चि.वि. जोशींनी सत्तर एक वर्षांपूर्वी बाल मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली. विविध बालपात्राद्वारे त्यांना मुलांना छान छान गोष्टी सांगितल्या. त्यातीलच एक बालजोडी म्हणजे मोरू आणि मैना होय. या दोन्ही बहीण-भावांच्या बालकरामती त्यांनी "मोरू आणि मैना" या पुस्तकात रंगवल्या आहेत. अगदी बालसुलभ पद्धतीने मांडलेल्या गोष्टी कधी हसवितात तर कधी उपदेशाचे डोस पाजत असतात. त्यांची वाघाबरोबरची भेट, झालेली नजरानजर, दोघांचीही गुजरात भ्रमंती, तिथल्या गमतीजमती, मोरूची हास्यउपचार पद्धती व त्याने लिहिलेला उपसंहार इत्यादी विविध गोष्टी या पुस्तकात वाचण्यासारख्या आहेत.
Tuesday, March 31, 2020
Sunday, March 29, 2020
सोळा आणे
'सोळा आणे' हा चि.वि. जोशींचा १६ कथांचा कथासंग्रह. १६ गोष्टींमुळे त्यांनी
ह्या संग्रहात 'सोळा आणे' हे नाव दिलं आहे, हे वेगळे सांगणे नको!
सर्वसामान्य जीवनात घडणाऱ्या विविध छोट्या छोट्या घटनांना अशाप्रकारे
विनोदी अंगे असू शकतात, हे या कथांमधून जाणवते. यातील काही कथा लेखकाने
विद्यार्थीदशेत असताना लिहिल्या आहेत. त्यामुळे युवा वयापासूनच त्यांच्या
अंगात विनोदीपणा भरला आहे, हे यातून निश्चितच दिसून येते. काही कथा ३-४
पानात संपतील अशा लघुकथा आहेत. त्यामुळे मित्र श्रेणीतील हा कथासंग्रह
निश्चितच चेहऱ्यावर हसू आणणारा आहे.
Saturday, March 28, 2020
शिवछत्रपती: एक मागोवा
इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर
चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा
मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या
पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडेल. त्यांनी तत्कालीन समाज
पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा
डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की
कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली? शिवाजी महाराज व
संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते? या प्रश्नांच्या उत्तरांचासह संभाजी
महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व
येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय
शिवाजी महाराजांचे कुळ कोणते? तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते? याची
विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची
आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे
इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल.
Friday, March 27, 2020
निळावंती
मराठी भाषेतील एक गूढ पुस्तक म्हणजे 'निळावंती' होय. याच नावाचे पुस्तक
निसर्ग लेखक मारुती चित्तमपल्ली यांनी लिहिले आहे. त्याच्या जुन्या
पुस्तकाशी तसा काही संबंध नाही. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या विविध
नियतकालिकात प्रकाशित झालेल्या कथांचा व लेखांचा संग्रह होय. आपल्या
सहजसुंदर भाषेत त्यांनी निसर्गाला शब्दबद्ध केले आहे. मुंग्या, कोल्हा,
कीटक, रानउंद्रे, तांबट, मोर अशा पक्षी-प्राणी सृष्टीची एक वेगळी ओळख या
पुस्तकातून होते. शेवटचे दोन लेख "पक्ष्यांपासून माणसाला काय शिकता येईल?" व
"जंगल: आपला मित्र" हे प्रत्येकाने वाचावे, असेच आहेत. निसर्ग लेखकाची खरी
दृष्टी या लेखनातून दिसून येते. मानवा इतकंच प्राणी-पक्ष्यांचे व निसर्गाचे
जग अद्भुत आहे, हेच मारुती चितमपल्ली या छोटेखानी पुस्तकातून दर्शवतात. या
पुस्तकाचे एक पान सोबत जोडले आहे ते नक्की वाचा.
Thursday, March 26, 2020
फार फार वर्षांपूर्वी
फार वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे लाखो व कोटी वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे.
एका गोष्टीत रहस्य आहे, गुढ आहे, विज्ञान आहे, संशोधन आहे शिवाय उत्तरही
आहेत. निरंजन घाटे यांचे हे पुस्तक अशाच लाखो-करोडो वर्षांपासून पडलेल्या
विविध प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे आपल्याला देतं. निरंजन घाटे हे हाडाचे
विज्ञानलेखक. त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांनी लिहीलेले सर्वच
लेख आपल्याला मानववंशशास्त्र, पुराणवास्तुशास्त्र, हवामान शास्त्र व
इतिहासाची माहिती करून देतात. पृथ्वीचा इतिहास हा करोडो वर्षांचा असला तरी
बहुतांशी तो फक्त मागील दोन हजार वर्षांचाच पुस्तकात मांडलेला दिसतो.
परंतु, तत्पूर्वी मनुष्य जीवन कसे होते? व त्यांनी प्रगतीची पावले कशी पुढे
टाकली? याचे वर्णन निरंजन घाटे यांनी या पुस्तकात केले आहे.
मानववंशशास्त्र व पुरातनवास्तूशास्त्र या विज्ञानशाखा किती सखोल आहे,
त्याची प्रचिती हे पुस्तक देतं. संशोधन कसं करावं व त्याला किती विविध पैलू
असू शकतात? या प्रश्नांची उत्तरेही आपल्याला विविध घटनांतून मिळतात.
पुस्तकातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांना याठिकाणी मांडत आहे.
- पुरातन काळी मनुष्य हा मांसाहारी, शाकाहारी होता की प्रेताहरी? याचं सप्रमा स्पष्टीकरण त्यांनी या पुस्तकात दिलं आहे.
- आदिमानवाचा शेती विषयक, पर्यावरण विषयक, आरोग्यविषयक प्रवास कशा प्रकारे झाला?
- समुद्रात शेकडो मैलांवर असणाऱ्या इस्टर आयलँड वरील पुतळ्यांचं गूढ काय?
- चंद्रावती नावाचं अतिसुंदर शहर भारतात होतं. परंतु परकीय आक्रमकांनी त्याची नासधूस करून विद्रूप करून टाकलं.
- उत्खननात सापडलेली हाडे ही मानवशास्त्रात अभ्यास करण्यासाठी सर्वात मोठा पुरावा मानले जातात. त्यांचे महत्त्व व रोमांचकारी इतिहास इथे मांडला आहे.
- चिली व दक्षिण अमेरिकेत अनेक प्राचीन कलाकृती आहेत. माया संस्कृतीत बनवलेल्या या कलाकृतींचे रहस्य काय?
- ऑस्ट्रेलियातील डायनासोर्स संशोधन.
- डायनासोर, ट्रायनोसॉर म्हणजे काय?
- चीनमधल्या ड्रॅगनच्या हाडांच्या शोधामागचा रोमांचकारी प्रवास.
- युरोपातल्या प्राचीन अटलांटिस शहराच्या समृद्धीतेची वर्णने आजही केली जातात. ते पाण्याच्या तळाशी स्थित आहे.
- वृक्षवर्तुळावरून वृक्षांचे वय व त्या काळची हवामान स्थिती ओळखण्याची अचूक शास्त्र.
- व्हिएतनाम, कंबोडिया मध्ये एकेकाळी हिंदू राजे राज्य करीत होते. परंतु परकीय आक्रमकांमुळे त्यांची संस्कृती लयास गेली. आजही त्यांच्या सांस्कृतिक पाऊलखुणा दोन्ही देशात सापडतात.
- मानवशास्त्रज्ञ डग्लस औसली यांनी आजवर सर्वाधिक अचूकतेने या विज्ञानाचा वापर करून दाखवला आहे.
- रेण्विक पुरानशास्त्र म्हणजे काय? त्याचा वापर कसा करता येतो?
- आदिमाता अर्थात आपल्या सर्वांच्या एकमेव मातेचा शोध कसा घेतला गेला याची कहाणी.
- आपण सारे होमोसेपियन एकाच आईची लेकरे आहोत. पण आज लाख वर्षानंतर आपापसात कितीतरी भेदभाव तयार झालेत.
- आफ्रिके पासून अलिप्त असणाऱ्या अमेरिका खंडात मानव पोहोचला कसा? याचे शास्त्रीय उत्तर.
अशा
विविध प्रकारची माहिती व त्याची उत्तरे निरंजन घाटे यांनी या पुस्तकात
दिली आहेत. पारंपरिक इतिहास व विज्ञानापलीकडे जाऊन वाचण्यासारखे हे
निश्चितच वेगळे पुस्तक आहे.
Wednesday, March 25, 2020
ओसाडवाडीचे देव
ओसाडवाडी नावाचं सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात एक गाव असतं. इथले लोक
अवली आहेतच. देवही जागृत असतात. मारुती, गणपती, नवलाई सटवाई आणि महादेव हे
ओसाडवाडीचे मुख्य दैवत. सर्वच जागृत देव भक्तांच्या हाकेला लगेच ओ देत
असतात. याच पार्श्वभूमीवर रंगवलेला चि. वि. जोशी यांचा हा कथासंग्रह होय.
पु.लंची बटाट्याची चाळ, द.मां.ची भोकरवाडी, निलेश साबळेची थुक्रटवाडी तशीच
ही चि.विं.ची ओसाडवाडी होय! विशेष म्हणजे ओसाडवाडीचा त्यांचा हा पूर्ण
कथासंग्रह देवांच्या विविध करामतींनी रंगलेला आहे. भक्तांच्या हाकेला ओ
देऊन सर्व देव आपल्या अंगातली ताकद दाखवतात व त्यातूनच बऱ्याच गमतीजमती
तयार होत असतात. कधी हनुमान सर्कशीचे खेळ दाखवतो, कधी शिपायी होतो, कधी
वाईसाठी बॅटिंग करतो तर कधी पुण्यातल्या आपल्या भाऊबंदांना भेटून येतो. हीच
परिस्थिती गजाननाची आणि त्याच्या उंदीर मामाची आहे. १९४६ झाली प्रसिद्ध
झालेला हा कथासंग्रह आजही तितकाच हसविणारा आहे.
Tuesday, March 24, 2020
शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?
महाराष्ट्रात असे फार क्वचितच इतिहासकार असतील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिले नाही. शिवरायांवर लिहिलेल्या हजारो पुस्तकांपैकी हेही एक छोटेखानी पुस्तक. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. खरतर शिवचरित्रापासून या अगणित गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, ज्या एका पुस्तकातून मांडणं केवळ अशक्य आहे. जयसिंगराव पवारांनी त्यांच्या लेखमालेतून शिवचरित्रातील काही अंग इतिहासकाराच्या नजरेतून उलगडून दाखवले आहेत. त्यामुळे शिवप्रेमी व अभ्यासकांसाठी हे निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल. मराठा इतिहासाचे ज्येष्ठ संशोधक प्रा. न.र. फाटक म्हणाले होते इतिहासाला चार मुख्य शत्रू असतात, ते म्हणजे नाटककार, कादंबरीकार, सिनेमावाले व राजकारणी लोक! त्यांच्या काळात टीव्ही नव्हता अन्यथा पाचव्या शत्रूचीही त्यात भर पडली असती. त्यांचे म्हणणे मात्र शंभर टक्के खरे आहे. खरा इतिहास जाणून घेणाऱ्यांनी या पाच शत्रुंपासून दूर राहायला हवे.
डॉ. पवारांनी शिवचरित्राचे काही महत्त्वपूर्ण पैलू या पुस्तकातून सादर केले आहेत ते इथे नमूद करू इच्छितो.
- शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. परंतु ते केवळ हिंदूंचेच राजे होते का? इस्लामी जनतेविषयी त्यांचा दृष्टिकोन कसा होता? या प्रश्नांची उत्तरे इतिहासकारांच्या नजरेतून आपल्याला मिळतात.
- शिवरायांना रयतेचा राजा मानले जात. इतर बादशहा प्रमाणे त्यांची त्यांनी स्वतःलाच रयतेचा राजा मानले नव्हते. तर रयतेने त्यांना खर्या अर्थाने राजा म्हणून स्वीकारले होते. हे ऐतिहासिक पुराव्यांतून डॉ. पवारांनी सिद्ध केले आहे.
- शिवछत्रपती हे मराठा आरमाराचे किंबहुना भारतीय आरमाराचे खरे जनक होय. सागरावर राज्य प्रस्थापित करणे किती महत्त्वाचे आहे, हे ते जाणून होते. इतिहासाच्या पुस्तकात नसणाऱ्या विविध आरमार मोहिमांची माहिती या पुस्तकातून होते. शिवाय स्वतः आरमाराच्या गलबलातून प्रवास करून मोहीम फत्ते करणारे शिवाजी महाराज हे पहिले व शेवटचे मराठी राजे होत!
- सुरतेच्या हल्ल्याच्यावेळी शिवाजी महाराजांवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचे तपशीलवार वर्णन या पुस्तकात सापडेल. शिवाय सुरतेच्या दोन्ही छाप्यांव्यतिरिक्त त्यांनी इतरही अनेक मुघलांच्या समृद्ध बाजारपेठांवर सातत्याने हल्ले केले होते. त्याचा सारांश या पुस्तकात उपलब्ध आहे.
- शिवराज्याभिषेक ही इतिहासातील एक मोठी घटना होती. त्यासाठी त्यांना किती दिव्ये पार पाडावी लागली होती. अनेक शतकांनंतर इस्लामी राजवटीत असलेल्या भारतात एक हिंदुराजा सार्वभौम छत्रपती झाला होता.
- छत्रपतींचे व इंग्रजांचे एकंदरीत राजकीय संबंध कसे होते? यावरील डॉ. पवारांचा तपशीलवार लेख आहे. इतिहासातील अनेक अज्ञात गोष्टी या माध्यमातून अभ्यासकांना निश्चितच समजतील. शिवाय सिद्धी, पोर्तुगीज, डच या पश्चिमेकडून आलेल्या अन्य परकीय शक्तींचा शिवाजी महाराजांनी कसा सामना व वापर केला याचीही माहिती या पुस्तकात आहे.
- शिवरायांच्या सर्व सेनानीपैकी हंबीरराव मोहिते हे असे सेनापती होते, ज्यांनी स्वराज्याच्या पहिल्या दोन्ही छत्रपतींची कारकीर्द प्रत्येकी सात वर्षे पाहिली. त्याबद्दलही इतिहासात बरीच कमी माहिती सापडते. त्यांनी ठरवले असते तर आज इतिहास वेगळा असला असता. परंतु स्वराज्य निष्ठावंत असणाऱ्या हंबीररावांनी खंबीरपणे राज्याची सेवा केली अनेक मोहिमांमध्ये विशेषत: संभाजीमहाराजांच्या काळात त्यांनी शत्रूला नामोहरम करून सोडले होते. कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेतले होते. त्यांच्यावरील सर्वात विस्तृत लेख या पुस्तकात सापडतो. तो निश्चितच वाचनीय आहे.
- शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमांची माहिती आजही सर्वसामान्य शिव अभ्यासकांना नाही. तंजावर, जिंजीची स्वारी, व्यंकोजी बरोबरचे युद्ध व वाटाघाटी यासंबंधी बरीचशी माहिती डॉ. पवारांनी त्यांच्या लेखांतून दिली आहे.
एकंदरीतच शिवाजी महाराजांच्या नीतीकौशल्याची, युद्धकौशल्याची व राज्यकौशल्याची तपशीलवार आढावा घेणारे काम हे पुस्तक निश्चित करते यात शंका नाही.
Friday, March 20, 2020
बोरी बाभळी : चि. वि. जोशी
विनोदी कथालेखक ही चि. वि. जोशी यांचा हा वेगळा कथासंग्रह होय. यात केवळ
विनोदीच नाही तर काही विचार करायला लावणाऱ्या वैचारिक कथा देखील आहेत.
छोट्या छोट्या प्रसंगांना विनोदी अंगाने सादर करण्याची जोशी यांची कला याही
कथासंग्रहात दिसून येते. शिवाय भीषण भिकारी, गतवैभवाचे ठसे यांसारख्या
कथांमधून त्यांनी काही वेगळे विषयी उत्तमरीत्या हाताळण्याचे दिसते.
Subscribe to:
Posts (Atom)







