Thursday, October 6, 2022

महाराष्ट्रात या आणि हिंदी शिका

ग्रामीण भागातील एका 'एमआयडीसी'मधील कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे माझे दिवसभराचे सत्र होते. संध्याकाळी ते संपले त्यानंतर सहभागी कर्मचाऱ्यांपैकी एक जण मला भेटायला आला. तो केरळमधून अडीच वर्षांपूर्वी कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आला होता. शिवाय मी त्याच्याशी पूर्णपणे इंग्रजीत बोलत असलो तरी त्याचे माझ्याशी बऱ्यापैकी संभाषण हिंदी भाषेतून चालू होते. याचे मला आश्चर्य वाटले. म्हणून उत्सुकता म्हणून मी त्याला विचारले,
"Generally, Tamil and Malayalam people don't study and understand Hindi language. How can you speak Hindi so well?"
तर तो म्हणाला, "मेरे को केरला मे ढाई साल पहले हिंदी नही आती थी. यहा महाराष्ट्र मे आके हिंदी सीखी है!"
यावर मी त्याला विचारले, "So people around you are North Indians?"
माझा प्रश्न ऐकून तो किंचितसा हसला आणि बोलू लागला, "यहा के सभी लोग मराठी ही है लेकिन वो मुझसे हिंदी मे ही बोलते है. इस वजह से मुझे हिंदी आती है."


त्याचे बोलणे माझ्यासाठी धक्कादायक होते. पुणे जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागामध्ये राहणारा दक्षिण भारतीय माणूस अडीच वर्षांमध्ये उत्तम हिंदी बोलू शकतो. परंतु मराठीचा त्याला गंध देखील नव्हता. त्याच्याशी आजूबाजूचे सर्व मराठी लोक हिंदीमध्ये संभाषण साधायचे. ज्या भाषेला मल्याळम लोक काडीचीही किंमत देत नाही, ती भाषा मराठी लोकांनी या व्यक्तीला शिकवली होती.
खरंतर आपल्याच भाषेला तुच्छ समजणाऱ्या मराठी लोकांसाठी हा एक धडा आहे. समोरच्याला मराठी समजत नसेल तर थेट हिंदीत संभाषण करून आपलेच लोक आपल्या भाषेला दुय्यम दर्जा देताना दिसतात. पूर्वी मुंबई शहरामध्ये असणारे मराठीच्या अनासक्तीचे लोन आता हळूहळू महाराष्ट्रात इतरत्र देखील पसरताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजेभाषेच्या भविष्यासाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे.
मराठी लोकांनो वेळीच सावध व्हा आपली भाषा आपल्याच राज्यात मरत आहे. त्याला जबाबदार पण आपणच आहोत.

Tuesday, October 4, 2022

दीक्षाभूमीतील तो अर्धातास

नागपुरातील दीक्षाभूमीबद्दल अनेक वर्षांपासून केवळ वृत्तपत्रांमध्येच वाचत होतो. दरवर्षी धम्मचक्र परिवर्तनदिनी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी येथे लाखो आंबेडकरी अनुयायांची गर्दी होत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अगणित लोक या ठिकाणी येत असतात. अशा पवित्र ठिकाणी जाण्याची माझी कित्येक वर्षे इच्छा होती. अखेर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरला दोन दिवसांसाठी जाणे झाले आणि माझ्या सुदैवाने मी ज्या ठिकाणी राहत होतो तिथून केवळ दीड किलोमीटरच्या अंतरावर दीक्षाभूमी होती!
आदल्या दिवशीचा कार्यक्रम उरकल्यानंतर रात्री लवकर झोपी गेलो आणि सकाळी सात वाजताच तयार झालो होतो. गुगल मॅपवर दीक्षाभूमी शोधून काढली आणि आजचा मॉर्निंग वॉक याच रस्त्याने करायचा असे ठरवले. कधी मोठ्या रस्त्याने तर कधी छोट्याशा गल्लीमधून पायपीट करत पंधरा मिनिटांमध्ये दीक्षाभूमीच्या एका दरवाजापाशी पोहोचलो. तो बंद होता. गुगल मॅपवर मात्र सकाळी सात वाजल्याचीच उघडण्याची वेळ दाखवत होते. मला काहीतरी चुकल्याचे जाणवले. नंतर लक्षात आले की हा मुख्य दरवाजा नव्हता. तीन ते चार मिनिटांमध्ये पुढच्या सिग्नलला वळसा घालून मी मुख्य दरवाजातून आत प्रवेश केला. आतमध्ये कोणीच नव्हतं. दूरवर एक सुरक्षारक्षक दिसून आला तेव्हा जाणवले की आत प्रवेश करता येऊ शकतो. जसजसे चालत होतो तसतसे या भूमीचे पावित्र्य मन शांत करत होते. पाठीवरची बॅग बाहेर काढून ठेवली व मुख्य प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश केला. आत कुणीही नव्हतं. अगदी टाचणी पडेल इतकी शांतता या ठिकाणी अनुभवता येत होती!
या वास्तूची रचनाच अशी आहे की इथे बाहेरचा देखील कुठलाच आवाज येत नव्हता. ध्यान करण्यासाठी ती एक सर्वोत्तम जागा होती. अगदी मन भरून मी ती डोळ्यात साठवून ठेवली. तासनतास याच ठिकाणी बसून राहावे, असे देखील वाटत होते. मध्यभागी असणारी बुद्धमूर्ती शांतता, एकाग्रता आणि प्रसन्नता यांचे प्रतीक असल्याची मला खात्री झाली. एक क्षणी असे देखील वाटून गेले की ही तीच जागा आहे का जिथे एकाच दिवशी लाखो लोक दर्शनासाठी आणि प्रार्थनेसाठी येत असतात. अर्थात त्या दिवशी मी अतिशय भाग्यवान ठरलो. कदाचित कुणालाही न अनुभवता येणारी प्रसन्नता, शांतता आणि मनःशांती मला अनुभवता आली होती!









 

Sunday, September 18, 2022

Vijapurchi Adilshahi (विजापूरची आदिलशाही)

सतराव्या शतकात दक्षिण भारतीय इतिहासावर प्रभाव टाकणारी 'आदिलशाही' ही एक बलशाली राजसत्ता होती. स्वराज्य विस्तार करत असताना शिवाजी महाराजांना अनेकदा बलाढ्य आदिलशाहीशी सामना करावा लागला. परंतु, विजापूरच्या या आदिलशाहीशी संबंधित अतिशय तुरळक माहिती मूळ मराठी ग्रंथांतून वाचायला मिळते. बहामनी साम्राज्यातून उदयास आलेल्या आदिलशाहीच्या उगमापासून अस्तापर्यंत याचे सविस्तर वर्णन असलेला 'बुसातीन-उस-सलातीन' हा पहिला पर्शियन ग्रंथ फकीर महंमद झुबेरी यांनी इसवी सन १८२४ मध्ये लिहिला होता. या ग्रंथाचे मराठी भाषांतर नरसिंहराव विठ्ठल पारसनीस यांनी त्यानंतर सुमारे वीस ते पंचवीस वर्षांमध्ये केले. तसेच मूळ मोडी लिपीमध्ये असणारा हा ग्रंथ इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी सन १९६८ मध्ये मराठी देवनागरी लिपीमध्ये संपादित केला. हा ग्रंथ म्हणजेच 'विजापूरची आदिलशाही' होय. आदिलशाही राजवटीमध्ये होऊन गेलेल्या सर्व आदिलशहांच्या कारकिर्दीची इत्यंभूत माहिती या ग्रंथांमध्ये वर्णन केलेली आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथांपैकी असणारा हा एक 'साधनग्रंथ' होय. तो आदिलशाहीच्या दृष्टिकोनातून लिहिला गेलेला आहे. तसेच तो तत्कालीन मराठी भाषेमध्ये त्याचे भाषांतर झाले असल्याने मराठी लेखन कलेच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी देखील महत्त्वाचा असा ग्रंथ आहे!
 

Get this book from here: 

Thursday, September 1, 2022

भयंकर सुंदर मराठी भाषा

समाज जीवन सुधारले, पिढ्या बदलल्या की भाषा देखील बदलत जाते. भाषेमध्ये नवीन शब्द तयार होतात. तसेच जुन्या शब्दांचे नवे अर्थ देखील तयार होतात. यातूनच 'भयंकर' सुंदर असे विशेषण मराठी भाषेला लेखकाने दिले आहे. त्यातूनच तयार झालेले पुस्तक 'भयंकर सुंदर मराठी भाषा' होय. सुमारे वीस वर्षांपूर्वी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली ही एक भाषाविषयक उत्कृष्ट लेखमाला होय. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या तसेच मराठी भाषेच्या सौंदर्याची चिकित्सा करणाऱ्या प्रत्येक वाचकाला आवडेल असेच हे पुस्तक आहे. भाषा वाचताना तसेच दैनंदिन जीवनामध्ये वापरताना आपण अतिशय सहज व सुलभपणे तिचा वापर करत असतो. परंतु त्यातील सौंदर्य आपल्याला ध्यानात येत नाही. लेखकाने अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी या लेखमालेतून सुंदररित्या वाचकांसमोर मांडलेल्या आहेत. त्यांचे विवेचन देखील अतिशय सुंदर आहे. त्यामुळे त्यांच्या भाषा बुद्धीकौशल्याचे कौतुक करावेसे वाटते.
'मराठी असे आमची मायबोली' हे अभिमानाने सांगावे का? या प्रश्नाचे उत्तर हे पुस्तक आपल्याला निश्चितच देईल.


 

Tuesday, August 30, 2022

एक अनपेक्षित भेट

श्री. रमेश खरमाळे म्हणजे जुन्नर आणि परिसरातील प्रत्येकाला माहित असणारे व आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व होय. मागील अनेक वर्षांपासून जुन्नरमधील निसर्ग-संपदा व पर्यटन वृद्धीचे महान कार्य खरमाळे सर करत आहेत. मागील आठवड्यामध्ये जुन्नरमध्ये असताना योगायोगाने त्यांची भेट झाली.
तसं पाहिलं तर आम्ही अनेक वर्षांपासून समाज माध्यमांद्वारे एकमेकांना ओळखत होतो. पण त्यादिवशीची भेट ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती! एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे दर्शन झाल्यामुळे आम्ही दोघेही अर्थात मी आणि आमच्या सौ. भारावून गेलो. त्यांच्या कामाची पावती म्हणून मिळालेली स्मृतिचिन्हे आणि सन्मानपत्रे पाहून आम्हाला त्यांच्या एकूण कार्याची निश्चितच प्रचिती आली.
खरमाळे सरांनी स्वतः लिहिलेले ‘जगेन मायभू तुझ्यासाठी’ हे पुस्तक त्यांनी आम्हाला भेट म्हणून दिले. मागील काही दिवसांमध्ये वेळ मिळेल तसे पुस्तक वाचत होतो. त्यातून खरमाळे सरांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाची ओळख होत गेली. जुन्नर परिसरातील अडचणीच्या प्रसंगी जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या मदतीची हकीकत तसेच जुन्नरमधील अनेक अपरिचित ट्रेकच्या गोष्टी त्यांनी या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेल्या आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातील कार्य करत असताना आपण समाजाचे देखील देणे लागतो, याची जाणीव विविध प्रसंगांमधून खरमाळे यांनी ठेवल्याचे दिसते. त्यांचे या पुस्तकातील अनुभव निश्चितच प्रेरणादायी असेच आहेत. नव्या पिढीतील तरुणांनी यातून बऱ्याच गोष्टी बोध घेण्यासारख्या आणि शिकण्यासारख्या आहेत.
त्यांच्या या पुस्तकामध्ये वर्णन केलेल्या अनेक ट्रेकच्या वाटा मी देखील अजून सर केलेल्या नाहीत! त्यांचे वर्णन ऐकून या परिसरामध्ये निसर्गामध्ये मुक्तपणे स्वैर करण्याची ऊर्जा निश्चितच प्राप्त होते. 



Saturday, August 13, 2022

प्रकाशतंत्राची रोमहर्षक गाथा

सृष्टीच्या अनेक मुलतत्त्वांपैकी एक म्हणजे प्रकाश होय. जगातील सर्वात वेगवान गोष्ट म्हणजेच प्रकाश होय. प्रकाशाविना विश्व अंधारमय आहे. अशाच प्रकाशतंत्राची रोमहर्षक गाथा अच्युत गोडबोले यांच्या 'प्रकाश' या पुस्तकांमध्ये वर्णिलेली आहे.
अनेक शतकांपासून माणूस प्रकाशाचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करत होता. प्रकाशाचा मूळ स्त्रोत मात्र सूर्य आहे, असे मानले जायचे. परंतु मानवाने कृत्रिम प्रकाशाची निर्मिती केली. आगीचा शोध लागला. त्यातून प्रकाश कसा निर्माण करायचा? हे मानवाला समजले. तिथून मेणबत्त्या तयार झाल्या आणि विजेचा शोध लागल्यानंतर कृत्रिम प्रकाश दिवे तयार झाले. मनुष्याला प्रकाशामागचं विज्ञान कळत गेलं. हाच प्रकाश मानवी प्रगतीचे एक साधनच बनून गेला. मानवी प्रगतीच्या नव्या पिढ्या घडत गेल्या. विज्ञान प्रगत होत गेलं. तसतसं प्रकाशाचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये होत गेला. याच प्रकाशामुळे मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, कॅमेरा, फोटोग्राफी टेलिव्हिजन, लेझर आणि फायबर ऑप्टिकचा जन्म झाला. या तंत्रज्ञानाने अनेक विविध प्रकारच्या नव्या शोधांना जन्म दिले. एका अर्थाने प्रकाशाधारित शोध हे विज्ञानाच्या शेकडो शोधांची जननी आहे, असे म्हणावे लागेल.
या सगळ्यांची कहाणी अच्युत गोडबोले यांच्या 'प्रकाश' या पुस्तकामध्ये वाचायला मिळते. यातून आपल्याला भेटतात अनेक ध्येयवेडे तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ! त्यांच्या वेगळेपणामुळे अथवा अभ्यासामुळेच आपण सहज उपलब्ध होणाऱ्या तंत्रविश्वामध्ये वापरत आहोत. त्यांचे स्मरण देखील करणं तितकंच गरजेचं आहे. भविष्यामध्ये मनुष्य प्रकाशाचा वेग गाठायला पाहतो आहे. कदाचित ते काही दशकांमध्ये शक्य देखील होईल. परंतु त्यामागची प्रेरणा काय होती? हेही आपण ध्यानात ठेवायला हवे.

 


 

Thursday, June 23, 2022

द रेस्क्यू

सन २०१८ मध्ये थायलंडमधील थाम लुआंग या नैसर्गिक गुहेमध्ये १३ मुले अडकली होती. फुटबॉल खेळून झाल्यानंतर फिरण्यासाठी ही मुले या गुहेमध्ये पोहोचली. परंतु पावसाचा वेग वाढत असल्यामुळे हळूहळू गुहेमध्ये पाणी शिरायला लागलं. त्यामुळे पाण्यापासून बचावासाठी ती अधिकच आत गुहेमध्ये जाऊन पोहोचली. परतण्याच्या सर्व वाटा बंद झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी बाह्यजगताला या मुलांची माहिती मिळाली. गुहेच्या बाहेर सापडलेल्या सायकलींवरुन ही मुले गुहेमध्येच असावीत, असा कयास बांधण्यात आला. पावसाचा जोर वाढतच होता. त्यामुळे मुलांना बाहेर कसे काढायचे? असा प्रश्न देखील प्रशासनाला पडला आणि यातून सुरू झाली जगातली सर्वात मोठी रेस्क्यू अर्थात सुटका मोहीम.
थायलंडमधील या गुहेतील मुलांच्या सुटकेचा थरार जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट होत होता. ही गुहा पाच ते सहा किलोमीटर लांब आहे. शिवाय अनेक ठिकाणी जाण्यासाठी चिंचोळ्या वाटा आहेत. या वाटांमध्ये पाणी भरलं तर आत मध्ये जाणं केवळ अशक्य आहे. ही बातमी जगातील विविध देशांमध्ये पसरल्यानंतर गुहेमध्ये जाण्यासाठी जगातील सर्वोत्तम डायव्हर्स बोलविण्यात आले. युके, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया येथील सर्वोत्तम डायव्हर्स थायलंडमध्ये दाखल झाले व त्यांनी जवळपास अडीच आठवड्यांच्या प्रयासानंतर या मुलांची गुहेमधून सुटका केली.
ही मुले गुहेमध्ये अशा ठिकाणी अडकली होती जिथे केवळ जाण्यासाठीच तीन ते साडेतीन तास लागत होते! शिवाय ती पाण्याने भरलेली असल्यामुळे पूर्णपणे अंधारामध्ये होती. जसजसे दिवस जात होते तसतसे ही मुले जिवंत असतील का? हा प्रश्नही गडद होत होता. किंबहुना त्याची शक्यता देखील मावळत चालली होती. परंतु दहा दिवसानंतर पहिला डायवर या मुलांपर्यंत पोहोचला. ती सर्व मुले सुखरूप होती! विशेष म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती अथवा काळजी दिसत नव्हती. दहा दिवस एका ठिकाणी ही मुले बसून होती. ही त्यांच्या धैर्याची व धाडसाची परीक्षाच म्हणावी लागेल. मुले या गुहेमध्ये सापडल्याची बातमी जगभरातील दूरचित्रवाहिन्यांवर उत्सवासारखी दाखविली गेली. परंतु त्यांना बाहेर कसे काढायचे? हादेखील प्रश्न होताच. यामध्ये दोन ते तीन दिवस गेले. तोपर्यंत मुलांना खाण्याचे पदार्थ व पाणी पुरविण्यात आले होते. त्यांना परत काढण्याच्या मोहिमेमध्ये अजूनही डायव्हर्स सहभागी झाले. दरम्यान थायलँड नौदलाचा एक अधिकारी या मोहिमेत ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे मृत्युमुखी पडला होता. विशेष म्हणजे मुले ज्या ठिकाणी अडकली होती, त्या ठिकाणी केवळ १५ टक्के ऑक्सिजन वातावरणात होता. वैज्ञानिकदृष्ट्या १८ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी राहणे मानवासाठी अशक्य अशी गोष्ट आहे. परंतु ही सर्व मुले मात्र अशा वातावरणामध्ये पूर्ण अंधारात देखील जिवंत होती! त्यांना तिथून परत काढताना बेशुद्ध करूनच बाहेर काढले गेले. कारण, परतताना पूर्ण प्रवास पाण्यामधून करायचा होता. शिवाय सर्वत्र अंधारच होता. त्यामुळे तीन तासांच्या या प्रवासामध्ये ती मुले तग धरू शकतील की नाही, ही शंका होतीच. अखेर दोन दिवसांमध्ये सर्व मुलांना बाहेर काढून ही मोहीम यशस्वी झाली.
ही सर्व खरीखुरी रोमांचकारी कहाणी हॉटस्टार वर 'रेस्क्यु' या डॉक्युमेंटरीमध्ये चित्रित करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेले सर्व फुटेज हे मूळ व्हिडिओ मधूनच घेण्यात आलेले आहे. यात कोणतेही नाट्यरूपांतर वापरले गेलेले नाही. केवळ डॉक्युमेंटरी म्हणून नाही तर एक प्रेरणादायी कहाणी तसेच रोमांचकारी कथा म्हणून देखील तिच्याकडे बघता येऊ शकेल.
 
 
Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे
 

 


Tuesday, June 21, 2022

अदृश्य माणूस

विज्ञान कथांचं जग मनोरंजक आणि तितकच अद्भुत देखील असतं. त्यात अनेकदा अतिशयोक्ती असली तरी 'हे असं घडू शकतं' असंही वाटत राहतं. मराठी साहित्याला विज्ञान कथांचा प्रदीर्घ इतिहास नसला तरी पाश्चिमात्य साहित्यामध्ये मात्र शेकडो वर्षांपासून विज्ञानकथा लिहिल्या जात आहेत.
विज्ञान कथांचे जनक म्हणले जाणारे एच. जी. वेल्स यांची 'अदृश्य माणूस' ही अतिशय रंजक अशी विज्ञान कादंबरी होय. 'इनव्हीजीबल मॅन' या मूळ कादंबरीचा प्रणव सखदेव यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. ही कादंबरी सन १८९७ मध्ये म्हणजे सव्वाशे वर्षांपूर्वी वेल्स यांनी लिहिली होती. विज्ञान कथा याच काळामध्ये पहिल्यांदा तयार व्हायला लागल्या. त्यात 'इनव्हीजीबल मॅन' ही कादंबरी मोठ्या प्रमाणात गाजली. आज ती वाचत असताना इतकी जुनी असेल असे जराही वाटत नाही. अदृश्य माणूस ह्याच मध्यवर्ती संकल्पनेवर ती आधारित असली तरी त्या भोवती फिरणारा थरार हा लेखकाने अतिशय उत्कृष्टरित्या रंगविलेला आहे. सुरुवातीला पार्श्वभूमी तयार करत असलेला काळ थोडासा कंटाळवाणा वाटतो. कदाचित भाषांतरित कादंबरी असल्याने इंग्रजी माणसांची नावे जुळवून घेण्यास थोडासा वेळ लागत असावा. परंतु अदृश्य माणसाचे जसे जसे रहस्य समोर यायला लागते तसतसा घटनांचा वेग वाढत जातो आणि कादंबरीचा थरार देखील वाढतो. अनेकदा अदृश्य माणसाची कीव देखील येते. कादंबरी वेगाने पुढे सरकत असताना लेखकाने अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आहे. यावरूनच लेखकाचे सूक्ष्म निरीक्षण देखील लगेच ध्यानात येते. हे सूक्ष्म निरीक्षणच या कादंबरी लेखकाचे यश मानावे लागेल. विशेष म्हणजे सुरुवातीची काही पाने सोडली तर ती कुठेही कंटाळवाणी जाणवत नाही. साहस कथा आणि रहस्यकथा तसेच विज्ञानकथा वाचकांसाठी ही मेजवानीच आहे असे म्हणता येईल!