Thursday, February 13, 2020

एरंडाचे गुऱ्हाळ - चि. वि. जोशी

शालेय अभ्यासक्रम संपल्यानंतर थेट एम. ए. च्या अभ्यासात चि.वि. जोशी यांचं नाव पुन:श्च ऐकलं. शिवाय त्यांनी सुमारे नव्वद वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'एरंडाचे गुऱ्हाळ' या पुस्तका संबंधात फक्त ऐकीव माहिती होती.

अर्थातच चि. वि. जोशी यांचे मी वाचलेले हे पहिलेच पुस्तक! विनोद करणं ही खरोखर सर्वात आव्हानात्मक गोष्ट आहे.  त्यामुळे विनोदी लेखक, विनोदी कवी व विनोदी नट हे त्यांच्या क्षेत्रातले खरे राजे असतात.  पु.  ल.  देशपांडे यांच्या आधी चि. वि. जोशी यांनी मराठी विनोदी साहित्य विश्व सजवले. त्याच काळातील हे पुस्तक होय. विविध घटनांना जोशींनी अगदी खुमासदार पद्धतीने रंगवले आहे. कुठेही अतिशयोक्ती जाणवत नाही. यातील अनेक विनोदी कथा या संपादक व प्रकाशक या लेखनाशी संबंधीत दोन जातींची आहे. कदाचित चि. वि. जोशी त्यांना स्वतः मध्ये पाहत असावेत. इतकं मात्र नक्की की, आजच्या शतकानंतरही वाचावीशी अशी पुस्तके, तीही विनोदी फार कमी आहेत. त्यातीलच हे एक पुस्तक!

Tuesday, January 28, 2020

शालिवाहन शक - गोविंद नारायण दातारशास्त्री

महाराष्ट्रावर अनेक वर्षे राज्य करणाऱ्या परकीय शकांचा महाराष्ट्रीय सातवाहनांनी केलेला पराभव ही इतिहासातील एक मोठी घटना होती व त्यातील युद्धही ऐतिहासिकच होते. परंतु, आजवर या विषयावर वाहिलेली कादंबरी वाचनात आली नाही. हाच विषय घेऊन गोविंद नारायण दातारशास्त्री यांनी 'शालिवाहन शक' ही कादंबरी लिहिली आहे. सातवाहनांनी शकांचा महाराष्ट्रातून समूळ नाश केल्यानंतर महाराष्ट्रीय शके परंपरा चालू झाली. इसवी सन ७८ च्या सुमारास सदर युद्ध झाले होते. या युद्धास मध्यवर्ती ठेवून दातारशास्त्रींनी ही कादंबरी लिहिली आहे. विशेष म्हणजे पूर्ण कथा ही नाशिक व परिसरात घडल्याचे दिसते. ती सुरू होते सातमाळा रांगेतल्या पहिल्या अहिवंत दुर्गा पासून.
कथेची नायक-नायिका हे देवरात-कामंदकी आहेत. त्यांना या दुर्गावर बऱ्याच रहस्यमय गोष्टी आढळून येतात. त्याची उकल उर्वरित कादंबरीत करण्यात आलीये. देवरत व कामंदकीसोबत सेनापती शर्विलक हाही कादंबरीतील महत्त्वाचा नायक आहे. अहिवंत गडापासून सुरु झालेला प्रवास सप्तशृंगगड, बल्लीपुर, दंडपुर (दिंडोरी), पालखेड, रामशेज, नाशिक, अंजनीदुर्ग (अंजनेरी) ते गोवर्धनला येऊन विसावतो. दातारशास्त्रीनी त्यांच्या अनोख्या शैलीत ही कादंबरी रंगवली आहे. त्यामुळे इतिहास, पुरातनकाल व रहस्य यात विशेष रुची असणाऱ्यांनाही कादंबरी निश्चित आवडेल.


ऐतिहासिक संदर्भ:
१. क्षत्रप राजा नहपानाचा नाशिकच्या गोवर्धन येथे मोठा राजवाडा होता व तिथेच सातवाहन व शकांचे युद्ध झाले.
२. त्रिरश्मी अर्थात पांडवलेणी काही शकांनी तर काही सातवाहनांनी बांधली आहेत.
३. या युद्धात सातवाहनांनी शकांचा समूळ नाश केला होता.

बिगर ऐतिहासिक नाटकीय संदर्भ:
१. वासिष्ठीपुत्र पुळुमावीने क्षत्रप राजा नहपानाचा पराभव केला, असे कादंबरीत दाखवण्यात आलेले आहे. परंतु, प्रत्यक्ष इतिहासात गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा पराभव केल्याचे दिसते. पुळुमावी हा सातकर्णीचा मुलगा होता. महाराणी गौतमी बलश्री व सातकर्णी याचा उल्लेख नाशिकच्या पांडवलेणीत देखील आहेत. त्याचा संदर्भ इथे दिसत नाही.
२. चकोर, शिवश्री व हकुश्री सातकर्णी यांचे झालेले उल्लेख.
३. कामंदकी हिने 'कामंदकिय नीतिसार' लिहिल्याचे कादंबरीत म्हटले आहे. प्रत्यक्षात हा नीतिसार कामंदक की कामंदकिने लिहिले यात अजूनही इतिहासकारांत एकमत नाही. शिवाय सदर पुस्तक इसवीसन आठव्या शतकात लिहिले आहे. ते या कादंबरीत पहिल्या शतकात लिहील्याचे दाखवले आहे.
सदर युद्ध हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते, यात शंका नाही. या ऐतिहासिक घटना आज महाराष्ट्राच्या अतिशय नगण्य लोकांना ज्ञात आहेत. 'शालिवाहन शक' या अनेक दशकांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकामुळे निदान त्या महाराष्ट्रीय लोकांना समजतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

Friday, December 20, 2019

एका पुस्तक प्रदर्शनात

मागच्या आठवड्यात एके ठिकाणी पुस्तक प्रदर्शनाला जाणे झाले. वाचनसंस्कृतीची आपल्या इथे काय स्थिती आहे, हे आपल्याला माहीतच आहे. त्याप्रमाणेच सदर प्रदर्शनाला अगदी तुरळक गर्दी दिसून आली. माझी पुस्तके घेऊन झाल्यानंतर मी ती काउंटरवर घेऊन आलो. तिथे पैसे घेण्यासाठी बसलेला युवक आपल्या मोबाईल मधल्या व्हाट्सअपवर विविध मिम्सचे व्हिडिओ पाहत गुंग झाला होता. मागच्या अर्ध्या तासापासून त्याची नजर जराही मोबाईल मधून बाहेर आलेली नव्हती. माझे बिल करण्यासाठी त्याने काही सेकंद मोबाईल बाजूला ठेवला व परत आपल्या इच्छुक कार्यात गुंग होऊन गेला. 


प्रदर्शनातून बाहेर आल्यावर मी विचार केला, अशा मोठ्या पुस्तक प्रदर्शनाच्या काउंटरवर जर मी बसलो असतो तर कदाचित मी दिवसभर फक्त तिथली पुस्तकेच वाचत बसलो असतो! किंबहुना कोणत्याही पुस्तक प्रेमीने हेच केलं असतं. पुस्तके वाचायची सोडून मोबाईल मधले व्हिडिओ पाहण्यात हे लोक किती वेळ वाया घालवतात? त्यांना नक्की त्यातून कोणते ज्ञान मिळतं? हा टाईमपास नाही का?
पण थोड्याच वेळात मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. विचार केल्यानंतर समजले की, तो वाचत नाहीये..  कदाचित त्याला वाचनाची आवड नाहीये. म्हणून तो आज या ठिकाणी फक्त गल्ल्यावर पैसे गोळा करण्याची कामं करतोय. त्याचा त्याच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असता तर कदाचित त्यालाही त्याच्या प्रगतीचा मार्ग सापडला असता. अर्थात तुमचा दृष्टीकोनच तुमचा भविष्य ठरवत असतं, हे पुनश्च एकदा त्या दिवशी समजलं.

© तुषार कुटे

Monday, November 25, 2019

ग्रहणांतील भीती

सूर्यग्रहण म्हणजे आपल्यात खगोल सृष्टीचा एक अद्भुत चमत्कार आहे! लहानपणी सर्वात पहिलं ग्रहण अर्थात खग्रास सूर्यग्रहण माझ्या वाढदिवशी 25 ऑक्टोबर 1995 ला पाहिलं होतं. रस्त्यावरची सामसूम आणि इतर कर्मकांड त्यावेळेस पहिल्यांदाच पाहिली व अनुभवली. रस्त्यावर पडलेल्या रिकाम्या गुटख्याच्या कव्हर मधून पाहिलेले ते सूर्यग्रहण आजही ध्यानात आहे. आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोन त्यावेळेस आकार घेऊ लागला होता. त्यानंतर बरीच खंडग्रास सूर्यग्रहण पाहिली. रात्री जागून अनेक चंद्रग्रहणही पाहिली. एके वर्षी एक कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिले होते.
अशाच कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या योग कित्येक वर्षांनी 26 डिसेंबरला येतोय. आज सर्वच ग्रहणांची माहिती आपल्या दिनदर्शिकेत लिहिलेली असते. या पोस्ट सोबत जे छायाचित्र जोडलेले आहे, ही माहिती एका 'जगप्रसिद्ध' दिनदर्शिकेतून घेण्यात आली आहे. 
 

वर्षानुवर्षे ग्रहणाच्या बाबतीत चालत आलेल्या गैरसमजुती व अंधश्रद्धा यांना खतपाणी घालण्याचे काम हे लोक करताना दिसतायेत. ग्रहण वेधामध्ये भोजन करू नये, पर्वकाळात पाणी पिऊ नये, झोपू नये, गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये, नर्मदा स्नान करावे असे मूर्खासारखे उपदेश व सल्ले याठिकाणी देण्यात आलेत. अशा गोष्टी वाचल्यावर देण्यात येते की, आपण अजूनही पुरातन काळात जगतोय. किंबहुना हे स्वयंघोषित ज्योतिषी लोक आपल्याला जगायला लावतायेत. खगोल विज्ञानाच्या या नयनरम्य आविष्काराचा आस्वाद घेण्याऐवजी भीतीचे वातावरण तयार करतायेत. अशाच लोकांवर महाराष्ट्र अंधश्रद्धा विरोधी कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी. ती होईल की नाही हे माहीत नाही. परंतु, नागरिकांनी सजग होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे याच जगप्रसिद्ध दिनदर्शिकेमध्ये अनिल काकोडकर, माधवराव चितळे, दत्तप्रसाद दाभोळकर यांचेही लेख आहेत हा मोठा विरोधाभास!

Monday, November 18, 2019

हॉटेलात पुस्तक वाचणारा

बर्‍याच दिवसांनी भाऊबीजेच्या निमित्ताने आमची ही दोन दिवसांसाठी माहेरी गेली होती. म्हणून घरी एकट्यासाठी काही बनविण्यापेक्षा बाहेर उपहारगृहातच जाऊन खावे, असा विचार केला. दिवाळीच्या निमित्ताने बरीचशी उपहारगृहे ही बंद होती. मुख्य चौकातल्या एका दर्शनी जागेत 'महाराष्ट्रीयन कॅफे'च्या नावाने चालू झालेले नवे उपाहारगृह दिसले. तशी चांगलीच गर्दी होती. त्यामुळे आमचीही पावले पोटाची पूजा करण्यासाठी सदर उपहारगृहाकडे वळाली. तिथे गेल्यावर समजले की, चपात्या संपल्या आहेत व सध्या फक्त थाळीच उपलब्ध आहे. दहा मिनिटे थांबावे लागेल, असा मालकांचा आदेश आला. रात्रीचे दहा वाजले होते. आता यावेळेस कुठे नवे उपहारगृह शोधा? असा विचार करून तिथेच बसायचा विचार केला. आमच्यासारखे अजून अनेक जण थाळी येण्याची वाट बघत बसले होते. आजकालच्या युगात एखाद्या ठिकाणी वाट बघणे म्हणजे मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसणे असा होतो. त्याचा प्रत्यय आम्हास याही वेळेसही आला. जेवणाची वाट बघणारे सर्व मनुष्यप्राणी खाली मान घालून मोबाईलच्या स्क्रीनवर बोटं वर खाली करत बसले होते. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. 



आम्हीपण एका टेबलावर ठाण मांडून बसलो. दहा मिनिटे असच स्वस्थ बसण्यापेक्षा बॅगमध्ये एखादं पुस्तक आहे का? हे पाहिलं तर शेवटचे एकच पुस्तक सापडलं. आमच्या उर्दू भाषेमध्ये ते पुस्तक होतं! पुस्तक उघडलं आणि जामा मशीदीतल्या चाचा कबाबी दिल्लीवाले यांच्यावर मुल्ला वाहिदी यांनी लिहिलेला लेख वाचायला सुरुवात केली. उपहारगृहात काम करणारा पोऱ्या (मराठीत वेटर!) आमच्याकडे टक लावून पाहायला लागला. पहिली गोष्ट म्हणजे कुणी हॉटेलमध्ये पुस्तक घेऊन वाचत का? हा प्रश्न त्याला पडला असावा व दुसरी गोष्ट, सदर पुस्तक हे कुठल्याशा "मुसलमानी" भाषेत लिहिले आहे, हेही त्याने पाहिलं. हा बाबा नक्की कोण आहे? याविषयी त्याला नक्कीच कुतूहल निर्माण झाले असावे. अशा प्रकारची पुस्तकं फक्त विशिष्ट धर्माचे लोकच वाचतात, असा अनेकांचा समज असतो. कदाचित त्यालाही तसेच वाटत असावे. जवळपास दहा मिनिटे झाली असावीत. त्यानंतर तो वाट पाहणाऱ्या प्रत्येकाला विचारत होता, 'तुम्हाला थाळी पाहिजे का?' परंतु, माझ्या जवळ आल्यावर त्याने विचारले, 'आपको भी लाऊ क्या थाली?' त्यावर मी प्रतिप्रश्न केला, 'मराठी येत नाही का तुला?' माझ्या अनपेक्षित प्रश्नावर तो काहीसा वरमला. मग मीच सांगितले, 'ये घेऊन'.
यातून एक गोष्ट समजली की, सर्वसामान्य जीवनात वावरताना आपण मनात कितीतरी समजुती घेऊन फिरत असतो व आपल्या निरीक्षणाने वेगवेगळ्या प्रतिमा मनात तयार करत असतो. प्रत्येक वेळेस या प्रतिमा तंतोतंत तशाच असतील असेही नाही.

Friday, November 15, 2019

निसर्ग बदलांकडे...

मागच्या काही वर्षांपासून वातावरणात व हवामानात होत चाललेले बदल आता प्रकर्षाने लक्षात येऊ लागलेत. यंदाचा ऑक्टोबर महिना पूर्ण पावसाचा गेला. शिवाय कधी नव्हे ते पूर्ण दिवाळीतही पाऊस पडला! निसर्गाकडून मानवजातीला देण्यात येणारी ही धोक्याची घंटा समजायला हवी. मानवनिर्मित कारणांमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे सर्वच ऋतूंवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतोय. हिवाळ्यात थंडीची तीव्रता वाढत चालली व उन्हाळ्यातही उन्हाची दाहकता नवे नवे उच्चांक गाठत आहे. नुकतेच क्लायमेट सेंटरने प्रकाशित केलेल्या अहवालात मुंबईसह अन्य मोठी शहरे येत्या तीस वर्षांत पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा विविध धोक्याच्या घंटांनी आता तरी नागरिक व सरकारांनी जागे व्हायला हवे. पर्यावरण शिक्षणाला फारसे गांभीर्याने न घेतल्याने मानव जातीकडून निसर्गाची अतोनात हानी होत आहे. त्यामुळेच निसर्गाचे पलटवार मनुष्य जातीवर होत आहेत. या सर्व घटनांची कारणमीमांसा होणे व त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे वाटते. केवळ मूठभर पर्यावरणवाद्यांमुळे पर्यावरणात बदल घडेल, अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरेल. निसर्ग संवर्धनासाठी सरकारबरोबरच नागरिकांचाही सकारात्मक व सबळ पाठिंबा असायला हवा. तरच भविष्यात येऊ घालणाऱ्या नैसर्गिक संकटापासून आपण आपल्याला व येणाऱ्या पिढीला वाचवू शकू.
 
 

Thursday, November 14, 2019

पुस्तके रस्त्यावरची

कंपनीच्या कामाच्या निमित्ताने अनेकदा सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरला जाणे झाले. हे शहर बऱ्यापैकी ओळखीचे झाले आहे. जून महिन्यातली गोष्ट आहे. एका पाच दिवसांच्या कामासाठी इस्लामपूरला गेलो होतो. राहण्याची सोय कामाच्या ठिकाणी होती. संध्याकाळी पाच नंतरचा वेळ रिकामाच असायचा. त्या वेळात थोडं शहरात फेरफटका मारून यावं, असा विचार होता. शिवाय फिरण्यासाठी एक बाईकही मिळवली होती. त्यादिवशी आमच्या हीचा मेसेज आला की, इस्लामपुरात "स्वराज्य रक्षक संभाजी" मालिकेतील कलाकारांची रांगोळी काढलेले एक प्रदर्शन भरलंय. तिने पत्ताही पाठवला होता. शहरातल्या आंबिका मंदिराशेजारी हे प्रदर्शन भरलं होतं. सहानंतर फ्रेश होऊन प्रदर्शन बघायला निघालो. अर्थात गुगल मॅपवाली बाई होतीच आम्हाला मार्गदर्शन करायला. साधारणत: पंधरा-वीस मिनिटात मी या मंदिराजवळ जाऊन पोहोचलो. 
 
 
इस्लामपूरातल्याच एका महाविद्यालयातर्फे रांगोळीचे हे छोटेखानी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रांगोळी मात्र छान काढलेली होती. अगदी हुबेहूब! त्यासोबत थोडावेळ फोटोसेशन करून मी मंदिराच्या बाहेर आलो. अजून जेवायला बराच वेळ होता. त्यामुळे काय करावे, याच विचारात असताना मंदिराच्या उजव्या बाजूला चार-पाच स्टॉल्स लावलेले दिसले. त्या रस्त्याने आज शिरलो तर लक्षात आले की, इथे खूप मोठे मार्केट आहे. अगदी पुण्या-मुंबईतल्या गजबजलेल्या रस्त्यासारखी गर्दी येथे झाली होती. जवळपास सर्वच वस्तू रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दुकानात लावलेल्या दिसल्या. अनेक दुकाने लख्ख प्रकाशात उजळून निघालेली दिसत होती. खरेदीदारांची संख्याही काही कमी नव्हती. एकमेकांना धक्का मारून पुढे जाणारे उत्साहाने भाव करीत खरेदीला हातभार लावत होते. अशा ठिकाणी पुस्तकांचं दुकान असणे, म्हणजे मूर्खपणाचं लक्षण म्हणता येईल! पण त्या गर्दीतही पुस्तकांची दुकाने होती! कुठे... तर रस्त्यावर! मार्केटच्या दोन्ही बाजूंनी दुकानांची गर्दी तर मधल्या जागेत दोन-तीन मुले रस्त्यावर बसून पुस्तके विकत होती. अशा गजबजलेल्या मार्केटमध्ये कुणी खरेदीदार त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता. याउलट त्यांच्या पुस्तकांना व विक्री करणाऱ्या मुलांनाही येणाऱ्या जाणाऱ्यांचे अनेकदा पाय लागत होते. या परिस्थितीतही दहा-बारा वर्षांची ती मुले उत्साहाने विक्रीसाठी बसली होती. आपल्या देशातल्या वाचनसंस्कृतीचे एक अंग मी याची देही याची डोळा पाहिले. पुस्तक म्हटलं की आमचे हात आणि मेंदू दोन्ही उत्तेजित होतात. मी खाली बसून पुस्तके चाळायला सुरुवात केली. बहुतेक सर्वच लहान मुलांची पुस्तके होती. कोल्हापुरच्या कुठल्या प्रकाशनाने प्रकाशित केलेली... बऱ्याचशा पुस्तकात बोधपर, मनोरंजनपर गोष्टी होत्या व किंमतही वीस ते पंचवीस रुपयांच्या दरम्यान होती. मी तिथे जाईपर्यंत कदाचित त्यांचे एकही पुस्तक विकलं गेलं नसावं. गिऱ्हाईक आलय म्हटल्यावर त्यांनीही पुस्तकांची माहिती सांगायला सुरुवात केली. एकेक पुस्तक पाहून मी माझा गठ्ठा तयार करायला लागलो. जवळपास तीस पुस्तके मी निवडली. यावर मुलांचा आनंद द्विगुणित झाला होता. त्यामुळे त्यांनीही प्रत्येक पुस्तकामागे पाच रुपये कमी केले. शिवाय एक पुस्तकही मला फ्री देऊन टाकले!
मी ती सर्व पुस्तक लहान मुलांना वाटण्यासाठी घेतली होती. परंतु त्यात विक्री करणाऱ्या मुलांचे समाधानही मला प्राप्त झाले होते. आज मी त्यातील बरीच पुस्तके लहान मुलांना वाटून टाकलीयेत. थोडीशी उरलीत, ती पण संपतील. परंतु वाचनाची संस्कृती आज रस्त्यावर पडली, हे मात्र या घटनेतून मला मनापासून जाणवले.

© तुषार कुटे

Tuesday, November 12, 2019

मराठी पुस्तके मिळवा ऑनलाईन

तंत्रज्ञानाचा वापर आज जवळपास प्रत्येकच क्षेत्रात होतोय. पुस्तक निर्मिती, विपणन व विक्री क्षेत्रही या पासून दूर राहिलेले नाही. आज अनेक कंपन्यांनी पुस्तक व्यवसायात उडी घेतली आहे. वाचनसंस्कृतीवर आजही लोकांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळेच तंत्रज्ञानाचा वापर याही क्षेत्रात वाढत चाललाय. आज तुम्ही घरबसल्या आपल्या भाषेतील पुस्तके मागू शकता. विविध वस्तू खरेदी करताना जसे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय वा हात लावल्याशिवाय त्याचा दर्जा कळत नाही, तसे पुस्तकांचे नाहीये. पुस्तकांचा दर्जा हात लावून समजत नाही. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने कोणतीही शंका मनात न ठेवता आपण पुस्तके मागू शकतो. खाली काही महत्त्वाच्या वेबसाईट्स दिल्या आहेत, तिथून तुम्ही तुमचं अकाऊंट तयार करून पुस्तके कुरियरने घरपोच मागवू शकता. शिवाय तुमची खरेदी 500 वा हजार रुपयांच्या वर असेल तर त्यासाठी वेगळे कुरिअर चार्जेस द्यावे लागत नाहीत.


१. बुक गंगा (https://www.bookganga.com/)
मराठीतील सर्वात जास्त पुस्तके असणारी ही वेबसाइट आहे. तुम्हाला हवे असणारे जवळपास प्रत्येक पुस्तक तुम्हाला या वेबसाइटवर मिळू शकेल. शिवाय सदर पुस्तकाची पहिली दहा-पंधरा पाने तुम्ही वाचू शकता. जेणेकरून पुस्तकाचा आशय व लेखकाची लेखनशैली तुम्हाला तपासता येईल. अनेक पुस्तके ई-बुक स्वरूपात ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रत्येक पुस्तकावर तुमचा अभिप्राय अर्थात रीव्ह्यू टाकण्याची सुविधा बुकगंगा ने उपलब्ध करून दिली आहे. अनेक पुस्तकांवर कमीत कमी पाच ते दहा टक्के सूटही तुम्हाला मिळू शकेल. बुकगंगाचं बुक स्टोअर पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरात आहे. तिथेही तुम्ही पुस्तके खरेदी करू शकता.
२. अक्षरधारा (https://www.akshardhara.com/)
पुण्याच्या बाजीराव रस्त्यावर असणारे अक्षरधारा बुक गॅलरी हे पुस्तकालय होय. या पुस्तकालयातही मोठ्या प्रमाणात पुस्तके उपलब्ध आहेत. ती तुम्ही प्रत्यक्ष जाऊन वा ऑनलाईन खरेदी करू शकता. त्यांच्या वेबसाइटवर शाखानुसार, प्रकाशननुसार, लेखकानुसार पुस्तक शोधण्याची सुविधा दिली आहे. व बहुतांशी पुस्तकांवर थेट कमीत कमी दहा टक्के सुटही उपलब्ध आहे. सभासदत्वाची सुविधाही अक्षयधाराने देऊ केली आहे. या अंतर्गत पुस्तकांवर अधिक सूटही मिळवता येते.
३. अमेझॉन इंडिया (https://www.amazon.in/)
ही भारताची सर्वाधिक पुस्तके विक्री करणारी वेबसाईट आहे. मराठीतील खूप पुस्तके त्यांच्या संकेतस्थळावरून तुम्ही खरेदी करु शकता. अमेझॉन सर्च साठी उपलब्ध असणारे सर्व ऑप्शन्स तुम्हाला पुस्तके शोधण्यासाठी वापरता येतात. अमेझॉन चे स्पेशल सेल चालू असताना अमेझॉन बुक्स ला भेट द्यायला विसरू नका. अनेक मोठी पुस्तके भल्यामोठ्या सूटच्या रूपाने इथे उपलब्ध होऊ शकतात. मी स्वतः मेहता पब्लिकेशनच्या सर्व मोठ्या कादंबऱ्या (स्वामी धरून!) 49 टक्के डिस्काऊंट मध्ये खरेदी केल्या होत्या! एवढा डिस्काउंट मला मेहतांच्या गॅलरीत पण मिळत नाही.
सर्वात अभिमानाची बाब म्हणजे सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकात अमेझॉन इंडियावर मराठी ही हिंदी नंतरची दूसरी भारतीय भाषा आहे! अमेझॉनचे स्वतःचे किंडल नावाची ई-बुक रीडर आहे. अनेक मराठी पुस्तके किंडल धारकांना मोफत ही वाचता येतात.
४. मेहता पब्लिशिंग हाऊस (http://www.mehtapublishinghouse.com/)
या ठिकाणी फक्त मेहता पब्लिशिंग हाऊसनेच प्रकाशित केलेली पुस्तके तुम्हाला विकत घेता येतील. शिवाय त्यांची सभासद होण्याची सुविधाही उपलब्ध आहे, ज्यात तुम्हाला 30 टक्क्यांपर्यंत एका पुस्तकावरही सूट मिळू शकते! आनंद यादव, वि. स. खांडेकर, द. मा. मिरासदार, रणजित देसाई, व. पु. काळे, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, विश्वास पाटील, सुधा मूर्ती, स्वाती चांदोरकर यांच्यासारख्या दिग्गज मराठी लेखकांची पुस्तके या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आज-काल इथे नव्याने येणारी पुस्तके ही बहुतांशी अनुवादित असतात.
५. बुक्सनामा (https://www.booksnama.com/)
डायमंड पब्लिकेशनची सर्व पुस्तके या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याशिवाय विविध विषयांची पुस्तके येथून तुम्ही भरघोस सूट घेऊन खरेदी करू शकता.
वरील साईट व्यतिरिक्त अजूनही काही वेबसाइट्स आहेत, जिथून सहजपणे पुस्तके मागवता येतात. त्यांचाही वापर तुम्ही बिनधास्त करू शकता.
https://www.flipkart.com/
https://www.granthdwar.com
https://www.bookvishwa.com/
https://www.rasik.com/
https://www.shubhambooksonline.com/
http://www.menakabooks.com/
https://www.suyashbookgallery.com/

कधीकधी बुक गॅलरीतून पुस्तक मागण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रकाशनाकडूनच मागण्यास सोयीचे पडते व कमी किमतीत ते उपलब्ध होऊ शकते. बऱ्याच मोठ्या प्रकाशकांनी ऑनलाईन पुस्तके विक्रीची सोय वाचकांना करून दिली आहे.
१. मेहता पब्लिशिंग हाऊस (http://www.mehtapublishinghouse.com/)
२. मनोविकास (https://www.manovikasprakashan.com/)
३. राजहंस (https://www.rajhansprakashan.com/)
४. सकाळ (http://sakalpublications.com/)
५. कॉन्टिनेन्टल (http://continentalprakashan.com/)