Thursday, January 8, 2026

हाकामारी - हृषिकेश गुप्ते

हाकामारी या भूतांमधल्या एका वेगळ्या पात्राबद्दल नारायण धारप यांच्या कादंबरीतून पहिल्यांदा वाचले होते. त्यानंतर इंटरनेटवरच्या काही छोट्या छोट्या कथांमधून ही हाकामारी समोर आली. हृषिकेश गुप्ते यांच्या "हाकामारी" या लघुकादंबरीतून तिची पुनश्च ओळख झाली. मागच्या वर्षी याच लेखकाची "काळजुगारी" ही कादंबरी वाचली होती. त्यांची लेखन शैली ही वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आजच्या अनेक लेखकांपैकी अतिशय कमी लेखकांना वाचकांना असे खिळवून ठेवता येते. ही कादंबरी वाचायला घेतल्यानंतर अगदी दीड तासांमध्येच समाप्त झाली.


लेखकाने स्वतःचे बालपण केंद्रस्थानी ठेवून कथेची मांडणी केली आहे. कथा निम्म्यापर्यंत येऊनही हाकामारीचे कोणतेही लक्षण दिसत नाही! परंतु त्यानंतर जसजशी कथा पुढे सरकते तसे विविध प्रसंग वाचकांच्या मनावर पकड घ्यायला लागतात. हाकामारीची एन्ट्री होते. पुन्हा काही कारणास्तव कथा एका वेगळ्या दिशेला सरकते. ही किंबहुना भरकटलेली दिशा पुन्हा कथेला योग्य मार्गावर आणून ठेवते आणि हाकामारी परत चर्चेला येते. शेवटाकडे जाताना एका अनपेक्षित प्रसंगाने आपण हादरून जातो. आणि या प्रसंगाची तसेच हाकामारीची सांगड घातलेली आपल्याला समजते. अनेक प्रश्न मग आपल्या मनाला पडतात. आणि नंतर लेखकच वेगवेगळ्या शक्यतांचा आधार घेत या प्रश्नांची उत्तरे आपल्याला देऊ लागतो. एका अर्थाने आपल्या शोधक मनाचा तो ताबाही घेतो. त्यामुळेच ही गोष्ट रंजक बनलेली आहे. कथा वेगाने पुढे सरकते म्हणूनच एकदा पुस्तक हातात घेतले की खाली ठेववत नाही. 
भयकथा वाचकांसाठी ही एक सुंदर लघुकादंबरी आहे.

--- तुषार भ. कुटे

#book #review #marathi #pustak #suspense



Tuesday, January 6, 2026

झाला आनंद आली बहार !

तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का की, एखादा विषय सतत डोक्यात घोळत राहतो. त्यावर आपण अनेकदा विचार मंथन करतो. आपले विचार देखील सातत्याने विविध ठिकाणी मांडत राहतो आणि एक दिवस एका चित्रपटाच्या माध्यमातून आपले सर्व विचार पडद्यावर दिसायला लागतात....  
आमचं सांगायचं झालं तर "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" या चित्रपटाद्वारे असंच काहीतरी आमच्या बाबतीत घडलं. हेमंत ढोमेने या चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासूनच चित्रपट प्रदर्शित होण्याची आम्ही चातकासारखी वाट पाहत होतो. तो प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पहायचा होता. परंतु काही कारणास्तव शक्य झाले नाही.
का कुणास ठाऊक पण चित्रपट पडद्यावर सुरू झाला, श्रेय नामावली दिसायला लागली आणि हलकेच माझ्या स्वतःच्या शाळेच्या आठवणी जागृत झाल्या. नकळतपणे डोळ्यांमध्ये पाणी तरळू लागले होते. एका अर्थाने अगदी पहिल्या सेकंदापासून मी चित्रपटांमध्ये गुंतून जाऊ लागलो. हा चित्रपट मराठी शाळांच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य करतो. याविषयी सर्वांनाच कल्पना आहे. परंतु मराठी भाषा हा विषय केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा पुढे सरकते, असे मला जाणवले. मागच्या काही वर्षांपासून आपल्या भाषेविषयीची मतमतांतरे विविध माध्यमांद्वारा प्रसूत होताना दिसतात. उत्तरेकडील राज्यांमधून महाराष्ट्रात होणारी स्थलांतरे आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये इंग्रजी माध्यमाचं वाढत चाललेलं प्रस्थ या दोन बाबींमुळे महाराष्ट्रामध्ये मराठीचं अस्तित्व धोक्यात आलेले आहे. दोन्ही गोष्टी एका अर्थाने राजकारणाशी निगडित. परंतु यातील दुसरी गोष्ट अर्थात मराठी शाळांची अवस्था हा ही सर्वसामान्य लोकांच्या हातात असलेली. मागच्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेल्या अनेक प्रसिद्ध आणि बड्या व्यक्ती या मराठी माध्यमातूनच शिकलेल्या आहेत. मराठी भाषेतून अर्थात आपल्या मातृभाषेतून त्यांनी ज्ञानग्रहण केले व प्रगतीचा मार्ग शोधला. परंतु जागतिक भाषा म्हणून उदयास आलेल्या इंग्रजीने नवपालकांना आकर्षित केले. शिक्षणाच्या गुणवत्तेपेक्षा त्यांना सुविधा महत्त्वाच्या वाटू लागल्या. आणि याच कारणास्तव मराठी शाळा बंद व्हायला लागल्या. इंग्रजी शाळेत किती ज्ञान मिळते? हा संशोधनाचा विषय आहे. परंतु स्टेटसचा विषय तयार झाल्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. अशाच एका बंद होत असलेल्या शाळेसाठी उभ्या ठाकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची गोष्ट या चित्रपटामध्ये अत्यंत प्रभावीपणे हेमंत ढोमे याने मांडलेली आहे. चित्रपट एका सामाजिक प्रश्नावर भाष्य करत असला तरी देखील अनेक प्रसंग विनोदी ढंगाने दाखवलेले आहेत. शाळेतल्या जुन्या आठवणी ताजे करणारे प्रसंग आपल्याला भूतकाळात घेऊन जातात. आठवणींमध्ये रमायला लावतात. आणि हलकेच पापण्यांच्या कडा ओलावतात देखील... 
एक गोष्ट मात्र खरी की भाषा वाचवायची असेल तर सर्वप्रथम त्या भाषेच्या शाळाच वाचवायला हव्यात. आपण ज्या भाषेतून शिकलो त्या भाषेविषयी मनामध्ये अत्युच्च प्रमाणात आपुलकी असते. आणि म्हणूनच ही भाषा पुढच्या पिढीकडे जाते. परंतु शाळाच टिकल्या नाही तर भाषा टिकणे अत्यंत अवघड आहे. असा मोलाचा संदेश हा चित्रपट आपल्याला देतो. इंग्रजी बोलणं हे एक कौशल्य आहे. त्याकरता मातृभाषेतील शिक्षणाचा गळा अनेक पालक घोटताना दिसत आहेत. बाकी कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर सर्वांच्याच भूमिका दमदार आहेत. त्यातही अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांना तोडच नाही. दिग्दर्शन आणि संवाद लेखनासाठी १०० पैकी १०० गुण.
आज हा चित्रपट चार कोटींचा गल्ला प्राप्त करून घोडदौड करत आहे. तरी अजूनही इंटरनॅशनल स्कूलच्या बाबतीत आग्रही असणाऱ्या अनेक पालकांनी हा चित्रपट पाहिला नसावा. त्यांनी चित्रपटगृहात जाऊन किमान हा चित्रपट पहावा, हीच अपेक्षा. हा एक केवळ चित्रपट नाही तर डोळे मिटून दूध पिणाऱ्या महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा यशस्वी प्रयत्न आहे. तो फक्त मनोरंजनासाठी किंवा मराठी चित्रपटांचा प्रसार करण्यासाठी बघू नका.... त्यातून बोध घ्या आणि आचरणात देखील आणा... 
इतकी उत्तम कलाकृती सादर केल्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांचे शतशः आभार... 

--- तुषार भ. कुटे


 

Saturday, January 3, 2026

ट्युरिंग अवॉर्ड: संगणक विश्वातील सर्वोच्च सन्मान

आजच्या आधुनिक युगात आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे तंत्रज्ञान वापरतो, त्यामागे अनेक महान बुद्धिमंतांची तपश्चर्या आहे. आपण वापरत असलेला स्मार्टफोन असो, इंटरनेट असो किंवा विविध ॲप्स, या सर्वांचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 'ट्युरिंग अवॉर्ड' दिला जातो. संगणकशास्त्र किंवा कॉम्प्युटर सायन्सच्या क्षेत्रातील हा जगातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर, विज्ञानात ज्याप्रमाणे 'नोबेल' पारितोषिकाला महत्त्व आहे, तितकेच महत्त्व संगणक विश्वात ट्युरिंग अवॉर्डला आहे. त्यामुळेच याला 'संगणक क्षेत्रातील नोबेल' असेही संबोधले जाते.

या पुरस्काराचे नाव ॲलन ट्युरिंग या महान ब्रिटीश गणितज्ञाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ॲलन ट्युरिंग यांना आधुनिक संगणक शास्त्राचे जनक मानले जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीने तयार केलेला अत्यंत अवघड 'एनिग्मा' कोड तोडून त्यांनी दोस्त राष्ट्रांचा विजय सुकर केला होता आणि लाखो लोकांचे प्राण वाचवले होते. एवढेच नाही, तर आज आपण ज्या 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा करतो, त्याची मूळ संकल्पना अनेक दशकांपूर्वी त्यांनीच मांडली होती. त्यांच्या या अफाट बुद्धिमत्तेचा आणि योगदानाचा आदर करण्यासाठी हा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.

हा प्रतिष्ठित पुरस्कार 'असोसिएशन फॉर कम्प्युटिंग मशिनरी' (ACM) या संस्थेकडून दरवर्षी प्रदान केला जातो. या पुरस्काराचे स्वरूपही तितकेच भव्य आहे. विजेत्याला सन्मानचिन्हासोबत १० लाख अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच भारतीय चलनुसार सुमारे ८ कोटी रुपयांची रक्कम दिली जाते. या बक्षीसासाठी गुगलसारख्या बड्या कंपनीकडून आर्थिक साहाय्य केले जाते. हा पुरस्कार मिळवणे ही कोणत्याही संगणक शास्त्रज्ञासाठी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी असते. हा पुरस्कार अशाच व्यक्तीला दिला जातो, ज्याने संगणक तंत्रज्ञान क्षेत्रात केलेले संशोधन हे केवळ तात्पुरते नसून त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा आहे.

या पुरस्काराने आजवर अनेक दिग्गजांना सन्मानित करण्यात आले आहे, ज्यांच्या कामामुळे तुमचे आणि आमचे आयुष्य सुखकर झाले आहे. उदाहरणार्थ, 'सर टिम बर्नर्स-ली' यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे, ज्यांनी 'वर्ल्ड वाइड वेब'चा (WWW) शोध लावला. आज आपण इंटरनेटवर जी कोणतीही माहिती पाहतो, ती त्यांच्यामुळेच शक्य झाली आहे. त्याचप्रमाणे, विंट सर्फ आणि बॉब कान यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे, ज्यांना 'इंटरनेटचे जनक' म्हटले जाते. त्यांनी संगणकांना एकमेकांशी जोडण्याची पद्धत विकसित केली. तसेच, 'C' लँग्वेज आणि युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम बनवणारे केन थॉम्पसन आणि डेनिस रिची यांचाही यात समावेश आहे. अलिकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि 'डीप लर्निंग'मध्ये क्रांती घडवणारे योशुआ बेंगियो, जेफ्री हिंटन आणि यान लिकुन यांनाही या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ राज रेड्डी यांना १९९४ मध्ये ट्युरिंग अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात, विशेषतः संगणकाला मानवी भाषा आणि दृश्ये समजून घेण्यास मदत करणाऱ्या तंत्रज्ञानात, मोठे योगदान दिले आहे.

शेवटी, ट्युरिंग अवॉर्ड हा केवळ एक पुरस्कार नसून तो मानवी कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्तेचा उत्सव आहे. ज्या संशोधकांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर शून्यातून हे अवाढव्य डिजिटल विश्व उभे केले, त्या पडद्यामागच्या नायकांना हा पुरस्कार जगासमोर आणतो. ॲलन ट्युरिंग यांनी लावलेल्या ज्ञानाच्या रोपट्याचा आज जो विशाल वटवृक्ष झाला आहे, त्याचे प्रतीक म्हणजे हा पुरस्कार होय.

--- तुषार भ. कुटे

#AlanTuring #Turing #TuringAward #Marathi #Nobel


९९ वे मराठी साहित्य संमेलन

९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा झाली तेव्हाच ठरवले होते की यंदाच्या संमेलनासाठी साताऱ्याला जायचे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अमोलची तब्येत फारशी बरी नसल्याने आमचे नियोजन अधांतरीत होते. याही परिस्थितीमध्ये मार्ग काढत संमेलनाच्या चार दिवसांपैकी एका दिवशी जाणे आम्ही निश्चित केले. तो दिवस होता २ जानेवारी २०२६. 
सातारा पुण्यापासून फार फार तर सव्वाशे किलोमीटर अंतरावर. त्यामुळे दोन ते अडीच तासांचा रस्ता. सकाळी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जाण्याची आम्ही ठरवले होते. पुण्यातून निघता निघता साडेअकरा वाजले. मोशी होऊन कर्वेनगरला आणि कर्वेनगर होऊन थेट साताऱ्याच्या दिशेने प्रयाण केले. कालचा संमेलनाचा पहिला दिवस होता. त्यामुळे आजच्या दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी जम बसलेला असेल, असे वाटूनच आम्ही साताऱ्याच्या दिशेने प्रयाण केले. बऱ्याच महिन्यानंतर अमोल इतक्या लांबचा प्रवास करणार होता. त्यामुळे थांबत थांबतच आम्ही प्रवास करत होतो. दुपारी दोनच्या सुमारास साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमवर संमेलन स्थळी पोहोचलो. यापूर्वी सन २०२० मध्ये नाशिकला सर्वप्रथम साहित्य संमेलनाला उपस्थित राहता आले होते. साताऱ्यातील ही आमची दुसरी वेळ. तशी बऱ्यापैकी गर्दी होती. परंतु मागचे तीन वर्षे पुणे पुस्तक महोत्सवातील गर्दी पाहत असल्याने ही गर्दी फार काही वाटली नाही. पुस्तक प्रकाशकांचा आणि विक्रेतांसाठी एक डोम बनवला होता. पुण्यातील बहुतांश पुस्तक प्रकाशक या ठिकाणी होते. मागच्या तीन-चार वर्षांमध्ये बऱ्याच जणांशी ओळखी झालेल्या आहेत. आणि त्या दिवसेंदिवस वृद्धिंगत देखील होत आहेत. साकेत प्रकाशनाच्या स्टॉलवर मला मधुश्री पब्लिकेशनने माझे प्रकाशित केलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पुस्तक देखील दिसले. म्हणजे यावर्षीच्या साहित्य संमेलनामध्ये मी देखील अप्रत्यक्षरीत्या  तिथे होतो. मधुश्री पब्लिकेशनच्या स्टॉलवर शरद अष्टेकर देखील भेटले. इथे देखील माझे पुस्तक होते. अनेकांशी भेटीगाठी झाल्या. दुपारच्या सुमारास कवी संमेलन देखील होते. या ठिकाणी थोड्या वेळ बसण्याचा योग आला. साडेचारच्या सुमारास आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
पुण्याच्या दिशेने परतताना उताराचा रस्ता असल्याने तशी गाडीला चार्जिंग करण्याची गरज नव्हती. परंतु जोखीम न पत्करता एका हॉटेलपाशी चार्जिंग केली आणि परतीच्या मार्गाला लागलो.
पुढच्या वर्षी शंभरावे साहित्य संमेलन होणार आहे. आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की, ते पुणे अथवा पिंपरी चिंचवड सारख्या भागामध्ये व्हावे. आशा करूया की आमची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल.

--- तुषार भ. कुटे


 

Friday, January 2, 2026

दिवस संकल्पचा

एक जानेवारी अर्थात वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाच्या संकल्पचा दिवस देखील. बरोबर एक वर्षापूर्वी मी लिहून काढलेले संकल्प पुन्हा एकदा आठवले. त्यातले ५०% पेक्षा अधिक संकल्प देखील पूर्ण झाले नव्हते. तरीदेखील यावर्षी पुन्हा नव्याने, नव्या जोमाने संकल्प करायला सिद्ध झालो. वाचन, लेखन, आरोग्य आणि भ्रमंती याविषयीच बहुतांश संकल्प निगडित असतात. यावर्षी काही वेगळी परिस्थिती नाही. आपल्याला इतकेच पैसे मिळवायचे आहेत, असा काही संकल्प मी आजवर केलेला नाही. कदाचित याच कारणास्तव खोऱ्याने ओढता येईल इतका पैसा आमच्याकडे येत नाही. मागच्या दोन-तीन दिवसांपासून समाज माध्यमांवर विविध वर्तमानपत्रांच्या पानांवर कोणत्या राशीला शुभयोग आहेत? हे दाखवतायेत. त्यामध्ये माझी तूळ रास देखील आहे. या राशीला २०२६ मध्ये भरभराटीचा योग आहे, असं सर्वच ज्योतिषांचं म्हणणं आहे. माझा या ज्योतिषशास्त्रावर काडीचाही विश्वास नाही. पण तरी देखील आपल्या समाधानासाठी अशा गोष्टी मी देखील चवीने वाचतो. असो. आपले प्रयत्न करीत राहिलं की यश मिळतच, हे मी पक्क जाणून आहे. 
यावर्षीचा मुख्य संकल्प हा लेखनाचा आहे. मागच्या वर्षी तीन पुस्तकं लिहिली आणि प्रकाशित देखील झाली. ई-बुक्स विचार केला तर तीन-चार पुस्तक तर आरामात झाली होती. यावर्षी लिखाणाचा हा संकल्प अधिक वेगाने चालू ठेवायचा आहे. जी पुस्तकं मला यावर्षी लिहायची आहेत त्यांची मुखपृष्ठ तयार केले प्रिंट काढल्या आणि समोरच्या भिंतीवर लावून ठेवलेल्या आहेत. जेणेकरून मला सातत्याने या पुस्तकांची आठवण होत राहील. यावर्षी प्राकृत प्रकाशनाच्या प्रगतीकडे अधिक जोमाने लक्ष द्यायचे आहे. कमीत कमी २५ प्रिंट पुस्तके तरी बाजारात यावी, असा मानस आहे. वाचनाचा संकल्प विचारात घेतला तर यावर्षी अधिकाधिक पुस्तके वाचून काढू असं मनाशीच ठरवलं आहे. त्या दृष्टीने आज पहिल्याच दिवशी ऋषिकेश गुप्ते यांची दोन पुस्तकं वाचून काढली. त्यापैकी एक दीर्घकथासंग्रह तर दुसरी लघुकादंबरी होती. वाचनाला वेग तर येतो आहे. बघूया पुढे काय होतं ते. 
लिखाणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अन्य संगणक तंत्रज्ञानाशी निगडित बरेच विषय मनात घोळत आहेत. प्रिंट बुक नाही निघाल्या तरी यावर्षी निदान ई-बुक तरी प्रकाशित करायचं असं ठरवलं आहे. मागच्या वर्षी कमीत कमी बारा किल्ल्यांची भ्रमंती करावी असं ठरवलं होतं. परंतु प्रत्यक्षात केवळ एकाच किल्ल्यावर जाता आले. बारास एक हे गुणोत्तर अगदीच नगण्य आहे. कदाचित यावर्षी किमान १२ चा आकडा तरी पार करू असं वाटतंय. 
बऱ्याच गोष्टींचा दृश्यीकरण करणं अतिशय महत्त्वाचं असतं. ज्या मधून ती गोष्ट सातत्याने आपल्या मनावर ठासत राहते. म्हणूनच सर्व गोष्टी लिहून आणि सातत्याने डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न राहील. मागील वर्ष अतिशय खराब होतं. एकंदरीतच आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये घडलेल्या नकारात्मक घडामोडींमुळे २०२५ काही चांगले गेले नाही. परंतु २०२६ मध्ये परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होईल, अशी आशा आहे. बघूया नव्या सकारात्मक दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात तर झाली आहेत आता पुढची पावले अधिक आत्मविश्वासाने टाकता येतील.


--- तुषार भ. कुटे 

Thursday, January 1, 2026

“अनस्टॉपेबल अस” - खंड दुसरा

लाखो वर्षांच्या सेपियन्सच्या प्रवासामध्ये घडलेल्या घडामोडींचे वर्णन युवाल नोवा हरारी यांच्या ‘अनस्टॉपेबल अस’ या ग्रंथशृंखलेमध्ये अनुभवता येते. पहिल्या खंडामध्ये माणसाने जग कसं जिंकलं? या प्रश्नाचे उत्तर मिळाले. याच्याच पुढे जग न्याय का नाही? या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या खंडामध्ये मिळते.
मनुष्य हा पृथ्वीवरच्या इतर प्राण्यांमधील एक प्राणी असला तरीही त्याने आपल्या मेंदूच्या बळावर अकल्पित अशी प्रगती करून दाखवली. आणि या प्रगतीचा वेग अजूनही वाढतोच आहे. आपल्या मेंदूच्या बळावर त्याने पृथ्वीवर आणि पृथ्वीवरील अनेक प्राण्यांवर नियंत्रण मिळवले. यातूनच तो जग जिंकायला लागला. हजारो वर्षांच्या प्रगतीच्या कालखंडामध्ये अनेक चढ उतार अनुभवत माणसाने स्वतःचे साम्राज्य निर्माण केले आणि यातूनच न्याय-अन्यायाची संकल्पना उदयास झाली. अनेक समस्यांवर त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर तोडगा काढला. नवनवीन शोध लावले. त्यातून त्याचा आत्मविश्वास बळवला गेला. चांगल्या वाईट गोष्टींची जाण होत गेली. कोणता प्राणी आपल्यासाठी फायद्याचा आहे आणि कोणता नाही? त्याला कळायला लागले. हळूहळू तो शेती करू लागला. काही वर्षांमध्येच शेतीतील पिके देखील त्याच्या नियंत्रणाखाली आली. “ट्रायल अँड एरर” पद्धतीचा वापर करून तो शिकत गेला आणि स्वतःचं इतर प्राण्यांपेक्षा वेगळा अस्तित्व त्याने तयार केलं. हळूहळू त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होत गेले. दुष्काळ, पूर, प्राण्यांची रोग, माणसांचे रोग, असंतुलित आहार, कष्टाची काम, उपद्रवी कीटक, झाडांना होणारे रोग, युद्ध आणि गुलामगिरी यासारखी संकटे त्याने अनुभवली. त्यातूनही तो शिकला. माणसांमध्येही काही बुद्धिमान लोक राजे बनू लागले. इतर लोक हळूहळू त्यांचे गुलाम झाले. एक प्रकारची राज्यव्यवस्था तयार झाली. मालमत्ता नावाची संकल्पना उदयास साली. नोकरशाही तयार झाली. शिक्षणाची सुरुवात झाली. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी नियम तयार झाले. आणि यातूनच न्यायाची संकल्पना देखील उदयास आली. अर्थात हे नियम सर्वांनाच समान पद्धतीने लागू झाले नाहीत. लाखो लोक अतिशय थोडक्यात लोकांचं अर्थात राजांचं, नेत्यांचं ऐकू लागले. हेच राजे नेते न्याय देणारे ठरले. परंतु न्यायाची संकल्पना समानतेकडे झुकली नाही. कदाचित आजही समाजव्यवस्थेतील ही परिस्थिती बदललेली नाही.
अशा विविध गोष्टींचा ऊहापोह करण्याचे काम रंगीत चित्रांद्वारे “अनस्टॉपेबल अस” च्या या खंडामधून होते. इतिहास हा नेहमी शिकवणारा असतो, बोध देणारा असतो. अर्थात इतिहासाच्या मांडणीतूनच तयार झालेला हा ग्रंथ बऱ्याच वेगवेगळ्या शिकवण्या देतो. आणि कदाचित याही पुढे आपली प्रगती न थांबविणारा सेपियन “अनस्टॉपेबल” म्हणूनच राहील, असे दिसते.

पुस्तकाचे नाव: अनस्टॉपेबल अस - खंड दुसरा 
लेखक: युवाल नोआ हरारी 
अनुवाद: प्रणव सखदेव 
प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन

— तुषार भ. कुटे


 

Friday, December 26, 2025

आर्टिफिशियल इंटेलिजन्स: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानव यांच्या सहअस्तित्वाचे कोडे

मागच्या जवळपास दोन वर्षांपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये होत असलेल्या नवनवीन तंत्र उदयाचा, घडामोडींचा आणि वेगवान स्पर्धेचा अभ्यास करताना या तंत्रज्ञानाची भविष्यातील व्याप्ती माझ्या ध्यानात यायला लागली होती. हे तंत्रज्ञान मानवी प्रगतीसाठी वरदान ठरत आहे, परंतु दुसऱ्या बाजूला त्याचे नवनवे धोके देखील निर्माण होताना दिसत आहेत. एआयचे पितामह जेफ्री हिंटन यांनी याविषयी आधीच जनजागृती सुरू केलेली आहे. परंतु त्याचा फारसा प्रभाव झालेला दिसत नाही. युवाल नोवा हरारी, स्टीफन हॉकिंग यांच्यासारख्या विद्वानांनी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकासाबाबत विविध मुद्दे उपस्थित केलेले आहेत. निक बॉस्ट्रॅम यांच्या सुपरइंटेलिजन्स या पुस्तकामधून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भविष्यातील वापर अधिक ठळकपणे समोर यायला लागला. या तंत्रज्ञानाबद्दल जुजबी माहिती असली तरी आजही आपण भारतीय त्याबद्दल फारशा गांभीर्याने बोलत नाही, किंबहुना विचारही करत नाही. म्हणूनच या गोष्टींचा उहापोह करण्यासाठी हा पुस्तकरुपी यज्ञ मी हाती घेतला.
आपण एका अशा युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, जिथे मानवी इतिहासाला कलाटणी देणारी, आपल्या अस्तित्वाच्या मूलभूत व्याख्यांना आव्हान देणारी आणि आपल्या भविष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकण्याची क्षमता असलेली एक नवीन शक्ती उदयास येत आहे – ती शक्ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. काही दशकांपूर्वी विज्ञानकथांचा विषय वाटणारी ही संकल्पना आज आपल्या दैनंदिन जीवनाचा, आपल्या अर्थव्यवस्थेचा, आपल्या समाजाचा आणि आपल्या जागतिक राजकारणाचा अविभाज्य भाग बनली आहे. आपल्या हातातील स्मार्टफोनपासून ते आपल्याला सेवा देणाऱ्या चॅटबॉट्सपर्यंत, आणि वैद्यकीय निदानापासून ते स्वयंचलित वाहनांपर्यंत, कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या अवतीभवती, अनेकदा आपल्या नकळत, कार्यरत आहे. तिचा विकास थक्क करणाऱ्या वेगाने होत आहे आणि तिची क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे.
ही प्रगती निःसंशयपणे अनेक संधी आणि फायदे घेऊन येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये मानवाच्या अनेक मोठ्या समस्या (उदा. रोगराई, गरिबी, हवामान बदल, अज्ञान) सोडवण्याची, आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्याची, वैज्ञानिक शोधांना गती देण्याची, आणि मानवी क्षमतांना एका नव्या उंचीवर नेण्याची अफाट क्षमता आहे. हे सर्व पाहता, एका उज्ज्वल आणि समृद्ध भविष्याची आशा पल्लवित होते.
परंतु, या नाण्याच्या दुसरी बाजूही तितकीच, किंबहुना अधिक, महत्त्वाची आणि विचार करायला लावणारी आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची ही वाढती शक्ती आणि स्वायत्तता आपल्यासोबत काही अत्यंत गंभीर आणि मूलभूत प्रश्न घेऊन येत आहे. जर यंत्रे मानवापेक्षा अधिक बुद्धिमान झाली, तर काय होईल? त्यांच्यावर आपले नियंत्रण राहील का? त्यांची ध्येये मानवी मूल्यांशी आणि हितांशी सुसंगत असतील का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा अनियंत्रित वाटणारा विकास आपल्याला एका अशा भविष्याकडे तर घेऊन जात नाहीये, जिथे मानवजातीचे स्थान, तिचे स्वातंत्र्य, तिची ओळख आणि कदाचित तिचे अस्तित्वच धोक्यात येईल?
"आर्टिफिशियल इंटेलिजन्स: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानव यांच्या सहअस्तित्वाचे कोडे" हे पुस्तक याच गंभीर आणि काहीशा अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांचा ऊहापोह करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. या पुस्तकाचे शीर्षक जाणीवपूर्वक काहीसे धक्कादायक आणि विचारप्रवर्तक ठेवले आहे. 'मानवतेचा अंत' याचा अर्थ केवळ पृथ्वीवरून मानवी प्रजातीचा शारीरिक विनाश होणे, असाच मर्यादित नाही. तो त्याहून अधिक व्यापक आणि सूक्ष्म असू शकतो. तो कदाचित आपल्या स्वातंत्र्याचा, आपल्या स्वायत्ततेचा, आपल्या निर्णयक्षमतेचा, आपल्या अस्तित्वाच्या उद्देशाचा, किंवा 'मानव' म्हणून असलेल्या आपल्या अद्वितीय ओळखीचाही अंत असू शकतो. हे पुस्तक या विविध शक्यतांचा, त्यांच्यामागील कारणांचा, आणि त्यांच्या संभाव्य परिणामांचा शोध घेण्याचा प्रयत्न करते.
या पुस्तकाचा उद्देश केवळ भीती निर्माण करणे किंवा निराशावाद पसरवणे हा नाही. तसेच, तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीला विरोध करणे हाही नाही. तंत्रज्ञानाचा विकास हा अटळ असतो, आणि त्याला थांबवणे शक्य नसते. पण त्याला योग्य दिशा देणे, त्याचे नियमन करणे, आणि त्याचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचवताना त्याचे धोके कमी करणे, हे आपल्या हातात नक्कीच असते. या पुस्तकाचा उद्देश आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या विषयाबद्दल समाजात एक सखोल, माहितीपूर्ण आणि चिकित्सक चर्चा सुरू व्हावी. आपण ज्या शक्तिशाली तंत्रज्ञानाची निर्मिती करत आहोत, त्याच्याबद्दल आपण अनभिज्ञ किंवा उदासीन राहून चालणार नाही. आपल्याला त्याचे स्वरूप, त्याची क्षमता, त्याच्या मर्यादा, आणि त्याचे संभाव्य धोके यांची स्पष्ट जाणीव असायला हवी.
या पुस्तकातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी सखोल माहिती वाचकांना मिळेलच परंतु याबरोबरच हे तंत्रज्ञान काय करू शकते? तसेच त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असावा? मानव आणि एआयचा समन्वय कसा साधता येईल? या सर्व प्रश्नांची सुटसुटीत उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी सातत्याने जाणून घेण्यासाठी उत्सुक असणारे वाचक पुस्तक वाचून झाल्यानंतर याकडे पाहण्याचा एक समर्पक दृष्टिकोन तयार करतील, अशी मला आशा आहे. 

--- तुषार भ. कुटे

#एआय #मराठी #पुस्तक #मधुश्री_पब्लिकेशन #tusharbkute 


 

Friday, December 19, 2025

पायथॉन प्रोग्रॅमिंग : नवीन आवृत्ती

"पायथॉन प्रोग्रॅमिंग" या पुस्तकाच्या सुरुवातीच्या आवृत्त्या संपल्यानंतर नवीन पुस्तकामध्ये काही गोष्टी नव्याने समाविष्ट करायच्या होत्या. त्याकरिता सध्या पायथॉन प्रोग्रॅमर म्हणून नव्याने तयार झालेल्या नोकऱ्यांकरता आवश्यक असलेल्या मूलभूत कौशल्यांवर काम करायला सुरुवात केले. आणि त्यातूनच पायथॉन तंत्रज्ञान विकासातील आणखी काही टप्प्यांचा विचार केला. याचाच वापर करून हे नवीन मुद्दे पुस्तकाच्या नव्या आवृत्तीमध्ये समाविष्ट केले. उदाहरणार्थ, विविध प्रकारचे एडिटर्स, पीप, मेन्यू बेस्ड प्रोग्रॅम्स, पॅकेज मॅनेजमेंट अशा विविध संकल्पनांचा या पुस्तकामध्ये समावेश करून नवीन आवृत्ती यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये प्रकाशित केली आहे. आधीच्या आवृत्त्यांची असणारी तीनशे रुपये किंमत याही आवृत्तीमध्ये तशीच ठेवलेली आहे. पायथॉन ३.१४ प्रकाशित झाल्यानंतर त्यातील नव्या संकल्पनांचा आधार घेऊन या पुस्तकामध्ये आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. 
सध्या तरी पायथॉन प्रोग्रॅमिंगची ही नवीन आवृत्ती पुणे पुस्तक महोत्सवामध्ये बुकविश्वच्या स्टॉल क्रमांक एच ५६ वरच उपलब्ध आहे. पायथॉन शिकण्यासाठी उत्सुक असणारे वाचक या सुधारित नवीन आवृत्तीची या ठिकाणावरून खरेदी करू शकतात.

--- तुषार भ. कुटे