योग आहे, असं सर्वच ज्योतिषांचं म्हणणं आहे. माझा या ज्योतिषशास्त्रावर काडीचाही विश्वास नाही. पण तरी देखील आपल्या समाधानासाठी अशा गोष्टी मी देखील चवीने वाचतो. असो. आपले प्रयत्न करीत राहिलं की यश मिळतच, हे मी पक्क जाणून आहे. 
यावर्षीचा मुख्य संकल्प हा लेखनाचा आहे. मागच्या वर्षी तीन पुस्तकं लिहिली आणि प्रकाशित देखील झाली. ई-बुक्स विचार केला तर तीन-चार पुस्तक तर आरामात झाली होती. यावर्षी लिखाणाचा हा संकल्प अधिक वेगाने चालू ठेवायचा आहे. जी पुस्तकं मला यावर्षी लिहायची आहेत त्यांची मुखपृष्ठ तयार केले प्रिंट काढल्या आणि समोरच्या भिंतीवर लावून ठेवलेल्या आहेत. जेणेकरून मला सातत्याने या पुस्तकांची आठवण होत राहील. यावर्षी प्राकृत प्रकाशनाच्या प्रगतीकडे अधिक जोमाने लक्ष द्यायचे आहे. कमीत कमी २५ प्रिंट पुस्तके तरी बाजारात यावी, असा मानस आहे. वाचनाचा संकल्प विचारात घेतला तर यावर्षी अधिकाधिक पुस्तके वाचून काढू असं मनाशीच ठरवलं आहे. त्या दृष्टीने आज पहिल्याच दिवशी ऋषिकेश गुप्ते यांची दोन पुस्तकं वाचून काढली. त्यापैकी एक दीर्घकथासंग्रह तर दुसरी लघुकादंबरी होती. वाचनाला वेग तर येतो आहे. बघूया पुढे काय होतं ते. 
लिखाणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अन्य संगणक तंत्रज्ञानाशी निगडित बरेच विषय मनात घोळत आहेत. प्रिंट बुक नाही निघाल्या तरी यावर्षी निदान ई-बुक तरी प्रकाशित करायचं असं ठरवलं आहे. मागच्या वर्षी कमीत कमी बारा किल्ल्यांची भ्रमंती करावी असं ठरवलं होतं. परंतु प्रत्यक्षात केवळ एकाच किल्ल्यावर जाता आले. बारास एक हे गुणोत्तर अगदीच नगण्य आहे. कदाचित यावर्षी किमान १२ चा आकडा तरी पार करू असं वाटतंय. 
बऱ्याच गोष्टींचा दृश्यीकरण करणं अतिशय महत्त्वाचं असतं. ज्या मधून ती गोष्ट सातत्याने आपल्या मनावर ठासत राहते. म्हणूनच सर्व गोष्टी लिहून आणि सातत्याने डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न राहील. मागील वर्ष अतिशय खराब होतं. एकंदरीतच आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये घडलेल्या नकारात्मक घडामोडींमुळे २०२५ काही चांगले गेले नाही. परंतु २०२६ मध्ये परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होईल, अशी आशा आहे. बघूया नव्या सकारात्मक दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात तर झाली आहेत आता पुढची पावले अधिक आत्मविश्वासाने टाकता येतील.


--- तुषार भ. कुटे 

Sunday, March 30, 2025

गौतमीपुत्राचा विजयोत्सव

मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा. हा दिवस का साजरा केला जातो, याविषयी समाजमाध्यमांवर विविध पोस्टच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती प्रसारित होताना दिसते. अनेकांनी याला हिंदू नववर्षाचे नाव देखील दिलेले आहे. खरं पाहिलं तर गुढी उभारण्याची परंपरा फक्त महाराष्ट्राच्या अर्थात मराठी भाषिकांच्या प्रदेशांमध्येच दिसून येते. यासाठी कोणतेही धार्मिक कारण नाही. समाजमाध्यमांवरील विविध पोस्टमध्ये नानाविध भोळीभाबडी कारणे दिसून आली. तेव्हा महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर संशोधन करणाऱ्या काही महत्त्वाच्या संशोधकांच्या पुस्तकांचा मी संदर्भ घेतला. आणि त्यामधील माहितीच प्रमाण मानावी अशी दिसून आली.
सातवाहन राजवंश म्हणजे महाराष्ट्राचा निर्माणकर्ता. त्यांच्या साडेचारशे वर्षांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण झाली. याच राजवंशातील विसावा राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी होय. ज्याने इसवी सन ७८ मध्ये शकांचा पराभव केला. त्याच वर्षापासून शालिवाहन शक सुरू झाला. हे इतिहास संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. अर्थात इतिहास संशोधकांच्या प्रत्येक पुस्तकांमध्ये हीच गोष्ट नमूद केलेली दिसते. गौतमीपुत्र सातकर्णीचा विजयोत्सव आपण मागील १९४७ वर्षे साजरा करत आलेलो आहोत. ९९ टक्के पेक्षा अधिक मराठी लोकांना सातवाहनांच्या या राजाचे नाव देखील कदाचित माहीत नसावे. यानिमित्ताने एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली की, गुढीपाडवा हा मराठी मातीतील खराखुरा मराठमोळा सण आहे.

सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

— तुषार व कुटे.

संदर्भ:
१. मुसलमानपूर्व महाराष्ट्र, लेखक वासुदेव कृष्ण भावे, वरदा प्रकाशन, पान क्रमांक १८
२. महाराष्ट्राची कुळकथा,  लेखक डॉ. मधुकर केशव ढवळीकर, राजहंस प्रकाशन, पान क्रमांक ८५
३. सातवाहनकालीन महाराष्ट्र ,लेखक रा. श्री. मोरवंचीकर, प्रतिमा प्रकाशन, पान क्रमांक ७१
४. जुन्नरच्या परिसरात,  लेखक प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पान क्रमांक १९९
५. Junnar Inscriptions, Author: Shobhana Gokhale, Page No. 17

 






Monday, April 12, 2021

गुढी: गौतमीपुत्राच्या विजयाचे प्रतिक

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. या दिवसाचे स्वागत महाराष्ट्रामध्ये गुढ्या उभारुन केले जाते. याच दिवशी महाराष्ट्राचा सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा अर्थात क्षत्रप राजा नहपान याचे हनन केले होते. या महान घटनेच्या निमित्ताने चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. जागतिक कॅलेंडर अर्थात ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार १ जानेवारी रोजी नवे वर्ष सुरू होत असते. महाराष्ट्रीय कालगणनेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी नववर्ष सुरू होते. भारतातल्या सर्व भाषिक संस्कृतीमध्ये निरनिराळ्या दिवशी नववर्ष साजरे केले जाते. जसे गुजरात मध्ये दिवाळी पाडव्याला नववर्ष सुरू होते. तर पंजाब व बंगाल मध्ये ते बैसाखी म्हणून साजरे केले जाते. अनेक जण गुढीपाडव्याचा संबंध काही पौराणिक घटनांशी जोडतात. जर तसे असते तर गुढीपाडवा केवळ महाराष्ट्रातच साजरा केला गेला नसता.
सातवाहन हे नाव आपण इतिहासात अनेक वेळा ऐकतो. बऱ्याचदा त्याची त्रोटक माहिती दिलेली असते. हेच सातवाहन दोन हजार वर्षांपूर्वी राज्य करणारे महाराष्ट्राचे पहिले निर्माते होत. इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २३० अशी जवळपास साडेचारशे वर्षे सातवाहनांनी महाराष्ट्रावर सत्ता गाजवली व महाराष्ट्रीयांचा सांभाळ केला. महाराष्ट्रातील अनेक गिरिदुर्ग व लेण्या ही सातवाहनांची निर्मिती आहे. इसवीसन ७८ पासून शालिवाहन शक सुरु होतो. शालिवाहन हा मूळ शब्द "सालाहण" असा आहे. तसेच सातवाहन हेही मूळचे "छातवाहन" होय! याचा अर्थ पर्वत निवासी असा होतो. सिमुक सातवाहन हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. त्याच्यामुळेच या घराण्यातील राज्यकर्त्यांना सातवाहन म्हटले जाते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या कालखंडात महाराष्ट्र व बहुतांश भारतीय भूप्रदेशावर क्षत्रप या परकीय घराण्याची सत्ता होती. जुन्नर ही त्यांची राजधानी होती. तसेच पैठण, नाशिक सारखी व्यापारी केंद्रे बहुतांश महाराष्ट्र क्षत्रपांच्या अधिपत्याखाली होती. गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन घराण्यातील विसावा राजा होय. क्षत्रप राजा शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या पूर्वज राज्यकर्त्यांवर वारंवार आक्रमणे करून सातवाहन सत्ता खिळखिळी करून टाकली होती. गौतमीपुत्राचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याच्याकडे केवळ साताऱ्याच्या आजूबाजूचा परिसर होता. कोकण, मराठवाडा, खानदेश परिसर नहपानाचा सत्तेखाली चालत असत. महाराष्ट्रीय प्रजा या राजवटीत गुलामीचे जीणे जगत होती. परंतु गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाविरुद्ध संघर्षाला सुरुवात केली. त्याने क्षत्रपांशी अनेक युद्धे केली. अखेर महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे युद्ध सातवाहन व नहपानामध्ये नाशिकच्या गोवर्धन येथे इसवी सन ७८ मध्ये झाले. याच गौतमीपुत्राने नहपानाचा पराभव केला. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. नाशिकच्या पांडवलेणीतील एका शिलालेखात उल्लेख आहे, 'क्षहरात वंस निर्वंस करत' अर्थात गौतमीपुत्राची क्षत्रपांच्या निर्वंश करणारा राजा, अशी प्रशंसा केली आहे. गौतमीपुत्राने आपले साम्राज्य पूर्ण महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातही वाढवले व महाराष्ट्राची खरी भरभराट सुरू झाली. सह्याद्रीतील दुर्गम गिरिदुर्ग बांधले गेले. पूर्वीपासूनच ग्रीक व रोमन सत्तांशी व्यापार चालू झाला होता. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सातवाहनांनी अनेक घाट तयार केले. गौतमीपुत्राने सातवाहनांची खरी ख्याती वाढवली. त्यामुळेच सातवाहनांना तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत ते सातवाहन अर्थात त्रीसमुद्रतोयवाहन असे अभिमानाने म्हटले जाऊ लागले. गौतमीपुत्राच्या नावापुढे शकारी अशीही पदवी लावली जाते. यावरूनच शकांवरील विजयाचे महत्व प्रतीत होते. महाराष्ट्रीय जनता गेली १९४२ वर्षे गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाचा दिवस साजरा करीत आहे. हा दिवस मराठी संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो. गुढी उभारताना सकाळी गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण महाराष्ट्रीयांनी करायलाच हवी.