Showing posts with label G. A. Kulkarni. Show all posts
Showing posts with label G. A. Kulkarni. Show all posts

Sunday, November 24, 2024

अमृतफळे- जीए कुलकर्णी

त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, त्याचप्रमाणे तुमच्याही पूर्ण होवोत. आभाळातून तीन फळे पडली. एक फळ हे कहाणी सांगणाऱ्याला, दुसरे फळ ती ऐकणाऱ्याला आणि तिसरे फळ तिचा मान ठेवणाऱ्याला. असं सांगून जीए आपल्या परीकथा पूर्ण करतात.

यापूर्वी जी.ए. कुलकर्णी यांचं ‘ओंजळधारा’ हे अशाच पठडीतलं परिकथांचे पुस्तक वाचनात आलं होतं. अर्थात या पुस्तकातून जीए मला पहिल्यांदा समजले. लहानपणी अशा कथा वाचत व ऐकत असू. पण या पुस्तकातून त्या आपल्याला पुन्हा एकदा वाचायला मिळतात. ‘अमृतफळे’ या पुस्तकातील बहुतांश कथा ‘अँपल ऑफ इममॉर्टलिटी’ या लिओ सुमेलियन यांनी लिहिलेल्या पुस्तकातील अनुवादित कथा आहेत. 

आटपाट नगर होतं! तिथे एक राजा राहत होता. त्याला एक राजपुत्र किंवा राजकन्या होती. काही राजांना अनेक राजपुत्र वा अनेक राजकन्या होत्या. असं सांगून या कथा पुढे सरकतात. प्राचीन राजांच्या राज्यातून भटकंती करत जादूचे करिष्मे दाखवत शेवटाकडे नेतात. अर्थात शेवट गोड असतो. राजकुमाराने राजकन्येला प्राप्त केले असते किंवा अमृतफळे मिळवलेली असतात. अशा धाटणीच्या कथा या पुस्तकांमध्ये वाचता येतात. त्यांचा वेग प्रचंड आहे. प्रत्येक घटना, प्रसंग वेगाने सरकत शेवटाकडे जातो. यातून बरीच अद्भुत पात्रे आपल्याला भेटतात. अर्थात केवळ मनुष्यच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे पशु-पक्षी देखील आपल्याला भेटून जातात. परिकथा आली म्हणजे पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव त्या कथेचा भाग असतो. हे या पुस्तकातून आपल्याला समजते. प्रत्येक कथा ही आपल्या स्वप्नाचा भाग देखील असू शकते. वाचक राजकुमार किंवा राजकन्येच्या जागी स्वतःला ठेवून पुस्तक वाचू शकतो. म्हणजेच परिकथा वाचण्यासाठी लहान होण्याची आवश्यकता नाही! आजही या पुस्तकाद्वारे आपण त्या विश्वात रममान होण्याचा निश्चित प्रयत्न करू शकतो.

Saturday, March 14, 2020

ओंजळधारा

जी. ए. कुलकर्णी यांचा मी वाचलेला हा पहिलाच कथासंग्रह. 'आधारित कथा' असे उपशीर्षक या पुस्तकाला देण्यात आले आहे. सर्वच कथा या 'परिकथा' या प्रकारात मोडणाऱ्या आहेत. मराठीतल्या 'फॅन्टसी' प्रकारात मोडणारे हे साहित्य मानता येईल. प्रत्येक कथेचा वेग मात्र प्रचंड आहे. कुठेही पाल्हाळ न लावता सहज समजणाऱ्या व सुटसुटीत कथा हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. एकूण बारा कथा या पुस्तकात आहेत. काही कथांवर पूर्ण चित्रपट तयार होईल इतपत त्या दीर्घ आहेत. पहिल्याच कथेत अर्थात 'तीन सोनेरी केस' या कथेने 'जी. एं'च्या लेखन कौशल्याची चुणूक आम्ही अनुभवली. परिकथेची आवड असणार्‍यांनी वाचावे असेच हे पुस्तक आहे.