Friday, March 8, 2024

स्माईल प्लीज

नंदिनी ही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि करिअरला वाहून घेतलेली प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. पतीबरोबर होणाऱ्या वारंवार कलहामुळे तिने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण अजूनही दोघांमध्ये कटूता नाही. दोघांची मुलगी असल्याने त्यांच्यात सर्वकाही सामंजस्याने सुरू आहे. प्रगतीच्या पायऱ्या चढत चढत नंदिनी यशाच्या शिखराकडे प्रवास करीत आहे. परंतु अचानक एका दिवसापासून ती छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागते. कामाच्या व्यापात हे तिच्या फारसं लक्षात येत नाही. पण आपली मैत्रीण असलेल्या मानसोपचार तज्ञाबरोबर चर्चा केल्यानंतर तिला समजते की तिला डिमेन्शिया अर्थात विसरण्याचा आजार झालेला आहे. आणि तो अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. यावर कुठलाही उपाय आजवर शोधला गेलेला नाही. मेंदूतून हळूहळू अनेक गोष्टी विसरल्या जाणार आहेत. हा तिच्यासाठी एक मोठा धक्का असतो. जसजसे दिवस जातात तसतशी तिची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. ती वेगळ्याच कोशात वावरत असते. परंतु एक दिवस तिला एक नवा मित्र भेटतो. जो तिला तिच्या आयुष्याची नवी दिशा दाखवतो. तिच्यातील मूळ कलागुण ओळखून नव्याने जगायला शिकवतो. पण कधीतरी ती त्याला देखील विसरत असते. कथेचा शेवट गोड होतो की कटू हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.
मुक्ता बर्वे हिने नंदिनीची भूमिका केलेली आहे. शिवाय प्रसाद ओक तिच्या पूर्वश्रमीच्या पतीच्या तर ललित प्रभाकर नव्या मित्राच्या भूमिकेत दिसतो. कथेची मांडणी तशी उत्तम आहे. शिवाय सर्वच कलाकार कसलेले असल्यामुळे एक उत्तम कलाकृती या चित्रपटातून पाहायला मिळते.


 

Thursday, March 7, 2024

काबुली हरभरा

दुपारची सुट्टी झाली. स्टाफ रूममध्ये आलो तोवर तिथे कोणीही आलेले नव्हते. शिपाई आल्यानंतर त्यांना लगेचच कॅन्टीनमधून जेवण घेऊन यायला सांगितले. दोनच मिनिटात जेवण आले आणि मी जेवायला सुरुवात केली. पाच-एक मिनिटांनी ‘त्या’ आत मध्ये आल्या. कदाचित त्यांचे लेक्चर उशिराने संपलं असावं. माझ्या ताटाकडे बघून त्यांनी विचारलं,
“ कोणती भाजी आहे आज?”
“ काबुली हरभरा.”, मी उत्तरलो.
माझ्या या उत्तराने त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव आणले. आणि पुढे बोलू लागल्या,
“ छोले आहेत होय!.... मराठी नावं म्हणजे कशी विचित्रच वाटतात नाही. त्यापेक्षा आपलं हिंदी आणि इंग्रजी बरं.”
त्यावर मी त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि बोललो,
“ सिमला मिर्च, लेडीज फिंगर आणि एलिफंट इयरबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?”
यावर प्रतिसाद म्हणून मला उसनं स्मितहास्य प्राप्त झालं. त्यानंतर मात्र आमचा संवाद अतिशय क्वचित झाला असावा.

Tuesday, January 9, 2024

गहिरे पाणी

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांचा गूढतेच्या दृष्टिकोनातून विचार केला की गुढकथा तयार होते. रत्नाकर मतकरी यांच्या कथेमध्ये गुढकथेचा हा सारासार विचार अतिशय प्रकर्षाने समोर येतो. निरनिराळे विषय घेऊन त्यातील घटनांमध्ये रहस्यमयता तयार करण्याची शैली केवळ मतकरींच्या लेखनामध्ये आहे, असे दिसते. “गहिरे पाणी” हा कथासंग्रह देखील रत्नाकर मतकरींच्या या शैलीची वाट जोपासणारा दिसतो. सुमारे वीस-बावीस वर्षांपूर्वी अल्फा मराठी या पहिल्या खाजगी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या “गहिरे पाणी” या चित्रमालिकेच्या कथांचा हा संग्रह होय. यातून लेखकाच्या कल्पनाशक्तीचा अद्वितीय अविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक कथा एका वेगळ्या विषयाशी जोडलेली आहे. ती वाचायला सुरुवात केल्यानंतर शेवट केल्याशिवाय थांबवत नाही. मतकरींच्या कथांचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणता येईल. जवळपास प्रत्येक कथा ‘वाचनीय’ या प्रकारामध्ये मोडते. विशेष म्हणजे या कथांची चित्रमालिका देखील युट्युबवर उपलब्ध आहे. अशा सर्व कथांचा या संग्रहामध्ये समावेश नाही. परंतु या कथा वाचताना त्यातील चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते. काही कथा मतकरींच्या अन्य कथासंग्रहामध्ये देखील आहेत. तरीदेखील त्या वाचताना पुन्हा नव्याने काहीतरी वाचण्याचा आनंद देऊन जातात.

#BookReview #Book2024 #RatnakarMatkari 

एक दृष्टिकोन

पुण्यातील एका राष्ट्रीय शिक्षण संस्थेमधील माझे काम आटोपून मी निघालो होतो. तळमजल्यावर कुणीच नव्हते. समोरून दोन विद्यार्थी काहीतरी शोधात येताना दिसले. त्यांनी मला हाक दिली आणि विचारले, “सर टॉयलेट कुठे आहे?” त्यांच्या बोलण्यावरून ते मराठी भाषिक वाटत नव्हते. पण तरीदेखील त्यांनी मराठी भाषेतून हा प्रश्न विचारला, याचे मला आश्चर्य वाटले. त्यामुळे मी तात्काळ त्यांना स्वच्छतागृहाचा रस्ता दाखवला. जाता जाता त्यांच्यातील संभाषण माझ्या कानी पडले.
दोघेही उत्तर भारतातील वेगवेगळ्या राज्यातून पुण्यात शिकायला आले होते. ज्या विद्यार्थ्याने मला विचारले तो इथे येण्याआधी पुणे शहराचा आणि इथल्या भाषेचा देखील अभ्यास करून आलेला होता! शिवाय मराठी भाषेत जुजबी प्रश्न विचारण्याचा सराव देखील त्याने केला होता. त्याचे मला विशेष कौतुक वाटले. कारण आजवर आपण पाहिलेच आहे की, उत्तरेतून आलेले लोक मराठी लोकांना गृहीत धरतात. आमची भाषा मराठी लोकांना येतच असेल, शिवाय तेच आमच्याशी आमच्या भाषेमध्ये बोलतील हे देखील त्यांना माहीत असतं. म्हणून महाराष्ट्र भूमीची मराठी भाषा शिकण्याची तसदी कोणी घेत नाही. परंतु या विद्यार्थ्याप्रमाणे दृष्टिकोन असेल तर त्यांच्याविषयी मराठी लोकांना देखील आपुलकी वाटेल. गरज कोणाला आहे हा प्रश्न नाही तर बाहेरून आलेले लोक इथल्या राज्याचा आणि भाषेचा किती सन्मान करतात? हे जास्त महत्त्वाचे. 


- तुषार भ. कुटे



Friday, January 5, 2024

आपली भाषा

रविवारचा दिवस. सकाळी बऱ्याच दिवसांनी बाहेर नाश्ता करण्यासाठी आम्ही जवळच्या एका हॉटेलमध्ये आलो. गर्दी फारशी नव्हती. आमची ऑर्डर दिली आणि वाट पाहू लागलो. शेजारच्या टेबलावर एक मराठी जोडपे येऊन बसले. अर्थात त्यांच्या बोलण्यावरून ते मराठी आहेत, हे आम्हाला समजले. त्यांनी लागोलाग हॉटेलच्या वेटरला बोलावले. अर्थात याकरिता त्यांनी बहुतांश मराठी लोक गुलाम असलेल्या हिंदी भाषेचा वापर केला, हे वेगळे सांगायला नको! हॉटेलचे नाव मराठी, मालक मराठी आणि सर्व कर्मचारी देखील मराठीतच बोलत होते. तरी देखील मराठी लोकांना मुघली भाषेचा वापर का करावा वाटतो, हा मोठा प्रश्नच आहे.
त्या दोघांनी ऑर्डर दिल्यानंतर लगेचच माझ्या पत्नीने मला एक गोष्ट सांगितली,
“आपल्या इथल्या मराठी लोकांना सतत हिंदीची गुलामी करायची सवय झालेली आहे. कुठेही गेलं की, लगेच हिंदीत सुरू होतात. अशा लोकांचा मला भयंकर राग येतो!”
अर्थात हे सर्व त्यांना ऐकू जाईल अशा भाषेमध्ये ती बोलली. याचा परिणाम सकारात्मक दिसून आला. पुढच्या वेळेस जेव्हा शेजारच्या टेबलावरील ‘त्या’ने वेटरला हाक मारली त्यानंतर तो त्याच्याशी मराठीतच संवाद साधत होता. अगदी बिल देईपर्यंत!
कधी कधी मुघली भाषेची गुलामी करत असणाऱ्या मराठी लोकांना अशाच पद्धतीने टोमणे मारावेत, असं वाटतं. त्याशिवाय ते सुधारणार नाहीत. आणि आपली भाषा देखील अभिमानाने वापरणार नाहीत!

- तुषार भ. कुटे


Wednesday, January 3, 2024

अंतराळातील स्फोट

जवळपास २५ वर्षांपूर्वी एका वाचनालयामध्ये जयंत नारळीकरांचं “अंतराळातील स्फोट” हे पुस्तक वाचायला मिळाले. अभ्यास सोडून अवांतर म्हणून वाचलेलं माझ्या आयुष्यातील कदाचित हे पहिलंच पुस्तक होतं. नारळीकरांची ही विज्ञान कथा मला भयंकर आवडली. कदाचित याचमुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. यानंतर मी नारळीकरांच्याच प्रेषित आणि ‘वामन परत न आला ‘या कादंबऱ्या देखील वाचल्या. त्याही मला तितक्याच आवडल्या होत्या. कालांतराने मी स्वतःच्या पुस्तकांचा संग्रह करायला सुरुवात केली. काही वर्षानंतर मी वाचलेले ‘अंतराळातील स्फोट’ हे पुस्तक बाजारात शोधण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु ते काही मिळाले नाही. मागील आठवड्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सवात साहित्य अकादमीच्या स्टॉलवर हे पुस्तक मला अनपेक्षितरित्या दिसून आले. ते विकत घेतल्यानंतर अगदी दोन ते तीन तासांमध्ये वाचून संपवले. दोन दशकांपूर्वीच्या वाचन आठवणी जागृत करणारा हा प्रसंग होता! 


 

Saturday, December 30, 2023

२०२३ मध्ये पाहिलेले चित्रपट

सन २०२३ हे वर्ष आणखी एका वेगळ्या अर्थाने माझ्यासाठी खास ठरलं! यावर्षी तब्बल १०१ मराठी चित्रपट पाहता आले. यापूर्वी कधीही इतके चित्रपट मी पाहिले नव्हते!  दिवसभरातला वाया जाणारा थोडा थोडा वेळ सार्थकी लावून ही चित्रपटांची यादी तयार झालेली आहे. भारतीय चित्रसृष्टीमध्ये मराठी चित्रपट त्याच्या अर्थपूर्णता आणि संवेदनशीलतेमुळे ओळखला जातो. कथेतील इतकं वैविध्य कदाचित अन्य कोणत्याही भाषेमध्ये नसावे. खूप वेगवेगळे विषय आजकालच्या मराठी चित्रपटांमध्ये हाताळले जात आहेत. आमचे निर्माते आणि दिग्दर्शक कथानकाला अधिक महत्त्व देतात. म्हणूनच काहीतरी सवंग आणि पांचट आमच्या मराठी चित्रपटांमध्ये दिसून येत नाही. कोणीही भारतीय चित्रपट प्रेमी खरे चित्रपट पाहायचे असल्यास मराठी भाषेलाच निश्चित प्राधान्य देईल.
खाली दिलेल्या यादीमध्ये ज्या चित्रपटांच्या समोर * लिहिलेले आहे ते प्रत्येकाने किमान एकदा तरी पहावे, असे चित्रपट आहेत. काही चित्रपटांची परीक्षणे मी माझ्या ब्लॉगवर यापूर्वी लिहिलेली आहेत, परंतु वेळेअभावी बहुतांश चित्रपटांचे परीक्षण लिहिता आले नाही. ते लवकरच हळूहळू प्रकाशित केले जाईल.

चित्रपटगृहात पाहिलेले चित्रपट (सर्व मराठी):
    1. वाळवी *
    2. फुलराणी  
    3. महाराष्ट्र शाहीर *
    4. बाईपण भारी देवा *
    5. सुभेदार *
    6. आत्मपॅम्प्लेट *
    7. झिम्मा २ *

ओटीटीवर पाहिलेले चित्रपट (मराठी)
    1. कॉफी
    2. सोहळा *
    3. वन वे तिकीट *
    4. अजिंक्य *
    5. श्यामचे वडील *
    6. पैसा पैसा *
    7. नीलकंठ मास्तर *
    8. गुलमोहोर *
    9. मात *
    10. रणभूमी
    11. बापमाणूस
    12. वेल डन बेबी
    13. गोविंदा
    14. टेरिटरी *
    15. बस्ता *
    16. गैर *
    17. ३१ दिवस *
    18. हॉस्टेल डेज
    19. दे धक्का २
    20. एक कप चा *
    21. वेडिंगचा सिनेमा
    22. स्वीटी सातारकर
    23. जीवनसंध्या *
    24. ध्यानीमनी *
    25. रौद्र *
    26. शुगर सॉल्ट आणि प्रेम
    27. खिचिक
    28. एक जगावेगळी अंत्ययात्रा
    29. आटापिटा
    30. अप्पा आणि बाप्पा
    31. निरोप
    32. धर्मवीर *
    33. ये रे ये रे पैसा २
    34. फकाट
    35. मी आणि यु
    36. धिंगाणा
    37. दगडी चाळ २ *
    38. ३५% काठावर पास
    39. तीन अडकून सीताराम
    40. संदूक *
    41. बॉईज-३
    42. डार्लिंग
    43. बसस्टॉप
    44. बाई गो बाई
    45. ते आठ दिवस *
    46. आठवणी *
    47. शटर *
    48. डेट भेट
    49. बॅलन्स होतोय ना?
    50. रौंदळ  *
    51. रावरंभा  *
    52. आपडी थापडी
    53. बाबू बँड बाजा *
    54. वॅनिला स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट
    55. डीएनए
    56. एक सांगायचंय *
    57. लंगर *
    58. रझाकार
    59. आरोन
    60. फोटो प्रेम *
    61. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी
    62. बाबांची शाळा
    63. फनरल *
    64. रिंगण *
    65. स्माईल प्लिझ *
    66. ट्रिपल सीट
    67. प्रवास *
    68. माधुरी *
    69. राजवाडे अँड सन्स *
    70. सखी *
    71. जीवन संध्या *
    72. डॉट कॉम मॉम
    73. एक निर्णय
    74. बोनस *
    75. मोगरा फुलला *
    76. देवा एक अतरंगी
    77. पिकासो
    78. रंग पतंगा *
    79. ड्रीम मॉल
    80. पोस्टकार्ड *
    81. पिंपळ *
    82. भिरकीट
    83. मुक्काम पोस्ट धानोरी
    84. अनन्या *
    85. बावरे प्रेम हे
    86. मला काहीच प्रॉब्लेम नाही
    87. शुगर सॉल्ट आणि प्रेम
    88. मिडीयम स्पायसी
    89. रेती *
    90. हृदयात समथिंग समथिंग
    91. जस्ट गंमत
    92. दुनिया गेली तेल लावत
    93. मेमरी कार्ड
    94. धरलं तर चावतंय

ओटीटीवर पाहिलेले अन्य भाषेतील चित्रपट:
    1. इंटरस्टेलर (इंग्रजी)
    2. स्क्विड गेम (कोरियन- इंग्रजी भाषांतरित वेबसिरीज)
    3. अलाईस इन वंडरलँड (जपानी- इंग्रजी भाषांतरित वेबसिरीज)
    4. कांतारा (कन्नड- इंग्रजी सबटायटल्स)
    5. मिसेस अंडरकव्हर (हिंदी)
    6. एक ही बंदा काफी है (हिंदी)
    7. चोर निकल के भागा (हिंदी)
    8. भोला (हिंदी)
    9. ओएमजी २ (हिंदी)
    10. सूर्यवंशी (हिंदी)
    11. सेक्शन ३७५ (हिंदी)

- तुषार भ. कुटे


 

Friday, December 29, 2023

एका मॅरेथॉनची गोष्ट!

२७ नोव्हेंबर २०२२… एका वर्षापूर्वी बजाज एलियान्झ पुणे हाफ-मॅरेथॉनचे आयोजन बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून करण्यात आले होते. मी प्रत्यक्ष पाहिलेली ही पहिलीच मॅरेथॉन होती.
सकाळी सातच्या दरम्यान आम्ही बालेवाडीच्या चौकात पोहोचलो. गाड्या पुढे नेण्यासाठी बंदी असल्यामुळे बालेवाडी पीएमटी डेपोच्या समोरच एका ठिकाणी गाडी पार्क केली. मॅरेथॉन संपायला बराच वेळ होता. म्हणून तिथेच बसून राहिलो. परंतु गाड्यांची गर्दी वाढत गेल्याने पार्किंगमधून गाडी काढता येईल की नाही अशी शंका आल्याने मी स्वतःच गाडी बाहेर काढून बायपासच्या पुढच्या चौकातून महाळुंगेच्या दिशेने निघालो. एका ठिकाणी गाडी पार्क करायला जागा मिळाली. तिथे गाडी लावून बालेवाडीच्या मुख्य चौकाकडे चालत आलो.
एव्हाना प्रत्यक्ष मॅरेथॉन चालू झालेली होती. खरंतर पाच किमी, दहा किलोमीटर आणि २१ किलोमीटरच्या मॅरेथॉन केव्हाच सुरू झाल्या होत्या आणि संपल्या देखील होत्या. आता फक्त तीन किलोमीटरची अर्थात हौशी लोकांची मॅरेथॉन चालू होती. बायपासपाशी असलेल्या बालेवाडीच्या त्या चौकामध्ये मॅरेथॉनसाठी पोलिसांनी बॅरिकेट्स लावून विशेष रस्ता तयार केला होता. त्याच्या पलीकडून शेकडो लोक या मॅरेथॉनमध्ये धावताना दिसले. कित्येक जण तर केवळ चालतच होते! आयोजकांनी दिलेले शर्ट घालून मस्त मौजमजा करत फिरत चालले होते. अनेक जण कदाचित वर्षातून एकदाच अशा कुठल्यातरी इव्हेंटमध्ये भाग घेऊन आपली ‘हेल्थ’विषयी असणारी काळजी दाखवत ‘स्टेटस मेंटेन’ करत असावेत, असे दिसले. शरीरात कदाचित मधुमेह, रक्तदाब, शर्करा सारखे आजार असणारे देखील यामध्ये असावेत, असं एकंदरीत त्यांच्या रूपावरून दिसून आलं. मॅरेथॉन अशी असते होय? असा प्रश्न मला पडला. हौशी लोकांना तीन किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करायला कदाचित पाहून ते एक तास तरी लागला असावा. मी मात्र शरीराने त्यांच्या मनाने बऱ्यापैकी किरकोळ होतो. जवळपास एक तास मी त्या गर्दीचे निरीक्षण करत होतो. मनात विचार आला की, आपणही अशा मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ शकतो का? अर्ध-मॅरेथॉन असल्यामुळे सर्वाधिक अंतर २१ किलोमीटरचे होते. मी इतरांच्या तुलनेत मला बऱ्यापैकी फिट समजत होतो! म्हणूनच याच मॅरेथॉन मध्ये पुढच्या वर्षी २१ किलोमीटर मध्ये भाग घेऊन ती पूर्ण करून दाखवायची, असा चंग बांधला
आजवर सकाळी उठल्यानंतर मी फक्त मॉर्निंग वॉक अर्थात केवळ चालण्यासाठीच जात होतो. अनेकदा हे अंतर चार ते पाच किलोमीटरचे असायचे. चालणं हाही हा एक व्यायाम असला तरी तो केवळ वृद्ध लोकांसाठीच पूरक असा आहे. खरंतर युवकांनी धावणे आणि सायकलिंग करायला हवी असे म्हटले जाते.
मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी आता तयारी करायची होती. म्हणून मी दुसऱ्याच दिवसापासून पहिल्यांदाच सकाळी धावायला सुरुवात केली. सुमारे १०० मीटर अंतर गेल्यावर मला बऱ्यापैकी धाप लागली होती. मी हळूहळू चालू लागलो. छातीतली धडधड वाढत होती. कालांतराने ती कमी झाली. पुन्हा पळायला लागलो… परत तीच परिस्थिती! एका किलोमीटर नंतर मला ध्यानात आले की माझी पळण्याची क्षमता बऱ्यापैकी कमी झालेली आहे! त्यामुळे पहिल्याच दिवशी मी मॅरेथॉन मधील अर्ध-मॅरेथॉन चे २१ किमीचे अंतर पूर्ण करू शकेल की नाही याची मला शंका यायला लागली. तरीही दररोज थोडं थोडं धावणं चालू ठेवलं. १०० मीटर वरून थोड्याच दिवसांमध्ये मी सलग एक किलोमीटर धावायला लागलो! कधी कधी पाय देखील दुखायचे, पण त्याकडे दुर्लक्ष करत माझा हा नित्यनियम चालू होता. या कारणामुळे दिवसभर मला ताजतवानं देखील वाटायला लागलं. एक दिवस निश्चयाने जोपर्यंत पूर्ण दम लागत नाही तोपर्यंत पळत राहायचं ठरवलं. जवळपास तीन किलोमीटरची सलग धाव मी पूर्ण केली! त्या दिवशी एक महत्त्वाचा मैलाचा दगड पार केलाय की काय, याची अनुभूती मला आली. आनंदाने मी ही गोष्ट घरी देखील सांगितली होती. माझा हुरूप वाढायला लागला. हळूहळू मी दमनं विसरायला लागलो… पाय मात्र नियमितपणे दुखायचे. कधीकधी पाय दुखायला लागल्यामुळेच धावायचे थांबत होतो. काही दिवस तर कंबर आणि कधी पोट देखील दुखायचे. अशावेळी धावण्याचा वेग कमी करायचो. पण धावणे थांबवले नाही. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये एका व्हर्चुअल मॅरेथॉन विषयी वाचले. त्यात सहभाग देखील घेतला. त्यावेळी स्ट्राव्हा नावाच्या अँड्रॉइड एप्लीकेशन बद्दल समजले. आणि दररोजचे धावणे रेकॉर्ड करण्यासाठी या अँड्रॉइड एप्लीकेशनचा वापर करायला लागलो. त्याचा बऱ्यापैकी फायदा झाला. रोजची प्रगती कशी होत होती, याचा अंदाज यायला लागला. दर दिवशी नवे ध्येय समोर ठेवायला लागलो. एव्हाना दररोजचे पाच किलोमीटर धावणे ठरलेले होते. दररोजचा मार्ग देखील निश्चित होता. एकदा मनाशी ठरवलं की, आज इतके किलोमीटर पळायचे आहे की आपोआपच जोश वाटायला लागायचा. त्याच उर्जेने मी दररोज धावत होतो. गुगल फिट एप्लीकेशनमध्ये देखील सर्व काही व्यवस्थित नोंदवले जात होते. एकेकाळी दिवसभरात केवळ ४० हार्ट पॉइंट्स मिळवणारा मी दररोज शंभरी गाठायला लागलो! याच कारणास्तव वजन देखील कमी झाले होते. शरीरातील स्थूलपणा जाऊन शरीर मध्यम पातळीवर स्थिर होऊ पाहत होते. अशात भूक देखील वाढली होती. एका अर्थाने व्यायामाचे किंबहुना पळण्याचे व्यसन लागायला लागले होते. अशातच आमच्या सौभाग्यवतींनी मला सायकल भेट दिली. त्यामुळे सकाळच्या माझ्या या उद्योगामध्ये आणखी एका उद्योगाची भर पडली. जेव्हा जेव्हा पाण्यामुळे पाय दुखायचे त्याच्या दुसऱ्या दिवशी मी सायकल घेऊन फिरायला बाहेर पडत असू. आजूबाजूच्या बऱ्याच ठिकाणी तीस ते पन्नास किलोमीटरचे फेरफटके मी या काळात मारले. यात अतिशय क्वचित असा खंड पडत होता. एक दिवस मी सलग दहा किलोमीटरची धाव पूर्ण केली! पाय बऱ्यापैकी दुखत होते पण मैलाचा आणखी एक दगड पूर्ण केल्याचे समाधान मात्र मिळाले. तोपर्यंत चार ते पाच महिने झाले होते. जसजसे नवनवे मैलाचे दगड पूर्ण होत होते तसतसे ध्येय जवळ येत असल्याची जाणीव होत होती. स्ट्रावामध्ये निरनिराळी ध्येय समोर ठेवत होतो. आणि पूर्ण देखील करत होतो. ध्येयपूर्तीचा तो आनंदच निराळा होता. एव्हाना मला माझ्या शारीरिक क्षमतेचा अंदाज यायला लागला होता. पुन्हा काही महिन्यांमध्ये मी पंधरा किलोमीटरची धाव देखील पूर्ण केली! त्यामुळे आत्मविश्वासाने पुढची पायरी गाठली होती. यावेळी मी लवकरच २१ किलोमीटरची धाव पूर्ण करेल याची खात्री वाटायला लागली. सप्टेंबर २०२३ पर्यंत तीन वेळा १५ किलोमीटरची धाव पूर्ण केली. आणि प्रत्येक वेळी आधीच्या पेक्षा कमी वेळ गाठली होती. दरम्यान सायकलिंगचा प्रवास चालूच होता. सकाळच्या धावण्याच्या आणि सायकलिंगच्या स्वतःसोबत चाललेल्या स्पर्धेमुळे एक निराळीच ऊर्जा शरीरामध्ये तयार झाली होती. ऑक्टोबरमध्ये आजवरची सर्वात लांबची धाव अर्थात १७ किलोमीटरची धाव पूर्ण केली. पाय मात्र दुखत होते. त्यावर उपाय म्हणून डॉक्टरच्या सल्ल्याने विटामिन बी१२ च्या गोळ्या सुरू केल्या. शाकाहारी लोकांमध्ये या जीवनसत्वाची कमतरता असल्याने पाय दुखतात, असे त्यांनी सांगितले. माझ्या या सर्व कार्यक्रमात मी बाहेरून शरीरात घेतलेले हे एकमेव ‘सप्लीमेंट’ होय. या पूर्ण प्रवासात मी एकाही प्रत्यक्ष मॅरेथॉन अथवा सायक्लोथॉनमध्ये सहभाग घेतला नाही. ध्येय होते यावर्षीच्याच पुणे हाफ-मॅरेथॉनमध्ये धावण्याचे. एका वर्षात स्वतःला ह्याच मॅरेथॉनसाठी तयार करण्याचे होते. पण काही कारणास्तव मला यामध्ये सहभागच घेता आला नाही. पण खात्री मात्र होती की मी २१ किलोमीटर नक्की पूर्ण करू शकलो असतो.
शंभर मीटर वरून २१ किलोमीटरपर्यंतचा धावण्याचा हा प्रवास दहा महिन्यांमध्ये झाला. ऊर्जेंची एक अद्वितीय अनुभूती २०२३ या वर्षांने मला दिली. एक अनोखी वाट जोपासायची संधी देखील याच वर्षात मिळाली. कदाचित पुढील वर्षी नव काहीतरी करता येईल, म्हणून हा प्रवास झाला असावा!

-   तुषार भ. कुटे