Sunday, June 19, 2022

'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस' - उमेश करंबेळकर

मानववंशशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला होमो सेपियन अस हे नाव नक्की कोणी दिले असावं? असा प्रश्न पडला होता. त्याचे उत्तर देखील मी शोधले होते. तो नामदाता होता, कार्ल लिनियस!
परंतु त्याच्याविषयी अगदीच जुजबी माहिती काही पुस्तकांमध्ये उपलब्ध होती. तीदेखील सारांश रूपामध्ये. अच्युत गोडबोले यांच्या 'किमयागार' या पुस्तकामध्ये लिनियसवर एक पूर्ण प्रकरण लिहिलेले सापडले. त्यातून बरीचशी माहिती मिळाली. शिवाय दीपा देशमुख लिखित 'जग बदलणारे ग्रंथ' या पुस्तकामध्ये जग बदलणाऱ्या पन्नास ग्रंथामध्ये कार्ल लिनियस लिखित 'सिस्टिमा नॅचुरी' या पुस्तकाचा समावेश केलेला आढळला. तेव्हा लिनियस नक्की कोण होता? याविषयी कुतूहल जागृत झाले. म्हणूनच डॉ. उमेश करंबेळकर लिखित 'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस' हे पुस्तक वाचायला घेतले आणि लिनियस नावाच्या वादळाची कहाणी समजून आली.
जगामध्ये पशु, पक्षी, कीटक, जलचर, फळझाडे, फुलझाडे, वृक्ष, वेली अशाच प्रकारचे सजीवांचे गट पाडले जातात. परंतु प्रत्यक्षात लाखो प्रकारचे सजीव या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. त्यातील अजूनही काही सजीवांशी मनुष्याचा संपर्क झालेला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या सजीवांची वर्गवारी करणारा शास्त्रज्ञ म्हणजे कार्ल लिनियस होय! त्याने सजीवांचा हा पूर्ण पसारा एका सिस्टीममध्ये मांडला. शिवाय त्या प्रत्येकाला नाव दिलं. त्याचं वर्गीकरण केलं. त्यातूनच सजीवांच्या जातीची ओळख झाली. ही नामकरण पद्धत जीवशास्त्राने कायमची स्वीकारलेली आहे. म्हणूनच काल लिनियस याला 'सजीवांचा नामदाता' असे म्हटले जाते.
स्विडन म्हटलं की विज्ञानविश्वाला आठवतो तो 'अल्फ्रेड नोबेल'. याच स्वीडनमध्ये तीनशे वर्षांपूर्वी कार्ल लिनियसचा जन्म झाला. पहिल्यापासूनच तो निसर्ग वेडा होता. त्याने वनस्पती संशोधनासाठी केलेली लॅपलँड या स्वीडनमधील जंगलाची सफर मात्र अद्भुत आणि रोमहर्षक अशीच होती. आजही आपण कोणी भारतातल्या जंगलांमध्ये इतके दिवस एकट्याने सफर करू शकत नाही. त्यामुळे लिनियसची ही भटकंती धाडसी अशीच म्हणता येईल. आपल्या आयुष्यातील अनेक दशके त्याने निरनिराळ्या सजीवांचा शोध घेतला व त्यांचे वर्गीकरण केले. त्यासाठी त्याने भटकंती देखील मोठ्या प्रमाणात केली. एका अर्थाने तो आपल्या जीवनातील ध्येयाने प्रेरित झालेला होता. शिवाय त्याला अनेक संशोधक शिष्यदेखील लाभले. याच शिष्यांनी जगभरामध्ये प्रवास करून विविध देशांतील जंगलांमधून वनस्पतींचे नमुने गोळा करून त्याला दिले. लिनियसचे शिष्य जगातील जवळपास प्रत्येक जंगलांमधून भटकले होते. याच कारणास्तव त्याचे 'सिस्टीमा नॅचुरी' हे परिपूर्ण पुस्तक तयार झाले. त्याची पहिली आवृत्ती १३ पानांची तर तेरावी आवृत्तीत तेवीसशे पानांची तयार झाली होती. अशा या ध्येयवेड्या वनस्पतीशास्त्रज्ञाचा प्रवास सांगणारं हे पुस्तक, 'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस'!


 

Saturday, June 18, 2022

विकिपीडियाला मदत करा

इंटरनेट म्हणजे माहितीचा महासागर होय. या महासागराला समृद्ध करणारी वेबसाईट म्हणजेच 'विकिपीडिया'. बहुतांश संज्ञा आपण जेव्हा गुगलमध्ये शोधतो तेव्हा देखील आपल्याला विकिपीडियाच्या पानांची लिंक समोर दिसते. विकिपीडिया हा जगातील अनेक लेखकांनी तसेच संपादकांनी समृद्ध केलेला माहितीचा स्त्रोत आहे. येथील माहिती अगदी नगण्य प्रमाणात अविश्वासार्ह मानली गेली असली तरी बहुतांशी माहिती आपल्याला ज्ञानस्वरूपात प्राप्त होत असते. किंबहुना आम्ही देखील बऱ्याच वेळा विकिपीडिया वरील माहितीचा वापर करत असतो. विशेष म्हणजे बहुतांश माहितीला माहितीचे स्त्रोत व संदर्भ दिलेले असतात. त्यामुळे तिच्या विश्वासार्हतेवर शंका घेता येत नाही.
आजपर्यंत आम्ही देखील मोठ्या प्रमाणात विकिपीडियावरील लेखांचा उपयोग वाचनासाठी व नवीन ज्ञानग्रहण करण्यासाठी केलेला आहे. परंतु काल विकिपीडिया उघडली तेव्हा त्यांचं हे निवेदन समोर दिसलं. विकिपीडिया हा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या ज्ञानचा स्त्रोत आहे. त्यावरील माहिती वाचण्यासाठी आपल्याला कोणतेही अकाउंट लागत नाही किंवा पैसेही द्यावे लागत नाहीत! आज-काल आपल्या ऑनलाईन वर्तमानपत्रांमध्ये लेख वाचण्यासाठी देखील आपल्याला पैसे द्यावे लागतात, अशी परिस्थिती आहे. याउलट विकिपीडिया मात्र आपल्याला माहितीचा साठा मोफत उपलब्ध करून देते. ही गोष्ट कौतुकास्पद अशीच आहे. परंतु त्या बदल्यात आपण विकिपीडिया ला काय देतो? या प्रश्नाचे उत्तर देखील शोधावे लागेल. विकिपीडियाने दिलेल्या माहितीनुसार केवळ दोन टक्के वाचक हे त्यांना डोनेट अर्थात पैसे दान करत असतात. याच गोष्टींवर विकिपीडिया टिकून आहे. हा आकडा खरोखरच वाढायला हवा, असे आम्हाला देखील वाटते. माहितीचा जगातील सर्वात मोठा स्त्रोत हा टिकून राहायला हवा, त्यासाठी त्यांनी आपल्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा केली तर चुकीचे ठरणार नाही. अगदी पन्नास रुपयांपासून आपण विकिपीडियाला डोनेट करू शकतो जेणेकरून माहितीचा हा स्त्रोत टिकून राहील आणि भविष्यामध्ये अधिक समृद्ध होत राहील.
(या पोस्टपूर्वीच आम्ही विकिपीडियाला डोनेशन दिले आहे)



 

Thursday, June 16, 2022

मऱ्हाटा पातशाह

मागील बरीच दशके मराठी माणसांची इतिहासाबद्दल अनास्था दिसून येते. जसे की शिवकालानंतर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे एकही चित्र उपलब्ध नव्हते. परंतु, शंभर वर्षांपूर्वी इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी महत्प्रयासाने छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले चित्र युरोपमधून भारतामध्ये आणले आणि शिवाजी महाराज कसे दिसत होते? हे महाराष्ट्रीयांना पहिल्यांदाच अनुभवता आले. विशेष म्हणजे त्यापूर्वीही शिवाजी महाराजांची चित्रे अनेक युरोपियन देशांमध्ये होती. परंतु इतिहास विषयाच्या अनास्थेमुळे आपण यावर फारसा विचार केला नाही. वा. सी. बेंद्रे यांनी शोधलेल्या पहिल्या चित्रानंतर हळूहळू शिवरायांची अनेक चित्रे उपलब्ध होत गेली. किंबहुना ती शोधण्यासाठी बेंद्रे यांची प्रेरणाच संशोधकांना कारणीभूत ठरली, असे म्हणता येऊ शकेल.
'शिवाजी महाराजांची चित्रे' हा विषय घेऊन लिहिलेला केतन कैलास पुरी लिखित 'मऱ्हाटा पातशाह' हा ग्रंथ होय. आजच्या काळामध्ये संशोधनात्मकरीत्या लिहिलेल्या निवडक ग्रंथांपैकी हा एक उत्तम ग्रंथ आहे. मागील शतकभरामध्ये शिवाजी महाराजांची विविध तत्कालीन चित्रकारांनी काढलेली चित्रे ही या पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. शिवाय त्यांमागील इतिहास, त्यांची चित्रशैली याचेही सारासार वर्णन सदर पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळते. शिवाजी महाराजांचे समकालीन इतिहासकारांनी केलेले वर्णन व त्यांचे चित्र किती मिळतेजुळते आहे, याचा तपशील लेखकाने खूप सुंदररित्या दिलेला आहे. शिवाय त्यांनी वापरलेले संदर्भदेखील विश्वासार्ह असेच आहेत. पुस्तक वाचताना आपण देखील शिवाजी महाराजांना त्या रूपामध्ये मनोमन पाहत जातो. शिवरायांची चित्रे काढणाऱ्या अनेक व्यक्ती इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेल्या आहेत. याची देखील खंत वाटते. खरंतर त्या चित्रकारांचे अगणित उपकार भारत देशावर आहेत, असे म्हणावे लागेल.
शिवाजी महाराजांव्यतिरिक्त आज विविध ठिकाणी उपलब्ध असणारी छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, शहाजीराजे, औरंगजेब यांची चित्रे देखील या पुस्तकांमध्ये कलर प्रिंट स्वरूपात पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांचे बोलणे कसे होते? यावर सेतुमाधवराव पगडी वगळता अन्य इतिहासकारांनी फारसा विचार केलेला दिसत नाही. याविषयी देखील एक प्रकरण या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.
एकंदरीत शिवरायांचे व्यक्तित्व शोधण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला दिसतो आणि तो यशस्वी देखील झालेला आहे.

Wednesday, June 15, 2022

एक विशेष संवाद

'पायथॉन प्रोग्रॅमिंग' या मराठीतील माझ्या पुस्तकाची 'लिंक्डइन'वर मी पोस्ट केली होती. अनेक मराठी तसेच अमराठी तंत्रज्ञांकडून त्यावर लाईक, कमेंट्स आणि शेअर्सचा पाऊस पडला. त्यामुळे ती अधिकाधिक लोकांकडे पोहोचण्यास मदत झाली. मराठी लोक आपल्या भाषेतून तंत्रज्ञान शिकण्यास व समजावून घेण्यास उत्सुक आहेत, ही बाब समाधानाची होती. परंतु काही अमराठी लोकांनी देखील आमच्या या प्रयत्नाची प्रशंसा केली.
बंगळुरूमधील 'डेटा सायन्स'मध्ये काम करणाऱ्या एका कन्नड अभियंत्याशी झालेला संवाद मला विशेष महत्त्वाचा वाटतो. त्याने आग्रहाने माझ्याकडून माझा मोबाईल नंबर घेतला होता आणि मी दिलेल्या वेळेवरच मला फोन केला. त्याने युरोपमधील फ्रान्स आणि जर्मनी सारख्या देशांचे दौरे केले होते. तिथल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शिक्षण हे त्यांच्याच भाषेमध्ये दिले जातं. इंग्रजी भाषा ते वेगळी ट्युशन लावून शिकत असतात. याच कारणास्तव तंत्रज्ञानातील अनेक मूलभूत तत्वे त्यांची पक्की झालेली असतात. परंतु भारतात मात्र परिस्थिती अगदीच उलटी आहे. आपण अभियांत्रिकी असो व मेडिकल असो कायदा, वाणिज्य, विज्ञान असो किंवा औषधनिर्माणशास्त्र असो सर्वच गोष्टीत इंग्रजीमधून शिकवत असतो. इंग्रजी ही जगाची भाषा आहे, असं आपल्याला वाटतं. त्यात खोटं काहीच नाही. ती एक संवादाची भाषा आहे. परंतु ज्ञानग्रहण करायची असल्यास स्वभाषा हीच सर्वोत्तम भाषा होय. ज्यामधून आपल्याला सर्व गोष्टी नीट समजतात. परंतु भारतात असं कुठेही होताना दिसत नाही, याबद्दल त्याने खंतही व्यक्त केली. आपल्यासारख्या तंत्रज्ञांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अधिकाधिक ज्ञान भारतीय भाषांमध्ये यायला हवं. याविषयीही तो आग्रही होता. इंग्रजीमध्ये बहुतांश जणांना समजत नसल्याने ते केवळ रट्टा मारून परीक्षा देतात व पास होतात. आज अभियांत्रिकी शिक्षण घेणारे सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक विद्यार्थी केवळ प्रश्नांची उत्तरे पाठ करूनच परीक्षा देत असतात. अशी परिस्थिती भारतातील सर्वच राज्यांमध्ये आहे. याच कारणास्तव भारतामध्ये मनुष्यबळ पुरेसे असले तरी ज्ञानाधारित पिढी तयार होताना दिसत नाही. उलट भारतीय भाषांमधून शिकवले तर ते अधिक उत्तमरीत्या समजू शकतात, असेही त्याला वाटत होते. मी देखील त्याच्या या मताशी शंभर टक्के सहमत आहे. आज भारतातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थांमधील बहुतांश विद्यार्थी ज्ञानग्रहण करतच नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या पदव्यांना केवळ एक प्रिंट केलेला एक आकर्षक कागदी तुकडा म्हणता येईल. आणि मग आम्हाला नोकरी का मिळत नाही? या प्रश्नाचे उत्तर ते दुसऱ्या कुणावर तरी सोपवून मोकळे होतात. यातून सुयोग्य मार्ग काढण्याची गरज आहे. शासनाने देखील थोडे सर्वेक्षण केले तरी त्यांना चांगला मार्ग सापडू शकतो.
(टीप: आमचा हा पूर्व संवाद इंग्रजीतून झाला!)

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे

Tuesday, June 14, 2022

पृथ्वीवर माणूस उपराच - डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी

विज्ञानविश्वामध्ये वाद आणि प्रतिवाद चालूच असतात. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्णपणे १००% पुराव्यानिशी सिद्ध होत नाही, तोपर्यंत विज्ञानामध्ये त्या गोष्टीला अनेक अस्पष्ट बाबी घेरलेल्या असतातच. मानवाची पृथ्वीवरील उत्क्रांती हादेखील असाच एक बहुसंशोधनाचा विषय आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत व त्यातील 'मिसिंग लिंक्स'चा आधार घेऊन इंग्रजीमध्ये तसेच मराठीमध्ये देखील पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यातीलच डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी लिहिलेले हे पुस्तक, 'पृथ्वीवर माणूस उपराच'.
याच विषयावर बाळ भागवत यांचं देखील पुस्तक उपलब्ध आहे. ते पुस्तक वाचले तेव्हा अनेकांनी मला नाडकर्णी यांच्या या पुस्तकाविषयी देखील सुचवलं होतं. तसं पाहिलं तर दोन्ही पुस्तकांचा गाभा हा एकच आहे. तसेच त्यामध्ये नमूद केलेल्या काही घटना व गोष्टी देखील सारख्याच जाणवतात. पृथ्वीवर आज अतीप्रगत झालेला मानवप्राणी हा मूळचा पृथ्वीवरील नाहीच, या सिद्धांताला पुष्टी देण्यासाठी केलेला अभ्यास या पुस्तकामध्ये विस्कटून सांगितलेला आहे.
पृथ्वीवर फार वर्षांपूर्वी अस्तित्वात असणाऱ्या अनेक संस्कृतींचा तसेच त्या संस्कृतीमध्ये तयार झालेल्या रचनांचा अभ्यास करून अनेक अतिमानवी गोष्टींचा उहापोह या पुस्तकामध्ये केलेला आढळतो. अशा अनेक प्रश्नांची शास्त्रीय उकल आजही मनुष्यप्राण्याला करता आलेली नाही. यामुळेच उत्क्रांतिवादाचा सिद्धांत अजूनही १००% शास्त्रज्ञांनी स्वीकारलेला नाही! हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर तयार झालेल्या किंबहुना तयार केल्या गेलेल्या रचना या आजदेखील प्रगत मानवाला तयार करणे शक्य नाही. मग त्यांचा उगम झाला तरी कसा? या प्रश्नाचे उत्तर लेखकाने अप्रत्यक्षरीत्या दिलेले आहे. माणसाची उत्क्रांती या पृथ्वीवर झालेली नाहीच. तो दुसऱ्या ग्रहावरून पृथ्वीवर आलेला आहे! मानव प्राण्यांमध्ये आणि अन्य प्राण्यांमध्ये असलेले छोटे छोटे फरक व त्यांचे विवेचन यास निष्कर्षापर्यंत पोहोचत असल्याचे लेखक म्हणतात. अर्थात ही संशोधकांची एक बाजू आहे. ती समजून घेणे देखील तितकेच गरजेचे वाटते. हजारो वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये तयार केले गेलेले पिरॅमिड्स आणि पॅसिफिक महासागरातील ईस्टर आयलँडवर तयार केलेल्या भल्यामोठ्या मानवी आकृती यांचे गूढ अजूनही आजच्या वैज्ञानिकांना शोधता आलेले नाही. याच कारणास्तव हजारो वर्षांपूर्वीचा मानव कसा होता? या प्रश्नाचे उत्तर आजही तंतोतंत मिळत नाही. यावर आणखी खोलात जाऊन संशोधन होणे निश्चितच गरजेचे वाटते. तरच याविषयी अवैज्ञानिकपणे बोलणारी तोंडे बंद होतील!



 

Wednesday, June 8, 2022

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स: एका नव्या वाटेने (लेखांक पहिला)

इसवी सन १९४० चा काळ होता. संपूर्ण जग दुसऱ्या महायुद्धाच्या अनुभवातून जात होते. हिटलरने पूर्ण जगाला युद्धाद्वारे वेठीस धरलेले होते. जर्मन सैन्य मित्र राष्ट्रांवर भारी पडताना दिसत होते. आक्रमक पद्धतीने युद्धात उतरलेल्या जर्मन सैन्याचे संदेश 'डीकोड' करण्यासाठी ब्रिटनमध्ये एका प्रकल्पावर काम सुरू झाले. या प्रकल्पामध्ये ॲलन ट्युरिंग नावाचा उमदा गणितज्ञ व संगणकतज्ञही काम करत होता. किंबहुना तो या चमूचा 'लीडर' होता. जर्मन सैन्याचे संदेश डीकोड करण्यासाठी एखाद्या मशीनला देखील कित्येक महिने लागतील, अशी स्थिती असताना ट्युरिंग याने 'ट्युरिंग मशीन' नावाचे यंत्र तयार केले. याद्वारे काही तासांमध्येच जर्मन संदेश डीकोड होऊन ब्रिटिश सैन्याला समजायला लागले. याच कारणास्तव हळूहळू मित्र राष्ट्रांची सरशी व्हायला लागली. याची परिणीती जर्मनी व त्यांचे सहकारी दुसरे महायुद्ध करण्यामध्ये झाली. या महायुद्धाचे परिणाम अतिशय भयावह झाले असले तरी ॲलन ट्युरिंग याने ट्युरिंग मशीनसारखे अद्भुत यंत्र संगणक विश्वाला तयार करून दिले होते. यामागे असणारे संगणकीय तर्कशास्त्र आजदेखील संगणकामध्ये वापरण्यात येते. आज अस्तित्वात असणाऱ्या संसाधनांची तसेच संगणकीय ज्ञानाची त्यावेळेस कमतरता होती. तरीदेखील ट्युरिंग याने या नव्या यंत्राची रचना केली. यावरूनच त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेची प्रचिती येऊ शकेल. ट्युरिंग याच्या म्हणण्यानुसार एखादी गोष्ट जर मनुष्य करू शकत असेल तर तीच गोष्ट संगणकाद्वारे देखील करताच यायला हवी. त्याकाळी त्याला फारसे कोणी गांभीर्याने घेतले नाही. परंतु संगणकीय बुद्धीमत्तेची सुरुवात त्याच्यामुळे झाली, असं म्हणता येऊ शकेल. तोपर्यंत संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या शब्दाचा उगम देखील झाला नव्हता.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच डार्टमाउथ येथे झालेल्या एका संगणक तज्ञांच्या संमेलनांमध्ये जॉन मॅकर्थी यांनी 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' ही संज्ञा सर्वप्रथम मांडली. अनेक संगणक तज्ञांना संगणक माणसासारखं काम करू शकतो, याचा विश्वास वाटायला लागला होता. परंतु त्यासाठी निश्चित कोणता मार्ग अवलंब करायचा? याबाबत मात्र विविध मतप्रवाह संगणक तज्ज्ञांमध्ये होते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे संगणकाचा उपयोग मानवी कामे करण्यासाठी करावा किंबहुना करता येऊ शकतो, हाच विचार संगणकाच्या या दुसर्‍या पिढीमध्ये उदयास आला. परंतु समस्या अशी होती की, संगणकाची आकार हा अवाढव्य होता. त्याचा वेग देखील अतिशय कमी होता. तसेच त्याला माहिती साठवण्यासाठी लागणारी क्षमता देखील खूपच तोकडी होती. या संगणकातील मर्यादा लक्षात घेता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विकसित होऊ शकेल, याबाबत शंकाच होती. परंतु डोक्यात किडे असणाऱ्या अनेक संगणक तज्ञांनी मात्र यावर संशोधन, विचार व विकसन देखील सुरू केले. त्याचा फायदा आजही संगणक विकसकांना होत आहे.
माणूस हा नैसर्गिक क्षमता असणारा जगातील सर्वात प्रगत प्राणी आहे. या क्षमता संगणकामध्ये अंतर्भूत करायच्या असल्यास अतिशय किचकट अल्गोरिदम तयार करावे लागतील. तसेच तितकेच अवघड प्रोग्रॅम्स देखील लिहावे लागतील. याची कल्पना तत्कालीन संगणक तज्ञांना होती. तरीदेखील अनेक संगणक तज्ञांनी हे शिवधनुष्य हाती घेतले आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा विकास व्हायला सुरुवात झाली. खरोखरच त्यांनी लिहिलेले प्रोग्रॅम्स अतिशय किचकट व सर्व सामान्य बुद्धिमत्ता असलेल्या कोणालाही समजणे अतिशय अवघड असेच होते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गणितज्ञांची मोठी मदत संगणकशास्त्राला झाली. तसेच ती आजही होत आहे. 


विसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मधील विविध अल्गोरिदम तयार केले गेले. उदाहरणार्थ बुद्धिबळाचा खेळ खेळायचा असल्यास संगणक तो कसा खेळू शकतो, याचा अतिशय किचकट अल्गोरिदम देखील तयार करण्यात आला होता. असे बहुतांश अल्गोरिदम संगणकाला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान करण्यासाठी तयार केले गेले. या सर्व अल्गोरिदमची समस्या अशी होती की, ते लिहिण्यासाठी अगदी मूलभूत पायऱ्यांपासून सुरुवात करावी लागत असे. त्याकरिता सामान्य बुद्धिमत्ता काहीच कामाची नव्हती. आजही असे अनेक किचकट अल्गोरिदम संगणक शास्त्रांमध्ये आहेत, जे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना देखील लवकर समजत नाहीत. एकंदरीत कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करायची म्हणजे विकासकाकडे असामान्य बुद्धिमत्ता असावी लागत होती. म्हणूनच आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये काम करणाऱ्या संगणक विकासकांची संख्या तशी फारच कमी होती. याच कारणास्तव हे क्षेत्र हव्या तितक्या वेगाने विकसित झाले नाही. शिवाय संगणकतज्ञांचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये काम करण्याचा ओघ देखील कमी होता. परंतु एकविसावे शतक उगवले ते या क्षेत्राला नवीन संजीवनी देण्यासाठीच, असे म्हणावे लागेल.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये आता 'मशीन लर्निंग' या नवीन तंत्राचा वापर व्हायला लागला होता. तसं पाहिलं तर मशिन लर्निंग ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स इतकीच जुनी संज्ञा आहे. सन १९५९ मध्ये अर्थर सॅम्युअल यांनी संगणकाद्वारे खेळण्यात येणारा 'चेकर्स गेम' तयार केला होता. हा संगणकीय खेळ त्याला दिलेल्या अनुभवातून शिकून निर्णय घेऊ शकत असायचा. हीच मशीन लर्निंग या तंत्राची सुरुवात होती. परंतु गेली कित्येक दशके त्यात फारशी सुधारणा झाली नाही. संगणकाच्या पिढ्या बदलत गेल्या. सांख्यिकी शास्त्राचे, लिनियर अल्जेब्रा, कॅल्क्युलस तसेच प्रोबॅबिलिटी सारख्या विषयांचे महत्त्व देखील संगणक शास्त्रामध्ये वाढत गेले आणि मशीन लर्निंग या तंत्रज्ञानाला नवे बळही मिळत गेले.
तसं पाहिलं तर मशीन लर्निंग हे 'निसर्ग प्रेरित संगणन' या विषयाचेच एक रूप आहे. आपण कसे शिकतो? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे झाल्यास कुणीतरी आपल्याला शिकवले की शिकतो असं म्हणू शकतो. परंतु सारासार विचार केल्यास असं लक्षात येतं की, आपण अनुभवाद्वारे शिकतो! अनुभवाद्वारे मिळालेले ज्ञान हेच खरे ज्ञान होय. यात काहीच शंका नाही. याच कारणास्तव अनुभवी लोकांना नोकरीमध्ये प्राधान्य दिले जाते. अगदी लहान बाळापासून ते उच्चपदस्थांपर्यंत सर्वच जण सर्वाधिक ज्ञान आपल्या अनुभवातूनच प्राप्त करत असतात. मशीन लर्निंग देखील अशाच प्रकारचे तंत्रज्ञान आहे. ज्याद्वारे मानवी अनुभव संगणकाला प्रदान केले जातात व त्यातूनच संगणकीय अल्गोरिदम नव्या गोष्टी शिकत राहतो. अर्थात याकरिता संगणकीय अल्गोरिदमला अनुभवसंपन्न माहितीचा साठा आधी द्यावाच लागतो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या पहिल्या पिढीतील अल्गोरिदम हे या प्रकारामध्ये मोडत नव्हते. त्या अल्गोरिदम्सला 'रुल बेस्ड सिस्टम्स' असे म्हटले जायचे. अर्थात हे अल्गोरिदमस अगदी शून्य अनुभव असलेल्या एखाद्या व्यक्ती सारखे काम करत असत. परंतु मशीन लर्निंग तंत्रज्ञानाद्वारे अनुभवी अल्गोरिदम आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये वापरता येऊ लागलेले आहेत. याच कारणास्तव अधिक अचूक व कमी किचकट अल्गोरिदम पद्धतीने सदर तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. शिवाय पूर्वीच्या अल्गोरिदममध्ये असणारा किचकटपणा, वेळखाऊपणा तसेच बौद्धिक क्षमता मशीन लर्निंगमध्ये लागत नाही. सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेला तसेच सांख्यिकी व गणिताचे सुयोग्य ज्ञान असलेला कोणीही व्यक्ती मशीन लर्निंगचे अल्गोरिदम वापरू शकतो. तसेच याद्वारे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे सॉफ्टवेअर देखील विकसित करू शकतो. याच कारणास्तव मागील काही वर्षांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स इंजिनियर्सची संख्या देखील वेगाने वाढत आहे. नवनवे अल्गोरिदम आणि संकल्पना या तंत्रज्ञानामध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत. मानवी माहितीचा व बौद्धिक क्षमतेचा अचूक वापर आज आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये करण्यात येत आहे.
रोबोटिक्स सारखे तंत्रज्ञान देखील मशीन लर्निंगचाच वापर करून काळाच्या पुढची पावले टाकण्यासाठी सिद्ध झालेले आहे. मागील शतकामध्ये मंदावलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेग वाढताना दिसतो आहे. भविष्यामध्ये मशीन लर्निंगमुळे त्याची व्याप्ती अधिक विस्तृत होणार आहे. म्हणूनच आज जवळपास प्रत्येक क्षेत्रांमध्ये मशीन लर्निंग तंत्रज्ञ कार्य करताना दिसतात. संगणकीय प्रगतीचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मशीन लर्निंगमुळे सुकर व सुलभ झाल्याचा दिसतो. शिवाय मागील तीन ते चार वर्षांमध्ये अन्य क्षेत्रातील व्यवसायिक व कर्मचारी देखील या क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. संगणक क्षेत्रातील काळाची गरज असल्यामुळे मशीन लर्निंग आता सर्वांनाच हवेहवेसे वाटू लागले आहे. येणाऱ्या काळामध्ये मानवी प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी याच तंत्रज्ञानाची चाके पुरेशी आहेत, यात काहीच शंका नाही. (क्रमशः)

- तुषार भ. कुटे
डेटा सायंटिस्ट, मितू रिसर्च, पुणे. 

Thursday, June 2, 2022

मध्यरात्रीचे पडघम

रत्नाकर मतकरी यांच्या अकरा गूढकथांचा हा संग्रह आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच मतकरी यांनी गूढकथा या साहित्य प्रकाराचे अतिशय सुंदर विवेचन केलेले आहे. ही कथा म्हणजे केवळ रहस्य कथा व भूत कथा नसते. तिची स्वतःची वैशिष्ट्ये काय आहेत, हे देखील मतकरी यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये अपेक्षित गूढपणा जाणवत राहतो. 'मध्यरात्रीचे पडघम' शीर्षककथा ही या कथासंग्रहातील सर्वात शेवटची कथा आहे. 'काळ्या मांजराचं स्वप्न' या कथेतून त्यांनी मांजराच्या भावविश्वाचे चित्रण केले आहे. यातून लेखकाच्या कल्पनासृष्टीची व्याप्ती दिसून येते. अशी वेगळ्या धाटणीतली कथा सर्वात विशेष वाटते. शिवाय 'बाळ अंधार पडला' ही या कथासंग्रहातील सर्वात वेगळी कथा म्हणता येईल. अंतिम परिच्छेदामध्ये रहस्यभेद केल्यानंतर तो अनपेक्षित असतो. पुस्तकातील जवळपास सर्वच कथा या प्रकारामध्ये मोडतात. गुढकथांवर प्रेम करणाऱ्यांनी हा कथासंग्रह वाचलाच पाहिजे असा आहे.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे 




Wednesday, June 1, 2022

पहिला ई-मेल

ई-मेल अर्थात इलेक्ट्रॉनिक मेल होय. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविलेल्या पत्रास ई-मेल म्हटले जाते. इंटरनेट युगात ई-मेलचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. सन १९७१ च्या ऑक्टोबर महिन्यात रेमंड सॅम्युअल टॉम्लींसन याने जगातील पहिला ई-मेल पाठविला होता. रे टॉम्लींसन त्यावेळी उणापुरा तीस वर्षांचा युवक होता. हा प्रोग्रॅमर त्यावेळी SNDMSG या संगणकीय प्रकल्पावर काम करीत होता. आज यालाच आपण ई-मेल म्हणतो. टेनेक्स या संगणक प्रणालीवर कार्य करताना टॉम्लींसनने SNDMSG ची निर्मिती केली होती. यासोबतच Read Mail या प्रोग्रामचीही निर्मिती झाली होती. SNDMSG हे ई-मेल पाठविण्यासाठी तर Read Mail हे तो ई-मेल वाचण्यासाठी वापरले जात होते. आज असणारी ई-मेल ही संकल्पना टॉम्लींसनच्या 'ई-मेल 'पेक्षा बहुतांशी वेगळी असल्याचे दिसून येते. खरं तर ई-मेलसाठी टॉम्लिन्सनने केवळ अशा सॉफ्टवेअरची निर्मिती केली होती, ज्याद्वारे दोन संगणक केवळ एकमेकांना संदेश पाठवू शकतात व तो वाचू शकतात. असंही म्हटलं जातं की, पहिला ई-मेल हा १९६५ च्या दरम्यान पाठविण्यात आला होता. फनौड़ो कोबेटो व त्याच्या सहकान्यानी CTSS संगणकाच्या दोन केंद्रातून संदेशांचा देवाणघेवाण करीता ई-मेल प्रोग्रामची निर्मिती केली होती. पण ही पद्धती केवळ विशिष्ट प्रकारच्या संगणकावरच कार्य करायची. त्यामुळे त्यास अधिकृतपणे ई-मेलची मान्यता प्राप्त झाली नाही. नंतरच्या काळात 'अर्पा'चे संचालक स्टीव्ह ल्युकासिक यांच्या सूचनेनुसार की रॉबर्ट्स यांनी RD या नव्या ई-मेल पद्धतीची निर्मिती केली होती.

रे टॉम्लींसन

रे टॉम्लॉसनला ई-मेलचा जनक असे म्हटले जाते. सन १९४९ मध्ये जन्मलेल्या टॉम्लींसनचे पूर्ण नाव रेमण्ड सॅम्युअर टॉम्लींसन असे आहे. रेनसालायर पॉलिटेक्निक संस्थेतून पदवी मिळवल्यावर त्यांनी बीबीएन अर्थात बोल्ट, बेरानेंट व न्यूमन कंपनीत पूर्ण वेळ नोकरी पत्करली. याच ठिकाणी टॉम्लींसन पूर्ण वेळ सेवेत होते. महाविद्यालयीन काळात रेनसालायरमध्ये असताना आयबीएम कंपनीच्या बऱ्याच उपक्रमांत त्यांनी सहभाग घेतला होता. इ.स. १९६३ मध्ये रेनसालायरमधून विद्युत अभियांत्रिकीची बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी त्यांनी मिळवली. बीबीएनमध्ये येण्यापूर्वी त्यांनी १९६५ मध्ये एमआयटीत एम. एम. बी मास्टर पदवीही मिळवली होती. बीबीएनमध्ये त्यांनी टेनेक्स संगणक प्रणाली, आर्पानेट, नेटवर्क कंट्रोल प्रोटोकॉल तसेच टेलनेट अशा विविध तंत्रज्ञानांवर कार्य केले. अपनिटद्वारे संगणकातील माहितीची फाईल एका संगणकातून दुसरीकडे पाठविण्यासाठी त्यांनी CPYNET या प्रोग्रामची निर्मिती केली होती. याच प्रोग्रामचा बापर त्यांनी SNDMSG या पहिल्या ई-मेलची निर्मिती करण्यासाठी केला. त्यांच्या पहिल्या संदेशात @ या चिन्हाचा वापर केला गेला होता. तोपर्यंत संगणकाच्या की बोर्डवर हे चिन्ह नामांकित झाले नव्हते. आज याच चिन्हाने ई-मेल पत्त्याची ओळख दिसून येते. टॉम्लींसन यांनी ई-मेलद्वारे पाठविलेला पहिला संदेश त्यांनाही माहीत नाही. जेव्हा केव्हा त्यांना याविषयी विचारले जाते. ते सांगतात की कदाचित तो संदेश QWERTYUIOP असावा!' हीच अक्षरे की बोर्डच्या पहिल्या ओळीतील अक्षरे आहेत! त्यामुळे याच अक्षरसमूहास पहिला ई-मेल संदेश म्हटले जाते. टॉम्लींसन यांना त्यांच्या कार्याबद्दल जॉर्ज स्टीबिझ कॉम्प्युटर पायोनियर ऍवॉर्ड, वेबी ऍवॉर्ड व आयईईई इंटरनेट पुरस्कार मिळाला आहे.